एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याचे आदेश दिले. माननीय अमरु बिन आस(र.)आदेश मिळताच प्रेषितदरबारी हजर झाले. आदरणीय प्रेषितांनी म्हटले,
‘‘मी तुम्हाला एका मोहिमेवर रवाना करीत आहे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्ही सुरक्षित राहाल आणि बरीच संपत्ती तुमच्या पदरी येईल.’’
माननीय अमरु(र.)यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले,
‘‘हे प्रेषित! मी संपत्ती मिळविण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला नसून केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी इस्लामचा स्वीकार केला आहे.’’
‘‘पवित्र संपत्ती पवित्र आचरण असणार्या व्यक्तीकडे येणे उत्तम आहे.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून माननीय अमरु बिन आस(र.)आनंदाने मोहिमेवर रवाना झाले. त्यांना आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी ‘मर्दे स्वालेह’ अर्थात ‘शुद्ध आचरण असलेले पुरुष’ या नावाने संबोधित केले.
माननीय अमरु बिन आस(र.)हे इस्लामच्या आरंभ काळातील अशा शूरवीरांपैकी आहेत ज्यांच्या शौर्य, युद्धकौशल्य, दमदार नेतृत्व आणि विवेकशील युद्धनीतिमुळे इस्लामी शासनास स्थैर्य लाभले. ते कुरैश कबिल्याचे सुपुत्र होत. त्यांची वंशावळ अशी आहे.
‘अमरु पिता आस पिता वायल पिता हाशिम पिता सईद पिता सहम पिता अमरु पिता हसीस पिता कआब पिता नुवैयी पिता गालिब.’
त्यांच्या मातेचे नाव ‘नाबिगा’ असे होते. त्यांचे पिता ‘आस बिन वायल’ हे कबिल्याचे सरदार व न्यायाधीश होते. तसेच ते अतिशय श्रीमंत असल्याने समाजात त्यांचे वर्चस्व होते. ते इस्लामचे कट्टर विरोधी होते. ते मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवीत नसत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांचे कथन आहे की, ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे सुपुत्र ‘कासिम’ आणि ‘अब्दुल्लाह’ यांचे बालपणातच निधन झाले, तेव्हा याच ‘आस बिन वायल’ यांनी उपहासात्मक विधान काढले की,
‘मुहम्मद(स.) यांची वंशवेल समाप्त झाली. त्यांचा एकही पुत्र त्यांचा वारसा चालविण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. आता मुहम्मद(स.) वारले की लोकांचा पिच्छा आपोआपच सुटेल.’ याच प्रसंगी दिव्य कुरआनाची ‘सूरह-ए-कौसर’ अवतरली आणि यामध्ये ईश्वराने आपल्या लाडक्या प्रेषितांच्या सांत्वनास्तव घोषणा केली की, ‘हे प्रेषिता! आपला वारसा निश्चितच चालू राहील. तुम्ही शोकाकुल होऊ नका. ज्यांनी तुमच्यावर उपहासात्मक वाक्य काढले, त्यांचीच वंशवेल आम्ही संपवीत आहोत.’
आणि खरोखरच! आदरणीय प्रेषितांचा उपहास करणार्यांची वंशवेल संपूनच गेली. त्यांच्या वंशाचा कोणीच वारसदार शिल्लक राहिला नाही.
इस्लामच्या या अतिकठोर द्वेष्ट्याच्या घरात इस्लामसाठी जीवन अर्पण करणारे माननीय अमरु बिन आस(र.)जन्मले होते. अमरु बिन आस(र.)हे आदरणीय प्रेषितांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. त्यांच्या इस्लामद्रोही पित्याने त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले होते. म्हणूनच ते शिक्षण व प्रशिक्षण घेऊन उच्चदर्जाचे युद्धनीतिज्ञ बनले. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा इस्लामद्वेषाचा पित्याचा हा वारसा बर्याच काळापर्यंत सुरु ठेवला.
त्यांचे धाकटे बंधू माननीय हिश्शाम बिन आस(र.)यांनी मात्र इस्लामच्या प्रारंभी काळातच इस्लाम स्वीकारला आणि इस्लामद्रोह्यांच्या छळ आणि अमानवी यातनांना बळी पडले. शेवटी त्यांनी ‘अॅबीसीनिया’ कडे स्थलांतर केले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जोरदार विरोध केला. त्यांनी इस्लामी लष्कराबरोबर घनघोर युद्ध केले.
आपल्या इस्लामस्वीकृतीचा वृत्तांत त्यांनी स्वतःच या शब्दांत मांडला,
‘‘मी ‘एहजाब’च्या युद्धातून परत येत असताना आपल्या हाताखालील तमाम लोकांना निमंत्रित करून सांगितले की, ईश्वराची शपथ! आपण किती जरी प्रयत्न केले तरी मुहम्मद(स.) यांची भूमिका निश्चितच दृढ आणि न्यायनिष्ठ वाटते. तसेच ते नेहमीच आपल्यापेक्षा प्रभावी ठरतात. मुहम्मद(स.)च्या काही सोबत्यांनी ‘अॅबीसीनिया’ देशात राजा ‘नेगूस’चा आश्रय घेतला आहे. आपणही तेथेच स्थायिक होऊ या. येथे मुहम्मद(स.) च्या प्रभुत्वाखाली राहण्यापेक्षा राजा ‘नेगूस’ च्याच आश्रयात राहणे श्रेयस्कर आहे. या ठिकाणी(अर्थात मक्का शहरात) आपल्या समाजाने जर मुहम्मद(स.) यांचा पराभव केला, तरी राजा ‘नेगूस’चे आपल्याबरोबर चांगलेच वर्तन राहील. कारण आपण श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक आहेत.’ माझ्या या विचारावर सर्वच सहमत झाले. मग आपसात सल्लामसलतीत निर्णय झाला की, आपल्याकडील प्रसिद्ध आणि मूल्यवान असलेली वस्तू अर्थात उच्च दर्जाचे चामडे आपण राजाला भेट म्हणून देऊ. तो आपल्यावर खूप प्रसन्न होईल. म्हणून आम्ही विपुल प्रमाणात चामडे घेऊन अॅबीसीनियाकडे निघालो. अॅबीसीनियात पोहोचताच आमची गाठ माननीय इब्ने उमैया(र.)यांच्याशी पडली. त्यांना आदरणीय प्रेषितांनी काही कामानिमित्त राजा नेगूसकडे पाठविले होते. आम्ही राजा नेगूसच्या दरबारी पोहोचलो. मी राजा बेगूसला नीतिनीयमाप्रमाणे साष्टांग नमस्कार केला. त्याने माझे स्वागत करून विचारले, ‘आमच्यासाठी काही विशेष भेट आणली काय?’ आम्ही उच्चदर्जाचे सोबत आणलेले चामडे त्याच्या समोर ठेवले. राजा खूप प्रसन्न झाला. मग मी त्यास म्हणालो, ‘‘राजवर्य! आपल्याकडे आमच्या शत्रू(अर्थात आदरणीय प्रेषित(स.) ने पाठविलेला माणूस आलेला आहे. त्यास(अर्थात माननीय इब्ने उमैया(र.)) ठार करण्याकरिता आमच्या स्वाधीन करावे. त्याने आमच्या बर्याच प्रतिष्ठितांना त्रास दिला आहे.’’ माझे हे वाक्य ऐकून राजा नेगूस अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपला हात आपल्या माथ्यावर मारला. त्याच्या या कृत्याने मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. मी म्हणालो,
‘‘हे राजन! मला याची पूर्वकल्पना असती की, माझ्या बोलण्याचे आपणास इतके वाईट वाटेल, तर मी बोललोच नसतो. क्षमस्व!’’ राजा नेगूस क्रोधित होऊन म्हणाला, ‘‘तुम्ही एका अशा पुरुषाच्या सोबत्यास माझ्या हातून ठार करू इच्छिता ज्यावर आदरणीय मूसा(अ.) या प्रेषिताप्रमाणेच दिव्य बोध होतो.’’
मी प्रश्न केला, ‘‘हे राजन! खरोखरच हे सत्य आहे काय?’’ बादशाह उत्तरला, ‘‘अमरु! तुम्ही खरोखरच दुर्दैवी आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे. तुम्ही त्यांना शरण जा. त्यांचे अनुकरण स्वीकारा. ज्याप्रमाणे मूसा प्रेषितांनी ‘फॅरो’ या क्रूर बादशाहाचा पराभव केला होता, त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करतील. म्हणून तुम्ही माझ्या हातावर आदरणीय प्रेषितांच्या सत्य धर्माची दीक्षा घ्यावी.’’ असे म्हणून राजा नेगूस याने आपला हात पुढे केला आणि मी त्याच ठिकाणी इस्लामचा स्वीकार केला. माझ्या विचारातही अभूतपूर्व क्रांती घडून आली होती. दरबारातून मी सरळ आपल्या सवंगड्यांकडे आलो. त्यांच्यासमोर मी इस्लाम स्वीकारण्याची घटना जाहीर केली नाही आणि सरळ मदीनाकडे प्रस्थान केले. रस्त्यात माननीय खालिद बिन वलीद(र.)व उस्मान बिन तलहा(र.)भेटले आणि मी त्यांना विचारले, ‘‘हे खालिद कोठे निघालात?’’ ‘‘ईश्वराची शपथ! आम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडे इस्लाम स्वीकारण्यासाठी निघालो आहोत. मग आम्ही एकत्र प्रेषित दरबारी पोहोचलो. आधी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी प्रेषितांकडून इस्लामची दीक्षा स्वीकारली मग मी प्रेषितांजवळ जाऊन म्हणालो,
‘‘हे प्रेषित! मी इस्लाम स्वीकारण्यासाठीच हजर झालो. परंतु आपण माझे पाप आणि आपणास केलेला विरोध क्षमा करावा!’’
यावर प्रेषित म्हणाले, ‘‘हे अमरु! इस्लामचा स्वीकार केल्यावर ईश्वर संपूर्ण पाप माफ करतो आणि इस्लामसाठी केलेल्या स्थलांतरामुळेसुद्धा पुर्वी केलेले सर्व पाप धुवून निघतात.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून मला खूप मानसिक समाधान लाभले आणि मी तत्काळ इस्लामचा स्वीकार केला आणि मक्का शहरी परतलो.’’
परंतु आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना सोडून त्यांचे मन मक्का शहरात रमले नाही. त्यांनी काही दिवसांतच मदीनेस स्थलांतर करून प्रेषितांसोबत वास्तव्य केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांच्या सर्व लढायांपैकी सर्वांत महत्त्वाचे युद्ध म्हणजे इजिप्तवर केलेली यशस्वी चढाई होय. याच विजयपूर्ण युद्धाने इतिहासात त्यांची विशेष ओळख आहे. सीरियावरील महत्त्वपूर्ण विजयानंतर त्यांनी आपल्या लष्करी कारवाईचा मोर्चा इजिप्तकडे वळविला. यामध्ये त्यांनी अतिशय सुपीक आणि समृद्ध असलेले इजिप्त तर ताब्यात घेतलेच, शिवाय तराबलस आणि जवळपासच्या इतर प्रदेशांवरही सत्य धर्माचा झेंडा रोवून मानवजातीस अन्यायी व अत्याचारी सत्तेच्या जोखडातून मुक्त केले.
इजिप्त देशावर सुद्धा रोमन सम्राटाचा ताबा होता. रोमन सम्राटाच्या हातून ‘सीरिया’ हिसकावून घेतल्यामुळे तो इजिप्तमध्ये इस्लामी लष्करास पराभूत करण्याची जोरदार तयारी करीत होता. इजिप्तवर चढाई करण्यात मोठ्या अडचणी आणि समस्या असूनही माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांची परवानगी मिळविली. हिजरी सन १८ मध्ये माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तच्या ‘बेबीलॉन’ शहरावर हल्ला केला. घनघोर युद्धानंतर इस्लामी लष्कराने या शहराचा ताबा घेतला. यानंतर त्यांनी नाईल नदीवर वसलेले प्राचीन शहर ‘गरजुल’ बलाढ्य येथे लष्कर तैनात केलेले होते. या लष्कराने तब्बल एक महिण्यापर्यंत इस्लामी लष्करास झुंज दिली आणि शेवटी शरणागती पत्करली. या किल्ल्याच्या पायथ्याशी नाईल नदी वाहात असे. जहाजे आणि युद्धनौका किल्ल्याच्या मुख्य द्वारावर थांबत असत. अर्थात हे एक बंदरच होते. या किल्ल्यास ताब्यात घेतल्याशिवाय इजिप्त देशात पुढचा विजय मिळविणे अतिशय कठीण व जवळपास अशक्यच होते. माननीय अमरु(र.)यांनी या किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा बरेच दिवस चालू होता. किल्ल्याच्या रक्षणार्थ असलेल्या लष्कराने देखील खूप निकरीची झुंज दिली. इस्लामी लष्कराने केंद्रीय इस्लामी शासनाकडून मदतीसाठी आणखीन कुमक मागविली. माननीय उमर फारुक(र.)यांनी दहा हजारांचे लष्कर पाठविले . या लष्कराचे नेतृत्व माननीय जुबैर(र.)यांच्याकडे होते. त्यामुळे माननीय जुबैर(र.)यांनी किल्ल्याच्या खंदकाची पाहणी करून रणनीती आखली. तरीदेखील सात महिने उलटूनही किल्ला ताब्यात आला नाही. म्हणून माननीय जुबैर(र.)यांनी एक लांबलचक सोल घेऊन किल्ल्याच्या तटावर चढून आत शिरकाव केला. त्यांच्या मागे इस्लामी लष्करसुद्धा आत शिरले आणि आत जाऊन किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार उघडले. संपूर्ण इस्लामी लष्कर किल्ल्यात शिरले आणि इजिप्शियन सैन्याची तारांबळ उडाली. इजिप्शियन लष्कराने काही सामान्य अटी समोर ठेवून इस्लामी लष्कराबरोबर तडजोड केली. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा जास्त रक्तपात घडू नये या पवित्र हेतूने त्यांना अभयदान दिले. या किल्ल्याचे नाव ‘कसर-ए-शमा’ असे होते.
‘कसर-ए-शमा’ येथे काही दिवस वास्तव्य केल्यावर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे शहर ‘अस्कंदरीया’ कडे आपला मोर्चा वळविला. रस्त्यामध्ये ‘अश्मून’, ‘आलिया’, ‘कूम’, ‘माफूक’, ‘करयून’ आणि इजिप्तच्या आणखीन काही ठिकाणच्या फौजांनी इस्लामी लष्करास अयशस्वी झुंज दिली आणि पराभव पत्करला. अशा प्रकारे माननीय अमरु(र.)यांनी आपली यशस्वी घोडदौड चालूच ठेवली आणि ‘अस्कंदरीया’ शहरास धडक मारली. या शहरात तब्बल पन्नास हजाराचे रोमन लष्कर इस्लामी लष्कराचा सामना करण्यास सज्ज होते. शहरास चारही बाजुंनी उंच तटबंदी होती. हत्यारे आणि रसदसुद्धा मुबलक प्रमाणात रोमन लष्कराकडे होती.
शिवाय त्यांच्याकडे युद्ध नौकादेखील होत्या. ‘बलाजुरी’ आणि ‘मुकरीजी’ या इतिहासतज्ञांनी लिहिले की, येथील सेनापती ‘मकोकस’ हा इस्लामी लष्करास टक्कर देण्याच्या मनःस्थितीत नव्हता. कुशल योद्धा असल्याने आणि युद्धांचा दीर्घ अनुभव असल्याने इस्लामी लष्कराचे बळ त्याने ओळखले होते. तरीदेखील रोमन सम्राटाच्या मर्जीखातर त्यास हे युद्ध करणे भाग पडले. त्याला याची चांगलीच जाण होती की, रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले सीरिया आणि इतर भाग इस्लामी लष्कराने मोठ्या जिद्द आणि चिकाटीने हिसकावून घेतले होते. ते सहजासहजी इजिप्त सर केल्या वाचून श्वासही घेणार नाही. म्हणून त्याने माननीय अमरु(र.)यांच्याशी एक गुप्त करार केला की, हे युद्ध आमची मर्जी व इच्छा नसताना रोमन सम्राटाच्या आग्रहाखातर आम्ही करीत आहोत. बळजबरीच हे युद्ध आमच्यावर लादण्यात येत असून इच्छा नसतानाही आम्हास तुमच्याविरुद्ध लढावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या समाजाच्या लोकांना ठार करु नये. अशा प्रकारे हे युद्ध टळले आणि इस्लामी लष्कराशी तडजोड झाली.
या घटनेमुळे इजिप्त देशाच्या इतर शहरात राहणार्या रोमन नागरिकांचे धैर्य खच्ची झाले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इतर शहरांना ताब्यात घेण्यासाठी उमैर(र.), उकबा(र.)आणि खारजा(र.)यांच्या नेतृत्वात लष्करे रवाना केली. बर्याच ठिकाणी रोमन लष्कराशी त्यांचा सामना झाला आणि इस्लामी लष्कराने कोठेच माघार न घेता आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली. अशा प्रकारे अल्पशा काळातच संपूर्ण इजिप्त इस्लामी लष्कराने रोमन सम्राटाकडून हिसकावून तेथील जनतेच अन्यायमुक्त केले.
इजिप्तवर विजय मिळविल्यानंतर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी आपला मोर्चा ‘बरका’ कडे वळविला. ‘बरका’ हा अतिशय दाट वस्तीचा आणि इजिप्त व पश्चिमी तराबलसच्या दरम्यानचा सुपीक प्रदेश होता. परंतु या ठिकाणी इजिप्तचेच शासन होते. ‘बरका’मध्ये दाखल होताच माननीय अमरु(र.)यांनी येथील सर्वांत महत्त्वाचे केंद्रीय शहर ‘अन्ताबलस’ ला लष्करी वेढा दिला. परंतु येथील नागरिकांनीसुद्धा युद्धाच्या भानगडीत न पडता हे शहर इस्लामी लष्कराच्या स्वाधीन केले. ‘बरका’ ताब्यात घेतल्यावर माननीय अमरु(र.)यांनी ‘उकबा बिन नाफेअ(र.)यांना ‘जवेला’कडे लष्करी कारवाईसाठी रवाना केले. हे शहर सुडानच्या सीमेवर होते. मागील युद्धातील पराभवामुळे आणि इस्लामी लष्कराच्या सहिष्णुतावादामुळे, तसेच त्याच्या उदार नीतीमत्तेमुळे तेथील रहिवाशांनीसुद्धा युद्ध न करताच रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासन व्यवस्था पसंत केली आणि हे शहर इस्लामी लष्कराच्या अधिपत्याखाली आले. यानंतर माननीय अमरु(र.)यांनी आपला मोर्चा रोमन सागराच्या किनार्यावरील आणि आफ्रिका प्रदेशातील ‘तराबलस’कडे वळविला. तराबलसवासियांना इस्लामी लष्कराची वार्ता मिळताच त्यांनी किल्ल्यात आश्रय घेतला. अमरु बिन आस(र.)यांनी पूर्वेकडे पाडाव टाकून पूर्ण किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा पूर्ण दोन महिन्यांपर्यंत होता. परंतु शहरात प्रवेश करण्याचा कुठलाच मार्ग निघत नव्हता. योगायोगाने इस्लामी लष्कराचे काहीजण शिकारीसाठी गेल्यावर त्यांची दृष्टी किल्ल्याकडे जाणार्या एका मार्गावर पडली. तसेच त्यांना हेदेखील आढळून आले की, समुद्र आणि किल्ल्यादरम्यान कोणतीच तटबंदी नाही. त्यांनी याची भौगोलिक परिस्थिती अमरु बिन आस(र.)यांना तत्काळ कळविली. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच मार्गाने शहरात पूर्ण लष्करासह प्रवेश केला आणि रोमन लष्कराची दानादान उडविली. दोन्ही सैन्यांत घनघोर युद्ध झाले आणि त्यांचा इस्लामी लष्करासमोर टिकाव लागला नाही. शत्रूपक्षाने इस्लामी लष्करासमोर शरणागती पत्करली.
‘तराबलस’ वर विजयी पताका रोवून माननीय अमरू बिन आस(र.)यांनी तेथेच तळ ठोकून लष्कराचा एक दस्ता ‘तराबलस’ पासून थोड्या अंतरावर असलेल्या ‘सबरा’ शहराकडे पाठविला. हा दस्ता शहरात दाखल झाला आणि येथील सुरक्षा दलाने इस्लामी लष्करासमोर आत्मसमर्पण केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांनी लाखो चौरस मैल क्षेत्रावर इस्लामी शासनाचा झेंडा रोवला आणि आता ते ‘अस्कंदरीया’पासून शेकडो मैल दूरवर एका अशा ठिकाणी वास्तव्यास होते जेथे पाणी कमी हते आणि प्रवासही खडतर होता. परंतु त्यांचे मनोबल खूप कणखर आणि मजबूत होते. आता त्यांना आपली विजयी दृष्टी ट्यूनेशिया, अलजझायर आणि मोरॅक्कोकडे वळली. त्यामुळे त्यांना इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांना पत्र पाठविले की, ‘‘आम्ही ‘तराबलस’पर्यंतचा भाग ताब्यात घेतला. आता येथून टयूनेशिया, अलजसायर आणि मोरॅक्को फक्त नव्वद दिवसांच्या अंतरावर आहे. परवानगी असेल, तर आम्ही या प्रदेशावरही इस्लामी राज्य स्थापन करू. माननीय उमर फारुक(र.)यांनी पत्राचे उत्तर देताना लिहिले,
‘’अफ्रिकया(ट्यूनेशिया, अलझझायर व मोरॅक्को) मध्ये प्रवेश करू नका. हा प्रदेश उपद्रव आणि वैरभावाचे केंद्र आहे. तेथील लोक संघटित नसतात. तेथील पाणीच असे आहे की, त्यास पिणारा माणूस हा कठोरहृदयी होतो.’’ याचबरोबर माननीय अमरु बिन आस(र.)यांना माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपालपद बहाल करण्याचीदेखील घोषणा केली. अस्कंदरीयावर ताबा मिळविल्यानंतर बरेच रोमन लोक शहर सोडून रोमन सम्राटाच्या शहरात जाऊन वसले होते. त्यामुळे तेथील बरेच बंगले आणि हवेल्या रिकाम्या होत्या. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच ठिकाणी देशाची राजधानी बनविण्याची परवानगी माननीय उमर(र.)यांच्याकडे मागितली. परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी परवानगी दिली नाही आणि त्यांना लिहिले की,
‘‘मला योग्य वाटत नाही की, तुमच्या आणि माझ्या दरम्यान एवढी मोठी नदी आडवी असावी आणि एवढे मोठे अंतर असावे.’’
यानंतर माननीय अमरु(र.)यांनी ‘किस्तान’ नावाचे नवीन शहर उभारले आणि याच शहरास येथील इस्लामी सत्तेचे केंद्र बनविले. हे शहर अशा प्रकारे उभारण्यात आले, त्याचा सविस्तर वृतान्त शिबली नोअमानी(र.)या इतिहासतज्ञांनी ‘अल फारुक’ या ग्रंथात अशा प्रकारे सादर केला आहे,
‘‘माननीय अमरु(र.)हे ‘अस्कंदरीया’हून ‘कसर-ए-शमा’ येथे आले. अस्कंदरीयावरील हल्ल्याच्या वेळी ठोकण्यात आलेले तळ अजूनही तसेच रिकामे पडलेले होते. म्हणून त्यांनी याच तळावर नवीन शहर वसविले. प्रत्येक कबिल्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि ‘मआविया बिन खदीज’, ‘शरीक बिन समी’, ‘अमरू बिन मख्जूम’ आणि ‘इब्ने नाशेरा’ यांना नगररचना करण्याची जबाबदारी सोपविली. येथे एक विशाल ‘जामा मस्जिद’(केंद्रीय मस्जिद) उभारण्यात आली. या अतिविशाल मस्जिदीस तिन्ही बाजुंना द्वार बसविण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वार हे राजधानीच्या इमारतीच्या समोरच्या दिशेस ठेवण्यात आले. माननीय अमरु(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्यासाठीसुद्धा एका निवासाची इमारत उभी केली परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी लिहिले की, ‘‘त्याचे मी काय करणार.’’ म्हणून शेवटी ही विशाल वास्तु शहराच्या मुख्य बाजारपेठेसाठी वापरण्यास घेतली. हे शहर हिजरी सन २१ मध्ये उभारण्यात आले.’’
