Home A मूलतत्वे A ईश्वरभक्तांचे विश्वबंधुत्व

ईश्वरभक्तांचे विश्वबंधुत्व

नमाजसाठी मुस्लिमांना हाक देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अशी पद्धत जगातील कोणत्याच धर्मीय वा निधर्मी समाजात प्रचलित नाही.
नमाजसाठी हाक देण्याचा एकाच प्रकारचा शब्दसमूह (अजान) जगातील प्रत्येक मस्जिदीतून दिवसातून पाच वेळा पुकारला जातो. ‘अजान’ देणाऱ्याची व ज्यांना बोलाविण्यात येत आहे त्यांची मातृभाषा कोणतीही असो, ‘अजान’ अरबी भाषेतच पुकारली जाते. जगातील कोणत्याही भागातील मुस्लिमास ‘अजान’ ऐकताच नमाजकरिता हाक दिली जात आहे असे समजते. अजानने हेही लक्षात येते की, त्यांना (अर्थात सर्व इस्लाम धर्मियांना) कोठे बोलाविले जात आहे?
अजान केवळ नमाजसाठी दिलेली हाक नसून इस्लामच्या मूलतत्त्वांचे जाहीर प्रकटन आहे. ‘ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय कोणीही आराध्य नाही, मुहम्मद (स.) ईश्वराचे प्रेषित आहेत, नमाज (अदा करण्या) साठी या, (ईशभक्तीने) कल्याण व सफलता प्राप्त करा,’ हा अजानचा संक्षिप्त अर्थ आहे. लोकांना बोलविण्याकरिता यापेक्षा चांगली उद्घोषणा होऊच शकत नाही. याच हाकेला प्रतिसाद म्हणून मुस्लिम बांधव सर्व कामकाज सोडून मस्जिदीकडे धाव घेतात व दिवसातून पाच वेळा शिस्तबद्धपणे एकत्रित नमाज अदा करतात.
नमाज
नमाजची वेळ, नमाज अदा करण्याची पद्धत व नमाजमध्ये जे पठण करायचे, ते जगात सर्वत्र एकाच प्रकारचे असून काही बाबतीत नाममात्र फरक वगळता, जगातील सर्वच देशांतील मुस्लिमांच्या नमाजमध्ये कोणताच विशेष फरक आढळून येत नाही. त्यामुळे जगातील मुस्लिमांत ईशभक्तीची भावना सतत जागृत ठेवली जाते आणि एकता व विश्वबंधुत्वाची भावना सतत तेवत राहते.
रोजा
‘रोजा’ (म्हणजेच उपवास) अशाच सामूहिकतेच्या स्वरुपात पाळला जातो. रोजाबाबतही विशिष्ट काळ, वेळापत्रक व अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. रोजे ठेवण्याकरिता रमजानचा महिना निश्चित करण्यात आला आहे. उद्देश हाच की, सर्व मुस्लिमांनी एकाच वेळी रोजाचे पालन करावे. रोजा सुरु होण्याची व संपण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून सर्वांचा रोजा एकाच वेळी सुरू होऊन एकाच वेळी पूर्ण व्हावा. रोजाबाबतचे आदेशही समसमान देण्यात आले आहेत. त्यामुळे साऱ्या मुस्लिमांना आयुष्यभर दरवर्षी रमजान महिन्याचे ३० (किवा २९) दिवसांचे रोजे एकाच पद्धतीने, एकाच प्रकारच्या बंधनानुसार पूर्ण करायचे असतात. या पद्धतीमुळे जगातील सर्व मुस्लिमांमध्ये ते समान धार्मिक तत्त्वाचे पालन करीत आहेत, अशी एकतेची दृढ मानसिकता निर्माण होते. याशिवाय संपूर्ण जगात रमजान महिन्याच्या प्रत्येक रात्री (पाच वेळेच्या नमाजव्यतिरिक्त) तरावीहची नमाज एकत्रितरीत्या अदा केली जाते व तरावीहच्या नमाजमध्ये संपूर्ण कुरआनचे पठण केले जाते. अशा तऱ्हेने तरावीह प्रार्थनाही आहे व कुरआनचा प्रचार व पठणही आहे. त्यामुळे मुस्लिमांमध्ये धार्मिक चेतना निर्माण होते. दरवर्षी संपूर्ण कुरआनचे श्रवण करणाऱ्यांची भाषा अरबी असो वा नसो, त्यांना त्याचा अर्थ समजो वा न समजो, ते सर्वच्या सर्व एकाच (धर्म) ग्रंथावर श्रद्धा ठेवणारे आहेत व कुरआन निश्चितच ईश्वरीय ग्रंथ आहे, असा विश्वास त्या सर्वांच्या मनात दृढ होतो.
हज
इस्लाम धर्मियांच्या हज या धार्मिक विधीमुळे इस्लामच्या विश्वव्यापी सामाजिकतेचे अनुपम दर्शन घडते. जगातील प्रत्येक सधन मुस्लिम व्यक्तीला हज अनिवार्य करण्यात आले आहे व हे कर्तव्य (अनिवार्य) वर्षातील विशिष्ट तारखांना पार पाडले जाते. या तारखांच्या काळातच जगातील ज्या ज्या भागात सधन मुस्लिम राहतात, ते मक्का (सऊदी अरेबिया) येथे एकत्र येतात. हजनिमित्ताने जगाच्या विविध भागांतून सामान्य सधन मुस्लिम फार मोठ्या संख्येने एकत्र येतात. यू.एन.ओ. (संयुक्त राष्ट्रसंघा) च्या सभेला केवळ राजकीय मुत्सद्दी लोक प्रतिनिधित्व करतात. जागतिक चर्चासत्रात केवळ राजकीय पुढारी भाग घेतात, मात्र हजनिमित्ताने जगाच्या सर्व देशांतील मुस्लिम लाखोंच्या संख्येने डेरेदाखल होतात. एका सर्वशक्तिमान ईश्वराची एकत्र आराधना करणे, हाच त्यांचा एकमात्र उद्देश असतो. ते सर्व काबागृहाला प्रदक्षिणा घालतात. एकत्र मक्केहून मीना येथे जातात. तेथून ते अरफातला प्रस्थान करतात. अरफातहून मुझदल्फा व मुझदल्फाहून मीनाकडे परतीचा प्रवास करतात. एकाच वेळी जनावरांचे बळी देतात, एकत्रितरीत्या सैतानाला दगडाचे तुकडे फेकून मारतात. मीना व अरफातमध्ये एकत्र विश्राम करतात. एकाच (अरबी) भाषेत ‘लब्बैक’ च्या घोषणा देतात. एकाच वेळी काबागृहात चौतर्फा नमाज पढतात. याच काबागृहाच्या दिशेने जगातील सर्व मुस्लिम दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. त्या लोकांत जगातील सर्व वंशांच्या, वर्णांच्या, भाषांच्या व देशांच्या रहिवाशांचा समावेश असतो. सर्व लोक विविध प्रकारचे पोषाख धारण करतात, त्यात गरीब, श्रीमंत, राजे-महाराजे आणि दीन-हीन भिकारीही असतात. इतका विषम जनसमुदाय असूनही त्यांच्यात समतेचे अतुलनीय दृश्य पाहायला मिळते. काबागृहाच्या हद्दीत पोहचताच सर्व हाजी आपले खाजगी वेष काढून एकाच प्रकारचा अत्यंत शुभ्र व साधा वेष परिधान करतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते कोणत्या देशाचे रहिवासी आहेत व त्यांचा सामाजिक दर्जा काय आहे, हे मुळीच लक्षात येत नाही. उच्च दर्जाच्या माणसाला, साधारण माणसाच्या पंक्तीत आणले जाते. अत्यंत सुसंस्कृत व श्रीमंत व्यक्तीस साधारण व्यक्तीची दशा प्राप्त होते. काबा मस्जिदीस प्रदक्षिणा घालताना गरीब व श्रीमंत, गोऱ्या व काळ्यामध्ये कोणताच फरक केला जात नाही. काबागृहाच्या आवारात पोहचल्यानंतर माणसातला अहं नष्ट होतो व स्वतःच्या श्रेष्ठत्वाची जाणीव लुप्त होते व त्यांच्यातला वंश, वर्ण, भाषा व देशाचा भेदभाव कायमस्वरुपी नष्ट होतो. जगातील कोणत्याच धार्मिक वा निधर्मी जनसमूहाकडे मानवी भेदभाव संपुष्टात आणून समतेची भावना जागृत करणारा व सतत दरवर्षीं ती प्रक्रिया चालू ठेवणारा असा कोणताच चमत्कारिक मार्ग वा उपाय उपलब्ध नाही. हा ईश्वरीय आदेशाचा चमत्कार आहे, सर्वशक्तिमान ईश्वराच्या एकत्वावर श्रद्धा ठेवून त्याच्या प्रेषिताचे उपदेश व कुरआनातील आदेशानुसार जीवन व्यतीत करण्याचा निश्चय करणारे श्रद्धाळू मुस्लिम एक सशक्त समाजाचे रुप धारण करतात.
ईदु द्दुहा / बकरी – ईद
ईश्वराचे उपकार मानायला हवे की, त्याने हजचे पुण्यकार्य व पवित्र वातावरण काबा या इस्लामच्या केंद्रस्थानापर्यंतच सीमित न ठेवता जगातील सर्वच मुस्लिमांना त्यात सामील करून घेतले आहे. जगात विविध स्थानी वास्तव्य करून राहणाऱ्या मुस्लिमांनासुद्धा हजच्या दिवसांत हजच्या प्रक्रियेत सामील होण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. बकरी ईद (ईदु द्दुहा) च्या तीन दिवसांत सामूहिक नमाज व जनावरांचे बळी देण्याची प्रथा त्याच प्रक्रियेतला भाग आहे.
जगातील सर्व मुस्लिम बांधवांना आदेश देण्यात आले आहेत की, हिजरी सनाच्या ९ जिल्हज्ज या तारखेला जेंव्हा हाजी ‘मीना’ या स्थानापासून अरफातला रवाना होतात, त्याच दिवसाच्या सकाळपासून प्रत्येक फर्ज (अनिवार्य) नमाजनंतर उच्च आवाजात ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाह इल्लल्लाहा वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द’’ ची उद्घोषणा करण्यास सुरुवात होते. या घोषणा सतत चार दिवसांपर्यंत चालू ठेवाव्यात. कारण हज करणाऱ्यांचा या चार दिवसांचा काळ ‘मीना’ या भागात व्यतीत होतो. ईदुद्दुहाची नमाज इस्लामी महिना जिल्हजच्या दहा तारखेला आयोजित केली जाते, कारण हाजी त्या दिवशी कुरबानीचा (बलिदानाचा) दिवस साजरा करीत असतात. ईदच्या नमाजला जाताना व परत येताना याच घोषणा देत जावे, असे मुस्लिमांना सांगण्यात आले आहे. साऱ्या जगातील सधन मुस्लिम ईदच्या नमाजनंतर ‘मीना’ येथील हाजीप्रमाणे आपापल्या गावात कुरबानीचा कार्यक्रम करतात. अशा तऱ्हेने जगातील सर्व मुस्लिमांना तेसुद्धा हजच्या पुण्यकार्यात सहभागी असल्याचे समाधान प्राप्त होते. हजच्या मैदानावर एकत्र झालेल्या जनसमुदायाइतका विशाल समूह जगातील प्रत्येक गावात बकरी -ईदच्या दिवशी एकत्र येत नाही. तरीही आपापल्या गावात वा शहरात शक्य तितका मोठा जनसमूह ईदची नमाज अदा करतो व जागतिक पातळीवर बकरी ईद साजरी केली जाते. हे मुस्लिमांचे सामूहिक एकतेचे खुले प्रदर्शन सिद्ध होते.

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *