आदरणीय माई आयशा (रजि.) सांगतात की, माझ्याकडे एक भगिनी आपल्या दोन मुलींसह काही मागण्यासाठी आली. (त्या तिघीही उपाशी होत्या.) त्या वेळी माझ्याकडे फक्त एक खजूर होती जी मी तिला दिली. तिने खजुरीचे दोन भाग करून आपल्या दोन्ही मुलींना दिले पण स्वत: मात्र खाल्ले नाही. (ती स्वत: उपाशी असूनही) ती निघून गेल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) आले आणि त्यांना मी ही घटना सांगितली. पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ज्या व्यक्तीला मुली देऊन अजमावले गेले आणि तिने मुलींचे खुशीने संगोपन केले तर या मुली त्या व्यक्तीला नरकाग्नीपासून दूर ठेवतील.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
मुलींचे संगोपन करणे एक महान सत्कर्म आहे. म्हणून मुलीच्या जन्मावर निराश न होता आनंद साजरा करावयास हवा. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा मुलींच्या बाबतीत एक उपदेश असा आहे, ‘‘ज्याने तीन मुली अथवा तीन बहिणींचे संगोपन केले, त्यांना चांगले शिकवले, त्यांना दयेने आणि प्रेमाने वागवले, इथपर्यंत की वयात आल्यावर त्यांचा विवाह करून दिला तर अशा व्यक्तीसाठी अल्लाहने जन्नत (स्वर्ग) राखीव अर्थात अनिवार्य केली.’’
यावर एकाने विचारले की जर कोणाला दोनच मुली असतील तर? ‘‘दोन मुलींच्या बाबतीत हाच मोबदला मिळेल.’’
इब्ने अब्बास (रजि.) म्हणतात की जर कोणी एकाच मुलीच्या बाबतीतही विचारले असते तर पैगंबरांनी हाच मोबदला सांगितला असता. कुठे ते क्रौर्य की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात लोक मुलींना जन्मत:च जिवंत पुरत होते! आणि पैगंबरांच्या प्रबोधनानंतर कसे घडले हे महान परिवर्तन कुठे की लोक मुलींच्या जन्मानंतर आनंदाने भारावून जाऊ लागले.
दिव्य कुरआनात आहे, ‘‘काय बेतेल त्या दिवशी जेव्हा अल्लाह या निष्पाप मुलींना जिवंत करून विचारली की तुम्हाला कोणत्या गुन्ह्यापायी आणि कोणी ठार केले?’’ मृत्युपश्चात अल्लाहसमोर आपल्या प्रत्येक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल हे वास्तव मनमस्तिष्कात एकदा का बिंबले की केवळ स्त्री-भ्रूण हत्येचाच नव्हे तर सारे गंभीर प्रश्न मार्गी लागतील. अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल की ही जाणीव पतीपत्नीला मुलीचा गर्भपात करू देणार नाही. सोनोलॉजीस्टला गर्भलिंग परीक्षा करू देणार नाही. हीच भीती स्त्रीरोगतज्ज्ञाला गर्भपाताची सर्जरी करण्यापासून परावृत्तकत रील व हीच उत्तरदायित्वाची जाणीव पतीला, सासूसासNयांना व त्यांच्या सहकुटुंबियांना हुंड्यासाठी नववधूंना जिवंत जाळण्यापासूनही रोखण्याचे काम करेल!
समाजाला गुन्हेगारीपासून आणि दुराचारापासून रोखण्याचा आणि सदाचारी बनविण्याचा किती महान आणि गुणकारी तथा प्रॅक्टिकेबल उपाय आहे हा! आमच्या देशात हा उपाय राबविण्याची सद्बुद्धी अल्लाह आम्हाला प्रदान करो!
– संकलन : डॉ. सय्यद रफीक
0 Comments