किस्तात शहर उभारण्यास सुरुवात झाली तेव्हाच माननीय अमरु(र.)यांनी शहराच्या समोर आणि नाईल नदीच्या पश्चिमी किनार्यावर एक अस्थायी स्वरुपाची छावणीदेखील उभारली. नंतर माननीय उमर फारुक(र.)यांनी अमरु बिन आस(र.)यांना आदेश पाठविला की, ‘‘शहराच्या चारही बाजूस भव्य तटबंदी उभी करा.’’ हा आदेश मिळताच अमरु बिन आस(र.)यांनी एका भव्य व अलिशान आणि मजबूत किल्ल्याची निर्मिती केली.
माननीय उमर फारुक(र.)यांनी इस्लामी राज्यांच्या सर्व राज्यपालांना आदेश दिला की, त्यांनी ‘हज’ च्या प्रसंगी मदीना शहरी यावे आणि संपूर्ण जनतेस आवाहन केले की, ‘‘जर नागरिकास एखाद्या राज्यपालाविरुद्ध तक्रार असेल, तर ती निर्भयतेने माझ्याकडे करावी.’’ एकदा माननीय उमर फारुक(र.)यांनी अशाच प्रसंगी लोकांना उद्देशून भाषण करताना म्हटले,
‘‘इस्लामी शासनाच्या जनवासियांनो! ज्या लोकांची मी तुमच्या राज्याचे राज्यपालपदी नेमणूक करतो, त्यांना या गोष्टीचा मुळीच अधिकार नाही की, त्यांनी तुम्हास चापट मारावी, तुमची संपत्ती बळकावावी किवा इतर कोणत्याही प्रकारे तुमचा छळ करावा. या उलट मी नेमलेल्या राज्यपालांची जवाबदारी आणि कर्तव्य हे आहे की, त्यांनी तुमच्या प्राण, संपत्ती आणि इभ्रतीचे रक्षण करावे आणि तुम्हाला आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या सत्यमार्गावर आचरणाची दिशा द्यावी. हे प्रत्येक राज्यपालाचे परम कर्तव्य असून ज्या राज्यपालाने या कर्तव्यात थोडी जरी कुचराई केली, त्याच्या बाबतीत निःसंकोचपणे तक्रार करावी. मी या तक्रारीची याच ठिकाणी गंभीर दखल घेऊन फिर्यादीस न्याय देईन.’’
एवढ्यात एक बिगरमुस्लिम इजिप्शियन उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘अमीरुल मुअमिनीन ‘अमरु बिन आस’ या राज्यपालाने मला विनाकारण शंभर कोरडे मारले.’’ माननीय उमर फारुक(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हीसुद्धा राज्यपालास शंभर कोरडे मारू शकता आणि ते देखील या सर्व उपस्थितासमोर!’ आणि मग राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांनी त्यास दोनशे दिरहम घेऊन ही शिक्षा माफ करण्याची विनंती केली व फिर्यादीने ती आनंदाने मान्य केली.
एकदा तर अतिशय विलक्षण घटना घडली. ती अशी की, इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे तक्रार आली की, इजिप्तचे राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांचा मुलगा ‘इब्ने अमरु’ याने घोडदौडीच्या प्रशिक्षण मैदानावर एका इजिप्शियन बिगर मुस्लिम रहिवाशास असे सांगून बदडले की, ‘मी मोठ्या बापाचा अर्थात राज्यपालाचा पुत्र असल्याने माझ्या सरावाच्या वेळी घोडेस्वारीसाठी येऊन मला त्रास देऊ नकोस.’
माननीय उमर फारुक(र.)यांनी फिर्यादीस आपल्याचकडे थांबवून घेतले. आणि इब्ने अमरु या आरोपीस तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. त्यांनी फिर्यादीच्या हातात कोरडा देऊन म्हटले,
‘‘या मोठ्या बापाच्या बिघडलेल्या पुत्राचा या कोरड्याने खरपूस समाचार घे. तुझा आत्मा शांत होईपर्यंत मारीत राहा!’’
फिर्यादीने हातात कोरडा घेऊन सर्वांसमक्ष ‘इब्ने अमरु’ अर्थात राज्यपालाच्या पुत्राला बदडण्यास सुरुवात केली. याचबरोबर माननीय उमर फारुक(र.)म्हणत होते,
‘‘मार! आणखीन मार, या मोठ्या बापाच्या लाडात बिघडलेल्या पुत्राला!! आणखीन मार!!!’’
फिर्यादीने त्यास मारुन झाल्यावर माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपाल असलले आरोपीचे वडील माननीय अमरु(र.)यांना फिर्यादीसमोर करून म्हणाले,
‘‘तुझी इच्छा असेल तर यांनादेखील चांगले बदडून काढ! याच मोठ्या बापाचा तो बिघडलेला पूत्र आहे!’’ परंतु फिर्यादी म्हणाला, ‘‘हे उमर(र.)! आता माझी तक्रार संपली. मला न्याय मिळाला!’’ आता माननीय उमर फारुक(र.)यांनी या दोन्ही बाप- लेकांना क्रोधपूर्ण शब्दात खडसावले,
‘‘याच्या आईने(अर्थात फिर्यादीच्या आईने) तर याला ‘स्वतंत्र’ मानवाच्या स्वरुपात जन्म दिला, तुम्ही केव्हापासून यास गुलाम बनविले?’’
माननीय उमर फारुक(र.)यांच्या या वाक्याचा अर्थ असा की, प्रत्येक माणूस हा स्वतंत्रपणे जन्मतो. अर्थात स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून त्याच्यावर अत्याचार करणे म्हणजे त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे व त्यास गुलाम बनविणे होय. इस्लामी शासनाच्या राज्यपालाच्या मुलालासुद्धा जनतेवर अत्याचार करण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून अत्याचारपीडितास समाधान होईपर्यंत आरोपीस शिक्षा मिळालीच पाहिजे. हाच इस्लामी शासनाचा नियम आहे. याच नियमामुळे जनतेने रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासनाची न्यायपूर्ण छत्रछाया स्वीकारली आणि जवळपास ७५ टक्के विश्व इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आले.
इजिप्तच्या इस्लामी राज्यपालपदी असताना माननीय अमरु बिन आस(र.)यांनी ‘नहरे अमीरुल मुआमिनीन’ हा कालवा बांधला. याचा संक्षिप्त इतिहास असा आहे की, हिजरी सन २१ मध्ये मदीना शहर आणि याच्या परिसरात भयंकर दुष्काळ पडला. नद्या-नाले पूर्णतः आटून गेले होते. परिणामी तेथील व्यापारसुद्धा बंद झाला. ही दुष्काळजन्य परिस्थिती हातळण्यासाठी उमर फारुक(र.)यांनी सर्व राज्यपालांना पाचारण केले. सर्व राज्यपालांनी मदीनासाठी भरघोस मदत केली. ‘इजिप्त’ मदीनापासून खूप दूर असल्याने तेथून मदत पोहोचू शकली नाही. म्हणून माननीय उमर(र.)यांनी त्यांना पत्र लिहिले की, ‘तत्काळ मदत पोहोचवावी.’
यावर माननीय अमरु(र.)यांनी उत्तर दिले की ‘हे अमीरुल मुअमिनीन, लवकरच मदत पाठवीत आहे. रसद घेऊन उंटाचा मोठा काफिला रवाना करीत आहे. तसेच समुद्र मार्गानेही रसद येण्याची आशा आहे.’
यानंतर त्यांनी ‘नहरे अमीरुल मुअमीनीन’ या विशाल कालव्याची निर्मिती केली. शेवटी संपूर्ण इजिप्त जिकून इस्लामी शासनास जोडणारा हा थोर सेनापती परलोक मार्गी रवाना झाला.
माननीय अमरु बिन आस(र.) – इजिप्तजेते
संबंधित पोस्ट
0 Comments