– नौशाद उस्मान
जीवनात संतुलन कसं राखायचे हा प्रश्न जवळ-जवळ प्रत्येकालाच सतावतो, पवित्र रमजान महिन्यातील रोजाची परंपरा हेच शिकवते.
तुमच्या जीवनाचा उद्देश काय? हा प्रश्न आज विचारला तर अनेकांची भंबेरी उडते. जगायचं कशाला तर खाण्यासाठी अन खायचं कशाला तर मौजमजेसाठी असा एक ठोकताळा बांधून काही लोकं जगत असतात. असे लोकं उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं अन आज दुपारसाठी काय आणायचं आणि रात्रीचं डिनर कुठं घ्यायचं याचे आखाडे बांधण्यात तसेच या महिन्यात कोणता ड्रेस शिवायचा किंवा साडी घ्यायची याच नियोजनात वेळ घालवत असतात तर काही लोकांच्या गप्पात कोणती गाडी किती मायलेज देते यातच रंगून जात असतात.
मात्र रोजा ठेऊन खाण्या-पिण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीच त्याज्य केल्या किंवा शरीरसंबंधाचेच सुख त्याज्य केले तर माणसाला एकप्रकारची विरक्ती येते. जीवनावश्यक गोष्टी दिवसभर त्याज्य करून रात्री त्यांचा उपभोग करतांना मात्र परमानंद देऊन जातात. अशाप्रकारे विरक्ती आणि आसक्तीमध्ये संतुलन ठेवायला लावणारा असा हो रोजा चंगळवादापासून माणसाची मुक्ती करतो.
याचा अर्थ सर्वच लौकिक सुख त्याज्य मानायचं असं नाही, तर त्यावर नियंत्रण मिळविण्याचे संस्कार महिनाभर रोजाधारकावर होत असतात. याच महिन्यात अनेक लोकांची दारू सुटते तर कुणाचा गुटखा सुटतो तर कुणाची सिगारेट सुटते.
फक्त पोटासाठीच जगायचे नसते, काही काळासाठी का होईना, पण त्याच्याशिवायदेखील जीवन तग धरू शकते, उपभोगाशिवायदेखील आयुष्यात बरंच काही आहे, हा अध्यात्मिक साक्षात्कार घडतो. त्यागवृत्ती वृद्धिंगत होते.
बगदादमध्ये हारून अल रशीद खलिफा होते. त्यांचे चुलत बंधू बहलूल दाना संत होते. त्यांनी फकीरीचा वेष धारण केलेला होता. हारून अल रशीद यांनी बहलूल दाना यांना विचारले कि, कुरआनात ज्याचा उल्लेख आला आहे, ”सिरातल मुस्तकीम (सरळ मार्ग)” म्हणजे काय? तर बहलूल दाना यांनी त्यांना गरम पाण्याचे भांडं आणायला सांगीतले. नंतर त्या भांड्यात स्वतः उभे राहून ते खात असलेली व्यंजनं आणि त्यांच्याकडे असलेले कपडे यांची यादी सांगू लागले. यादी फारच छोटी होती. म्हणून त्यांना फार जास्त वेळ लागला नाही. ते ताबडतोब बाहेर आले. आता त्यांनी खलिफाला सांगितले कि, तुम्ही उभे राहून तुमच्याकडे असलेले सगळे कपडे आणि तुम्ही खात असलेली व्यंजने यांची पूर्ण यादी या गरम पाण्याच्या आत उभे राहून सांगा. खलिफाने भांड्यात पाय ठेऊन लगेच बाहेर काढला आणि म्हटले कि, पाणी तर फारच गरम आहे आणि माझी यादी फारच लांब लचक आहे. बहलूल दाना यांनी म्हटले कि, ”हाच सिरातल मुस्तकीम आहे.” खलिफांच्याही लक्षात आलं कि, ”जीवनात जितक्या गरजा कमी बनतील तितक्या सहजतेने माणूस सत्य मार्गावर चालू शकतो. अन्यथा त्या वस्तू आणि त्या गोष्टी जपून ठेवण्यात किंवा आणखी मिळविण्यात माणूस तत्वांशी तडजोड करू लागतो आणि सरळ मार्गाला पराङ्मुख होऊ शकतो.”
परिवर्तनासाठी झटणाऱ्या लोकांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर ते प्रस्थापितांकडून ‘मॅनेज’ होऊच शकत नाही. ते कोणाच्याही प्रलोभनाला, सौंदर्याला बळी पडत नाही. अशी व्यक्ती खंबीरपणे ध्येयाशी चिकटून राहते. हा खंभीरपणा रोजा उत्पन्न करतो, कारण रोजाधारकाला चंगळवाद स्पर्शही करू शकत नाही.
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी इमानवंतांना संतितले कि, ”एक दिवस येईल कि, अनेक राष्ट्रे तुमच्यावर भुकेल्या वाघांसारखे तुमच्यावर तुटून पडतील.” लोकांनी विचारलं कि, ”त्यावेळी आमची संख्या कमी असेल का?” तेंव्हा पैगंबर म्हणाले कि, ”नाही, तुम्ही संख्येत भरपूर असाल. पण तुमची अवस्था समुद्रात आलेल्या फेसासारखी होऊन जाईल.” असे का होईल, तर त्यांनी सांगितले कि, ” तुम्हाला वहनची बिमारी लागेल.” लोकांनी विचारले कि, वहन काय आहे? उत्तर मिळालं कि, ”लौकिक जीवनाची आसक्ती आणि पारलौकिक जीवनाप्रती उदासीनता म्हणजे वहन आहे.” रोजा या वहनची बिमारी, हा चंगळवाद दूर करतो. म्हणजे हा रोजा एकीकडे लौकिक जीवनातली आसक्ती कमी करत असतांनाच मात्र लौकिक जीवनातील कर्तव्याची आणि ते पूर्ण न केले तर अल्लाहला मरणोत्तर जीवनात जाब द्यावा लागणार या जबाबदारीची आठवण करून देतो. म्हणजे निव्वळ भौतिकवाद किंवा जडवाद आणि सन्यस्त अध्यात्म यातला मध्यम मार्ग रोजा दाखवतो. अशाप्रकारे रोजाधारकाला एकप्रकारची समष्टीच प्राप्त होण्यास मदत होते.
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
0 Comments