Home A प्रेषित A सत्य-असत्यातील पहिली लढाई

सत्य-असत्यातील पहिली लढाई

इस्लामी राज्य ‘मदीना’चे प्रमुख आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लष्करी तयारीबरोबरच परिस्थितीवर नजर ठेवून अनुमान लावीत होते की, कधी काय घडेल. प्रेषितांचा दृष्टिकोन गतीहीन नव्हता की, ते शत्रूच्या हल्ल्याची केवळ वाट पाहात बसतील आणि शत्रूने हल्ला केल्यावर त्याचे प्रत्युत्तर देतील. अगदीच प्रतिरक्षणात्मक दृष्टिकोनातून जरी विचार केला, तर हेच योग्य होईल की, शत्रूने म्याना बाहेर तलवार काढताच ती तलवार नष्ट करावी. युद्ध रोखण्यापेक्षा युद्धाची तयारीच रोखलेली बरी.
ज्या क्षणी आदरणीय प्रेषितांना कुरैशच्या त्या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली, त्याच क्षणी त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याने गुपचुपपणे सीरियाच्या मार्गाने जाण्याऐवजी मदीनाच्या सामरिक परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय दक्षतेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. त्यास संकटाची चाहूल लागताच त्याने लष्कर पाचारण करण्यासाठी ‘मक्का’ शहराकडे दूत पिटाळला. दूताने मक्का शहरी जाऊन जनतेला कळकळीने विनंती केली की, ‘हे मक्कावासीयांनो! आपला व्यापारी काफिला मुहम्मद(स) यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी निघा.‘तीव्र भावूक मनोदशासह एक जबरदस्त सशस्त्र फौज हा हा म्हणता निघाली. ‘अबू लहब’ वगळता सर्वच मोठमोठे सरदार या फौजेत सहभागी होते. प्रेषितांना याची गुप्त सूचना मिळाली. निर्णयाची वेळ समोर होती. जर पुरेशी शक्ती असती तर व्यापारी काफिला आणि शत्रूचे लष्कर, दोघांना लक्ष्य बनवीता आले असते. परंतु दोन्हीपैकी एकालाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेणे शक्य होते.
आदरणीय प्रेषितांनी ‘जफीरान’च्या घाटीमध्ये आपल्या सोबत्यांना सल्लामसलत करण्यासाठी बोलावले. बर्याचजणांनी काफिल्यावर हल्ला चढविण्याचा सल्ला दिला. माननीय अबू बकर(र), उमर(र), मिक्दाद(र) यांनी प्रेषितांना सांगितले की, आपण जे सांगाल आणि आपली ज्या दिशेला पावले पडतील तिकडे आम्हीसुद्धा आपल्याबरोबरच असू आणि अंतिम श्वासापर्यंत लढू. आम्हाला इस्त्राईलचे वंशज (‘ज्यू’ समाज) समजू नका की, ज्यांनी त्यांचे प्रेषित माननीय मूसा(अ) यांना सांगितले होते की, ‘‘तुम्ही आणि तुमचा ईश्वर मिळून शत्रूंशी लढा. आम्हाला काय देणेघेणे!’’ आदरणीय प्रेषितांनी परत एकदा या प्रकरणी लोकांचा सल्ला मागितला की, ‘या प्रसंगी आपण काय करावे?’ प्रेषित मुहम्मद(स) यांचा हेतु असा होता की, अनसार (मदीनातील प्रेषितांचे समर्थक) समुदायाची या प्रकरणी भूमिका काय आहे. कारण ‘अकबा’च्या ठिकाणी ज्या वेळी अनसार- समुदायाने प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली होती त्या वेळी त्यांनी अनसारकडून अशी प्रतिज्ञा घेतली होती की, मदीनावर हल्ला झाल्यास अनसार प्रेषित मुहम्मद(स) यांची साथ देतील. अर्थातच या प्रसंगी केवळ कुरैशच्या काफिल्यास रोखण्याची योजना होती. त्यामुळे अनसार समुदायावर या लष्करी कारवाईत सामील होणे अनिवार्य नसून केवळ ऐच्छिक होते. आदरणीय प्रेषितांना उत्तर देण्यासाठी अनसार समुदायाकडून माननीय साद बिन मुआज(र) उठले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! ज्याअर्थी आम्ही तुमच्या हातावर इस्लामची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा केली की आमचे प्राण, संपत्ती आणि सर्वकाही आपल्या आदेशावर अर्पण करू, तेव्हा याचा प्रश्नच उद्भवत नाही की, या लष्करी कारवाईत आम्ही आपल्यासोबत असू की नसू. आपण जर आदेश दिला की, पर्वतावर चढून जीव द्या किवा समुद्रात बुडून जीव द्या तर आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणी तयार आहोत. कारण आम्ही आपल्यावर श्रद्धा बाळगली आहे. आपल्या प्रेषितत्वाच्या सत्यतेस मनापासून स्वीकारले आहे. ईश्वराची शपथ की, ज्याने आपणास प्रेषित म्हणून आमच्याकडे पाठविले आहे, आमचा एकही माणूस मागे सरकणार नाही. प्रत्येकजण युद्धभूमीवर आपले प्राण पणाला लावून लढेल आणि ईश्वर आमचे हे कर्म पाहून आपल्या नयनांना शीतलता प्रदान करेल.’’
