आपल्या आजोबाप्रमाणेच आदमच्या संततीवरही अल्लाहची कृपा आहे. आपल्या अपराधानंतरही आदरणीय आदम (अ) जसे अल्लाहच्या कृपेपासून वंचित झाले नाहीत तसेच त्यांची संतती ही गुन्हा व पाप घडल्याकारणाने अल्लाहच्या कृपेपासून वंचित होत नाही. कारण अल्लाह मानवी स्वभावधर्मातील कमकुवतपणा व त्याच्या मर्यादा चांगल्या रीतीने जाणतो व जेवढा भार ते पेलू शकतात तेवढाच भार त्यांच्यावर टाकतो –
‘‘अल्लाह कोणत्याही प्राण्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे लादत नाही.’’ (कुरआन,२:२८६)
सर्व मानव (आदम (अ) ची संतती) अपराधास व चुकास पात्र आहेत व जे आपल्या अपराधासाठी (लज्जित होऊन) क्षमा याचना करतात, ते लोक अपराध्यांमध्ये महान आहेत.’ (तिर्मिजी)
अल्लाहच्या कृपेची व्यापकता
अल्लाहच्या दयेक्षमेबाबत तर कुरआनमध्ये अनेक आयती आहेत, पण आम्ही येथे एकच उदाहरण देतो
‘‘तुमच्या पालनकर्त्यांची क्षमा व स्वर्गाकडे नेणाऱ्या मार्गांने दौडत चला व स्वर्ग, जमीन व आकाशाप्रमाणे विशाल असून ते अशा संयमी जनांसाठी निर्माण केलेले आहे जे, सुस्थितीत तसेच कुस्थितीत संपत्ती खर्च करतात जे क्रोधाला जाळून टाकतात व इतरांच्या चुकांची क्षमा करतात. असे भले व सज्जन ईश्वराला अतिप्रिय असतात. त्यांची अवस्था अशी असते की एखादे कुकर्म त्यांच्या हातून घडते, अगर एखादे पाप करुन स्वतःवर ते अत्याचार करुन बसतात, तेव्हा तात्काळ त्यांना अल्लाहचे स्मरण होते व आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमायाचना भाकू लागतात. कारण अल्लाहखेरीज अपराधाची क्षमा कोण करू शकतो व ते हेतुपुरस्सर आपल्या अपराधाचे समर्थन करीत नाहीत. अशा लोकांना त्यांचा पालनकर्ता क्षमा करून, त्यांच्या क्षमायाचनेचा मोबदला देईल व त्यांना स्वर्गांच्या अशा उद्यानात दाखल करील तेथे खालून पाण्याचे कालवे वाहात असतील व तेथे ते चिरकाल राहातील. सद्वर्तन करण्यासाठी किती छान मोबदला आहे.’’ (३:१३३-१३६)
अल्लाहची कृपा किती व्यापक आहे, हे यावरून स्पष्ट होते. तो आपल्या दासांची क्षमायाचना स्वीकारतो एवढेच नाही तर त्या पापाच्या घाणीतून वर काढून व त्याला निर्मळ व शुचिर्भूत बनवून, आपल्या वेचक दासांच्या समूहात त्याचा समावेश करून टाकतो.
अल्लाहच्या कृपेचा एक आश्चर्यजनक पैलू
अशा कृपाळू व मेहेरबान अल्लाहच्या दये व क्षमेबाबत थोडासुद्धा संशय उरतो काय? अल्लाहच्या कृपेच्या अशा व्यापक धारणेमुळे आध्यात्मिक कष्ट व अस्वस्थपणा नष्ट होऊन जातो. तो माणसाला दाखवून देतो की तो आजन्म अपराधी नाही. तसेच त्याच्या पालनकर्त्याची कृपाही त्याच्या अवस्थेबद्दल गाफील नाही. उलट तो जेंव्हा पापाकरिता त्याची अंतःकरणपूर्वक क्षमायाचना भाकतो तेव्हा तो त्याला आपल्या आश्रयस्थानात घेतो. त्याकरिता खरोखरीने व निष्ठेने लज्जित व खजील होण्याखेरीज दुसरी कसलीही अट नाही. ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की तिचे समर्थनार्थ आणखी अधिक पुरावे देण्याची गरज नाही, तरी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या अनुपम वचनावर एक दृष्टिक्षेप टाकू या. मुस्लिमनुसार त्यांनी असे सांगितले,
‘‘ज्याच्या ताब्यात माझा प्राण आहे त्या शक्तिची शपथ, जर तुम्ही कसलेही पाप केले नसते, तर अल्लाहने तुम्हाला नष्ट करुन तुमचे जागी अशा लोकांना निर्माण केले असते, जे पापे करुन त्याची क्षमायाचना भाकीत आहेत व त्याने त्यांना क्षमा केली असती.’’ (मुस्लिम)
असे समजा की, माणसांच्या चुकांकडे डोळेझाक करुन त्यांना क्षमा करणे हाच जणू अल्लाहचा मानस आहे, कुरआनची ही शानदार आयतही हीच गोष्ट उघड करते,
‘‘जर तुम्ही कृतज्ञ भक्त होऊन श्रद्धेच्या मार्गाने गेलात तर शेवटी तुम्हाला अकारण शिक्षा करण्यात अल्लाहला काय स्वारस्य आहे. अल्लाह मोठा गुणग्राही आहे व सर्वांची अवस्था चांगल्या तऱ्हेने जाणतो.’’ (कुरआन ४:१४७८)
निःसंशय अल्लाह माणसाला कष्टात खितपत असलेला पाहू इच्छित नाही. उलट त्याला आपली कृपा व क्षमा प्रदान करतो.
0 Comments