जे लोक इस्लामला गतकाळाची गोष्ट समजतात व वर्तमानकाळातील त्याची उपयुक्तता, तसेच आवश्यकता यांचा इन्कार करतात ते वास्तवात इस्लामचे खरे स्वरुप जाणत नाहीत व जीवनातील त्याच्या खऱ्या संदेशासी व ध्येयाशी अनभिज्ञ आहेत. लहानपणी साम्राज्यवाद्यांच्या एजंटांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातून त्यांना जे काही शिकविले गेले तोच शिकविलेला धडा ते आजही गिरवीत आहेत. त्यांच्यामते इस्लामच्या उदयाचा हेतू मानवाला मूर्तीपूजेपासून मुक्त करण्याचा होता. तसेच परस्पराशी वैरभाव बाळगणाऱ्या अरबी टोळ्यांची एकजूट करुन त्यांच्यात बंधुत्व निर्माण करण्याचा होता. तसेच दारु पिणे, जुगार खेळणे, मुलींना जिवंत पुरणे व याप्रकारच्या अनेक नैतिक दोषांपासून मुक्त करण्याचा होता. म्हणून इस्लामने अरबांमधील आपापसातील झगडे व लढाया समाप्त करुन त्यांची शक्ती नष्ट होण्यापासून वाचवली व नंतर जगामध्ये आपल्या संदेशाचा प्रचार करण्याकरिता या शक्तीचा उपयोग केला. या ध्येयासाठी मुस्लिमांना इतर जातीशी अनेक युद्धे करावी लागली. परिणामस्वरुप इस्लामी जग आपल्या वर्तमान मर्यादांसह या विश्वपटला वर उभे राहिले. हा एक असा ऐतिहासिक संदेश व ध्येय आहे ज्याचे कार्य आता पूर्ण झाले आहे. जगात मूर्तिपूजा संपली आहे. अरब टोळ्यांनी आता मोठमोठ्या राष्ट्रांचे रुप धारण केले आहे, म्हणून आता इस्लामची काही गरज उरली नाही. कारण जेथपर्यंत जुगार खेळण्याचा व मदिरा प्राशन करण्याचा संबंध आहे, त्यावर आजच्या संस्कृतीच्या व संस्काराच्या युगात कोणताही पायबंद घालणे शक्य नाही. याचा अर्थ असा की या लोकांमध्ये इस्लाम एका विशेष काळापुरता अतिउचित जीवनव्यवस्था देणारा धर्म होता. पण आज जग इतके पुढे गेले आहे की आज इस्लामच्या मार्गदर्शनाची काही गरज उरली नाही. म्हणून मार्गदर्शन व प्रकाशाकरिता आम्ही त्याच्याकडे पाहू नये. उलट सिद्धान्त व जीवनदर्शनापासून हा प्रकाश व उपदेश घ्यावयास पाहिजे. यातच आमची मुक्ती होऊ शकते व यातच आमचे कल्याण सामावलेले आहे.
पाश्चिमात्यांचे हे पौर्वात्य चेले आपल्या गुरुंच्या वाक्यांचा पुनरुच्चार करुन अनिच्छेने व अज्ञानाने आपल्या संकुचितपणाची जाणीव करुन देतात. हे बिचारे इस्लामला जाणतही नाहीत, तसेच जीवनातील त्याचे वास्तविक उद्देशही त्यांना ठाऊक नाहीत. म्हणून पुढे जाण्यापूर्वी ‘इस्लाम’, त्याचा अर्थ व उद्देश यावर थोडीशी चर्चा आवश्यक आहे.
0 Comments