प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा ताकीद केली आहे. यसीरा बिन्ते यासिर (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘हे स्त्रियांनो ! तुम्ही ‘तसबीह’ (सुबहानल्लाह), ‘तहलील’ (ला इलाहा इल्लल्लाहु) आणि ‘तकदीस’ (सुब्बूहुन कुद्दूसुन) हा जप आवश्यक करा. बोटांच्या कांड्यावर त्यांची गणना करा. याचे कारण असे की, बोटांनादेखील विचारले जाईल व म्हणविले जाईल. नामस्मरणात निष्काळजीपणा करू नका; नाहीतर अल्लाहच्या कृपेपासून वंचित रहाल.’’ (मिश्कातुलमसाबीह किताबुद्दावात, तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी काही वेळा स्त्रियांना विशेष नामस्मरणाचासुद्धा उपदेश केला आहे. माननीय अली (र) म्हणतात की, माननीय फातिमा (र) यांच्यापाशी कोणताही सेवक नव्हता. घरचे कामकाज त्या स्वतःच करीत असत. पीठ दळल्यामुळे त्यांच्या हाताला फोड आले होते. एकदा काही गुलाम आले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांना आपल्या कष्टाविषयी सांगायला व एका गुलामाची मागणी करावयास गेल्या. प्रेषित मुहम्मद (स) घरी नव्हते, म्हणून माननीय आयेशा (र) यांच्याजवळ यासंबंधी बोलून माननीय फातिमा (र) घरी निघून आल्या. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचेजवळ माननीय फातिमा (र) यांचे आगमन आणि त्यांच्या गरजेचा उल्लेख केला. प्रेषित मुहम्मद (स) रात्री आमच्या घरी आले. आम्ही पहुडलो होतो. त्यांना पाहून आम्ही उठून बसलो. त्यांनी सांगितले, ‘‘उठू नका. पडून रहा.’’ आणि आम्हा दोघांच्यामध्ये अशा प्रकारे बसले की, त्यांचे चरणकमल माझ्या पोटाला लागले होते आणि मला त्यांचा गारवा लागत होता. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हा लोकांनी ज्या गोष्टीची मागणी केली आहे तिच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू काय ? ती अशी की, जेव्हा तुम्ही आपल्या अंथरुणावर जाल तेव्हा ३३ (तेहतीस) वेळा ‘सुबहानल्लाह’, ३३ वेळा ‘अलहम्दुलिल्लाह’ आणि ३४ वेळा ‘अल्लाहु अकबर’ जपत जा. हे तुमच्यासाठी सेवकापेक्षा अधिक चांगले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह, किताबुद्दावात – प्रमाण बुखारी व मुस्लिम)
एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, या वचनांचे प्रत्येक नमाजनंतर व झोपताना पठन करीत जा. (मागील प्रमाण – मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय फातिमा (र) यांनी सेवकाची मागणी केली आणि त्याच्या उत्तरादाखल प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना अल्लाहची ‘तसबीह’, ‘तहमीद’ व ‘तकबीर’च्या जपाचा उपदेश केला. यात या गोष्टीकडे संकेत आहे की, अल्लाहच्या नामस्मरणाने माणसाच्या बळात व कार्यशक्तीतसुद्धा वृद्धी होते.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या एक कन्या म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांना या दुआचे शिक्षण देत असत –
‘‘मी अल्लाहचा जप आणि स्तुती करते. चांगुलपणाची शक्ती अल्लाहद्वारेच मिळू शकते. अल्लाह जे इच्छितो ते घडते आणि जे इच्छित नाही ते घडत नाही. माझा विश्वास आहे की, अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. आणि अल्लाहच्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीला व्यापले आहे.’’ (अबू दाऊद (किताबुल अदब))
प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, माणसाने जर सकाळी ह्या दुआचे पठन केले, तर महान अल्लाह संध्याकाळपर्यंत व संध्याकाळी केल्यास सकाळपर्यंत त्याचे रक्षण करील.
या वचनामध्ये जो भरवसा, विश्वास आणि समर्पणाची भावना प्रकट केली गेली आहे, ती खरोखर मनात उत्पन्न झाली आणि नंतर माणसाच्या वाणीने तिची अभिव्यक्तीसुद्धा झाली, तर खात्री आहे की महान अल्लाह रात्रंदिवस त्याचे रक्षण करील.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नी आणि दुसऱ्या स्त्रिया नित्याचे जपतप आणि अल्लाहचे नामस्मरण व अल्लाहच्या प्र्रार्थना स्तुति वगैरेंचा जो इतमाम करीत असत त्याचा अंदाज खालील दोन घटनांवरून येईल.
प्रेषित मुहम्मद (स) सकाळच्या नमाजनंतर आपल्या पत्नी उम्मुल मोमिनीन माननीय जबेरिया (र) यांच्या घरातून बाहेर गेले. त्या वेळी त्या नमाजमध्ये मग्न होत्या.
