आदरणीय मुहम्मद(स) हे नित्यनेमाने ‘हिरा’ या गुहेत जाऊन उपासनेत तल्लीन होत. ‘रबिऊल अव्वल’ महिन्याची नऊ तारीख होती. त्या दिवशी अचानक एक ‘फरिश्ता’ (ईश्वरी संदेशवाहक) प्रकट झाला. या फरिश्त्याचे नाव ‘जिब्रील(अ)’ असे होते. मुहम्मद(स) यांना संबोधित करुन म्हणाला, ‘‘हे मुहम्मद(स)! आपल्यासाठी ईश्वराकडून एक शुभसूचना आहे. आपण ती स्वीकार करावी. आपण ईश्वराचे ‘प्रेषित’ आहात आणि मी ‘जिब्रील’ फरिश्ता आहे.’’
हा पहिला परिचय होता. यानंतर नियमानुसार वही (ईश्वरी संदेश) म्हणजेच दिव्य कुरआन अवतरण्याची सुरुवात सहा महिन्यानंतर झाली. त्या दिवशी ‘जिब्रील’ फरिश्त्याने सांगितले, ‘‘वाचा!’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘मला वाचता येत नाही.’’ यावर जिब्रील फरिश्त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांना जोरात कवटाळले आणि म्हणाला, ‘‘वाचा!’’ प्रेषितांनी परत तेच उत्तर दिले. परत ‘जिब्रील’ फरिश्त्याने प्रेषितांना कवटाळून सांगितले, ‘‘वाचा!’’ मग प्रेषितांनी फरिश्त्याबरोबर वाचण्यास सुरुवात केली,
‘‘वाचा आपल्या पालनकर्ताच्या नावाने, ज्याने (सर्व काही) निर्माण केले. वाचा! तुमचा पालनकर्ता महान प्रषिष्ठावान आहे, ज्याने लेखणीच्या माध्यमाने (ज्ञान) शिकविले आणि मानवास ते सर्वकाही शिकविले, ज्याच्या बाबतीत त्याला काहीच ज्ञात नव्हते!’’(कुरआन ९६ : १-५)
अशा प्रकारे प्रेषितत्वाची पहिली प्रभात झाली. ‘सूरह-ए-अलक’च्या या आयती ईश्वरी ज्ञानाची पहिली किरणे होती. या दिवशी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय चाळीस वर्षे, सहा महिने आणि दहा दिवस एवढे होते आणि मिलादी सन १, रमजान महिन्याची १८ तारीख होती.
प्रेषितत्वाची जवाबदारी मिळण्याच्या सात वर्षापूर्वीपासूनच त्यांना सत्य स्वप्न पडत होते. कधीकधी अचानक प्रकाश नजरेसमोर पडत असे. कधीकधी रस्त्याने चालताचालताच अचानक एखाद्या वृक्षातून साद यायची की, ‘अस्सलामु अलैकुम’ (अर्थात ईश्वर आपणास शांती व सुरक्षा प्रदान करो.) हे सर्व काही यासाठी घडत असे की, अचानक उद्भवणार्या दिव्य घटनांशी प्रेषित मुहम्मद(स) समरूप व्हावेत.
