Home A स्त्री आणि इस्लाम A मुस्लिम स्त्रीचे अधिकार

मुस्लिम स्त्रीचे अधिकार

सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे नैतिक अधिकार तर मिळत नाहीतच परंतु मान्य सुद्धा केले जात नाहीत. वर्तमान काळात मोठ्या वाद-विवाद व कठोर प्रयत्नांअंती स्त्रिचे काही मूलभूत अधिकार मान्य करण्यात आले आहेत. हे उपकारच मानावे लागेल. खरे तर हे उपकार इस्लाम धर्माचेच आहेत. सर्व प्रथम विश्वामध्ये इस्लामनेच स्त्रिला ते अधिकार प्रदान केलेत ज्या अधिकारांची याचना स्त्रि खूप पूर्वी पासून करीत होती. हे सर्व अधिकार इस्लामने स्त्रिला यामुळे दिले नाहीत की ती अत्याचारित व पीडित होती व सर्व बाजूंनी या बाबतीत निषेध व्यक्त होत होता व तिचा पक्ष घेऊन प्रतिनिधीत्व करण्यात येत होते. तर यासाठी दिलेत की हे अधिकार स्त्रीचे नैसर्गिक व स्वाभाविक अधिकार होते जे तिला मिळायलाच पाहिजे होते. इस्लामने विवश होऊन हे अधिकार दिले नसून स्त्रि अत्याचारित व पिडीत होती आणि अत्याचारितांना न्याय देणे हे इस्लामचे परम-कर्तव्य होते, आहे व असणार.
या ठिकाणी काही अधिकारांचा उल्लेख करण्यात येत आहे जे इस्लामने स्त्रिला प्रदान केले आहेत. इस्लाम या अधिकारांचे वर्णन केवळ कायद्यांच्या भाषेत करून गप्प बसत नसून त्यास प्रोत्साहणाच्या माध्यमाने त्यांना प्रदान करण्याची तीव्र भावना निर्माण करतो.
१) जिवंत राहण्याचा अधिकार
स्त्रिची जी अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. अरबचे काही कबीले आपल्या मुलींना जिवंत पुरुन टाकायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार थांबविण्यात आला. व तिला जिवंत राहण्याचा अधिकार दिला. आणि सांगितले की जी व्यक्ती तिचा जिवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेईल. कयामत (महाप्रलय) च्या दिवशी त्यास याचा हिशोब द्यावा लागेल.
‘‘आणि स्मरण करा ती वेळ, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधा पायी ठार केली गेली.’’ (सूरह-ए-अलतकवीर ८:९)
एकीकडे निरपराध मुलींवर अत्याचार करण्यास नरकाच्या यातनामय जीवनाचे भय दाखविण्यात आले व दुसरीकडे त्या लोकांना आनंदाची खबर देण्यात आली ज्यांनी निरपराध मुलींवर अत्याचार न करता त्यांच्याशी सद्व्यवहार केला. आणि मुलींबरोबर सुद्धा तोच व्यवहार करतात जो मुलांबरोबर करतात. अर्थात मुलगा आणि मुलगी दोघांबरोबर समान वागणूक व वर्तन करतात. वा दोघांच्या वागणुकीत किचितही फरक करीत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या माणसाला मुलगी झाली, त्याने ना तिला जिवंत पुरावे, ना तिला अपमानास्पद वागणुक द्यावी व ना तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे. तेव्हा ईश्वर त्याला जन्नत (स्वर्ग) मध्ये दाखल करील.’’ (अबुदाऊद, कीताबुल अदब)
या नैतिक शिक्षणाबरोबर इस्लामने पुरुषाप्रमाणे स्त्रिच्या जीवनाच्या सुरक्षेची शिकवण दिली. आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्याचा तिला अधिकार देण्यात आला. आणि यालाच इस्लामच्या भाषेत ‘कसास’ हा शब्द वापरण्यात आला. एवढेच नव्हे तर कोणी एखाद्याचा खुन केला तर मृताचे वारस खुन्याच्या बदल्यात जीव सुद्धा घेऊ शकतात. आणि हा कायदा स्त्रि व पुरुष दोघांसाठी समान आहे. दिव्य कुरआनात आहे की,
‘‘‘तौरात’ मध्ये मी (स्वयं ईश्वर) यहूदी (ज्यू) वर हा आदेश लिहीला की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान,दाताच्या बदल्यात दात आणि जखमांच्या बदल्यात त्याच्या समान (जखम) मग त्याने कीसास माफ केला असेल तर ते त्याच्या साठी प्रायश्चित्त आहे. आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्याप्रमाणे निर्णय करीत नाहीत तेच अत्याचारी आहेत.’’ (सूरह-ए-बकरा : ४५)
‘तौरात’ च्या या कायद्याचे इस्लामने पुनरुज्जीवन केले व तो इस्लामी शरीयत (विधी) चा एक भाग बनला. या कायद्याने केवळ स्त्रि वरच नव्हे तर प्रत्येक दुर्बलावर होणाऱ्या अत्याचारा वर विळखा कसला व त्यांना न्याय दिला.
