पहिला मार्ग मानवाच्या स्वतःच्या मनाच्या इच्छा आहेत
“अर्थात त्याच्यापेक्षा मोठा पथभ्रष्ट कोण असू शकेल ज्याने अल्लाहच्या आदेशांच्याऐवजी आपल्या मनाच्या इच्छांचे अनुसरण केले? अशा अत्याचारी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवीत नाही.”
– सूरतुल कसस : ५०
याचा अर्थ असा की सर्वात अधिक माणसाला मार्गभ्रष्ट करणारी गोष्ट माणसाच्या स्वतःच्या मनातील इच्छा आहे. जो मनुष्य इच्छेचा गुलाम झाला तो अल्लाहचा दास बनणे कदापि शक्य नाही. जरी अल्लाहने त्याला मनाई केली तरी तो सदेव असेच पाहील की मला कोणत्या कामात धन-प्राप्ती होईल, मला सन्मान व प्रसिद्धी कोणत्या कामात मिळेल, मला आमोद-प्रमोद व आनंद कोणत्या कामात मिळेल; मला आराम व ऐश्वर्य कोणत्या कामात प्राप्त होईल. बस्स, या गोष्टी ज्या कामात असतील त्यांचाच तो अवलंब करील. या गोष्टी ज्या कामात नसतील त्या तो कदापि करणार नाही, मग त्याची आज्ञा अल्लाहने का दिलेली असेना. तर मग याचा अर्थ असा की अशा माणसाचा ईश्वर महान अल्लाह नसून त्याचा ईश्वर त्याचे मन आहे. त्याला सबुद्धी कशी मिळू शकेल? हीच गोष्ट पवित्र कुरआनमध्ये अन्य
ठिकाणी अशाप्रकारे सांगितली आहे.
“हे पैगंबर! तुम्ही त्या मनुष्याच्या स्थितीवर विचार तरी केला काय की ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला ईश्वर बनविले आहे? काय तुम्ही अशा माणसावर नजर ठेऊ शकता? काय तुम्हाला असे वाटते की या लोकांपैकी बरेचजण ऐकतात व समजतात? कदापि नाही, हे तर जनावराप्रमाणे आहेत. नव्हे तर त्यांच्यापेक्षाही हीन दर्जाचे आहेत.’
सूरतुल फुरकान : ४३,४४
मनाचे गुलाम जनावरापेक्षा अधिक वाईट असणे एक अशी गोष्ट आहे ज्यात कोणत्याही शंकेला स्थान नाही. कोणतेही जनावर आपणास असे आढळणार नाही जे अल्लाहने ठरवून दिलेल्या सीमेला सोडून पुढे जात असेल. प्रत्येक प्राणी तीच दप्तु खातो जी अल्लाहने त्याच्यासाठी ठरवून दिलेली आहे. तितकीच खातो. जितक्या प्रमाणात ठरवून दिलेली आहे आणि जितके काम ज्या प्राण्यासाठी ठरविले आहे तितकेच तो करतो. परंतु मनुष्य एक असा प्राणी आहे की जेव्हा हा आपल्या इच्छेचा गुलाम बनतो तेव्हां तो असली-असली कृत्ये करतो की सैतानाला सुद्धा लाज वाटावी.
(२) वाड- वडिलांचे अंधानुकरण
हा तर मार्गभ्रष्टता येण्याचा पहिला रस्ता आहे. दुसरा मार्ग असा आहे की वाड-वडिलांपासून ज्या चालीरीती, ज्या श्रद्धा व विचार, ज्या प्रकारचे वागणे चालत आलेले आहेत त्यांचा मनुष्य गुलाम बनतो आणि अल्लाहच्या आज्ञेपेक्षा त्यांना श्रेष्ठ समजू लागतो आणि त्या उलट जर अल्लाहची आज्ञा त्याच्यासमोर प्रस्तुत केली गेली तर सांगतो की मी तर तेच करीन जे माझे वाड-वडील करीत असत आणि जी माझ्या घराण्याची व टोळीची पद्धत आहे. जो मनुष्य असल्या रोगाने पछाडलेला आहे तो बरे अल्लाहचा दास कसा बनू शकेल? त्याचे ईश्वर तर त्याचे वाड-वडील व त्याच्या घराण्याचे व टोळीचे लोक आहेत. त्याला हा खोटा दावा करण्याचा कोणता अधिकार आहे की मी मुसलमान आहे? पवित्र कुरआनमध्ये सुद्धा यावर कठोरपणे खबरदार केले आहे.
.
“आणि जेव्हा जेव्हां त्यांना सांगितले गेले की जी आज्ञा अल्लाहने पाठविली आहे तिचे अनुसरण करा. तेव्हा त्यांनी हेच सांगितले की आम्ही तर त्या गोष्टीचे अनसरण करू जी आम्हाला बाड-वडिलांकडून मिळाली आहे. जर त्यांच्या वाड-वडिलांना एखादी गोष्ट कळाली नसेल आणि ते सरळ मार्गावर नसतील तरी सुद्धा हे त्यांचेच अनुकरण करीत राहतील काय?
– सूरतुल बकराह : १७०
दुसऱ्या ठिकाणी सांगितले आहे –
“आणि जेव्हां त्यांना सांगितले गेले की या फर्मानाकडे या जो अल्लाहने पाठविला आहे आणि या पैगंबर (स.) यांच्या पद्धतीकडे या. तेव्हां त्यांनी सांगितले की आमच्यासाठी तर केवळ तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना पाहिले आहे. काय हे वाडवडिलांचेच अनुकरण करीत राहतील. मग त्यांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसो आणि ते सरळ मार्गावर नसोत? हे ईमानधारकांनो! तुम्हाला तरी स्वतःची काळजी असली पाहिजे. जर तुम्ही सरळ मार्गाला लागाल तर दुसऱ्या कुणाच्या मार्गभ्रष्टतेने तुम्हाला नुकसान पोहचणार नाही, शेवटी तर सर्वाना अल्लाहकडे परत जावयाचे आहे. त्यावेळी अल्लाह तुम्हाला तुमच्या चांगल्या व वाईट कृत्याविषयी सर्व काही सांगेल.”
सूरतुल माइदाह : १०४,१०५
ही अशी पथभ्रष्टता आहे ज्यात जवळजवळ प्रत्येक काळातील अज्ञानी लोक गुरफटलेले आहेत आणि नेहमी अल्लाहच्या पैगंबरांचे मार्गदर्शन स्वीकारण्यापासून हीच गोष्ट माणसाला रोखत असते. हजरत मूसा (अले.) यांनी जेव्हां लोकांना अल्लाहच्या शरीअतकडे (कायद्याकडे, मार्गाकडे) बोलाविले होते तेव्हां देखील लोकांनी असेच म्हटले होते,”काय तू आम्हाला त्या मार्गापासून हटवू इच्छितोस ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना चालत असताना पाहिले आहे?”
-सूरह यूनुस : ७८
हजरत इब्राहीम (अलै.) यांनी जेव्हा आपल्या टोळीवाल्यांना
अनेकेश्वरवादापासून रोखले तेव्हा त्यांनी सुद्धा असेच सांगितले होते –
“आम्ही आपल्या वाड-वडिलांना याच ईश्वरांची उपासना करताना पाहिले आहे.”
-सूरतुल अंधिया : ५३
थोडक्यात असे की अशाचप्रकारे प्रत्येक पैगंबरासमोर लोकांनी हाच मुद्दा सांगितला की तुम्ही जे म्हणता ते आमच्या वाड-वडिलांच्या पद्धतीविरुद्ध आहे म्हणून ते आम्ही मान्य करीत नाही. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे –
“म्हणजे असेच होत राहिले आहे की जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीत भीती दाखविणारा म्हणजे पैगंबराला पाठविले तेव्हां तेव्हा त्या वस्तीच्या सुखवस्तु लोकांनी असेच सांगितले की आम्ही आपल्या वाड-वडिलांना एका पद्धतीचा अवलंब करताना पाहिले आहे आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत. पैगंबरांनी त्यांना सांगितले की, जर मी याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुम्हाला सांगितली की ज्यावर तुमचे वाड-वडील चालत असता तुम्ही पाहिले आहे तर काय असे असून देखील तुम्ही तुमच्या वाड- वडिलांचे अनुकरण करीत रहाल? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ती गोष्ट मान्य करीत नाही जी तुम्ही घेऊन आला आहात. मग जेव्हा त्यांनी असे उत्तर दिले तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना खूप शिक्षा दिली आणि आता पहा की आमचे आदेश खोटे ठरविणाऱ्यांचा कसा शेवट झाला आहे.”
-सूरतुज्जुखरुफ़ : २३-२५
हे सर्व काही सांगितल्यावर महान अल्लाह फर्मावितो की एक तर वाडवडिलांचेच अनुकरण करा अथवा आमच्या आदेशांचे पालन करा. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. मुसलमान बनू इच्छिता तर सर्व काही सोडून केवळ तीच गोष्ट मान्य करा जी आम्ही सांगितली आहे –
“म्हणजे जेव्हां त्यांना सांगितले गेले की त्या आज्ञेचे पालन करा जी अल्लाहने पाठविली आहे. तेव्हां ते म्हणाले की, नाही. जरी शैतान आम्हाला नरकाच्या प्रकोपाकडे बोलावीत असला तरी सुद्धा आम्ही ती गोष्ट अवलंबू जिघा अवलंय आम्ही आमच्या वाड- वडिलांना करताना पाहिले आहे. जो कोणी स्वतःला पूर्णपणे अल्लाहच्या सुपुर्द करील आणि
सत्कर्म करणारा असेल त्याने तर दोरी मजबूत धरली आणि शेवटी सर्व बाबी अल्लाहच्या हातात आहेत आणि जो कोणी याचा इन्कार करील तर हे नबी, तुम्हाला त्याच्या इन्काराने दु:खी होण्याची गरज नाही. ते सर्व आमच्या कडे परत येणार आहेत. मग आम्ही त्यांन्या त्यांच्या कृत्यांचा परिणाम दाखवून देऊ.” – सूरह लुक़मान : २१-२३
(३) अल्लाहशिवाय इतरांच्या आज्ञेचे पालन
हा पथभ्रष्टता येण्याचा दुसरा मार्ग होता. तिसरा मार्ग पवित्र करआनने असा सांगितला आहे की मनुष्य जेव्हां अल्लाहची आज्ञा सोडून दुसऱ्या लोकांची आज्ञा पाळू लागतो आणि असा विचार करतो की अमुक मोठा मनुष्य आहे अथवा अमुक माणसाच्या हातात माझी रोजी आहे म्हणून त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. अमुक मनुष्य मोठा पदाधिकारी आहे म्हणून त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अमुक महाशय आपल्या शापाने मला नष्ट करतील किंवा आपल्या बरोबर स्वर्गात घेऊन जातील म्हणून ते जे सांगतील तेच खरे आहे. अमुक जात फार प्रगती करीत आहे. तिच्या पद्धती अवलंबिल्या पाहिजेत. तर असंल्या माणसासाठी सद्बुद्धी प्राप्त होण्याचा मार्ग बंद पडतो.
“जर तू पृथ्वीवर राहणाऱ्या त्या लोकांच्या आज्ञेचे पालन केले तर ते तुला अल्लाहच्या मार्गावरून पथभ्रष्ट करतील.”
-सूरतुल अनआम : ११६
म्हणजे मनुष्य सरळ मार्गावर तेव्हां असू शकतो जेव्हां त्यांचा ईश्वर एक असेल, ज्याने शेकडो हजारो ईश्वर स्वीकारले असतील आणि जो कधी या ईश्वराच्या म्हणण्यानुसार तर कधी त्या ईश्वराच्या म्हणण्यानुसार चालत असेल तर त्याला कसा मार्ग मिळू शकेल?
आता आपणास कळले असेल की पथभ्रष्टतेची प्रमुख कारणे तीन आहत १) मनाची गुलामी, २) वाड-वडील, घराणे आणि टोळीच्या प्रथांची गुलामी, ३) सामान्यपणे जगातील त्या लोकांची गुलामी ज्यात श्रीमंत लोक, तत्कालीन शासक आणि भोंदू धर्मगुरु व पथभ्रष्ट जाती सर्व यात सामील आहेत.
या तीन मोठ्या मूर्त्या आहेत ज्या ईश्वराच्या दावेदार बनल्या आहेत. जो मनुष्य मुसलमान बनू इच्छितो त्याला सर्वप्रथम या तिन्ही मूर्त्या फोडल्या पाहिजेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने तो मुसलमान बनेल, ज्याने या तिन्ही मूर्त्या आपल्या हृदयात बसविल्या असतील तो ईश्वराचा दास बनणे कठीण आहे. तो दिवसात पन्नास वेळा नमाज पढून व दाखविण्यासाठी उपवास ठेऊन आणि मुसलमानाप्रमाणे चेहरा बनवून लोकांना फसवू शकतो. स्वतः आपल्या मनाला सुद्धा फसवू शकतो की मी पक्का मुसलमान आहे. परंतु तो अल्लाहला फसवू शकत नाही.
0 Comments