या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका माननीय हमजा(र) यांनी अद्याप इस्लाम स्वीकार केला नव्हता. तसेच इतर विरोधकांप्रमाणे त्यांनी प्रेषितांचा विरोधही केला नव्हता. ते नेहमी शिकार करणे आणि सैरसपाटा करण्याच्या छंदातच मग्न असत. यामुळे त्यांना प्रेषितांच्या सत्यधर्माच्या संदेशाकडे लक्ष देण्याची सवडही मिळत नसे. एक दिवशी नेहमीप्रमाणे ते शिकारीवरून परत येत असताना ‘इब्ने जुदआन’ची दासी त्यांना रस्त्यात भेटली आणि त्यांना धिक्कारून म्हणाली, ‘‘हे अबू अम्मारा! (हमजा यांचे टोपण नाव) थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही येथे असता तर तुम्ही डोळ्यांनी पाहिले असते की, ‘अबू जहल’ याने तुमच्या पुतण्याशी (मुहम्मद(स) यांच्याशी) किती वाईट आणि अमानुष वर्तन केले. त्यांना शिवीगाळ केली. अंगावर माती आणि शेण टाकले, शारीरिक इजा पोहोचविली. धिक्कार असो तुमचा आणि तुमच्या ‘हाशिम’ परिवारजणांचा की त्या अनाथाच्या रक्षणार्थ हात उचलण्यासाठी तुमच्यात दम नाही!’’
माननीय हमजा(र) यांचा संताप अनावर झाला. ‘अबू जहल’ अजूनही तेथेच होता. माननीय हमजा(र) यांनी आपल्या धनुष्याचा वार त्याच्या डोक्यावर इतक्या जोरात मारली की, अबू जहल रक्तबंबाळ झाला. तसेच आवेशाच्या भरात त्यास खडसावले की, ‘‘तू मुहम्मद(स) यांना शिव्या देतोस आणि त्रस्त करतोस, तेव्हा कान उघडून ऐकून घे! आजपासून मीच प्रेषित मुहम्मद(स) यांचा धर्म स्वीकारतो. मग पाहतो की, मला रोखण्याची कोणात हिमत आहे!!’’
मग माननीय हमजा(र) सरळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन म्हणाले, ‘‘मुहम्मद(स)! मी तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे. अबू जहलने तुमच्यावर केलेल्या अत्याचाराचा मी बदला घेतला आहे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘काकावर्य! ज्या वेळेस आपण मूर्तीपूजा सोडून सत्यधर्माचा स्वीकार कराल, तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा असेल.’’
या ठिकाणी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या वैयक्तिक भावनांच्या समाधानापेक्षा जास्त काळजी सत्यधर्माच्या प्रसाराचीच आहे. त्यांचा उपदेश ऐकून माननीय हमजा(र) रात्रभर विचार करीत राहिले आणि पूर्ण विचारांतीच त्यांनी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी प्रेषितदरबारी येऊन इस्लामचा स्वीकार केला.
माननीय हमजा(र) यांच्या इस्लाम स्वीकारण्याची वार्ता मक्का शहरात वणव्यासारखी पसरली. इस्लामच्या अनुयायांना एकीकडे अत्यानंद झाला, तर दुसरीकडे विरोधक मात्र खूप संतापले. या घटनेच्या प्रतिक्रेयेत विशेषकरून अबू जहलचे त्यांच्याशी वैर जास्तच वाढले. त्याने आवेशपूर्ण घोषणा केली की, ‘‘जो माणूस मुहम्मद(स) यांचा वध करून त्यांचे शीर माझ्यासमोर हजर करील त्यास शंभर लाल रंगाचे उंट आणि एक हजार तोळे चांदी बक्षीस देण्यात येईल.’’ विशेषतः ‘अबू जहल’ याने आपले तरूण आणि युद्धपटू व कोणालाही न जुमानणारे भाचे माननीय उमर(र) यांना या कामासाठी उत्तेजित केले. (या वेळी माननीय उमर(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला नव्हता) माननीय उमर(र) यांनी तलवार उपसली आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या वधाचा पक्का निर्धार केला.
आधी ते सरळ माननीय अरकम(र) यांचा समाचार घेण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाले. रस्त्यात त्यांचे मित्र नुएम बिन अब्दुल्लाह भेटले व त्यांना विचारले, ‘‘हे उमर(र)! कोठे निघाला आहात?’’ ‘‘मी मुहम्मद(स) यांचा शीरच्छेद करण्यासाठी निघालो आहे!’’ उमर(र) ताडकन उत्तरले. ‘नुएम’ म्हणाले, ‘‘आधी आपल्या घरच्यांचा तर समाचार घ्या.’’
‘‘काय केले माझ्या घरच्या लोकांनी?’’ उमर(र) यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, ‘‘माझे कोणते घरचे लोक?’’
‘‘तुमची बहीण ‘फातिमा’ आणि मेहुणे ‘सईद बिन जैद’ यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि मानवकल्याणाकडे हाक देणार्यांच्या अनुयायांत सामील झाले.’’
‘नुएम’ यांचे उत्तर ऐकताच उमर(र) यांचा संताप अनावर झाला. त्यांनी माननीय अरकम(र) यांच्या घराची वाट सोडून प्रथम आपल्या बहीण-मेहुण्याचा समाचार घेण्यासाठी निघाले. दरवाजावर खटका दिला, तेव्हा दोघे पती-पत्नी माननीय खब्बाब(र) यांच्याकडून कुरआनची शिकवण घेत होते. दारावर जोरदार थाप ऐकताच घरच्यांनी ओळखले की, माननीय उमर(र) आले. ते तिघेजण खूप घाबरले. माननीय खब्बाब(र) यांनी घराच्या मागच्या भागात धूम ठोकली. बहीण फातिमा(र) यांनी दिव्य कुरआनची पाने लपविली आणि दार उघडले. उमर(र) संतापाच्या अतिरेकाने थरथर कापत होते. त्यांनी रागाच्या भरात आवेशोद्गार काढले,
‘‘माझ्या कानी आले की, तुम्ही दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. म्हणून तुम्हा दोघांना कायमचा धडा शिकविण्यासाठी आलो आहे!’’ एवढे सांगून ते माननीय सईद(र) यांच्यावर तुटून पडले. त्यांचे केस धरून त्यांना जमिनीवर पाडून अमानुषपणे बदडण्यास सुरुवात केली. माननीय फातिमा(र) आपल्या पतीच्या रक्षणार्थ आडवी आली आणि माननीय उमर यांचा एक जोरदार प्रहार फातिमा(र) च्या चेहर्यावर पडला. प्रहारामुळे त्या रक्त बंबाळ झाल्या. अशा अवस्थेतच माननीय फातिमा(र) दृढ निश्चयपूर्वक उद्गारल्या, ‘‘होय! आम्ही इस्लाम धर्म स्वीकार केला! ईश्वराच्या प्रेषितांच्या अनुयायांत सहभागी झालो! आता तुला काय करायचे ते करून घे! आमच्या हृदयावर शिक्कामोर्तब झालेले ईश्वरी चिन्ह तुला कधीच नष्ट करता येणार नाही!’’
रक्तबंबाळ झालेल्या आणि डोळ्यांत अश्रू आलेल्या बहिणीचे निश्चयपूर्ण वाक्य ऐकून माननीय उमर(र) यांचे बहिणीशी असलेले ममत्व जागृत झाले. आपल्या बहिणीच्या आपणच केलेल्या दुरावस्थेचा त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या संतापाची तीव्रता शमली. मग त्यांनी आपल्या बहिणीस प्रेमाने विचारले, ‘‘बरे तुम्ही जी वाणी वाचत होता ती मलादेखील दाखवा!’’ ‘‘तू त्या वाणीस नष्ट करशील!’’ बहीण फातिमा(र) उत्तरल्या. माननीय उमर(र) यांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, ‘‘मी वाचून परत देईन.’’ फातिमा(र) यांनी सांगितले, ‘‘उमर(र)! ही ईश्वराचीं वाणी आहे. शुचिर्भूततेशिवाय यास (कुरआनास) हात लावता येणार नाही. तू आधी स्नान करून मगच वाचायला घे.’’
माननीय उमर(र) यांनी बहिणीच्या विनंतीवरून स्नान केले. फातिमा(र) यांनी दिव्य कुरआन त्यांना दिले. या ठिकाणी ‘सूरह-ए-ताहा’ असलेले. पान उमर(र) पठण करू लागले. पठण करताना त्यांचे रोम रोम कापू लागले. दिव्य कुरआनचा त्यांच्या आंतरात्म्यावर कमालीचा प्रभाव होत होता. परिणामी त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि त्यांनी आरोळी ठोकली, ‘‘खरोखरच मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नसून मुहम्मद(स) ईश्वराचे प्रेषित आहेत.’’
त्यांची आरोळी ऐकताच घराच्या मागच्या भागात लपून बसलेले माननीय खब्बाब(र) समोर आले व म्हणाले, ‘‘हे उमर(र)! तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कालच ईश्वरदरबारी प्रार्थना केली होती की, ‘‘हे ईश्वरा! तू उमर बिन हिश्शाम (अबु जहल) आणि उमर बिन खत्ताब(र) या दोघांपैकी एकास इस्लाममध्ये दाखल करून इस्लामी आंदोलनास शक्ती प्रदान कर!’’ माननीय खब्बाब(र) यांच्यासोबत माननीय उमर(र) आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दरबारी हजर झाले. ‘‘हे उमर(र)! कोणत्या उद्देशाने आलात?’’ आदरणीय प्रेषितांनी नम्रपणे विचारले.
‘‘एकमेव ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचा स्वीकार करण्यासाठीच आलो!’’ माननीय उमर(र) भावूक होऊन उत्तरले. हे ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सर्व अनुयायी आनंदाने म्हणाले, ‘‘अल्लाहु अकबर!’’ (अर्थात ‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’)
माननीय उमर(र) हे अरब समाजातील अतिशय शूर, शक्तिशाली, महापराक्रमी व महाप्रतापी व्यक्ती समजले जात होते. माननीय हमजा(र) आणि उमर(र) या दोन शक्तींमुळे इस्लामी आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. मुस्लिमांवर अमर्याद अत्याचार होत असताना या व्यक्तीमुळे इस्लाम धर्माचा स्वीकार करून सत्याच्या आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. आता मात्र तेथील वातावरणात प्रचंड परिवर्तन झाले. माननीय उमर(र) यांनी विचार केला की, ‘कुरैश’ कबिल्यामध्ये ‘जमील बिन मअमर’ हा माणूस आपल्या इस्लामस्वीकृतीची वार्ता चांगल्यारीतीने पसरवू शकतो. म्हणून ते सकाळीसकाळीच त्याच्या घरी गेले आणि त्यास सांगितले की, ‘‘मी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या ईश्वरी धर्माचा स्वीकार केला आहे.’’ ‘जमील बिन मअमर’ याने तत्काळ चादर ‘‘हे कुरैश कबिल्याच्या लोकांनो! हा माणूस खोटे बोलत आहे. मी निधर्मी मुळीच झालो नाही! मी तर सत्यधर्माचा स्वीकार करून मुस्लिम झालो आहे आणि आपल्या अमानवी पारंपरिक असत्यधर्मांचा धिक्कार केला आहे!’’
माननीय उमर(र) यांची ही घोषणा ‘कुरैश’ कबिल्याच्या जखमेवर मीठ चोळणारी व त्यांच्यात लागलेल्या आगीत तेल ओतून भडका करणारी होती. हा भडका अतिशय तीव्र झाला. विरोधकांच्या तलवारी चमकल्या. माननीय उमर(र) यांच्यावर वार होत गेले. परंतु उमर(र) यांनी सर्वांचा मुकाबला केला. लढाई चालूच होती. एवढ्यात ‘कुरैश’ कबिल्याचा सरदार ‘आस बिन वाईल’ तेथे पोहोचला आणि मध्यस्थी करीत म्हणाला, ‘‘या व्यक्तीने (माननीय उमर(र) यांनी) स्वतःसाठी एक मार्ग निवडला आहे. तुम्हाला त्याच्याशी काय घेणे आहे?’’ असे म्हणून त्या ठिकाणी हे प्रकरण त्याने आवरते घेतले.
माननीय उमर(र) यांनी काबागृहात खुलेआम नमाज अदा करण्याची घोषणा केली आणि सर्व मुस्लिम उघडपणे काबागृहात नमाज अदा करू लागले. परिस्थितीत घडून येणारे हे एक जबरदस्त परिवर्तन होते. सत्यद्रोही शक्ती हताश होऊन हे सर्व काही होताना पाहत होती. सत्यधर्माच्या आंदोलनाचा हा महापूर ओसंडून वाहत होता आणि यात हळूहळू मोठमोठ्या व्यक्ती सामील होत होत्या.
आता मात्र इस्लामविरोधी शक्तींनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून इस्लामी आंदोलनाचा खातमा करण्यासाठी कंबर कसली. कुरैश कबिल्यातील विरोधकांनी संपूर्ण मक्कावासीयांना एकत्र करून करार केला की, ‘‘हाशिम’’ परिवाराचा (प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिवाराचा) सामाजिक बहिष्कार करावा. त्या परिवाराशी असलेले सर्व संबंध तोडण्यात यावे. सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात यावेत. ‘हाशिम’ परिवारास चांगलेच वेठीस धरण्यात यावे. इथपावेतो की, त्यांनी मुहम्मद(स) यांना आमच्या स्वाधीन करावे. मग आम्ही त्यांचा वध करून हे प्रकरण संपवून टाकू. हा करारनामा लिखित होता. हा काळ तब्बल तीन वर्षांचा होता.
या अमानुष करारामुळे ‘हाशिम’ परिवाराने ‘शैबे अबी तालिब’ या ठिकाणी आश्रय घेतला. एकार्थाने संपूर्ण इस्लामी परिवार तीन वर्षे नजरकैदेत होता. या बहिष्काराच्या करारामुळे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार बंद झाला. त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यात आला आणि इस्लामी आंदोलकांवर एक महान संकट कोसळले. अन्न मिळत नसल्याने प्रेषितांच्या अनुयायांना झाडाची पाने खाऊन दिवस कंठावे लागले. लहान लहान मुले अन्नावाचून अक्षरशः तडफडत होती.
‘एकदा हकीम बिन हिजाम’ या माणसास मुस्लिमांची दया आली. त्याने थोडेसे गहू आपल्या गुलामामार्फत गुपचूपपणे पाठविले. परंतु इस्लामद्रोही अबू जहल याची नजर पडताच तो ते धान्य हिसकावून घेऊ लागला. एवढ्यात ‘अबू बख्तरी’ तेथून जात होते. त्यांनी अबू जहलचे हे दुष्कृत्य पाहिले आणि अबू जहल यास सांगितले की, ‘सोडून द्या! पुतण्याने आपल्या आत्याकरिता पाठविले तर काय बिघडते.’’ अशा प्रकारे ‘हिश्शाम बिन अम्र’ हे लपून छपून धान्य पाठवित असत.
हाच ‘हिश्शाम बिन अम्र’ या अमानवी करारास निरस्त करण्यासाठी पुढे आला. मूळ गोष्ट अशी की, एकीकडे अत्याचार वाढत असताना दुसरीकडे त्या अत्याचाराविरुद्ध मानवी स्वभावात दयाळू भावना निर्माण होत असते. ‘हिश्शाम बिन अम्र’ हा जुहैर बिन अबि उमैया’कडे गेला आणि याविषयी त्याने अत्यंत प्रभावशाली व दयापूर्ण आपले मत मांडले. मग तो ‘मुतईम बिन अदी’ यास भेटला आणि शेवटी ‘अबू बख्तरी’ आणि ‘जमआ बिन असवद’ यांना भेटून मुस्लिमांच्या अत्याचारांविरुद्ध असलेले वातावरण बदलून टाकले. ‘हाशिम’च्या परिवारजणांनी सर्वसहमतीने योजना तयार केली आणि एकेदिवशी पवित्र काबागृहामध्ये संपूर्ण अरब समुदायास संबोधित करून म्हणाला, ‘‘हे मक्कावासीयांनो! हे कर्म कितपत उचित आणि योग्य आहे की, आपण सर्वांनी पोट भरून जेवायचे आणि चांगली वस्त्रे परिधान करावयाची आणि ‘हाशिम’ परिवारजणांना उपाशीपोटी आणि वस्त्रविरहित जीवन कंठित करण्यासाठी सोडून द्यावयाचे?’’ मग त्याने चेतावणी देताना सांगितले की, ‘‘ईश्वराची शपथ! अत्याचाराच्या आधारावर तयार झालेल्या सामाजिक बहिष्कार करणार्या करारपत्राचे मी जोपर्यंत तुकडे तुकडे करणार नाही, तोपर्यंत सुखाने श्वास घेणार नाही!’’
त्याचे हे शब्द ऐकताच ‘अबू जहल’ हा संतापलेल्या स्वरात म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! तू खोटारडा आहेस, तू ते करारपत्र मुळीच फाडू नये.’’ ‘जमआ बिन असवद’ ने ‘अबू जहल’ यास उत्तर दिले की,
‘‘ईश्वराची शपथ! तूच सर्वात जास्त खोटारडा आहेस. ज्या प्रणालीवर हा करार करण्यात आला आहे, तीच प्रणाली मुळात आम्हास मान्य नाही.’’
त्याचे समर्थन अबू बख्तरी यानेदेखील केले आणि म्हणता म्हणता सर्वांनीच ‘हिश्शाम बिन अम्र’चे समर्थन करण्यासाठी कंबर कसली. ‘अबू जहल’ला त्याच्या पायाखालची जमीन हलताना दिसू लागली आणि तो विवश झाला. पवित्र काबागृहाच्या भितीवर टांगण्यात आलेले बहिष्काराचे करारपत्र काढून नष्ट करण्यासाठी लोकांचे हात सरसावले. परंतु अश्चर्यम! आधीच ते करारपत्र वाळवी लागून नष्ट पावले होते. त्यावर केवळ ‘ईश्वराच्या नावे’ एवढेच शब्द बाकी राहिले होते. अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या समवेत असलेल्या हाशिम परिवाराच्या लोकांच्या नजरबंदीचा कठीण काळ संपुष्टात आला. हे प्रेषितत्वाचे दहावे वर्ष होते. आता मात्र पूर्वीपेक्षाही जास्त कठीण काळाची सुरुवात झाली होती.
या वर्षीच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका म्हणजेच माननीय अली(र) यांचे पिता अबू तालिब यांचे देहावसन झाले.
‘अबू तालिब’ हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची खूप मदत करीत. त्यांचे संरक्षण करीत आणि इस्लाम व मुस्लिमांवर येणार्या संकटांना परतवून लावीत असत. त्यांच्या देहावसानामुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) खूप व्यथित झाले. शिवाय प्रेषितांचे पिता त्यांच्या जन्मापूर्वीच वारलेले असल्याने ‘अबू तालिब’ हेच त्यांचे पालक होते. त्यांनी आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त काळजीपूर्वक प्रेषितांचे पालनपोषण केले. प्रेषित या आकस्मात दुःखातून सावरलेही नव्हते तोच त्यांची भार्या सन्माननीय खदीजा(र) यासुद्धा स्वर्गवासी झाल्या. सन्माननीय खदीजा(र) या प्रेषित मुहम्मद(स) यांच्या केवळ पत्नींच नसून इस्लाम स्वीकारणार्या त्या प्रथम महिला होत्या. त्यांनी प्रेषितांना खूप साथ दिली होती. ज्या वेळेस प्रेषिताचे अश्रू पुसणारा कोणी नव्हता, त्या वेळी यांनीच त्यांना सावरले होते. त्यांना मायेची ऊब दिली होती. धीर दिला होता. आपली संपूर्ण संपत्ती इस्लामी आंदोनासाठी समर्पित केली होती. प्रत्येक पावलावर प्रेषितांना साथ दिली होती. त्यामुळे प्रेषितांवर दुःखाचे एका पाठोपाठ दोन डोंगर कोसळले.
अर्थात, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे रक्षण करणारे अबू तालिब आणि आपल्या सर्वार्थाने
मदत करणार्या खदीजा(र) दोन्ही निवर्तले आणि विरोधकांचे धैर्य वाढले. त्यांचा विरोध अधिकच तीव्र झाला. ईश्वरी इच्छेला कदाचित हेच मान्य होते की, आता सत्याने आपले रक्षण स्वतःच करावे आणि स्वतःच आपला मार्ग शोधावा.
प्रेषितांचे कट्टर विरोधक असलेले व त्यांच्याच कुरैश कबिल्याचे लोक नीचपणावर उतरले. टवाळ मुलांच्या झुंडीच्या झुंडी प्रेषितांना यातना देण्यासाठी त्यांच्या मागे लावण्यात आल्या. प्रेषित मुहम्मद(स) नमाज अदा करतेवेळेस हलकल्लोळ माजविण्यात येत असे. शिवीगाळ करण्यात येत असे. अंगावर थुंकण्यात येत असे.
एकदा इस्लामचा विरोधक ‘अबू लहब’ याची दुष्ट पत्नी ‘उम्मे जमील’ हिने प्रेषित मुहम्मद(स) यांना ठार करण्याचा बेत रचला. प्रेषितांना शोधताना ती काबागृहात आली. परंतु प्रेषित तिला दिसले नाहीत. एकदा इस्लामद्रोही ‘अबू जहल’ यानेदेखील प्रेषितांना दगडाने ठेचून वध करण्याचा मानस केला. परंतु त्याला यश मिळाले नाही.
यातनांचा अंत होत नव्हता. मारझोडदेखील होत होती. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स) यांना मारझोड झाली. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अमानवी कृत्य करण्यात आले. परंतु प्रेषितांनी संयमाने आपला धर्मप्रचार सुरुच ठेवला.
0 Comments