अशा प्रकारे मुहाजिरीन (स्थलांतरित मक्कावासीय मुस्लिम) प्रमाणेच अनसारजणांनी सुद्धा आदरणीय प्रेषितांवरील आपल्या अमर्याद श्रद्धा आणि आपले सर्वस्व अर्पण करण्याचा पुरावा सादर केला आणि मुहाजिरीन व अनसारच्या पूर्ण सल्लामसलतीनंतर प्रेषितांनी लढाईचा निर्णय घेतला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या बारा तारखेस हिजरी सन दोनमध्ये मदीनाहून निघाले. ईश्वराकडून रमजान व रोजे (उपवास) आनिवार्य होण्याचे हे पहिलेच वर्ष होते. या युद्धात मुस्लिम सैनिकांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ‘सफरा’ या ठिकाणी प्रेषितांनी वीस अनुयायांना याकरिता पाठविले की, कुरैशच्या व्यापारी काफिल्याची संपूर्ण माहिती मिळवावी. त्यांच्यामार्फत प्रेषितांना खबर मिळाली की, कुरैश काफिला ‘बद्र’च्या पारंपरिक मार्गावरून न जाता समुद्रतटाच्या दीर्घ मार्गाने निघाला आणि दूरवर पोहोचला.
अर्थात हा काफिला प्रेषित व त्यांच्या अनुयायांच्या तावडीतून बाहेर निघून गेल्यावर काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याला वाटले की, आता मात्र संकट टळले. त्यामुळे त्याने कुरैशच्या सामरिक सरदारांना मक्का शहरी परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु इस्लामचा कट्टर द्रोही असलेला अबू जहलचा पारा खूप चढलेला होता. त्याने ‘अबू सुफियान’चा सल्ला धुडकावून लावला आणि ‘नखला’वरील झालेल्या झडपेत मुस्लिमांकडून ठार झालेल्या ‘हजरमी’चा भाऊ ‘अला बिन हजरमी’ यास आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यास्तव चिथावले या चिथावणीखोर सल्ल्यामुळे ‘अला बिन हजरमी’च्या भावना भडकल्या आणि ‘अबुजहल’शी सहमत होऊन ‘कुरैश’चे संपूर्ण लष्कर ‘बद्र’च्या किनार्यावर पोहोचले.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांच्या सल्लामसलतीतून पूर्ण विचाराअंती सामरिक योजना आखली. शत्रूंची संख्या आणि प्रमुख योद्ध्यांच्या बाबतीत गुप्त अहवाल मिळविला आणि मग आपल्या लष्करास उद्देशून म्हणाले,
‘‘मक्का शहराने त्याचे सुपुत्र तुमच्या समोर टाकले आहेत.’’
अर्थात या उपद्रवीजणांचा नाश करण्याची ही अगदी सुवर्णसंधी आहे. जवळपास एक हजाराच्या संख्येत शत्रूची फौज होती. त्यात सहाशे कवचधारी सैनिक आणि शंभर स्वार होते. सोबत मोठ्या संख्येत उंट होते. मोठ्या प्रमाणात हत्यारे होती. मुबलक प्रमाणात रसद आणि सैनिकांना खूश करण्यासाठी मदीरा व गीत गाणार्या व नाचणार्या सुंदर ललना होत्या.
दुसरीकडे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ईशधारणेने त्यांची मने ओतप्रोत वाहात होती. लढण्यासाठी मुबलक हत्यारे नसली तरी त्यांचे श्रद्धा, ईश्वर व प्रेषितांवरील धारणा, आंदोलनकारी प्रेरणा, संयम, ईशपरायणता, पवित्र चारित्र्य आणि संगठनकौशल्य हीच त्यांची सामरिक शक्ती होती. प्रेषितांनी तयार केलेल्या मुस्लिम फौजेसमोर केवळ एक लढाई जिकण्याचे उद्दिष्ट नसून ते इस्लामी आंदोलनास यशाच्या शिखरापर्यंत नेऊ इच्छित होते. त्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य हे ‘बद्र’च्या युद्धावर अवलंबून होते.
तिकडे शत्रुपक्षसुद्धा याच युद्धाच्या माध्यमाने प्रेषितांच्या आंदोलनास कायमस्वरूपी चिरडण्याच्या तयारीत होते. इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी ईश्वरासमोर याचनास्वरुप प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा, हे कुरैशजण आहेत! हे गर्व आणि दंभाच्या उन्मादात येथे आलेले आहेत. त्यांचा मूळ हेतूच हा आहे की, तुझ्या दासांनी तुझी उपासना बंद करावी. तुझ्या प्रेषिताचा इन्कार करावा, जेणेकरून त्यांना त्यांची अमानवी, अन्यायी व अत्याचारी व्यवस्था चालू ठेवणे शक्य व्हावे. लोकांनी ईश्वरास सोडून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे. त्यांनी तयार केलेल्या विभूतींची पूजा करावी. म्हणून हे यशदात्या ईश्वरा! तू मला मदतीचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण कर!! तुझी मदत पाठव!!! तू जर या प्रसंगी मदत केली नाहीस तर तुझे नाव तुझ्या जगातून नष्ट होईल. हे लष्कर जर नष्ट झाले तर तुझे नाव घेणारा या पृथ्वीतलावर कोणी राहणार नाही!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेबाबत ईश्वराकडून ईशबोध झाला की, ‘‘आपली प्रार्थना स्वीकारण्यात आली आहे. पुढच्या दिवशी म्हणजेच रमजान महिन्याच्या सतरा तारखेस दोन्ही फौजा समोरासमोर आल्या. प्रेषितांनी इस्लामी फौजेस पंक्तीबद्ध केले. युद्धाची सुरुवात आवाहनाने झाली. मुस्लिम सैन्याने एकूण बावीस जणांचे प्राण ईश्वराच्या नावे अर्पन करून शत्रूसैन्याच्या सत्तर जणांना कंठस्थान घातले. या युद्धामध्ये ‘शैबा’, ‘उत्बा’, ‘अबू जहल’, ‘आस बिन हिश्शाम’ ‘उमैया बिन खल्फ’ आणि ‘अबुल बख्तरी’सारखे दिग्गज आणि क्रूर ईशद्रोही ठार झाले. शिवाय शत्रू फौजेतील सत्तरजणांना बंदी बनविण्यात आले. ‘बद्र’च्या युद्धातील काही बाबीं लक्षणीय आहेत.
  1. ‘बद्र’ची लढाई ही या गोष्टीची साक्ष आहे की, सैन्याच्या संख्येत आणि शस्त्रांच्या संख्येत श्रद्धात्मक प्रेरणाशक्ती प्रदान करते. त्याचप्रमाणे सत्य आणि असत्याची लढाई दिव्य कुरआनची ही व्याख्या सत्य असल्याचे सिद्ध करते की, ‘‘विजय तर केवळ ईश्वरातर्फेच आहे!’’(संदर्भ : दिव्य कुरआन ८:१०, ३:१२६)
  2. ही घटना या गोष्टीची मार्गदर्शक आहे की, संख्या आणि शक्तीच्या अभावाच्या जाणिवा इस्लामी मोर्चावर प्रकट असूनही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मक्का’वरून येणार्या दोन मुस्लिम तरुणांची सेवा यासाठी नाकारली की, रस्त्यात शत्रूंनी त्यांना कैद केले व या अटीवर सोडले की, प्रेषितांच्या समर्थनार्थ युद्धात सहभागी होणार नाही. आदरणीय प्रेषितांनी त्या दोघांना बजावले की, ‘‘तुम्ही जे वचन त्यांना (शत्रूंना का असेना) दिले आहे, त्याचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. हीच होती ती नैतिक श्रेष्ठता. हीच नैतिक श्रेष्ठता मानवांपर्यंत पोहोचविण्याचा इस्लामचा उद्देश आहे.
  3. तसेच आदरणीय प्रेषितांनी शत्रूपक्षाच्या ठार झालेल्या सैनिकांच्या शवांचा अनादर केला नाही. उलट त्यांच्यासाठी एक मोठा खड्डा तयार करून सर्वांना एकत्रित दफन केले.
  4. युद्धामध्ये पराभूत शत्रूंची संपत्ती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरी आदेशानुसार सर्वांना वाटप केली.
  5. जगामध्ये पराभूत पक्षाच्या कैद झालेल्या सैनिकांवर अमानुष अत्याचार करण्यात येतात. पीडादायक कष्ट देण्यात येते. त्यांचे शील नष्ट करण्यात येते. परंतु या ठिकाणी परिस्थिती मात्र खूप उलट आहे. आदरणीय प्रेषितांनी लढाईत कैदी बनविलेल्या शत्रूंचा उत्तमरीत्या पाहुणाचार केला.त्यांच्याशी मानवतेस शोभणारे वर्तन केले. त्यांच्या शील व प्रतिष्ठा जोपासल्या. ‘मदीना’च्या बर्याच घरांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. प्रेषितांनी मदीनावासीयांना ताकीद केली की, त्या कैद्यांना चांगले अन्न पुरवावे. त्यांच्याकडे वस्त्र नसल्यास त्यांना वस्त्रे द्यावीत. प्रेषितांच्या आदेशाच्या पालनास्तव काही अनुयायांनी स्वतःचे पोट मीठ-मिरची व खजुरींवर भागवून कैद्यांना चांगला आहार पुरविला. त्यांना वस्त्रे दिली. मस्जिद-ए-नबवीमध्ये जे कैदी ठेवण्यात आले होते, त्यांच्या कन्हन्याच्या आवाजामुळे प्रेषितांची झोप उडाली. प्रेषितांनी आदरपूर्वक त्यांची विचारपूस केली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावरच प्रेषितांना झोप मिळाली.
  6. कैद्यांच्या सुटकेसाठी प्रेषितांनी प्रत्येकी चार हजार दिरहम (तत्कालीन नाणी) दड लावला. काही श्रीमंत कैद्यांना यापेक्षाही जास्त दंड आकारण्यात आला. या दंडाची एकूण रक्कम अडीच ते तीन लाखांच्या घरात होती. एवढा दंड लावणे म्हणजे कुरैशजणांची सामरिक शक्ती विस्कळीत करणे होय.
  7. महत्त्वाची बाब अशी आहे की, ईश्वराचे उपासक असलेल्या मुस्लिम विजेत्यांनी पहिल्याच युद्धात एवढे जबरदस्त विजय संपादन करूनसुद्धा कोणत्याच प्रकारचा जल्लोष साजरा केला नाही, तर प्रेषितांनी घडविलेले हे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) आपला आनंद ईश्वराच्या स्तुतीगानाने साजरा करीत होते. शिवाय असेदेखील घडले नाही की, मुस्लिमांना विजयाचा कैफ चढला आणि ते असे समजू लागले की, ‘‘आता आपणास एखादे खूप उंच स्थान प्राप्त झाले.’’ या बाबीविरुद्ध दिव्य कुरआनने त्यांना त्यांच्यातील त्रुटी स्पष्टपणे दाखवून दिल्या आणि त्यांत सुधारणा आणण्याचे आदेश दिले.
  8. अंतिम प्रकारचे सत्य हे आहे की, ईश्वराने ‘बद्र’च्या या दिवसास ‘फुरकान’चा दिवस घोषित केले. अर्थात या लढाईतून हे स्पष्ट झाले की, सत्य कोणते आणि असत्य कोणते आहे व कोणती शक्ती विकास पावणारी व कोणती शक्ती नष्ट होणारी आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *