मा. अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात की, आम्हाला पैगंबरांनी उपदेश केला, ‘‘तरुणांनो, वैवाहिक पात्रता असणाऱ्यांनी जरूर विवाह करावा. त्यामुळे दृष्टी-संयम प्राप्त होतो आणि माणूस चारित्र्यसंपन्न होतो. मात्र पात्रता नसणाऱ्यांनी रोजे (उपवास) ठेवावेत. रोजा वासनांवर नियंत्रण ठेवण्यात गुणकारी आहे.’’ (मुस्लिम व बुखारी)
निरुपण-
वैवाहिक पात्रता असणाऱ्याने अविवाहित राहणे कदापि योग्य नव्हे. त्याने जरूर विवाह करावा. वैध मार्गाने लैंगिक गरजेची परिपूर्ती केल्याने माणूस व्यभिचारापासून सुरक्षित होतो. अविवाहित व्यक्ती सदैव सैतानाच्या जबड्यात असते. विषयसुखाची भूक माणसाला वाममार्गाकडे नेऊ शकते.
तरुण मुलामुलींना अधिक काळ वैवाहिक जीवनापासून वंचित ठेवल्याने समाजात अनेक घृणास्पद व अनैतिक समस्या फोफावतात. विषयसुखाचा एकमेव वैध मार्ग म्हणजे विवाह आहे. मानवजातीची जोडप्याच्या स्वरूपात निर्मिती ही अल्लाहची महान कृपाच आहे, असे कुरआन म्हणतो. पती-पत्नी एकमेकांच्या पोषाखासमान आहेत, असेही कुरआनात वर्णन आहे. इस्लाम माणसाला चारित्र्यसंपन्नतेच्या उच्चतम शिखरापर्यंत पोहचवू इच्छितो. त्यासाठी विवाह अनिवार्य आहे. चारित्र्यसंपन्न व्यक्ती, चारित्र्यसंपन्न कुटुंब व चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीमध्ये विवाहाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र काही लोक विवाह करणे, संसार करणे इ. बाबींना अध्यात्मापासून वेगळे समजतात. हे कदापि योग्य नव्हे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा स्पष्ट सांगितले की, पत्नीशी संभोग करणेदेखील पुण्यच आहे. त्यावर एकाने आश्चर्याने विचारले की, ते कसे? पैगंबरांनी त्याला प्रतिप्रश्न केला की जर तो व्यभिचार करत असेल तर ते पाप नव्हे काय? तो म्हणाला होय, ते पापच! मग पैगंबर म्हणाले की जर व्यभिचार करणे पाप असेल तर पत्नीशी संभोग करणे पुण्य का नसावे?
खरे तर अविवाहित माणसाची नीतिमत्ता कधी ढासळेल याचा नेम नाही. म्हणूनच आपण पाहतो आज समाजात तथाकथित चांगली वाटणारी माणसे, अगदी बुवा-बापूदेखील व्यभिचारामुळे तुरुंगात खितपत आहेत.
0 Comments