इस्लाम हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ शांती, पावित्र्य आणि संपूर्ण जीवन ईश्वरी नियमानुसार जगणे म्हणजेच इस्लाम होय. आणि जो संपूर्ण ईश्वरी नियमानुसार जीवन जगतो तो मुस्लिम आहे. मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे की, 1) माणसाने आपल्या अंतःकरणाने अल्लाहाच्या अस्तित्वाला एक मानने. 2) अल्लाहाच्या प्रेषितांवर म्हणजेच आदरणीय आदमअलैह सलाम पासून ते अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) पर्यंत ही प्रेषितांची शृंखला होती त्याला मान्य करणे. आणि अल्लाहाच्या अंतिम प्रेषितावर जी परिपूर्ण ईश्वरी जीवनव्यवस्था अवतरित झाली होती त्याला मान्य करणे.
इस्लामचे मुलभूत पंचतत्व :- इस्लाम ही एक संपूर्ण जीवनव्यवस्था असल्याकारणाने साहजिकच या जीवनातील प्रत्येक कर्म इस्लामच्या दृष्टीने इबादत (सत्कर्म, उपासना, प्रार्थना) ठरते. उपासनेचे काही प्रकार असे आहेत जे सर्वांना बंधनकारक व अनिवार्य आहेत. ते मूलतः पाच आहेत. ज्यांना इस्लामचे आधारस्तंभ म्हटले जाते. हेच पाच स्तंभ ईश समर्पित
जीवनाची रूपरेखा निर्धारित करतात.
1) इमान (श्रद्धा) :- हे मान्य करणे ही की सृष्टी आपोआप अस्तित्वात आलेली नाही आणि असेही नाही की या सृष्टीचे अनेकानेक स्वामी, निर्माते व शासक असावेत. या संपूर्ण विश्वाचा स्वामी, निर्माता, शासक, नियंत्रक, सामर्थ्यवान, प्रभूत्वशाली एकमेव एकच अल्लाह (ईश्वर) आहे. अर्थात इमानने अभिप्रेत आहे की, साक्ष देणे की, अल्लाह (ईश्वर) शिवाय कोणीही नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांना अंतिम प्रेषित म्हणून मान्य करण्याचा अर्थ हा आहे की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ईश्वरांने जी परिपूर्ण आणि अंतिम जीवनव्यवस्था अंतिम प्रेषितावरती अवतरित केली. तयला मान्य करून त्यानुसार संपूर्ण जीवनात त्याचे अनुसरण करावे.
2) नमाज (प्रार्थना) : प्रत्येक मुस्लिमावर एक अनिवार्य कर्तव्य म्हणून दिवसातून पाच वेळा सामुहिक नमाज अदा करणे बंधनकारक आहे. नमाजच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्तीचा अल्लाहशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. नमाजमध्ये अल्लाह समोर नतमस्तक होताना माणसांतील गर्विष्ठपणा संपुष्ठात येतो. नमाजमुळे संपूर्ण समाजात समता प्रस्थापित होते. नमाज माणसाच्या चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहचविते. नमाज माणसाचे अंतः करण शुद्ध करते व त्याला दुराचार व निर्लज्जतेपासून परावृत्त करते.
3) रोजा (उपवास) – रोजा प्रत्येक मुस्लिमावर रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. याचा उल्लेख कुरआनमध्ये असा करण्यात आला आहे. ’’या अय्युहल्लजीना आमनु कुतिबा अलैकुमस् सियामु कमा कुतिबा अलल-लजीना निकबलिकुम लाअल्लक्कुम तत्तकून. (सुरे अलबकरा : आयत क्र. 183.)
अर्थ : हे श्रद्धावंतांनों! तुम्हावर उपवास त्याच प्रमाणे अनिवार्य करण्यात आले आहेत, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वीच्या उम्मतींच्या अनुयायांवरती अनिवार्य केले गेले होते. जेणेकरून तुम्हामध्ये तकवा (संयम, ईशपरायणता, चारित्र्यसंपन्नता) निर्माण व्हावा.
रोजा केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हटले ’’ जो रोजा ठेवूनही खोटे बोलणे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काहीच गरज नाही.’’ पवित्र कुरआनने इशपरायणता हाच रोजांचा खरा उद्देश आहे. असा उल्लेख केला आहे. जो वरील आयातींमध्ये दर्शवितो, ’’तकव्याचा अर्थच आहे ईशपराणता, ईश-भीरूता, आचार-विचारांची शुद्धता चारित्र्य संपन्नता. ज्याचा परिपूर्णपणे संपूर्ण जीवनावरती परिणाम असावा.
4) जकात : प्रत्येक धनसंपन्न मुस्लिामासाठी त्याच्या पवित्र कमाईतून संपत्तीच्या 2.5 प्रतिशत वर्षा अखेरच्या हिशोबांती ठरवून दिलेली रक्कम होय. जकात ही श्रीमंत लोकांच्या संपत्तीवरती ज्याचे प्रमाण 52.5 तोळे चांदी (595 ग्रॅम) व 7 तोळे सोने (70 ग्रॅम) यांच्या किमती बरोबरच्या व त्या अतिरिक्त रक्कमेवर सुद्धा 100 रू. वर 2.5 पैसे म्हणजेच 2.5 प्रतिशत यानुसार श्रीमंत लोकांचा संपत्तीवरचा गरीबांचा काढलेला वाटा होय. जकात नियोजन सामुहिकरित्या व्हावे असे निर्देश आहेत. जकातचा उपयोग समाजातील दीन-दुबळ्यांसाठी, प्रवासी, गुलामांना व कैद्यांना मुक्त करण्यासाठी, सदाचाराच्या संवर्धनासाठी व दृष्टकृत्यांच्या निर्मुलनासाठी, इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी व ईशमार्गात केला जावा, असे संकेत पवित्र कुरआनात आहेत.
5) हज :- आर्थिक व शारीरिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिमावर आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे. हजमध्ये मक्का येथील पवित्र काबागृहाची प्रदक्षिणा (तवाफ) व हजच्या इतर विधिंचा समावेश होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण (तमाम) मुस्लिम बांधव हजसाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वांचा एकच पोशाख – एहरामच्या दोन पांढऱ्या शुभ्र चादरी ! विश्वबंधूत्व व समतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा आगळा वेगळा, डोळे दिपवून टाकणारा असा हा महान सोहळा ! इस्लामची वरील पाचही अनिवार्य कर्तव्ये पुरूष व स्त्रिया दोघांना सारखेच लागू आहेत. हे येथे विषद करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीपासूनच इस्लामने स्त्रियांनाही मानाचे स्थान दिले आहे. ईमान, नमाज, रोजे, जकात, हज इत्यादी स्त्रियांसाठी
बंधनकारक आहे.
जीवनाचा उद्देश :-
अल्लाहने या सृष्टीत व्यर्थ अशी कोणतीही वस्तू निर्माण केली नाही, मग ती कितीही क्षुल्लक का असेना. मग या सृष्टीतील सर्वात महान असलेल्या मानवाची निर्मिती का व्यर्थ असेल? कदापि नव्हे! हे जीवन प्रत्येक माणसासाठी परीक्षा आहे. साधन-सामुग्री देवून पात्रता देवून, आचार-विचारांचे स्वातंत्र्य देवून, सन्मार्ग व वाम मार्ग स्पष्ट करून येथे प्रत्येकाची वेगवेगळ्या स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. की कोण स्वेच्छेने ईश सन्मार्गाची निवड करतो कोण वाममार्गाची निवड करतो हे जीवन खरे तर ईश अज्ञांचे अनुपालन करण्यासाठी आहे. अल्लाहशी कृतज्ञ राहण्यासाठी आहे, कृतघ्नतेसाठी नव्हे.
प्रत्येक व्यक्ती उत्तरदायी :-
सद्य जीवन नाशिवंत असून प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. तद्वतच या संपूर्ण सृष्टिचाही एक ठराविक वेळी अंत होईल. तत्पश्चात समस्त मानवजातीला पुन्हा जीवंत केले जाईल. न्याय-निवाडा होईल. प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. ज्यांनी ईशसंदेशाचा स्वीकार करून त्यानुसार कर्म केले, त्यांना पुरस्कृत केले जाईल व ज्यांनी ईश-संदेश धुडकावून वाममार्ग अंगीकारला, अन्याय-अत्याचार केला व केवळ चंगळवादी जीवन जगले त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. मृत्यू पश्चातचे हे जीवन अविनाशी, निरंतर, आनंत व शाश्वत असेल.
पवित्र कुरआनातील या सर्वांगीण मार्गदर्शनानुसार प्रेषित मुहम्मदांनी (स.) एक आदर्श राष्ट्र निर्माण केले. कुरआन : अल्लाहने पवित्र कुरआनला दिव्य प्रकरटनाद्वारे (वह्य) प्रेषित मुहम्मदांवर (सल्ल.) अवतरित केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अशिक्षित होते. त्यांना ना लिहिता येत होत न वाचता येत होते. त्यांच्या अनुयायांनी पवित्र कुरआनला मुखोदत करून व लिपीबद्ध करून सुरक्षित ठेवले हे कार्य प्रेषितांच्या देखरेखीत त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. ज्या पवित्र कुरआनच्या आधारे प्रेषित मुहमम्मद (सल्ल.) यांनी एक आदर्श राष्ट्र उभे केले. तो कुरआन आजही अगदी त्याच मूळ स्वरूपात, तंतोतंत जसाच्यातसा उपलब्ध आहे. त्यात यत्कींचितही हेराफेरी झाली नाही. आणि हा पवित्र संदेश अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. जगातल्या बहुतेक भाषेमध्ये त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत.
हदीस : प्रेषित मुहम्मद सल्ल. उपदेशांना हदीस म्हणून संबोधले जाते. मोठी सतर्कता व सावधगिरी बाळगून त्यांच्या अनुयायांनी हदीसचे संकलन केले. कुरआन हा ईशग्रंथ असून हदीस हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. इस्लामच्या दृष्टीकोनातून सदाचार म्हणजे केवळ नमाज, रोजा, जकात व हज यात्राच नव्हे. तर जीवनातील प्रत्येक पवित्र कार्य हे सदाचार होय. अल्लाह जवळ प्रार्थना आहे की, तो आम्हा सर्वांना व अखिल मानवजातीला त्याच्या नियमावरती पूर्णपणे सत्यावरती आधारित जीवन जगण्याची सद्बुद्धी देवो व पारलौकीक (मरणोत्तर) जीवनातील यश प्राप्ती होवो. आमीन! सुम्मा आमीन!
– शेख मु. जुबैर अहमद, लातूर
0 Comments