माननीय मुआविया बिन हकम सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर नमाज अदा करीत होतो, इतक्यात एका मनुष्याला शिंक आली तेव्हा मी नमाज संपताच ‘‘यरहमुकल्लाह’’ म्हटले तेव्हा लोक माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणालो, ‘‘अल्लाह तुम्हाला आयुष्य प्रदान करो. तुम्ही सर्वजण मला का पाहात आहात?’’ त्या लोकांनी मला गप्प राहण्यास सांगितले तेव्हा मी गप्प झालो. जेव्हा पैगंबरांची नमाज पूर्ण झाली, (माझे माता-पिता पैगंबरांवर कुर्बान) मी पैगंबरांपेक्षा उत्तम शिक्षण-प्रशिक्षण करणारा न भूतो न भविष्यती पाहिला. पैगंबर मला रागावले नाहीत, त्यांनी मला मारले नाही की मला वाईट बोललेही नाहीत, फक्त इतकेच म्हटले, ‘‘ही नमाज आहे, यात बोलणे योग्य नाही. ‘नमाज’ नाव आहे अल्लाहचे पावित्र्य वर्तविण्याचे, त्याचे श्रेष्ठत्व सांगण्याचे आणि कुरआनचे पठण करण्याचे.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका खेडुताने मस्जिदमध्ये लघुशंका केली तेव्हा लोक त्याला मारण्यासाठी धावले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्याला सोडून द्या. त्या ठिकाणी एक डोल पाणी ओतून स्वच्छ करा. दीनला लोकांसाठी सोपे बनविण्यासाठी आणि त्यांना दीन (इस्लाम) कडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात आले आहे. आपल्या अभद्र पद्धतीने लोकांसाठी दीनकडे येण्याचा मार्ग खडतर करावा, यासाठी तुम्हाला यासाठी अल्लाहने पाठविलेले नाही.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अबू मूसा (अ.) आणि मुआज यांना यमनला पाठविताना असा उपदेश केला होता की ‘‘यस्सिरा वला तुअस्सिरा व सक्किना वला तुऩिफ्फरा.’’ तुम्ही दोघांनी तेथील लोकांसमोर ‘दीन’ (इस्लाम धर्म) इतक्या आकर्षकपणे सादर करा की तो त्यांना सोपा वाटावा. अशा पद्धतीचा अवलंब करू नका की लोकांना ‘दीन’ अवघड वाटावा आणि लोकांना तुमचा स्वभाव प्रेमळ वाटावा, त्यांना कसल्याही प्रकारची इजा पोहोचवू नका आणि त्यांना भडकवू नका.’’
माननीय मालिक बिन हुवैरिस (रजि.) यांच्या कथनानुसार,
आम्ही काही समवयस्क तरुण ‘दीन’ (इस्लाम धर्म) चे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आलो होतो. येथे आम्ही वीस दिवस राहिलो. पैगंबर अतिशय दयाळू व मृदु स्वभावाचे होते. पैगंबरांना वाटू लागले की आम्ही सर्वजण घरी जाऊ इच्छित आहोत. तेव्हा पैगंबरांनी आम्हाला विचारले, ‘‘तुमच्या मागे (कुटुंबात) कोण कोण आहेत?’’ आम्ही उत्तर दिले तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘आपल्या मुलाबाळांमध्ये परत जा आणि जे काही तुम्ही ज्ञान प्राप्त केले आहे त्यांना शिकवा. त्यांना चांगल्या गोष्टी सांगा आणि समृद्ध व्हा, नमाज वेळेवर अदा करा आणि अमुक नमाज वेळेवर अदा करा.’’ (एका हदीसमध्ये असेही आढळून येते की ‘‘आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने नमाज अदा करताना पाहिले आहे त्याच पद्धतीने तुम्हीदेखील अदा करा.’’) आणि जेव्हा नमाजची वेळ होईल तेव्हा तुमच्यापैकी एकाने अजान द्यावी आणि जो तुमच्यापैकी ज्ञान व चरित्राच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल त्याने ‘इमामत’ (नमाजचे नेतृत्व) करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
0 Comments