Home A प्रेषित A क्रांतिकारी सफल जीवन

क्रांतिकारी सफल जीवन

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी रानटी लोकांतून नवी संस्फूर्त असे संघटित राष्ट्र निर्माण केले. त्यांना ईशज्ञान देऊन कृतार्थ केले, पवित्र केले. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातात रंगणारे असे अरब होते. त्यांना ‘तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय ईशपूजा’ असे ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनी एकत्र केले. विभक्त झालेल्या अरबांना त्यांनी जोडले. बंधुभावाने बांधले. संघटित केले. अनादिकाळापासून हे द्वीपकल्प अंधारात गुडुप होते. आध्यात्मिक जीवनाचे नावही नव्हते. ज्यूंच्या वा खिस्तांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रुढी, दृष्टता, दुर्गुण यांच्या घाणीत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत! मोठा मुलगा स्वत:च्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत, त्यांना स्वत:च्या बायका करी.
थोड्या वर्षांपूर्वी असा हा अरबस्तान होता. परंतु मुहम्मद (स.) यांनी केवढे स्थित्यंतर केले! जणू स्वर्गातील देवदूत खाली वावरायला आला. ज्यांची मने अर्धवट जंगली होती, अशांची मने भ्रातृभाव व प्रेम यांनी भरून गेली. अरबस्तान नैतिकदृष्ट्याही ओसाड वाळवंट होते. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथे पायमल्ली होत होती; परंतु मुहम्मद (स.) यांनी तेथे नैतिक नंदनवन फुलविले. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाची फुले फुलविली. मूर्तिपूजा व तद्नुषंगिक इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केले.
जो अल्लाह स्वत:च्या सामर्थ्यने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या एकमेव अल्लाहची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहम्मद (स.) यांनीच करून दाखविला. इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुन्हा आली नाही आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांची वाणी अत्यंत प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. अल्लाहचे अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणे, तीव्रपणे क्वचितच कोठे उपदेशिले गेले असेल, उद्घोषिले गेले असेल. अरब अत:पर केवळ ऐहिकदृष्टीचे राहिले नाहीत. मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असे जीवन असते. त्या पारलौकिक जीवनासाठी या जीवनात दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनात दाखविली पाहिजेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शिकविले.
हा जो अमूर्त ईश्वर तो अनाद्यनन्त आहे तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान, प्रेमसिंधू व दयासागर आहे. ही जी नवजागृती आली त्याचे मुहम्मद (स.) स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणू नवप्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यातून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वाहत होते आणि म्हणून मुहम्मद (स.) यांच्याविषयी भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणू आता एकच इच्छा झाली की त्या अल्लाहची सत्याने व पावित्र्याने सेवा करावी. अल्लाहची आज्ञा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जे जे सांगितले, जी जी वचने उच्चारिली, जे जे मार्गदर्शन केले, जी सत्ये दिली, ते सारे अरबांच्या हृदयात जणू कोरल्यासारखे झाले होते. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीती यांचे ऐक्य झाले. सद्सद्विवेकबुद्धीसाठी आनंदाने बलिदाने करणारे दिसू लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभू लागले. जगाला एवढी मोठी जागृती इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल.
मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत आपले कार्य पुरे केले. बुद्धाचे काम अशोकाने पुरे केले. खिस्ताचे कॉन्स्टंटाईनने, झरतुष्ट्राचे उरायसने, बनीइस्राईलांचे जोशुआने. परंतु मुहम्मद (स.) एक असे झाले ज्यांनी स्वत:चे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेही कार्य पुरे केले. जणू सारे काम अल्लाहच करवीत होता, मुहम्मद (स.) निमित्तमात्र होते, असे मुस्लिमांनी म्हटले तर त्यात काय आश्चर्य?
ज्याला कालपरवापर्यंत दगड फेकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधित आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्त्रप्रणाम, त्या महापुरुषाला.
मुहम्मद (स.) यांचे जीवन उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मांनी खच्चून भरलेले असे हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनी चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांना त्यांनी एक केले. अमर जीवनाच्या आशेने कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्तत: पडलेले किरण वेंâद्रिभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणे नाही. तडजोडीस वाव नाही.
अप्रतिहत धैर्याने हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधीच बाळगिली नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वत:च्या जणू संपूर्ण विसर त्यांना पडला होता. खिस्ताने निराकार प्रभूचा धर्म दिला; परंतु त्या धर्मात मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेत चुस्त गढून गेलेल्या अरबांना या न पढलेल्या फकीराने इतक्या प्रखरतेने ईश्वराची एकता पटविली की ती वज्रलेप झाली. ज्यांनी ज्यांनी म्हणून पैगंबरांची वाणी एकदा ऐकली, त्यांच्या मनावर ईश्वराचे अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय राहत नसे.
संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *