मा. अनस (रजी.) यांचे निवेदन आहे, मला प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या प्रिय मुला! जर तू अशाप्रकारे जीवन पार पाडू शकशील की, तुझ्या मनात कोणाचे अनिष्ट चिंतन नसावे तर असेच जीवन व्यतीत कर. मग फर्माविले, ‘‘आणि हीच माझी पद्धती आहे. (की माझ्या मनात कोणासाठी खोट नाही) आणि ज्याने माझ्या आचरण शैलीशी प्रेम राखले तर नि:संशय त्याने माझ्याशी प्रेम राखले आणि ज्याने माझ्याशी प्रेम राखले, तो जन्नतमध्ये माझ्या सोबत राहील. (हदीस – मुस्लिम)
प्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे….
मा. अब्दुल्ला यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित (स.) यांच्याजवळ आला आणि तो प्रेषित (स.) यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘जे तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हंटले की ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्याच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी, पुरापेक्षा जास्त वेगाने सरसावून येतात. (हदीस – तिर्मिजी)
भावार्थ
एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्याच्या पसंतीस आपली पसंत, आणि त्याच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. ‘प्रिय’ ज्या मार्गावरून चालतो त्यास आपला जीवनमार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे. आणि बलिदानासाठी, प्राणार्पण करण्यासाठी सदैव तत्पर असावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ त्यांचे एक एक पाऊलचिन्ह व प्रत्येक मार्ग चिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार चालावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन केले, त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ ही प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे आणि ‘बद्र व हुनेन’ देखील त्यांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याचा परिणाम स्रfरद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टीचा मारा होईल. आर्थिक आघात हा सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी प्रेमाने केला जाऊ शकतो. इमानधारक मनुष्य अशा वेळी हा विचार करतो की अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही, आणि शेवटी मी एक गुलाम आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे, अशा प्रकारचे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करते. सैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम करून टाकते. प्रेषित (स.) यांनी असे सांगितले की, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य (अपेक्षित दर्जाचा) ईमानधारक होऊ शकत नाही, जो पर्यंत मी त्याच्या नजरेत, त्याचा पिता, त्याचे पूत्र, आणि सर्व माणसापेक्षा अधिक प्रिय न व्हावे. (हदीस – बुखारी, मुस्लीम)
मनुष्य इतर सर्वांचे प्रेम आणि निकडींना बाजूला सारून केवळ प्रेषित (स.) यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार होईल, तेव्हा समजून घ्या की तो खऱ्या अर्थाने मोमीन (ईमानधारक) आहे.
0 Comments