पुण्य व पाप, सन्मार्ग व वाममार्ग, सत्कर्म व दुष्कर्म, न्याय व अन्याय, दया व निर्दयता, लज्जा व निर्लज्जता आणि ईश्वरीय आज्ञापालन व ईश्वरीय बंडखोरी हे समान होऊ शकत नाही. तसेच या परस्परविरोधी कृत्यांचा परिणाम- देखील एकच असू शकत नाही. सत्कृत्याचा परिणाम चांगला आणि दुष्कर्माचा परिमाण वाईटच असला पाहिजे. पुण्यवानाला बक्षीस आणि पापीला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. परंतु आपण पाहतो की, असे घडत नाही. सत्कर्माला लाभ व बक्षीस तसेच पापाची, दुष्कर्माची शिक्षा मिळतेच असे नाही. असेही घडते की, सन्मार्गी, सदाचारी लोक संकट व त्रास सहन करतात आणि वाईट, वाममार्गी लोक चैन व ऐश करतात. गरीब, लाचार लोक अत्याचारांना बळी पडून अन्यायाच्या जात्यामध्ये भरडले जातात. त्याचप्रमाणे ज्ञान, कौशल्य, कला सदाचार व संस्कृती प्रगतीपथावर असूनसुद्धा अगदी तीच दयनीय स्थिती आहे.
असे का घडते? हे जग अंधेर नगरी आहे काय? त्याचा राजा अन्यायी आहे काय? नाही! असे नाही!! आपण पाहतो की, विश्वातली प्रत्येक वस्तू ज्ञान, बुद्धिचातुर्य, वैशिष्ट्य व अर्थपूर्णतेची साक्ष देत आहे. विश्वाचा शासक, अज्ञान व अन्यायाच्या प्रत्येक स्वरुपापासून पवित्र आहे. अल्लाह लाचार व परावलंबी नाही. तो शक्तिशाली व समर्थ आहे. तर मग हे असे का घडते? वस्तुस्थिती ही आहे की, हे जग ज्ञान भांडारांनी भरलेले असून मानवी परीक्षागृह आहे. इथे पुण्य व पाप, न्याय व अन्याय, ईश्वरी आज्ञापालन तसेच बंडखोरी, विद्रोह, याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. ही कर्माची एक प्रयोगशाळा आहे. म्हणून मानवाला या जगात शिक्षा किंवा बक्षीस मिळू शकत नाही. जेव्हा हे विश्व, हे जग नष्ट होईल व संपुष्टात येईल आणि सर्व सजीव मृत्यु पावतील तेव्हा या विश्वाचा निर्माता व शासक हे विश्व व मानव पुन्हा निर्माण करेल. हेच आहे पारलौकिक विश्व आणि शिक्षा व बक्षीस मिळण्याचे एकमेव स्थान! ईश्वरातर्फे कर्माचे फळ व शिक्षा किंवा बक्षीस कायमचे व अमर्याद असेल. मानवी जीवनदेखील कायमचे अमर्याद असेल. हे याकरिता असेल की, पुण्य व पाप, न्याय व अन्याय, ईश्वरी आज्ञापालन व त्याच्याशी बंडखोरी दोहोंबद्दल भरपूर बक्षीस किंवा शिक्षा मिळावी. कर्म व फळ आणि संधीची कमतरता असेल, तर मृत्यु त्याला अटकाव करणार नाही. त्यावेळी अल्लाहचे न्यायालय अस्तित्वात येईल. प्रत्येक व्यक्ती ईश्वराच्या, म्हणजेच अल्लाहच्या न्यायालयात एकटी हजर केली जाईल. त्यावेळी कोणीही तिचा शिफारसकर्ता, वकील व मदतगार असणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा जाब तिला स्वतःला द्यावा लागेल.
इस्लामी जीवनव्यवस्था चारित्र्यसंपन्नतेवर अवलंबून असून ज्या मूलभूत तत्त्वांवर आधारभूत आहे ते कुरआनच्या शब्दात खालीलप्रमाणे आहे.
निश्चितच निःसंशय अल्लाहचा आदेश आहे की, ‘‘तो अटळ न्यायसंपन्न चारित्र्य प्रस्थापित करतो आणि निर्लज्जता, दुष्कृत्य, अन्याय व अत्याचार यांपासून रोखतो.’’
इस्लामजवळ आपले असो वा परके, सर्वांकरिता सदाचार व संपन्न चारित्र्य हाच मापदंड आहे. सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे न्यायाची प्रस्थापना करण्यास्तव इस्लामचा कडक आदेश हाच आहे की, शत्रूबरोबरदेखील न्याय करा. इस्लामच्या दृष्टीने आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पृथ्वीतलावर पाठविण्याचा उद्देश हाच आहे की, जगामध्ये संपूर्ण मानवता न्यायावर प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकास कायमस्वरुपी न्याय मिळावा. मुस्लिम समाज आणि प्रत्येक मुस्लिम यांच्या अस्तित्वाचा उद्देशच हा आहे की, त्यांनी सत्य व सदाचाराची साक्ष द्यावी, न्याय व चारित्र्य प्रस्थापित करावे, सन्मार्ग व सत्कर्माचे आदेश द्यावे, दुष्कर्म व वाममार्गापासून परावृत्त व्हावे इतरांनाही करावे. इस्लामी राज्य प्रस्थापनेचा उद्देश अल्लाहचे दासत्व आहे. तसेच गरिबांची काळजी, सत्कर्म, सदाचार व सत्चरित्र्याचा प्रसार, प्रचार करून कार्यक्षेत्र वाढविणे आणि दुराचाराचा विरोध, नाश करणे हे आहे. इस्लाम राजकीय, आर्थिक व सामाजिक ‘संपूर्ण’ जीवनाला सदाचारी व चारित्र्यसंपन्न तत्त्वांवर आधारभूत बनवतो आणि व्यक्ती, समाज व राज्य या सर्वांना अनिवार्य कर्म, कर्तव्य म्हणून राबवितो. तसेच याची जबाबदारी देतो की, त्यांनी सामूहिकरीत्या वाईटाचा, दुष्कृत्याचा नाश करावा, अन्याय व अत्याचाराचा समूळ नायनाट करावा व त्यापासून पराङ्मुख करावे. न्याय, चारित्र्य प्रस्थापित करुन चारित्र्यसंपन्न सदाचाराचा, सत्कृत्याचा प्रचार व प्रसार करावा. इतकेच नव्हे तर इस्लाम एक अशी जीवनव्यवस्था आहे, जी नखशिखांत सदाचार व चारित्र्याच्या तत्त्वावर उभारलेली आहे. इस्लामी जीवनव्यवस्था मुस्लिमांना आदेश देते की, त्यांनी या जीवनपद्धतीला पृथ्वीवर कायमस्वरुपी प्रस्थापित करावे.
0 Comments