हे सर्व असूनदेखील जिब्रील फरिश्ता समोर आल्याच्या आणि ईश्वराकडून प्रेषितत्वाची जबाबदारी मिळाल्याच्या या दैवी घटना घडल्याने प्रेषित मुहम्मद(स) यांची विचित्र मनोदशा झाली. ते तत्काळ ‘हिरा’ या गुहेतून घरी परतले. त्यांच्या सर्वांगास घाम फुटला. जणू त्यांच्यावर ईश्वरी कांतीचे प्रतिबिब पडत होते. घरी येताच त्यांनी आपली पत्नी खदीजा(र) यांना सांगितले, ‘‘माझ्यावर चादर पांघरा. मला कासावीस होत आहे.’’ काही वेळाने मन आणि प्रकृती शांत झाल्यावर त्यांनी आपल्या पत्नी ‘खदीजा(र)’ यांना सांगितले की, माझ्याबरोबर अशा घटना घडत असल्याने मला खूप भीती वाटत आहे. मला माझा जीव जाईल असे वाटते.’’ हे ऐकून माननीय खदिजा(र) आपल्या पतीचे सांत्वन करताना म्हणाल्या,
‘‘मला माहीत आहे की, तुम्ही नेहमीच संकटात सापडणार्यांचे सहाय्यक, दीनदुबळ्यांचे स्नेही, अनाथांचा आश्रय आहात. आपण सत्यवचनी आहात. सर्वांशी चांगले वर्तन करता. पाहुणचार करता, विधवा आणि अनाथांचा खर्च आपल्या कमाईतून भागविता. ईश्वर तुम्हास कशापायी दुःख व संकटात टाकेल बरे!’’
परंतु स्वतः खदीजा(र) सुद्धा या घटनेने चितित झाल्या आणि घटनेची सविस्तर हकिकत सांगण्यासाठी प्रेषितांसह आपले चुलतभाऊ ‘वरका बिन नौफल’कडे गेल्या. प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘वरका’ यांना सविस्तर वृत्तान्त सांगितला. ‘वरका बिन नौफल’ हा एक धार्मिक विद्वान होता. त्याने ईसाई आणि इतर सर्वच धर्माचा गाढा अभ्यास केला होता. प्रेषित मुहम्मद(स) यांचा संपूर्ण वृत्तान्त ऐकताच तो म्हणाला,
‘‘आपल्यावर प्रेषित मूसा(अ) प्रमाणेच दैवी वाणी अवतरित झाली. जर मी तरूण असतो आणि त्या काळापर्यंत जगलो असतो तर किती चांगले झाले असते की, जेव्हा तुमचा समाज तुम्हास धिक्कारेल व शहराबाहेर घालवील.’’
हे ऐकून प्रेषितांनी प्रश्न केला, ‘‘माझा समाज मला समजाबाहेर काढील?’’ ‘वरका’ने उत्तर दिले, ‘‘होय! या जगात ज्याने सत्यमार्गाची शिकवण दिली, त्याचा निश्चितच विरोध झाला. त्या काळापर्यंत मी जर जीवंत राहिलो असतो तर आपली प्राणपणाने सेवा केली असती.’’
दिव्य कुरआन अवतरणाच्या सुरुवातीसच जिब्रील फरिश्त्याने प्रेषितांना ‘वुजू’ (पूर्ण चेहरा, कोपरापर्यंत हात व घोट्यांपर्यंत पाय धुवून पवित्र होण्याची विशिष्ट पद्धत) करून दाखविला. मग प्रेषित मुहम्मद(स) यांनीदेखील त्याच पद्धतीने ‘वुजू’ केला. मग जिब्रील फरिश्त्याने दोन रकअत नमाज पढली. प्रेषित मुहम्मद(स) यांनीदेखील त्याच पद्धतीने नमाज अदा केली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी घरी आल्यावर सर्वप्रथम इस्लामची शिकवण आपली पत्नी खदीजा(र) यांना दिली. खदीजा(र) यांनीदेखील ही शिकवण मनापासून स्वीकारून इस्लामचा स्वीकार केला. इस्लाम स्वीकारण्याच्या सौभाग्यवान होण्यात पहिला क्रमांक माननीय खदीजा(र) यांचाच आहे. शुक्रवारच्या दिवशी प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासोबत खदीजा(र) यांनी पहिली नमाज अदा केली. दुसर्या दिवशी अली(र) यांनी वयाच्या दहाव्या वर्षी इस्लाम स्वीकारला. मग प्रेषित मुहम्मद(स) यांचे बालपणाचे परम मित्र असलेले माननीय अबू बकर(र) यांनी प्रेषितांच्या निमंत्रणावर इस्लाम स्वीकारला. तसेच प्रेषित मुहम्मद(स) यांनी दत्तक घेतलेल्या मुलाने म्हणजेच झैद बिन हारिस(र) यांनी प्रेषितांच्या निमंत्रणावर इस्लामचा स्वीकार केला. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये माननीय खदीजा(र) पुरुषांमध्ये माननीय अबू बकर(र) लहान मुलांमध्ये माननीय अली(र) आणि माननीय झैद बिन हारिस(र) यांनी सर्वप्रथम इस्लाम स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समूहास दिव्य कुरआनात ‘हिज्बुल्लाह’ अर्थात सत्य धर्मास प्रस्थापित करणारे आंदोलनकारी म्हटले गेले आहे. ज्या आंदोलनकर्त्यांनी आपल्या संपूर्ण सेवा पुरविल्या, त्यांपैकी एकजण गर्भश्रीमंत होते. ‘मक्का’ शहरात त्यांचा कापडाचा मोठा व्यापार होता. अज्ञानतेच्या काळापासूनच त्यांचे चारित्र्य आणि विचारपावित्र्य प्रसिद्ध होते. त्यांचे नाव माननीय अबू बकर सिद्दीक(र) होते. त्यांच्या संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा सत्यधर्मप्रचारास खूप फायदा झाला. याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक प्रसारामुळे त्यांचे जुने मित्र माननीय उस्मान बिन अफ्फान(र), जुबैर(र), अब्दुर्रहमान बिन औफ(र), तलहा(र), साद बिन अबी वक्कास(र) यांनी इस्लाम स्वीकारला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे गुप्त प्रसारकार्य प्रामाणिक आणि निर्मळ स्वभावीजणांना आपल्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित करीत होते. मग माननीय अम्मार(र), खब्बाब बिन अल अरत(र), अबुउबैदा(र), झैद(र), जाफर बिन अबुतालिब(र), अब्दुल्लाह बिन मसऊद(र), अबुसलमा(र), उस्मान बिन मजऊन(र), सुहैब रूमी(र), अकरम(र) या सज्जनांनी इस्लामचा स्वीकार केला. अकरम(र) यांचे निवास इस्लमच्या गुप्त प्रचाराचे केंद्र होते.
इकडे स्त्रियांमध्ये माननीय खदीजा(र) यांच्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दोन्ही काकु, माननीय लुबाबा बित हारिस(र) आणि अस्मा बित अबू बकर(र), तसेच उमर(र) यांची बहीण फातिमा बित खत्तान(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला.
या पहिल्या पर्वात प्रेषित मुहम्मद(स) यांचे निमंत्रण स्वीकारणार्या स्त्री-पुरुषांना ‘अस्साबिकूनल अव्वलून’ असे म्हटले जाते. अर्थात ‘सर्वप्रथम इस्लाम स्वीकारणारे लोक’. इस्लाम प्रचाराच्या यशाला या लोकांनी डोळ्यांनी पाहिलेही नव्हते. उलट इस्लामचा स्वीकार करणे म्हणजे संकट, समस्या आणि आरिष्टांना सामोरे जाणेच होते. या सुरुवातीच्या काळात ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला तो कोणत्याही आमिषाला बळी पडून केलेला नव्हता. हा स्वीकार म्हणजे केवळ सत्याचे निमंत्रण मनापासून स्वीकार करणे होय. तसेच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना केवळ त्यांची निष्ठा, चारित्र्य आणि दिव्यवाणीच्या शैलीस पहिल्याच दृष्टीत ओळखले होते. अज्ञानता काळातील बुरसटलेल्या प्रथा आणि आचरणांविरुद्ध या लोकांच्या मनात पूर्वीपासूनच संताप धुमसत होता. जणू सत्यधर्माची साद देण्याची वाटच पाहात होते. प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्याची साद घालताच त्यांनी या क्रांतिदूताकडे पाहिले आणि त्यांच्या प्रामाणिक चारित्र्य आणि निर्मळ आचरणास पाहून त्यांच्या सत्य धर्मनिमंत्रणासमोर आपले सर्वस्व समर्पण केले.
एखाद्या समाजात सत्य, चांगुलपणा, सुधार व निर्माणावर जे लोक सुरुवातीलाच आपल्या तन-मन-धनाची भेट सादर करतात, तेच समाजाचे सार असतात. ही बाब स्वतः प्रेषितांच्याच साक्षीने सिद्ध आहे की, समाजाचा विरोध झुगारून, ऐहिक लाभांना ठोकरून व सत्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून सर्वप्रथम जे लोक सत्याचा स्वीकार करतात, ते मानसिक आणि नैतिकदृष्ट्या सामान्यांच्या स्तरांपेक्षा उच्च असतात.
प्रत्येक काळात, प्रत्येक दर्जा व स्तरावर आणि प्रत्येक कामामध्ये अर्थात सर्वप्रथम आत्मसमर्पन करणारे असतात आणि सत्यधर्माचा ध्वज उंच ठेवण्यासाठी जे लोक पहिल्या रांगेत जागा मिळवितात त्यांना परलोकातसुद्धा सर्वांत प्रथम व सर्वांच्या आधी जागा मिळते. याची साक्ष दिव्य कुरआननेच स्वतः स्पष्ट शब्दांत दिली आहे.
‘सूरह-ए-अलक’च्या काही काळानंतर ‘सूरह-ए-मुदस्सिर’च्या प्रारंभी आयती अवतरल्या, यामध्ये लहानलहान वाक्यांत संक्षिप्त व सर्वांगीण आदेश देण्यात आले. उदाहरणार्थ, ‘उठा आणि ईश्वरी प्रकोपाची सूचना द्या.’ अर्थात लोकांना वाईट कर्माच्या भयानक परिणामांची सूचना द्या. ‘आपली वस्त्रे पवित्र व स्वच्छ ठेवा.’ अर्थात, ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्याच्या धर्माच्या प्रचारकांसाठी हे योग्य नव्हे की, त्यांनी त्यागी व संन्याशाप्रमाणे गलिच्छ राहावे.
‘‘कृत्रिम देवी-देवतांपासून विमुख व्हा,’ ‘जास्त लाभ घेण्याच्या उद्देशाने कुणावर उपकार करु नका.’ ‘आपल्या पालनकर्ता ईश्वराखातर संयम बाळगा.’ म्हणजेच ईश्वरी धर्मप्रस्थापणेसाठी पूर्ण संयमानिशी प्रयत्नशील राहा. संयम म्हणजे धर्मप्रस्थापनेच्या मार्गात येणारी संकटे व अरिष्टे संयमाने शौर्याने सहन करा, तसेच सत्यधर्माच्या नियम व सिद्धान्ताविरुद्ध आणि त्याच्या उद्देशाविरुद्ध धमक्या व प्रलोभणे देण्यात आल्यास संयम बाळगा. सत्यधर्माच्या स्वरुपात कोणत्याही प्रकारचा स्वतःच्या सवलतीखातर बदल करू नका.’’
‘मक्का’ शहरातील प्रेषितवास्तव्य काळात दिव्य कुरआनचा जो काही थोडासा भाग अवतरित झाला, त्यामध्ये एकीकडे हे वैशिष्ट्य होते की, प्रचलित साहित्य, काव्य आणि वक्तृत्वकलेच्या सर्व स्वरांना मागे टाकले होते, तर दुसरीकडे हे वैशिष्ट्य आणि आकर्षण होते की, दिव्य कुरआनची साद अज्ञानताच्या बिनबुडाच्या सिद्धान्तावर आधारित जीवनाच्या दीर्घ, निष्क्रिय आणि उदास प्रणालीने कंटाळलेल्या व वैतागलेल्या मानसिकतेसमोर विचार करण्याच्या आणि कार्याच्या नवीन वाटा उघडल्या होत्या. मग ईश्वर एकच असणे, त्याच्या अधिकार व गुणधर्मांवर कुरआनच्या आयतींमध्ये जबरदस्त पुरावे उपलब्ध असून त्याचबरोबर त्यामध्ये एकप्रकारचे मानसिक आवाहन होते. हे आवाहन कोणत्याही श्रावकास पहिल्याच वेळी प्रभावित करीत असे. याबरोबरच हेदेखील उल्लेखणीय आहे की, दिव्य कुरआनने परलोकाचा इन्कार करणार्यांसमोर मृत्यूपश्चात जीवनाचे चित्र अतिशय प्रभावीपणे अशा प्रकारे रेखाटले की, पुण्यकर्माचे फळ आणि पापाच्या शिक्षेचे सत्य असे सादर केले की, प्रामाणिक जणांचे काळीज हेलावून जात असे.
सत्यधर्मप्रचारक असलेले निष्कलंक व्यक्तित्व प्रेषित मुहम्मद(स) यांचे आणि वर्णनशैली दिव्य कुरआनची, या बाबीं लपणार्या कशा असू शकतात. जे लोक ही दिव्यवाणी निष्कलंक चारित्र्याच्या प्रेषितांच्या मुखाने ऐकत, त्यांच्या अंतःकरणात वादळ उठत असे. त्यांच्या विचारांत काहूर माजत असे. ते मानसिक संघर्षातून गुदरत असे आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या हातावर इस्लाम स्वीकारून एकमेव ईश्वरासमोर आत्मसमर्पण करण्याची प्रतिज्ञा केल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती मिळत नसे.
या काळात मानवाची मूळ विचारसरणी बदलण्यावर आणि जीवनाचे मूळ एकेश्वरवादावर ठेवण्यावर पूर्ण जोर देण्यात आला होता. अर्थात सृष्टीची, जीवनाची, नैतिकतेची आणि संस्कृतीची नवीन धारणा.
धर्माच्या गुप्तप्रचाराच्या या काळात केवळ सुस्वभावी आणि सज्जन लोकांशीच संफ साधण्यात येत असे. जे लोक आदरणीय प्रेषितांच्या सत्यधर्माचा संदेश स्वीकारित असत ते प्रेषितांच्या समूहात सामील होत असत आणि प्रेषितांसोबत एखाद्या पर्वतापार जाऊन लपून छपून नमाज अदा करीत असत. एकदा योगायोगाने प्रेषितांचे काका अबू तालिब तिकडून जात असताना त्यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना त्यांच्या अनुयायांसोबत नमाज अदा करताना पाहिले. नमाज संपल्यावर त्यांनी आपल्या पुतन्यास अर्थात प्रेषित मुहम्मद(स) यांना विचारले,
‘‘बेटा! ही कोणती धर्मपद्धती आहे?’’
‘‘ही धर्मपद्धती आपल्या सर्वांचे आजोबा असलेल्या माननीय इब्राहीम(अ) या प्रेषितांची आहे.’’ प्रेषित मुहम्मद(स) उत्तरले.
‘‘असो! मी याचा स्वीकार तर करु शकत नाही. परंतु तुम्हास याची परवानगी आहे. कोणतीही व्यक्ती तुम्हास रोखणार नाही,’’ अबू तालिब म्हणाले.
मग एकेदिवशी झाले असे की, प्रेषित मुहम्मद(स) यांना काही विरोधकांनी म्हणजेच मूर्तीपूजकांनी आपल्या अनुयायांसोबत एका पर्वतापलीकडे नमाज अदा करताना पाहिले. आधी तर त्यांना खूप आश्चर्य वाटले. मग शिव्याशाप देऊ लागले. प्रेषित व त्यांच्या अनुयायांनी कोणतेही उत्तर दिले नाही. यावर त्यांचा संताप अनावर झाला आणि ते अटीतटीवर आले. त्यांनी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांवर तलवारी उपसल्या. या तक्रारीत प्रेषितांचे अनुयायी माननीय साद बिन अबी वक्कास(र) जखमी झाले. इस्लामी क्रांतीसाठी सांडलेली ही पहिली रक्ताची धार होती.
0 Comments