पूर्णपणे प्रेषितांना आज्ञांकित होणे हे अनुयायीसाठी अत्यावश्यक आहे. ही सर्वप्रथम गरज आहे श्रध्दावंत होण्याची. धर्मासाठी आणि दैवी नियमांसाठी हे आवश्यक आहे की प्रेषित जे काही सांगतील त्यास अनुयायींनी कुचराई न करता अंगीकारले पाहिजे. प्रेषित जे काही सांगतील अनुयायींना समजो अथवा न समजो, त्यांनी ते त्वरीत खरे आणि चांगले म्हणून स्वीकार केला पाहिजे. हा प्रेषितांचा दर्जा स्वतः अल्लाहनेच ठरवून दिलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘यांना सांगा की आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांचा आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी, जर यांनी ही पध्दत अंगीकारली असती की जेव्हा हे स्वतःवर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाजवळ क्षमायाचना केली असती, तर निःसंशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.’’ (कुरआन ४: ६४)
ही आज्ञाधारकता आणि शरणागती फक्त मौखिक स्वरूपाचीच नसावी तर ती प्रेषिताच्या आज्ञेला गांभीर्यपूर्वक आणि मनाने स्वीकार करणारी असावी. अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांच्या आज्ञांकित राहण्याबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘हे मुहम्मद (स)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रध्दावंत होऊ शकत नाहीत. जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत. मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनातदेखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावे.’’ (कुरआन ४: ६५)
हे स्वभाविकतः अत्यावश्यक आहे. वरील संकेतवचनात नमूद केलेली प्रेषिताची संकल्पना व्यतिरिक्त दुसरी अस्वाभाविक ठरेल. मनुष्य हा निर्माण केला गेला आहे मुळात अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकतेसाठीच फक्त! प्रेषित हे माध्यम आहे अल्लाहचे आदेश आणि संदेश जाणून घेण्यासाठी. म्हणून प्रेषितांचे पूर्णतः आणि गांभीर्यपूर्वक अनुकरण अनिवार्य आहे. हे खरे आहे की एखादी व्यक्ती रस्ता चालूनच एखाद्या ठिकाणी पोहचू शकते किंवा एखादा हवाई प्रवाशी विमानाने प्रवास करूनच हवाई प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे व्यक्ती अल्लाहचे मार्गदर्शन तोपर्यंत प्राप्त करूच शकत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स) यांचा सच्चा अनुयायी बनत नाही. कुरआन स्पष्ट करीत आहे की जेव्हा जेव्हा प्रेषितांनी त्यांच्या प्रेषित्वांची घोषणा केली, तेव्हा त्यांनी लोकांपासून अपेक्षा ठेवली की,
‘‘म्हणून तुम्ही अल्लाहच्या रोषचे भय बाळगा आणि माझे (प्रेषित) आज्ञांकित राहा.’’ (कुरआन २६: १२६)
खरे तर हे संकेतवचन स्पष्ट करीत आहे की अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकता यांना प्राप्त तेव्हाच करून घेता येईल जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांचे पूर्ण अनुकरण केले जाईल. प्रेषितच फक्त सांगू शकतात की अल्लाहचे आदेश काय आहेत आणि आपण त्यांना कसे आचरणात आणावेत. म्हणून तर अल्लाहने फक्त त्याचीच शरणागती पत्करण्यास सांगितले नाही तर त्याबरोबर प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारण्याचासुध्दा आदेश दिलेला आहे.
वस्तुतः प्रेषितांनी धर्माच्या बाबतीत जे काही सांगितले आहे ते सर्व अल्लाहकडून आहे, प्रेषितांची ही स्थिती त्यांच्या कार्याला आणखी जास्त महत्त्व प्रदान करते. म्हणून त्यांचे आज्ञांकित होणे (प्रेषितांची आज्ञा पाळणे) म्हणजे अल्लाहची आज्ञा पाळण्यासारखे कृत्य आहे.
‘‘हे मुहम्मद (स), आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगम्बर बनवून पाठविले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. ज्याने पैगम्बराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो पराडः मुख झाला तर आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठविले नाही.’’ (कुरआन ४: ७९-८०)
थोडक्यात, प्रेषित्वांवर श्रध्दा ठेवणे ही अत्यावश्यक अट आहे. प्रेषितांचे पूर्ण आज्ञापालन करण्यासाठी प्रेषितांचे अनुयायी वर वर आणि दिखाऊ आज्ञाधारकता दाखविणारे मुळीच नसतात. प्रेषितांवरील श्रध्देत थोडीसुध्दा चलबिचल ही श्रध्देच्या मुळावर घाव घालणारी ठरते. असे करणे हे दुसरे तिसरे काहीच नसून प्रेषितांच्या महान कार्याबद्दलचे घोर अज्ञान आहे. असा मनुष्य अज्ञानाच्या घोर अंधारात चाचपडत असतो.
0 Comments