‘चाश्त’च्या नमाजनंतर जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) परतले तेव्हासुद्धा नमाजच्या त्याच ठिकाणी बसून होत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना विचारले की, ‘‘मी जाताना (अल्लाहचे नामस्मरण करीत असता) ज्या स्थितीत तुमच्यापासून गेलो होतो, अद्याप तुम्ही त्याच स्थितीत आहात काय ?’’ त्यांनी होकारार्थी उत्तरादाखल मान हलविली. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुमच्यापासून गेल्यापासून मी चार वचने म्हटली आहेत. परंतु ती (अर्थाच्या दृष्टीने) वजनात तुमच्या अद्यापर्यंतच्या नामस्मरणाबरोबर असतील.’’ ती वचने अशी आहेत –
‘‘मी अल्लाहचे नामस्मरण व स्तुति इतकी करतो की, त्याच्या निर्मितीची संख्या असावी, त्याच्या प्रसन्नतेइतकी, त्याच्या सिहासनाइतकी आणि त्याच्या वचनांच्या शाईइतकी.’’ (मिश्कातुल मसावीह (किताबुद्दअवात) मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय साद बिन अबी वक्कास (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) समवेत एका स्त्री (बहुत करून त्या प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकीच कोणीतरी असाव्यात.) च्या घरी गेलो. त्यांनी पाहिले की, त्यांच्यासमोर बी अथवा खडे पडलेले आहेत आणि त्या त्यांच्या आधारे स्तुति – वचनांची (तस्बीहात) गणना करीत आहेत. त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला तस्बीह (स्तुति – वचनांचे पठन) ची यापेक्षा सोपी व श्रेष्ठ पद्धती सांगू काय ? ती अशी की तुम्ही असे म्हणा –
‘‘मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, आकाशात अल्लाहची जितकी निर्मिती आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितकी अल्लाहची निर्मिती जमिनीत आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितक्या जमीन व आकाशात वस्तु आहेत. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितका महान अल्लाह निर्मितीला उत्पन्न करणारा आहे. अल्लाहची महानता ही त्याच्याबरोबर आणि अल्लाहचे स्तवनसुद्धा त्याच्याबरोबर.’’
मनुष्य महान अल्लाहचे जितके स्तवन व स्तुति करील कमी आहे. यात रात्रंदिवस मग्न राहिला तरीसुद्धा त्याचा हक्क अदा होऊ शकत नाही. या हदीसमध्ये अशा संख्यांचा आश्रय घेतला गेला आहे, ज्यांची सीमा व संख्या अनाकलनीय आहे, जेणेकरून मनुष्याने त्यांच्या आधारे आपल्या असीम भावनांची अभिव्यक्ती करावी.
उपासनेचे आधिक्य
काही अप्रसिद्ध महिला सहाबींनादेखील उपासनेची खूप आवड होती. माननीय उमर (र) यांच्या एका दासीचे नाव जाइदा असे होते. त्यांच्यासंबंधी उल्लेख आहे की –
‘‘त्या, त्या महिलांपैकी होत्या ज्या उपासनेच्या बाबतीत खूप कष्ट घेत होत्या. त्यांच्या या सद्गुणामुळे प्रेषित मुहम्मद (स) त्यांच्याशी आपुलकीने वागत.’’
काही महिला सहाबी इतकी उपासना करीत असत की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना मध्यममार्गी बनण्याची व समतोल राखण्याची ताकीद दिली. माननीय आयेशा (र) म्हणतात की, त्यांच्यापाशी हौला बिन्ते तुवैत बसलेल्या होत्या. इतक्यात प्रेषित मुहम्मद (स) यांचे आगमन झाले. मी म्हणाले, ‘‘या हौला बिन्ते तुवैत आहेत. यांच्या उपासनेची मोठी चर्चा आहे. असे म्हटले जाते की, या रात्री झोपत नाहीत. नमाज पढत असतात.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी नापसंती व्यक्त केली आणि म्हणाले –
‘‘असे करू नका. तितकीच उपासना करा जितकी तुमच्यात शक्ती आहे. अल्लाहची शपथ ! महान अल्लाह (आपल्या कृपाप्रसादाने तर) कंटाळणार नाही. तुम्ही स्वतः कंटाळून जाल. अल्लाहच्या दृष्टीने तर त्याला धर्माची तीच कर्मे पसंत आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणाऱ्याने त्यात निरंतरता व नियमितपणा अवलंबावा.’’ (बुखारी)
माननीय अनस (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी एकदा पाहिले की, मस्जिदच्या दोन खांबादरम्यान दोरी बांदलेली आहे. त्यांनी विचारणा केली की, येथे ही दोरी कसली ? लोक म्हणाले की, ही माननीय जैनब (र) (बहुतकरून उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश (र)) यांची आहे. त्या रात्री नमाज पढत असतात. जेव्हा त्या थकून जातात तेव्हा याचाच आधार घेऊ लागतात. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले –
‘‘नाही ! ही पद्धत बरोबर नाही. ही सोडा, जोपर्यंत तुमच्यापैकी कोणत्याही व्यक्तीमध्ये आल्हाद आणि ताजेतवानेपणा शिल्लक आहे तोपर्यंत त्या व्यक्तीने नमाज अदा करणे आवश्यक आहे. जेव्हा थकेल तेव्हा तिने बसावयास पाहिजे.’’ (बुखारी (किताबुत्तहज्जुद) मुस्लिम (किताबुस्सलात))
सहाबानंतरच्या म्हणजे ताबयीनच्या काळात माननीय राबिया बसरिया आपल्या उपासने व तपश्चयेंसाठी फार प्रसिद्ध होत्या. अल्लामा इब्ने खल्लकान लिहितात –
‘‘त्या आपल्या काळातील मोठ्या लोकांपैकी होत्या. सदाचार, अल्लाहचे भय आणि त्याच्या उपासनेबाबत त्यांच्या घटना प्रसिद्ध आहेत.’’
त्यांची एक सेविका म्हणते की, त्या रात्रभर नमाज पढत असत. सूर्योदयाच्या वेळी थोडावेळ मुसल्ला (नमाज पढण्यासाठी अंथरण्याचे कापड) वरच झोपत असत. जेव्हा सूर्योदय होई तेव्हा घाबरून चटकन आपल्या अंथरूणावरून असे म्हणत उठून बसत ‘‘हे आत्म्या ! किती वेळ झोपशील आणि कोठपर्यंत झोपशील ? ती वेळ लवकरच येणार आहे जेव्हा तू असा झोपशील की, अंतिम दिनीच (कियामतच्या दिवशी) उठशील.’’ त्या प्रार्थनेत म्हणत असत, ‘‘हे अल्लाह ! तू त्या हृदयाला आगीत टाकशील का की जो तुझ्यावर प्रेम करतो.’’ असे म्हटले जाते की, एके दिवशी एक अप्रत्यक्ष आवाज आला की
‘असे होणार नाही. तुम्ही आमच्या बाबतीत सुविचार ठेवला पाहिजे.’ माननीय सुफयान सूरी (र) यांनी त्यांच्याजवळ अंतिम दिनाची आठवण करून म्हटले, ‘‘अरेरे, हे दुःख आणि क्लेश !’’ त्यांनी सांगितले, ‘‘चुकीची गोष्ट सांगू नका. असे म्हणा, ‘‘अरेरे, किती दुःख कमी आहे !’ त्याला कारण असे की, खऱ्या अर्थाने तेथील परलोकीचे दुःख मिळाले, तर श्वासोच्छवास करणे कठीण होईल. (वफीयातुल आयान लिब्नि खल्लकान)
उम्मुस्सहबा मआजा बिन्ते अब्दुल्लाह यांची इब्ने हिब्बान यांनी उपासिकामध्ये गणना केली आहे. असे म्हटले जाते की, त्यांचे पति अबुस्सहबा यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्या कधीही अंथरुणावर झोपल्या नाहीत. त्या रात्रभर जागून उपासना करणाऱ्या महिला होत्या. त्या म्हणत असत की, ‘‘या डोळ्यांचे आश्चर्य वाटते जे झोपत असतात, की जेव्हा त्यांना माहीत आहे की, कबरीत दीर्घ निद्रेत झोपावयाचे आहे.’’ त्या आपल्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, त्यांना पोटाचा काही त्रास होत होता, म्हणून घागरीत ठेवलेल्या नबीज (सातू व खजूरपासून बनविलेले मद्य) चा उपाय म्हणून उपयोग करण्याची त्यांना सूचना केली गेली. जेव्हा त्यांच्यासमोर त्याचा पेला आणला गेला, तेव्हा त्यांनी तो पेला ठेवला व प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! तुला हे ज्ञात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी ही हदीस ऐकविली होती की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी नबीजचा उपयोग करण्यास मनाई केली आहे. तू मला यापासून वाचव आणि आपल्या कृपेने माझी प्रकृती चांगली कर.’’ ही प्रार्थना केल्याक्षणी पेला पालथा झाला आणि त्यांचा त्रास नाहीसा झाला. (तहजीबुत्तहजीब १२ : ४५२ येथे या गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कोणत्याही कर्माचे बरोबर अथवा चुकीचे असण्याचा निर्णय कुरआन व सुन्नतच्या आधारे होईल. या पुस्तकात ज्या घटनांचा उल्लेख आला आहे त्यात एखादे वेळी न्यूनाधिक्य दिसून आले तर तो पुरावा ठरणार नाही. त्यांचा उल्लेख केवळ या दृष्टीने केला गेला आहे की, प्रारंभिक काळातील स्त्रिया उपासनेच्या किती इतमाम करीत असत व अल्लाहशी त्यांचे संबंध किती दृढ होते.)
0 Comments