प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी ज्या शिकवणी दिल्या, त्यापैकी पाचवी शिकवण म्हणजे पारलौकिक जीवनावरील दृढ श्रद्धा होय. पारलौकिक जीवनासंबंधी ज्या गोष्टीवर श्रद्धा बाळगणे अगत्याचे आहे, त्या खालीलप्रमाणे,
एके दिवशी अल्लाह सर्व ब्रह्मांडाला व त्याने निर्मिलेल्या एकूण प्राणीमात्राला व वस्तूमात्राला नष्ट करून टाकील. त्या दिवसाला ‘कयामत’ (प्रलयकाळ) असे नाव आहे.
नंतर तो सर्वांना पुन्हा जिवंत करून दुसरे जीवन प्रदान करील. सर्वजण एके ठिकाणी ईश्वरासमोर आणले जातील. त्या दिवसाला ‘हश्र’ असे नाव आहे.
प्रत्येक माणसाने या जगातील जीवनात केलेल्या एकूण कर्माची नोंद असलेले दप्तर (अभिलेख) ईशन्यायालयात सादर केले जाईल.
ईश्वर प्रत्येक माणसाच्या पाप-पुण्याचे तंतोतंत मूल्यमापन करील. ईशतराजूत ज्याचे पुण्यकर्माचे पारडे पापकृत्याच्या पारड्यापेक्षा अधिक जड असेल त्याला क्षमा केली जाईल. उलट ज्याचे पापकृत्याचे पारडे, अधिक जड असेल त्याला शिक्षा होईल.
जे क्षमेस पात्र ठरतील, ते जन्नत (स्वर्ग लोक) मध्ये प्रवेश करतील व जे शिक्षेस पात्र ठरतील त्यांना ‘जहन्नम’ (नरकाग्नी) मध्ये झोकून दिले जाईल.
पारलौकिक जीवनावर ईमान व त्याची गरज आखिरत (पारलौकिक जीवन) वरील ही श्रद्धा जशी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सादर केली आहे, तशीच ती आधीच्या सर्व प्रेषितांनीही केली होती. प्रत्येक काळात ती श्रद्धा निष्ठापूर्वक बाळगणे मुस्लिम होण्यासाठी एक आवश्यक अट राहिली आहे. या श्रद्धेचा ज्यांनी इन्कार केला अथवा तिच्याबद्दल संशय बाळगला, त्याला आधीच्या सर्व प्रेषितांनी ‘श्रद्धाहीन’ (काफिर) ठरविले आहे. कारण अशा श्रद्धेविना ईश्वरास, त्याच्या ग्रंथास व त्याच्या प्रेषितांस मानणे अगदी अर्थहीन ठरते आणि माणसाचे संपूर्ण जीवन बिघडून जाते. अंतर्मुंख होऊन चिंतन केल्यास ही गोष्ट तुमच्या चटकन लक्षात येईल. एखादे कृत्य करण्यास तुम्हास सांगितले जाते, तेव्हा पहिला प्रश्न जो तुमच्या मनात उद्भवतो तो हाच की, ते कृत्य केल्याने कोणते हित प्राप्त होईल व ते टाळल्यास काय हानी होईल? असा प्रश्न मनात का उद्भवतो? त्याचे वास्तविक कारण असे आहे की माणसाचा उपजत स्वभावधर्म असा आहे की ज्या कृत्यापासून काहीच निष्पन्न होत नाही, असे कृत्य त्याला निरर्थक वाटते. जे केल्याने कसलाही लाभ वा हित साधणारे नाही अशी तुमची खात्री असल्यास, ते कृत्य करण्यास तुम्ही कधीही प्रवृत्त होणार नाही. त्याचप्रमाणे ज्यापासून कसलीही हानी नाही, असे ठामपणे वाटल्यास तशा गोष्टीचे पथ्य पाळण्यासही तुम्ही तयार होणार नाही. अशीच अवस्था संशयाबद्दलही असते. ज्या कृत्याचे फळ प्राप्त होणे अनिश्चित असेल ते करण्यास तुम्हाला स्वारस्य वाटणार नाही. तसेच एखादे कृत्य हानिकारक असण्याबद्दल शंका असेल तर त्यापासून अलिप्त राहाण्यास तुम्ही विशेष प्रयास करणार नाही. लहान मुलांवर नजर टाका. ते विस्तवाला का धरतात? विस्तव जाळणारी, भाजणारी वस्तू आहे या गोष्टीची खात्री त्यांच्या मनावर उमटलेली नसते. एवढ्याचसाठी ते असे करतात ना? ते विद्यार्जनाचे कष्ट का चुकवीत असतात? त्यांची वडीलधारी माणसे विद्येची जी महती व तिचे जे काही फायदे त्यांना सांगत असतात, ते सर्व त्यांच्या मनात पटत नाहीत. याचसाठी ते असे वागतात का? यावरूनच असा विचार करा की जी व्यक्ती आखिरत (पारलौकिक) वर श्रद्धा बाळगत नसेल तर ती ईश्वरेच्छेला व ईश्वरेच्छेनुसार आचरणाला निरर्थक व निष्फळ मानते. त्याच्या दृष्टीनुसार ईशआज्ञापालनाचा कोणताही लाभ नाही. तसेच ईश्वराची अवज्ञा केल्यास कसलीही हानी होणारी नसते. मग ईश्वराने आपल्या प्रेषितांकरवी व आपल्या ग्रंथाद्वारा दिलेले आदेश व आज्ञा यांचे पालन करणे त्याला कसे शक्य आहे? समजा, त्याने ईश्वराचे अस्तित्व मान्यही केले तरी असे मानणे व्यर्थ असेल कारण तो ईश्वराच्या आज्ञांचे पालन करणार नाही व तो ईश्वरेच्छेनुसार आचरण करणार नाही.
परंतु ही बाब येथेच संपत नाही. आणखी जरा विचार केलात तर तुम्हाला हे कळून चुकेल की, पारलौकिक जीवनावरील श्रद्धा बाळगणे अगर न बाळगणे या गोष्टीचा माणसाच्या जीवनावर अत्यंत निर्णायक ठसा उमटतो. आम्ही वर सांगितलेच आहे की, मनुष्यस्वभावधर्मच असा आहे की, तो कोणतेही कृत्य करण्याचा अगर न करण्याचा निर्णय त्या कृत्याच्या लाभ अगर हानीच्या दृष्टीने करीत असतो. एक मनुष्य असा आहे की, त्याची दृष्टी केवळ या जगातील लाभावर व हानीवर खिळलेली आहे. तो असे कोणतेही सत्कृत्य व पुण्य-कर्म करण्यास प्रवृत्त होणार नाही ज्यापासून या जगात कसलाही लाभ होण्याची आशा नाही. त्याचप्रमाणे असे दुष्कृत्य व पापकर्म करण्यापासूनही परावृत्त होणार नाही ज्यामुळे त्याला या जगात कसलीही हानी होण्याची भीती नाही. आता दुसरा एक असा मनुष्य घ्या, ज्याची दृष्टी आपल्या कृत्यांच्या व कर्माच्या अंतिम परिणामांवर खिळलेली आहे. तो या जगातील लाभ व हानी यांना हंगामी स्वरूप मानील व पारलौकिक जीवनातील चिरकाल स्वरूपाच्या हितांवर व हानीवर सतत दृष्टी ठेवून सन्मार्गाचा स्वीकार करील व कुमार्गाचा त्याग करील. या नश्वर जगात, सन्मार्ग अनुसरल्याने कितीही मोठे नुकसान झाले अगर कुमार्गाने कितीही मोठा लाभ होणार असेल तरी तो अविचल राहील. या दोन व्यक्तीत किती मोठा फरक पडला ते पाहा. एक मनुष्य सत्कृत्य या गोष्टीला मानतो की, या अल्प जीवनकाळात त्याचे फळ त्याला तेथेच मिळते. उदा. धनप्राप्ती, जमीन-जुमला मिळणे, हुद्दा व अधिकारप्राप्ती, नावलौकिक मिळणे, जनमाणसात कौतुक व प्रशंसा होणे व त्यामुळे समाधानाचा आस्वाद व आनंद प्राप्त होणे, तसेच इच्छावासनाची तृप्ती, पाशवी प्रवृत्ती तृप्त होणे इ. इ. तसेच असा मनुष्य दुष्कृत्य व कुकर्म अशाच कृत्याला मानील ज्याच्यामुळे कोणतीही हानी अगर दुष्परिणाम याच जीवनात घडून येतील अगर घडून येण्याचा संभव असेल. उदा. जीवित व वित्त हानी, आरोग्य नष्ट होणे, अपकीर्ति, शासनाकडून होणाऱ्या शिक्षा, कोणत्याही प्रकारचा त्रास, दुःख अगर औदासिन्य प्राप्त होणे वगैरे.
याच्या तुलनेत दुसरा मनुष्य सत्कर्म अशा गोष्टीस मानतो, जे केल्याने ईश्वराची प्रसन्नता प्राप्त होते व दुष्कृत्य म्हणजे जे केल्याने ईश्वराची अप्रसन्नता व कोप होतो. सत्कृत्य केल्याने त्याला या जगात कसलाही लाभ प्राप्त होत नसला व उलट त्याला अधिकाधिक हानीच होत गेली, तरी असा मनुष्य सत्कृत्याला सत्कृत्यच मानतो. तो अशी दृढश्रद्धा बाळगून असतो की, सरतेशेवटी परमकृपाळू ईश्वर त्याला चिरकाल टिकणारा लाभ प्रदान करीलच. त्याचप्रमाणे दुष्कृत्य करून या जगात कसलीही हानि अगर नुकसान होणारे नसले अगर तसे होण्याचा धोकाही नसला, उलट त्यापासून उघड उघड लाभच दृष्टीस पडत असेल तरी असा मनुष्य दुष्कृत्याला दुष्कृत्यच मानतो. तो अशी दृढश्रद्धा बाळगतो की, मी या क्षणभंगूर जगातील जीवनकाळात कसलीही शिक्षा होण्यापासून वाचलो व काही काळ जरी आनंद भोगला तरी सरतेशेवटी ईशकोपापासून काही मी वाचणार नाही.
हे दोन भिन्न विचार असून त्यांच्या प्रभावाने माणसे दोन वेगवेगळे मार्ग अनुसरतात. जी व्यक्ती पारलौकिक जीवनावर दृढश्रद्धा बाळगत नाही तिला हे कदापिही शक्य होणार नाही की, इस्लामच्या जीवनपद्धतीने ती एक पाऊलही टाकू शकेल. इस्लाम असे सांगतो, ‘‘असहाय्य व गांजलेल्यांना ईशमार्गात ‘जकात’-दान करा.’’ तर या विचारप्रणालीचा मनुष्य असे म्हणतो, ‘‘दान केल्याने माझे धन कमी होईल. मी तर माझ्या पैशाचे पुरेपूर व्याज मिळवीन व व्याजापोटी जप्ती, हुकूमनामे मिळवून गोरगरीबांच्या संसारातील लहान सहान वस्तूंचाही लिलाव करवीन.’’ इस्लामचे असे सांगणे आहे, ‘‘नेहमी खरे बोला व असत्यापासून दूर राहा, मग सत्य बोलल्याने केवढेही नुकसान होवो अगर असत्य बोलल्याने कितीही मोठा लाभ होवो.’’ या विचारधारणेचा विरोधी मनुष्य असे उत्तरतो, ‘‘नुसत्या सत्याला घेऊन मी काय करू ज्यामुळे माझा केवळ तोटाच होतो, नफा मात्र काहीच नसतो. तसेच अशा असत्यापासून मी काय म्हणून परावृत्त व्हावे, जे लाभकारक असेल व ज्यात अपकीर्तीचा कोणताही धोका असणार नाही?’’ तो एखाद्या निर्जन मार्गांने जात असतो, तेव्हा एखादी बहुमूल्य वस्तू रस्त्यात पडलेली दृष्टीस पडते. इस्लाम असे म्हणतो, ‘‘ती काही तुझी मालमत्ता नाही, म्हणून ती तू कदापिही घेऊ नये.’’ हा मनुष्य म्हणतो, ‘‘फुकटात मिळत असलेली वस्तू मी काय म्हणून सोडून द्यावी? येथे कोणीही पाहात नाही व पोलिसांना वर्दी देणारा नाही अगर कोर्टात साक्ष देऊन माझी बदनामी करू शकेल असाही कोणी नाही. मग त्या वस्तुचा मी काय म्हणून लाभ घेऊ नये?’’ एखादी व्यक्ती गुप्तपणे अशा माणसाजवळ एखादी रक्कम ठेव म्हणून ठेवते व मरण पावते, अशा परिस्थितीत इस्लामचे असे सांगणे आहे, ‘कोणाच्याही ठेवींचा अपहार करू नका. ती ठेव त्याच्या संततीला परत करून टाका.’ हा मनुष्य म्हणतो की, ‘‘काय म्हणून मी असे करावे? निधन पावलेल्या व्यक्तीची ठेव माझ्याजवळ आहे असे सिद्ध करणारा कसलाही पुरावा नाही अगर कोणी साक्षीदारही नाही, खुद्द त्याच्या मुलाबाळांनाच ती गोष्ट ठाऊक नाही, ती ठेव जर मी विनासायास गिळंकृत करून पचवू शकतो व कसल्याही दाव्याची अगर बदनामीचाही धोका नाही, तर मी ती ठेव काय म्हणून पचवू नये?’’
तात्पर्य असे की, जीवनमार्गात पावलोपावली इस्लाम त्याला एका जीवनपद्धतीने आचरण करण्याचा आदेश देईल व असा मनुष्य नेमका त्याविरुद्ध मार्ग अनुसरेल. त्याचे कारण असे की इस्लाममध्ये प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन पारलौकिक जीवनातील चिरकालच्या लाभहानीच्या परिणामाच्या दृष्टीने होते, परंतु हा मनुष्य प्रत्येक बाबतीत या जगातील क्षणभंगूर जीवनकाळात प्राप्त होणाऱ्या परिणामावर दृष्टी ठेवून असतो.
आता तुमच्या हे लक्षात आलेच असेल की, ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) वर दृढश्रद्धा धारण केल्याविना मनुष्य मुस्लिम (आज्ञाधारक) का होऊ शकत नाही. मुस्लिम होणे तर फार मोठी गोष्ट आहे. परंतु सत्य तर असे आहे की, पारलौकिक जीवनाचा इन्कार माणसाचे मानवतेपासून अधःपतन करून त्याला पशूपेक्षाही खालच्या दर्जावर नेऊन सोडतो.
पारलौकिक जीवनावरील श्रद्धेची (ईमान) सत्यता:-
पारलौकिक जीवनावरील श्रद्धेची आवश्यकता व तिचे फायदे आपणास कळले. आता आपण संक्षिप्तपणे हे पाहू या की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी पारलौकिक जीवनावरील श्रद्धेचे जे वर्णन केलेले आहे, तीच गोष्ट बुद्धिप्रामाण्यावरही खरी असल्याचे दिसून येते. खरे तर आमची ही श्रद्धा केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विश्वासार्हतेवर आधारलेली असून ती बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली नाही. तरी आम्ही जेव्हा विचार व चिंतन करतो तेव्हा, पारलौकिक जीवनाच्या संदर्भात अन्य सर्व श्रद्धांपेक्षा हीच श्रद्धा बुद्धिनुसार असल्याचे आढळून येते.
पारलौकिक जीवनासंबंधी आज जगामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या विचारप्रणाली व श्रद्धा असल्याचे आढळून येतात.
एक समूह असे म्हणतो की, मृत्यूनंतर मनुष्य नाश पावतो. त्यानंतर कसलेही जीवन नाही. अशी विचारधारणा नास्तिकांची आहे व ते स्वतः विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करतात.
दुसरा समूह असे सांगतो की, मनुष्य आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेत असतो. या जन्मात त्याने कुकर्मे केली तर पुढच्या जन्मात एखाद्या पशूचा जन्म घेतो. उदा. कुत्रा, मांजर. वगैरे अथवा वृक्षाच्या वा एखाद्या शूद्रातिशूद्र माणसाचा जन्म घेतो. याउलट सत्कर्मे केली असतील तर अधिक उच्च व श्रेष्ठ श्रेणीत तो जन्म घेतो. अशी श्रद्धा बहुतेक करून अपरिपक्व धर्मामध्ये असलेली आढळते.
तिसरा समूह ‘कयामत’ (प्रलयकाळ), ‘हश्र’ (पुनरुज्जीवन) व ईश न्यायालयात हजेरी, तसेच ईश पुरस्कार व शिक्षा या बाबीवर ईमान बाळगतो. हीच श्रद्धा सर्व प्रेषितांची होती व त्याबद्दल त्यांच्यात कसलेही दुमत नव्हते.
आता पहिल्या समूहाच्या श्रद्धेबद्दल थोडा विचार करु या. या लोकांचे असे म्हणणे आहे की, मृत्यूनंतर कोणीही पुन्हा जिवंत झाल्याचे आम्ही पाहिले नाही. जो मृत्यू पावतो तो मातीत मिसळून जाऊन नष्ट होतो, एवढेच आम्हाला दिसते. म्हणून मृत्यूपश्चात कोणतेही जीवन नाही. परंतु जरा विचार करून पाहा. हा काय युक्तिवाद झाला? मृत्यूनंतर कोणी जिवंत झाल्याचे तुम्ही पाहिले नाही तर जास्तीत जास्त तुम्ही असे म्हणू शकता की, ‘‘मरणोत्तर काय होणार ते आम्ही जाणत नाही.’’ यापुढे जाऊन तुम्ही जो असा दावा करता की, ‘‘आम्ही हे जाणतो की, मरणोत्तर काहीही होणार नाही.’’ याला तुमच्याजवळ कोणता आधार अगर पुरावा आहे? एखाद्या अडाणी माणसाने जर विमान पाहिले नसेल तर तो म्हणू शकतो की, ‘‘विमान कसले असते, हे मला ठाऊक नाही.’’ परंतु जेव्हा तो म्हणतो की, ‘‘विमान ही कोणतीही वस्तु मुळातच नाही, हे मी जाणतो.’’ तर कोणताही शहाणा मनुष्य त्याला मूर्ख म्हणेल. याचे कारण असे की, त्याने एखादी वस्तु डोळ्यांनी पाहिली नसेल तरी तो असा दावा करु शकत नाही की, त्या वस्तूचे मुळातच अस्तित्वच नाही अगर ती असू शकतच नाही.
यानंतर दुसऱ्या श्रद्धेबद्दल चिंतन करु या. या श्रद्धेचा सार असा आहे की, आज जी व्यक्ती माणसाच्या रूपात दिसते. तिने माणसाचे रुप एवढ्यासाठीच प्राप्त केले की, जेव्हा तो प्राणीरुपात होता तेव्हा त्याने सदाचार करून पुण्यसंचय केला होता. तसेच आज जो पशूरुपात दिसतो तो त्या पशूरुपात केवळ यासाठीच गेला की, मानवरुपात असताना त्याने दुराचार व दुष्कृत्ये करून पापसंचय केला होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मानवजन्म, पशूयोनी अगर वृक्षजन्म वगैरे सर्व काही पूर्व जन्मातील कर्माचे फळ होय.
आता प्रश्न असा उद्भवतो की, सर्वांत आरंभी आत्म्याचे रुप कोणते होते? आरंभी मानवजन्म होता असे म्हटले तर त्या अगोदर पशू अगर वृक्षरुप होते असे मानावे लागेल. मानवीरुप जे मिळाले ते कोणत्या सत्कर्माचे फळ म्हणून? आरंभीच आत्म्याचे रुप पशूचे अगर वृक्षाचे होते. असे म्हटले तर त्यापूर्वी मानवीरुप होते हे मान्य करावे लागेल. तसे न मानल्यास प्रश्न असा उद्भवतो की, पशूचा जन्म अथवा वृक्षाचे रूप त्याला कोणत्या दुष्कर्माची शिक्षा म्हणून प्राप्त झाले? तात्पर्य असे की, ही श्रद्धा मानणारे लोक ब्रह्मांडातील निर्मित वस्तुच्या उत्पत्तीचा प्रारंभ कोणत्याही रुपातून झाल्याचे ठरवू शकत नाहीत. त्याचे कारण असे की, प्रत्येक जन्माआधी पूर्वीचा जन्म असणे आवश्यक ठरते जेणेकरून नंतरचा जन्म म्हणजे पूर्वीच्या जन्मातील कर्मांचे फळ म्हणून ठरविले जावे. ही गोष्ट स्पष्टपणे बुद्धिविरुद्ध आहे.
आता तिसऱ्या प्रकारची श्रद्धा पाहा. सर्वप्रथम तिच्यात असे वर्णिले गेले आहे की, ‘‘एके दिवशी ‘कयामत’ येईल व विश्वनिर्माता ईश्वर हे ब्रह्मांड नष्ट करून टाकील आणि मुळापासून एका उच्च श्रेणीची व चिरकाल टिकणारी अशी नवी व्यवस्था प्रस्थापित करील. ही गोष्ट इतकी ठाम आहे की, तिच्या खरेपणाबद्दल यत्किंचितही संशय अगर शंका बाळगण्यास वाव नाही. विश्वातील व्यवस्थेबद्दल जितके अधिक चिंतन करावे तितकेच जास्त प्रमाणात या गोष्टीचा पुरावा मिळतो की, ही एकूण व्यवस्था चिरकाल टिकणारी व अनंत नाही. कारण असे की, ज्या काही शक्ती या व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांनाच मर्यादा असून त्या एके दिवशी संपणे अगदी निश्चित आहे. म्हणूनच सर्व वैज्ञानिक शास्त्रज्ञांचे असे एकमत झालेले आहे की, एके दिवशी सूर्याची उष्णता व प्रकाश पूर्णपणे लोप पावून तो थंड पडेल. ग्रह तसेच तारे एकमेकांवर आदळतील व हे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल.
या श्रद्धेतील दुसरी बाब अशी सांगितली गेली आहे की, ‘‘सर्व मानवांना मरणोत्तर पुन्हा एकदा जिवंत केले जाईल. हे एक असे सत्य आहे ज्याचे घडण्यात कसलीही शंका घेण्यास वाव नाही. तरी हे शक्य आहे काय? तशी गोष्ट घडणे जर अशक्य मानले तर मानवाला लाभलेले हे प्रस्तुत जीवन कसे शक्य झाले? ज्या ईश्वराने मानवाला या जगात जन्म प्रदान केला आहे. तो पारलौकिक जीवनाच्या नवीन व्यवस्थेमध्येही मानवाला जन्माला घालू शकतो. हे अगदी उघड आहे. तिसरी बाब अशी की, ‘‘मानवाने या जगातील, जीवनकाळात जे आचरण केले आहे, जी सत्कर्मे व कुकर्मे केली आहेत त्या सर्वांची इत्यंभूत नोंद केली गेली असून ती जपून ठेवण्यात आली आहे व त्या नोंदीचे दप्तर ‘हश्र’ (पुनरुत्थान) च्या दिवशी हजर केले जाईल. या गोष्टीचा पुरावा आज या जगातही आम्हाला प्राप्त होत आहे. पूर्वीच्या काळी असा एक समज होता की, आपल्या मुखातून जो ध्वनी बाहेर पडतो तो हवेत थोड्याशा लहरी निर्माण करून कायमचा नष्ट होतो परंतु वैज्ञानिक संशोधनाने आता असे कळून चुकले आहे की, प्रत्येक ध्वनि आपल्या सभोवतालच्या वस्तूंवर आपला कायमचा ठसा उमटून मागे सोडतो व तो ठसा पुनर्ध्वनित केला जाऊ शकतो. म्हणून याच तत्त्वावर ग्रामोफोनची तबकडी निर्माण करण्यात आली आहे. यावरूनच हेही कळून चुकते की, आपल्या सभोवताली असलेल्या ज्या चराचर वस्तूंवर ध्वनिलहरी आदळत आहेत, त्या सर्व वस्तूंवर तुमच्या प्रत्येक कृतीचा ठसा उमटत आहे. वस्तुस्थिती जर अशी आहे की तुमच्या सर्व कृत्यांच्या नोंदीचे दप्तर व्यवस्थितपणे जपून ठेवले गेले आहे आणि पुराव्यादाखल ते पुन्हा सादर केले जाऊ शकते. ही गोष्ट अगदी खात्रीपूर्वक व निश्चित असल्याचे उमगते.
चौथी बाब अशी की, ‘‘ईश्वर ‘हश्र’च्या दिवशी काटेकोर न्यायाने तुम्हाला सत्कर्माची फळे तसेच कुकर्माची शिक्षा देईल.’’ हे अशक्य असल्याचे कोण म्हणू शकतो? यातील काय काम बुद्धीविरुद्ध आहे? सारासार बुद्धी व विचारशक्ती तर असेलच इच्छिते की, ‘‘एकदा कधीतरी ईशन्यायालय भरायला हवे व काटेकोर न्यायपद्धतीने सर्व कर्माचा न्यायानिवाडा व्हायला हवा. कोणीतरी एखादी व्यक्ती सत्कर्मे करते व त्याचा कोणताही मोबदला त्या व्यक्तीला य जगात प्राप्त होत नाही, असे आम्ही डोळ्यांनी पाहतो. दुसरी एखादी व्यक्ती अनेक कुकर्मे करीत असते तरी त्यापासून त्या व्यक्तीला कसलीही हानी या जगात भोगावी लागत नाही, हेही आपण डोळ्यांनी पाहात असतो. इतकेच नव्हे तर अशीसुद्धा सहस्त्रावधी उदाहरणे पाहातो की एखाद्याने सत्कर्म करून उलट त्याचा तोटाच होत असतो. त्या उलट दुसरा एखादा कुकर्मे करूनही मौजमजा लुटत जगत असतो. असे प्रकार पाहिल्यानंतर सारासार विचारशक्तीची अशी इच्छा व अपेक्षा असते की सदाचारी माणसाला त्याच्या सत्कर्माची व दुराचारी माणसाला त्याच्या कुकर्माची फळे मिळणे अगदी अगत्याचे व आवश्यक आहे.
या श्रद्धेमधील शेवटची बाब ‘जन्नत’ (स्वर्ग) व ‘जहन्नम’ (नरकाग्नी) यांची अस्तित्वाची सत्यताही अशक्य नाही. विश्वनिर्माता ‘अल्लाह’ सूर्य, चंद्र, पृथ्वी, मंगळ वगैरे जर निर्माण करू शकतो तर ‘जन्नत’ व ‘जहन्नम’ त्याने निर्माण न करण्याला कोणती कारणे आहेत? तो जर न्यायनिवाडा करणार व मानवांना सत्कर्माची योग्य फळे व कुकर्माची शिक्षा देणार आहे तर बक्षीसाची फळे प्राप्त करण्यासाठी प्रतिष्ठादायक आनंद व आस्वाददायक स्थान असणे क्रमप्राप्त आहे व शिक्षा भोगण्यासाठी अवमानजनक तसेच दुःख, यातना व क्लेशदायक ठिकाणही असणे अगत्याचे आहे.
या सर्व बाबींचा जेव्हा तुम्ही खोल विचार व चिंतन कराल तर तुमची बुद्धीच तुम्हाला अशी ग्वाही देईल की माणसांच्या अंतिम परिणामाच्या संदर्भात जितक्या वेगवेगळ्या श्रद्धा जगात आढळतात, त्यापैकी मनाला पूर्णपणे पटणारी अशी केवळ हीच श्रद्धा असून तिच्यात कोणतीही गोष्ट बुद्धीविरुद्ध अगर अशक्यप्राय नाही.
तर जेव्हा हे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सारख्या सच्चा प्रेषिताने सांगितली आहे आणि त्यात जर सर्वस्वी तुमचेच हित व कल्याण आहे तर त्यावर दृढ विश्वास बाळगणे क्रमप्राप्त ठरते आणि कसल्याही युक्तिवादाविना व आधाराविना तिच्याबद्दल शंका बाळगू नये, यातच शहाणपणा आहे.
0 Comments