२) पालन पोषणाचा अधिकार
इस्लाम शिकवण देतो की प्रत्येक जन्म घेणारे मुल हे नैतिक व कायदेशीर अधिकार घेऊनच जन्मास येते. जेणेकरून त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यात याव्यात व त्यास मृत्यूच्या विळख्यात जाऊ न द्यावे. त्याचे संगोपन व पालन पोषण करावे. व हे कार्य कठीण कार्य आहे. सामान्यतः मुलाचे संगोपन जेवढया काळजीने केले जाते तेवढया काळजीपूर्वकपणे मुलीचे संगोपन होत नाही. इस्लाम धर्माने ही तफावत अजिबात पसंत केली नाही. तसेच मुलीच्या पालन पोषणास विशेष प्रोत्साहन दिले. व याला एक मोठे व परम कर्तव्य घोषित केले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की,
‘‘कन्यादान देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमावले आणि जर त्या माणसाने आपल्या मुलींशी सद्व्यवहार केला. तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार नरकाग्नी पासून बचावाचे साधन होईल.’’ (बुखारी व मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या कथनामध्ये मुलीवर ‘एहसान’ व सद्व्यवहाराचा उल्लेख आहे. ‘एहसान’ म्हणजे पालन-पोषण, शिक्षण व प्रशिक्षण व त्यांच्याशी उत्तम व्यवहार व प्रेमळ वागणूक हे सर्व काही आहे. माननीय अनस (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित केले की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘जो माणुस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरुण होई पर्यंत करील ‘कयामत’ च्या दिवशी (अंतीम निवाड्याच्या दिवशी) मी आणि तो असे असतील. हे सांगताना प्रेषित (स) यांनी आपली दोन बोटे जोडलीत.’’ (मुस्लिम)
याचे कायदेशीर स्वरूप पाहिल्यास लक्षात येईल की इस्लामी विधीनुसार ‘मुलांचा नान नफका’ अर्थात अन्न पाणी पुरविणे, पासून पोषण करणे या सर्व जबाबदाऱ्या पित्यावर आहेत. मग या मुलांमध्ये मुलगा असो वा मुलगी त्याच्या संगोपानात फरक करता येणार नाही किवा जबाबदारीतून कोणतेही कारण दाखवून परावृत्त होता येणार नाही. ‘रजाअत’ च्या बाबतीत कुरआनात आहे की,
‘‘मूल ज्याचे असेल (अर्थात पिता) त्याच्यावर दूध पाजणाऱ्या स्त्रिचे अन्न व वस्त्र कायद्याप्रमाणे (रीतसर) वाजिब (अनिवार्य) आहे.’’ (सूरह-ए-बकरा : २३३)
या बाबतीत इस्लामी विद्वानांनी भरपूर वर्णनात्मक माहिती उपलब्ध केली आहे. ‘हनफी’ विद्वानांनी लिहिलेत की पुत्रास अन्न पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तरुणावस्थेत पोहोचण्यापर्यंत आहे. या नंतर पिता या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो. परंतु मुलगा अपंग नसावा. परंतु मुलीस अन्न पुरविण्याची जबाबदारी तिच्या तारूण्यानंतर सुद्धा (लग्नापर्यंत) जन्मदात्या पित्यावर आहे. काहींच्या मते हे की तरुणावस्थेत आल्यावर ही जबाबदारी माता व पिता या दोघांत विभागली जाते. या खर्चाच्या एकूण रकमेंपैकी दोन भाग वडीलावर आणि एक भाग आई वर असेल. अशा प्रकारे जी तरुण स्त्रि आहे परंतु तिला अन्न पाणी मिळत नाही, तिची जबाबदारी सुद्धा जवळच्या नाते वाईकावर आहे.
३) शिक्षणाचा अधिकार
मानवाचा विकास ज्ञानाशी जुळलेला आहे. जी व्यक्ती अथवा समूह विद्या व ज्ञानापासून वंचित राहील ते जीवनाच्या प्रवासात इतरांच्या तुलनेत मागे राहतील. अज्ञाना मुळे त्यांची विचारसरणी उंच भरारी घेऊ शकत नाही, तसेच भौतिक प्रगतीत ही त्याची पीछेहाट होत असते. हे सर्व काही असून सुद्धा इतिहासाचा एक मोठा काळ असा होता की स्त्रि करिता ज्ञानार्जनाची महत्वाची जाणीवच झाली नाही. ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रांत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी समजली गेली. पुरुषांमध्ये सुद्धा काही विशेष वर्गच ज्ञानार्जन करीत असे. स्त्रि ज्ञानार्जनाच्या कल्पने पासून खितपत खूप दूर अज्ञानाच्या गर्ततेत चांचपडत होती.
इस्लाम ने ज्ञानार्जनाचे सर्व मार्ग स्त्रि व पुरुष दोघांकरिता उघडलेत. या मार्गातील प्रत्येक अडसर दूर करून प्रत्येक प्रकारची सवलत व सरळ पद्धती उपलब्ध करून दिली. इस्लामने विशेष करून मुलींच्या शिक्षण व प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित कले. तिच्या शिक्षण व प्रशिक्षण कार्यास पुण्य कार्य घोषित केले. माननीय अबु सईद खदरी (र) प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्याने तीन मुलींचे संगोपान केले, त्यांना शिक्षण दिले, त्यांचे विवाह केले, आणि लग्नानंतर सुद्धा सद-व्यवहार केला तर त्याच्यासाठी (निश्चितच) स्वर्ग आहे.’’ (अबुदाऊद)
इस्लाम धर्म स्त्रि व पुरुष दोघांना संबोधित करतो. त्याने प्रत्येक स्त्रि पुरुषास भक्ती, नैतिकता व शरीयतचे नियम यांच्या पालनाचा आदेश दिला. आणि ज्ञाना शिवाय या नियमांचे पालन शक्य नाही. स्त्री करिता पुरुषाशी संबंधाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे. हे संबंध अतिशय नाजुक व कीचकट असतात. यामध्ये स्त्रिचे अधिकार आणि जबाबदाऱ्या व कर्तव्य सुद्धा आले. आपले अधिकार मिळविणे आणि आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तिला ज्ञानार्जन करणे अत्यावश्यक आहे.
इस्लामी विद्वानांनी लिहिले की स्त्रि व पुरुष या दोघांसाठी कमीत कमी धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. स्त्री या बाबतीत अज्ञानी असेल तर पतीचे कर्तव्य आहे की त्याने तिला याचे ज्ञान द्यावे अथवा अशी व्यवस्था करावी की तिला या बाबतीत शिक्षण मिळावे. किवा स्त्रिने स्वतःहून हे नियम शिकण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हा तिचा कायदेशीर अधिकार आहे. या शिक्षणासाठी (नैतिक मर्यादांचे पालन करून) ती घराबाहेर पडू शकते. आणि पती तिच्यावर बंधन लादू शकत नाही. (या सखोल माहिती साठी माझे ‘‘इस्लामी समाजात स्त्रिचे स्थान’’ हे पुस्तक आवश्य अभ्यासावे)
या संपूर्ण गोष्टींचा परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारे पुरुषांत ज्ञानाचा सुकाळ झाला त्याच प्रकारे स्त्रिया सुद्धा विद्या-विभूषित झाल्या. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सवंगड्यात कुरआन व हदीस (प्रेषिताची प्रवचने) चे ज्ञान असणाऱ्या प्रगल्भ स्त्रिया मुबलक प्रमाणात पाहावयास मिळतात. दिव्य कुरआन व प्रेषित कथनाच्या प्रकाशात प्रश्न सोडविणे व समस्यांचे निराकरण करणे हे एक कठीण व विद्वत्तापूर्ण कार्य आहे. या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांची विद्वत्ता वाखाणण्या जोगी आहे. या प्रगल्भ स्त्रियांमध्ये माननीय आयेशा (र) माननीय उम्मे सलमा (र), माननीय उम्मे अतिया (र), माननीय सफया (र), माननीय उम्मे हबीबा (र), माननीय अस्मा बिन्त अबु बकर (र), माननीय उम्मे शरीफा (र), माननीय फातेमा बिन्त कैस (र), माननीय खौला बिन्तनवीत (र) उल्लेखनीय आहेत.
४) विवाहाचा अधिकार
स्त्रिला ज्या प्रमाणे जीवनातील महत्वाच्या व्यवहार व प्रश्नांबाबत ‘ब्र’ काढण्याचा अधिकार नव्हता, त्याच प्रमाणे विवाहाच्या बाबतीत ही तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिचे आईवडील वा परिवाराची बुजुर्ग मंडळी ज्या व्यक्ती बरोबर विवाह करतील त्या विरुद्ध एकही शब्द बोलण्याचा तिला अधिकार नसे. अर्थात आई वडील व परिवाराच्या निर्णया विरुद्ध आपला अभिप्राय देणे म्हणजे अतिशय कू-कर्म, महापाप समजले जाई व समाजात तऱ्हेतऱ्हेची चर्चा करण्यात येई. आपल्या भावी जीवन सवंगड्याच्या बाबतीत मत व्यक्त करणे. आणि परिवाराच्या निश्चित केलेल्या वरास नाकारणे या बाबींना व्यभिचार समजले जात असे.
हे पण म्हटले जाते की मुलीला तिच्या पसंतीचा वर निवडण्याचा अधिकार देणे हे तिच्याच स्वार्थाच्या विरोधात आहे. ती तिच्या अज्ञानामुळे आणि कच्च्या अनुभवामुळे चुकीचा वर निवडते. मुलीचे आई-वडील आणि परिजन तिच्या पेक्षा जास्त अनुभवी आणि व्यवहार ज्ञानी असल्या कारणाने तेच मुलीच्या बाबतीत योग्य निर्णय करू शकतात. तसेच ते मुलीचे शत्रू नसून शुभचितक असतात. आणि तिच्या भल्या-बुऱ्याची त्यांना पण खूप काळजी असते. म्हणून ते तिच्या भविष्याशी कधीच दगा करू शकत नाही.
हे दाही दिशा सत्य आहे की मुलीचे पालक व परिवारजन तिच्या करिता उत्तम वर निवडू शकतात. परंतु हे पण तेवढेच सत्य आहे की कधी-कधी वर निवडण्यात आई वडीला कडून सुद्धा अन्याय होतो. ते वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरिता या संबंधांचा वापर करतात. कमीत कमी हे तर नाकारताच येत नाही की वर निवडणाऱ्या पालकांच्या समोर ते आदर्श नसतातच ज्यांना मुलगी महत्व देते. या परिस्थितीत मुलीच्या विवाहाचा अधिकार पूर्णपणे पालकांना देणे बरोबर असणार नाही.
हे एक कटू सत्य आहे की, कोणत्याही स्त्रि व पुरुषांचे विवाह-बंधनात बांधले जाणे एक अति महत्वाची घटना आहे, दोघेही या घटनेपासून जीवनाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करतात. करिता या संबंधांची प्रस्थापना दोघांच्या राजी-मर्जी ने व्हावी. ही गोष्ट कधीच योग्य होणार नाही की स्त्रिवर तिच्या आवडी विरुद्ध विवाहाचा निर्णय थोपविण्यात यावा.
इस्लाम धर्माने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास महत्व अवश्य दिले,परंतु हे पण स्पष्ट केले की तिचा विवाह तिच्या परवानगीनेच व्हावा. स्त्री विधवा किवा घटस्फोटित असल्यास स्पष्टपणे आपली मर्जी कळवील आणि कुमारिका असल्यास गप्प बसणार व यालाच तिची परवानगी समजण्यात येईल. माननीय अबु हुरैरा (र) प्रेषिताचे कथन कथीत करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘विधवा आणि तलाक पीडित स्त्रिचा विवाह त्यांचे मत माहिती होई पर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही.’’ (बुखारी व मुस्लिम)
यावर प्रेषित मुहम्मद (स) यांच्या तत्कालीन सोबत्यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तिची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की तिचे मौन धरणेच परवानगी समजण्यात येईल. (अर्थात मौन स्वीकृती)
‘‘जर एखाद्या स्त्रिच्या पालकाने तिचा विवाह केला व त्या स्त्रिने या विवाहास मान्यता दिली नाही, तर हा विवाह ‘रद्द-बातल’ ठरणार. या बाबतीत माननीय खन्सा बिन्त खुद्दाम (र) चा विवाह तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी हा विवाह रद्द बातल ठरविला.’’ (बुखारी)
५) मेहेरचा अधिकार
इस्लामने पुरुषाला आदेश दिला की तो ज्या स्त्रिशी विवाह करील तिला मेहेर अवश्य देण्यात यावा. कारण पती तर्फे पत्नीस मेहेर दिल्या शिवाय विवाह होत नाही. इस्लाम च्या पूर्वी अज्ञानाच्या युगात ही पत्नीला पती तर्फे मेहेर देण्याची प्रथा होती. परंतु अरब वासीयांनी स्त्रिचा हा अधिकार हिरावून घेतला होता. याचे विविध स्वरूप होते. ते या प्रमाणे,
  1. स्त्रिचा पालक या मेहेरच्या राशीला स्वतःची मिळकत समजून त्यावर स्वतःच ताबा मिळवत असे. तसे पाहता मुलगी म्हटल्यावर तिला तो स्वतःप्रती अडसर समजत. तिच्या जन्म घेण्यावरच तो छाती बदडून घेत आणि दुःख व संताप व्यक्त करीत असे. या दृष्टीकोनाने तिच्या विवाहाच्या वेळी मिळणाऱ्या मेहेरच्या संपत्तीवर हक्क बजावयाचा आणि स्त्रि जन्माच्या दुःखाची या आनंदाने परत फेड करायचा. या कारणाने तो मुलीला ‘अलनाफेजा’ (संपत्तीत वाढ करणारी) या शब्दाने संबोधित करीत असे. तसेच तिच्या जन्म घेण्यावर ‘तुमच्या करिता संपत्तीत वाढ करणारी आली’ या शब्दात शुभ कामना स्वीकार करीत असे. मेहेर मध्ये ते उंट स्वीकारित असे अर्थातच मुलीच्या विवाहासमयी उंटाची संख्या वाढून संपत्तीत वाढ व्हायची.
  2. हे सुद्धा घडत असे की पतीच्या मृत्यूनंतर त्या विधवेचा सावत्र मुलगा अथवा नातेवाईक तिच्या अंगावर चादर टाकायचा आणि म्हणायचा की, मरणाऱ्याच्या संपत्ती प्रमाणेच मी या स्त्रीचा सुद्धा वारसदार झालो. यामुळे त्या विधवा स्त्रिवर त्याचा अधिकार स्थापित व्हायचा. मग कोणी दुसरा इसम तिच्या वर दावा करू शकत नसे व स्वतः त्या विधवा स्त्रिला पण त्याच्या विरोधात काहीही करता येत नसे. जर या नवीन तथाकथित वारसास त्या विधवेशी विवाह करायचा झाल्यास पूर्वीचाच ‘मेहेर’ ग्रहित धरून लग्न लावण्यात येई व नवीन ‘मेहेर’ देण्याची गरज नसायची. अथवा कोण्या दुसऱ्या इसमाशी तिचे लग्न करून दिल्यास त्या नवीन घरोब्या पासून मिळालेल्या मेहेर वर ताबा मिळवित असे. (तफसीरे कबीर)
  3. कधी-कधी तिच्या विवशतेचा व दौर्बल्याचा फायदा उचलून अत्यल्प मेहेर देण्यात येई. माननीय आयेशा (र) सांगतात असे की एखाद्या वडिल व आई वारलेल्या अनाथ मुलीचा पालक तिच्या सौंदर्यावर आणि संपत्ती वर भाळून स्वतः तिच्याशी विवाहाचा इच्छूक असल्यास दुसऱ्याशी तिचा विवाह न करता स्वतःच लग्न करायचा आणि एवढे ‘मेहेर’ सुद्धा देत नसे जेवढे ‘मेहेर’ दुसरा इसम देण्याकरिता तयार असायचा. दिव्य कुरआनने या प्रथे वर प्रतिबंध लावला. आणि म्हटले की या अनाथ मुलींशी जर विवाह करायचा असेल तर त्यांना पूर्ण मेहेर द्या ! नसता दुसऱ्या स्त्रियांशी विवाह करा. (बुखारी)
  4. अज्ञानाच्या (अर्थात इस्लाम पूर्व) काळात मेहर नष्ट करण्याची आणखी एक शक्कल होती. तिला प्रेषित वचनात ‘शिघार’ असा शब्द वापरण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की, एक इसम आपल्या कन्येचा विवाह दुसऱ्या इसमाशी या अटीवर करतो की त्याच्या कन्येच्या मोबदल्यात त्याला आपली मुलगी विवाह करिता द्यावी आणि या साट्या-लोट्यात दोन्ही मुलींचा ‘मेहेर’ देण्यात येत नसे.
इस्लाम धर्माने ही पदभ्रष्ट प्रथा संपुष्टात आणली. प्रेषितांचे तत्कालीन सोबती माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) यांनी सांगतिले की,
‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी शिधारची मनाई केली आहे.’’ (बुखारी व मुस्लिम)
इमाम बुखारी यांच्या प्रेषित कथनांच्या संग्रहात विनामेहेर कन्यांच्या अदला-बदली चा उल्लेख आहे. इमाम मुस्लिम यांच्या प्रेषित कथन संग्रहास बहिणींच्या अदला बदलीचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त ‘इमाम नूदी’ सांगतात की ‘इस्लामी विचारवंत सहमत आहेत की त्या काळात कन्या आणि बहिणीच्या व्यतिरिक्त पुतण्या, आत्या आणि चुलत बहिणी सुद्धा या साट्यालोट्यांत बळी पडत आणि इस्लामी पंडितांनी यावर सहमती व्यक्त केली की इस्लाम पूर्व काळातील या मार्गभ्रष्ट प्रथा इस्लामने मुळापासून नष्ट केल्या आहेत. मात्र या बाबतीत वाद आहे की या प्रकारच्या विवाहाच्या बाबतीत नेमका आदेश काय आहे ?
इमाम अबूदाऊदच्या कथन संग्रहात आहे की अब्दुल्लाह बिन अब्बास यांचे सुपुत्र अब्बास यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्दुर्रहमान बिन हकमशी केला. आणि अब्दुर्रहमान बिन हकम यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्बास यांच्याशी केला. आणि याच साट्या-लोट्यास ‘मेहेर’ साठी पर्याय ठरविला. माननीय मावियां (र) याना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी (ही गोष्ट माननीय मावियांच्याशासन काळातील आहे) मदिनाचा राज्यपाल ‘मरवान’ यास पत्र पाठविले की हा विवाह संपुष्टात आणण्यास फरमान जारी करावा. कारण या प्रथेलाच अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘शिघार’ म्हटले आहे व प्रथा कायमची बंद केली आहे.
इमाम मालिक, इमाम शाफई व इमाम अहमद बिन हम्बल या इस्लामी विद्वानांच्या दृष्टिकोनांनुसार हा विवाह रद्द-बातल आहे. परंतु इमाम अबू हनीफा आणि सुफयान ‘सूरी’ यांच्या दृष्टिकोनांनुसार, हा विवाह तर झाला परंतु मेहेर अदा न करण्याचा अपराध त्यांच्या कडून घडला. जर त्यांनी मेहेर निश्चित करून अदा केला. तर हा विवाह अबाधित राहील. (मआलिमुस्सुनन)
अशा प्रकारे इस्लाम धर्माने ‘मेहेर’ ला केवळ मात्र विवाह करणाऱ्या एकट्या स्त्रीचाच अधिकार घोषित केला आणि या अधिकारांवर होणाऱ्या संपूर्ण बाधांना समूळ नष्ट करून स्पष्ट शब्दांत आदेश दिला की,
‘‘स्त्रियांचे मेहेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा.’’ (दिव्य कुरआन सुरह-ए-निसा : ४)
धर्म-पंडित अबु बकर जस्सास यांनी याचे वर्णन अशा शब्दांत केले की,
‘‘मेहेर पत्नीची स्व-संपत्ती असून केवळ तिचाच त्यावर अधिकार आहे. आणि तिच्या पालकाचा त्यावर कोणताच अधिकार नाही.’’ (एहकामुल कुरआन २-६९)
शरीयतने (अर्थात इस्लामी विधीने) मेहेरच्या राशी वा संपत्तीची कोणतीची मर्यादा निश्चित केली नाही. ती माणसाच्या अर्थिक क्षमतेच्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. परंतु एवढे मात्र निश्चित की कोणत्याही व्यक्ती करिता त्याच्या ऐपती नुसार ‘मेहेर’ ची अदायगी कठीण होता कामा नये. इस्लामी कायदे तज्ञांच्या दरम्यान ‘मेहेर’ च्या रकमेच्या कीमान मर्यादेबाबतीत वाद आहे. हनफई कायदे तज्ञांच्या मतानुसार मेहेरची रक्कम कमीत कमी दहा दिरहम पेक्षा कमी नसावी.
अशा प्रकारे ही बाब स्पष्ट होते की ‘मेहेर’ ची राशी कमी असो वा जास्त असो शेवटी तो केवळ मात्र स्त्रिचाच कायदेशीर अधिकार आहे. इस्लामी कायद्याच्या नुसार तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. काही वेळा ‘मेहेर’ ला स्त्रीच्या सम्माना विरुद्ध समजले जाते. आणि यावर आणखीन काही आक्षेप व हरकती आहेत. त्यावर सखोल चर्चा पुढील भागात करण्यात आली आहे.
६) नान व नफ्का चा अधिकार
लग्नापर्यंत मुलीच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या पित्याची आहे. लग्नानंतर तिच्या ‘नान व नफ्क्यांची जबाबदारी पूर्णपणे तिच्या पतीची आहे. इस्लामी विधीनुसार पत्नी श्रीमंत असो अथवा गरीब तिच्या ‘नान-नफ्क्या’ ची पूर्तता करणे पतीचे परम कर्तव्य आहे. ‘हनफी फिक्ह’ मध्ये म्हटले गेले की पती आणि पत्नी जर दोघेही अर्थिक सबळ असल्यास पत्नीचा ‘नफ्का’ तिच्या आर्थिक दर्जानुसार असावा. पत्नी गरीब व पती श्रीमंत असल्यास त्यांचा ‘नफ्का’ गरीब व श्रीमंताच्या मधल्या दर्जाचा असेल. अर्थात श्रीमंता पेक्षा थोडा कमी आणि गरीबांपेक्षा थोडा जास्त असेल. परंतु जर पत्नी श्रीमंत आणि पती गरीब असल्यास पती त्याच्या आर्थिक ऐपती नुसार तिला लागणारा खर्च पुरवेल व बाकीची रक्कम त्याच्यावर कर्जाच्या स्वरूपात असेल व त्याची तो सवडीनुसार परत फेड करू शकतो.
पत्नी जर श्रीमंत असेल तर तिच्यासाठी नोकरचाकर सुद्धा पुरविण्यात यावे. पत्नी पतीच्या परिवारात किवा परिजनात किवा नातलगांसोबत राहण्यास तयार नसल्यास तिच्यासाठी वेगळ्या आवासाचा बंदोबस्त करण्यात यावा. हा तिचा वैधानिक अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची पूर्तता करणे पतीचे कर्तव्य आहे.
या विषयांत हे स्पष्टीकरण करणे सुध्दा आवश्यक आहे की पतीची सेवा व घराचे काम-काज करणे पत्नी वर बंधनकारक नाही. किवा तिची जबाबदारी सुद्धा नाही. ती हे सर्व कांही करीत असल्यास तिचे ते उपकारच समजावे. परंतु पतीची सेवा व घरकाम करण्याकरिता तिच्यावर बळजबरी करता येणार नाही. (याचे तपशीलवार वर्णन हनफी फिकह मध्ये विस्तारित स्वरूपात आहे. संदर्भ – हिदाया २/४१७-४१९)
७) व्यवसाय आणि कार्य स्वातंत्र्याचा अधिकार
इस्लाम धर्माने स्त्रिला व्यवसाय आणि कार्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिच्या करिता व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व निर्मिती, नोकरी, ज्ञानदान, पत्रकारिता व लेखन या सर्व कार्यांची परवानगी आहे.या कार्यांसाठी ती घरा बाहेर पण जाऊ शकते. मात्र गोशा-पर्दाच्या सुरक्षेसहीत या सुरक्षात्मक बंधनांची दोन उद्दीष्टे आहेत. प्रथम हे की परिवार व्यवस्थेत कोणतीही ढवळा-ढवळ होऊ नये व त्याच्या स्थैर्यात बाधा येऊ नये. द्वितीय हे की स्त्रिने मानाने व अब्रु शाबुत ठेवून जीवन जगावे. व तिला अशा परिस्थितीत कोणी ढकलू नये की तिच्यासाठी नैतिक मर्यादा जपणे कठीण व्हावे. (या विषयावर विस्तारित वर्णनांकरिता ‘स्त्रि आणि आर्थिक समस्या’ या विषयावरील चर्चा अभ्यासावी)
८) धन संपत्तीचा अधिकार
जगातील कीती तरी राष्ट्रांमध्ये ‘स्त्री’ ला संपत्तीच्या अधिकारापासून वंचित केले. माता-पित्याच्या संपत्तीत तर तिचा वाटा नव्हताच या उलट तिने स्वतः काबाडकष्ट करून मिळविलेल्या पैशावर पती, मुले व बाप किवा इतर परिवारात किवा परिजन ताबा मिळवून फस्त करीत. इस्लाम धर्मात स्त्रिच्या मिळकतीस मान्यता देऊन तिच्या मिळकतीत ढवळा-ढवळ करण्यास प्रतिबंध करण्यात आला. तिने नैतिकरित्या कमावलेल्या संपत्ती वर ज्या प्रमाणे पुरुषांचा मिळकतीचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे स्त्रिलाही हा अधिकार देण्यात आला. दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘जे काही पुरुषांनी कमावले आहे त्या नुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमावले आहे, त्या नुसार त्यांचा वाटा आहे.’’ (सुरह-ए-निसा : ३२)
स्त्रिला इस्लामी वैधानिक सुत्रानुसार माता-पिता पती अथवा संतती वगैरे पासून जी संपत्ती मिळते किवा तिच्या स्व प्रयत्नांनी जी संपत्ती मिळते तिच्यावर तिचा मालकी हक्क आहे. तिच्या वापराचा तिलाच पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या स्वतंत्र आवडी-निवडी नुसार स्वतःवर, पती व मुलांवर, माता-पिता व परिवार जणांवर खर्च करू शकते व विधायक कार्यावर खर्च करू शकते. संपत्तीची खरेदी-विक्री व दान-धर्म चा अधिकार तिला आहे. तिच्या अधिकारांत ढवळा-ढवळ कोणीही करता कामा नये.
९) शील व अब्रू सुरक्षेचा अधिकार
मानसम्मान व अब्रू मानवाची अनमोल संपत्ती आहे. तिच्या अब्रूशी खेळ करणे वा तिचा मानभंग करण्याचा कोणालाही अधिकार नाही. स्त्रिच्या अब्रू व इज्जतीवर नेहमीच आक्रमणे होत असतात. ती तिच्या दुर्बलतेच्या कारणास्तव स्वःरक्षणात जास्त यशस्वी झालेली दिसत नाही. तिच्या वरील हल्ल्यांचे दोन स्वरूपे आहेत. प्रथम स्वरूप म्हणजे तिच्यावर व्यभिचाराचे आरोप लावून तिला मानसिक ताप देणे व दुसरे स्वरूप म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे. इस्लाम धर्मात हे दोन्ही अपराध अति भीषण स्वरूपाचे आहेत. स्वतः प्रेषित मुहम्मद (स) यांनी माणसास जगातून नष्ट करणाऱ्या सात अपराधांपैकी एकाचा उल्लेख अशा प्रकारे केला की,
‘‘सत्शील, श्रद्धावंत आणि निरागस स्त्रियांवर आळ घेणे.’’ (मिश्कात, बुखारी व मुस्लिम)
इस्लाम धर्माने या भीषण अपराधांवर शक्तीशाली विळखा आवळला. तो अशा प्रकारे की जर कोण्या इसमाने एखाद्या स्त्रिवर व्यभिचाराचा आरोप लावला तर त्याला तब्बल ऐशी (८०) फटक्याची शिक्षा ठोठावली. व नंतर कोणत्याही प्रकरणांत त्याची साक्ष मान्य करण्यात आली नाही. कुरआनत सांगितले आहे,
‘‘आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील, मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना एेंशी फटके मारा. व त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अवज्ञाकारी आहेत. त्या लोकां व्यतिरिक्त जे आपल्या कर्मावर पश्चात्ताप करतील व सुधारणा घडवून आणतील. कारण ईश्वर अवश्य (त्यांच्या बाबतीत) क्षमाशील व परम दयाळू आहे.’’ (सूरह-ए-नूर : ४,५)
आता व्यभिचार आणि बलात्काराचा विषय चर्चेला घेऊया. इस्लामी विधी नुसार कोणत्याही इसमाने एखाद्या स्त्रिवर जबरी लैंगिक अत्याचार केल्यास अ-विवाहितास शंभर कोरड्यांची शिक्षा आणि विवाहितास ‘रजम’ म्हणजे समाजातील लोकांकडून त्याचा दगडाने ठेचून वध केला जाईल. तसेच स्त्रि व पुरुषाच्या राजी मर्जीने हे पातक घडल्यास दोघांना ही शिक्षा भोगावी लागेल.
१०) टीका आणि ‘जाब’ घेण्याचा अधिकार
हे खरे आहे की इस्लाम धर्माने स्त्रिला काही सामुहिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्यांतून मुक्ती दिली. (या विषयावर आपण वेगळी चर्चा करूया) परंतु याचा अर्थ अजिबात असा होत नाही की ती या प्रकरणांशी बिल्कुल अलिप्त आणि सामुहिक व सामाकिड स्वार्थ व फायदे व तोट्यांशी तिला काहीच देणेघेणे नाही. दिव्य कुरआनने स्त्रि आणि पुरुष दोघांनाही ‘सत्याचा आदेश व वाईट कर्मांचा त्याग’ करण्याचा आदेश दिला. दिव्य कुरआनात ईश्वरीय आदेश आहे की,
‘‘श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्यांचे मित्र आहेत. भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.’’ (सूरह-ए-तौबा : ७१)
‘सत्याची प्रस्थापना व दुष्कर्मांना आळा घालण्याचा विषय अतिशय विस्तृत आहे. या आदेशाच्या चौकटीत इस्लामचा प्रसार व प्रचार, समाज सुधारणेचे कार्य आणि शासनाच्या अयोग्य नीतीवर टीका व त्याचे परिक्षण हे सर्व काही आलेच. स्त्रिची जबाबदारी आहे की तिने तिच्या मर्यादा पाळून हे सर्व कार्य करावे. (याच्या तपशीलाकरिता माझे ‘मुस्लिम स्त्रीयांची जबाबदारी’ अवश्य अभ्यासावे)
इतिहासाने ठळक आणि स्पष्टपणे याची साक्ष दिली की इस्लामच्या प्रारंभी काळातील स्त्रियांनी हे कर्तव्य यशस्वीपणे व शौर्याने पार पाडले आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *