अरबस्थानच्या सभोवताली ईराण, रोम व इजिप्त हे देश होते. या देशात बऱ्याच विद्या व कलांची रेलचेल होती, परंतु त्यांच्या दरम्यान पसरलेल्या वाळवंटरूपी अथांग महासागरामुळे अरबस्थान या सर्वांहून तुटलेला व एकटा पडलेला होता. अरब व्यापारी ऊंटावर माल लादून महिनेन महिने प्रवास करून त्या देशात व्यापारासाठी जात असत. परंतु हा संपर्क केवळ मालाच्या खरेदी-विक्रीपर्यंतच सीमित होता. ज्ञान व सभ्यतेचा प्रकाश त्यांच्याबरोबर येत नसे. खुद्द अरबस्थान अप्रगत होता. त्यात शाळा नव्हत्या. लोकांत शिक्षणाची आवडही नव्हती. सबंध देशात बोटावर मोजण्याइतके लिहिता-वाचता येणारे लोक होते व त्यांनाही इतके लिहिता-वाचता येत नव्हते की, त्या काळातील सर्व विद्या व कला त्यांना ज्ञात व्हाव्यात. त्यांच्याजवळ उच्चकोटीची एक भाषा होती, ज्यात उच्च विचार प्रकट करण्याची असाधारण शक्ती होती. अरबांत उत्तम साहित्य अभिरूची होती. परंतु अंधविश्वास, अज्ञानता, बर्बरता त्यांचा स्वभावगुण होता.
तेथे कसलेही पद्धतशीर शासन अस्तित्वात नव्हते. कसलाही कायदा अंमलात नव्हता. प्रत्येक अरब टोळी स्वतः सार्वभौम होती. अनिर्बंधपणे लूटमार होत असे. दररोज रक्तरंजित लढाया होत असत. मानवी प्राणास कसलेही मूल्य नव्हते व जो ज्यावर मात करी त्याचा वध करून त्याच्या संपत्तीवर कब्जा करीत असे. सदाचार व शिष्टाचार याचे वारेसुद्धा त्यांना लागले नव्हते. मदिरापान, व्यभिचार व जुगार, हिंसा व रक्तपात या गोष्टी सर्रास होत्या. एकमेकांसमोर अगदी निःसंकोचपणे माणसे नग्न होत असत. स्त्रियांसुद्धा काबागृहात नग्न होऊनच प्रदक्षिणा घालित असत. पवित्र व अपवित्र, शिष्ट व अशिष्ट, निषिद्ध व हलाल यामध्ये त्यांना फरक ठाऊक नव्हता. अरबांचे स्वातंत्र्य इतके अनिर्बंध झाले होते की, कोणीही मनुष्य कसल्याही कायद्यांचे व नियमांचे पालन करण्यास तयार नव्हता. त्याचे जीवन अत्यंत मलीन होते. ते आपल्या मुलींना स्वतःच्या हातांनी जिवंत गाडत असत. केवळ यासाठी की त्यांचा कोणी जावई बनू नये. ते त्यांचे बाप मृत्यू पावल्यास सावत्र आईशी विवाह करत असत. त्यांना भोजन, वस्त्र व स्वच्छतेच्या साधरण नियमांचे ज्ञानसुद्धा नव्हते. मूर्तीपूजा, प्रेतपूजा, नक्षत्रपूजा, तात्पर्य एक ईश्वरपूजेऐवजी जगात ज्या पूजा होत होत्या, त्या सर्व त्यांच्यामध्ये प्रचलित होत्या. प्राचीन प्रेषित आणि त्यांच्या शिकवणीविषयी सत्यज्ञान त्यांच्याजवळ नव्हते. त्यांचा कोणता धर्म होता, हेसुद्धा त्यांना माहीत नव्हते. तसेच कोणत्याही शासकाचे आज्ञापालन करणे मनुष्य मान्यही करीत नव्हता. यावर कळस हा होता की, सर्व अरबवंश दगडाच्या मूर्तीची पूजा करीत असे. चालता चालता वाटेत एखादा गुळगुळीत दगड दृष्टीस पडला की लगेच त्याला पुढे मांडून त्याची पूजा केली जात असे. जी मस्तके कोणा पुढेही नमत नसत ती दगडापुढे झुकू लागली होती. असे मानले जात असे की, हे दगड त्यांच्या इच्छा-आकांक्षाची पूर्तता करतील.
मानवता – उपकारकाचा जन्म
अशा देशात व अशा परिस्थितीत एक व्यक्ती जन्माला येतो. लहानपणीच मातापित्यांचे तसेच आजोबांचे छत्र डोक्यावरून नाहिसे झालेल्या अशा विपन्नावस्थेत कसलेही शिक्षम संस्कार प्राप्त होत नाहीत. बालपणात तो अरब गुरख्यांबरोबर शेळ्या राखतो. तारूण्यात व्यापार-उदिमात व्यग्र होतो. त्याचे बसणे-उठणे व एकमेकांत मिसळणे सर्व अशा अरब लोकांशीच असे ज्यांची अवस्था वरीलप्रमाणे होती. शिक्षणाचा मागमूसही नव्हता, किंबहुना अक्षरओळखही नव्हती. त्यास एखाद्या विद्वानाची संगतीसुद्धा प्राप्त झाली नाही, कारण त्याकाळी ‘‘विद्वान’’चे अस्तित्व संपूर्ण अरबस्तानातच नव्हते. त्यास अरबच्या बाहेर जाण्याच्या संधी अवश्य मिळाल्या होत्या. या व्यापारी यात्रा केवळ सीरियापर्यंतच सीमित होत्या. हे मान्य जरी केले की त्या यात्रांदरम्यान त्यांना विद्या व सभ्यतेचे काही निरीक्षण करण्याच्या संधी प्राप्त झाल्या असतील आणि विद्वानांच्या भेटीगाठीसुद्धा झाल्या असतील, परंतु अशा वरवरच्या भेटीगाठींनी व निरीक्षणाने एखाद्याचे चारित्र्य निर्माण होणारच नाही. यापासून एका अरब खेडूताला जो निरक्षर होता, त्याला असे ज्ञान प्राप्त होणे अशक्य आहे ज्यामुळे एका देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा तसेच एका विशिष्ट काळासाठीच नव्हे तर सार्वकालिक नेता बनविले. धर्म, नैतिकता, सभ्यता व संस्कृती तसेच नागरिकतेचे सिद्धान्त व संकल्पना त्याकाळी जगात कुठेच अस्तित्वात नव्हते. मानवी चारित्र्याचे आदर्श त्या काळी कुठेही सापडणे अशक्य होते आणि त्यांना प्राप्त करण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. फक्त अरबस्थान नव्हे तर संपूर्ण जगाची ही स्थिती होती.
ही व्यक्ती ज्या लोकांमध्ये जन्मली, ज्यांच्यात बालपण घालवले, ज्यांच्यासोबत राहून तारूण्यावस्थेत आला आणि अशा लोकांमध्ये मिळून मिसळून व्यवहार करीत राहिला. परंतु तरीही त्याच्या सवयी, त्याचे आचार-विचार, इतरापेक्षा अगदी भिन्न आहेत. तो कधीही खोटे बोलत नाही, कधीही अपशब्द उच्चारत नाही. त्याच्या वाणीत कठोरता नव्हती तर असा गोडवा होता की, ज्यामुळे माणसे त्याच्यावर लुब्ध होत असत. तो कोणाकडूनही अनुचित मार्गाने एक पैसाही घेत नव्हता. त्याचा प्रामाणिकपणा इतका उच्च होता की सर्वजण आपली धनसंपत्ती व मूल्यवान वस्तू त्याच्यापाशी सुरक्षित राहावी म्हणून आणून ठेवीत असत. तो आपल्या प्राणाच्या मोलाने सर्वांच्या धनसंपत्तीचे व वस्तूंचे रक्षण करीत असे. सर्व अरबवंश त्याच्या प्रामाणिकपणावर संपूर्णपणे विश्वास बाळगत असे व त्याला ‘‘अमीन’’ (प्रामाणिक) असे संबोधित असे. त्याचा लज्जाशिलपणा असा होता की बालपणातसुद्धा त्याला कोणीही उघडानागडा पाहिला नाही. त्याचा सभ्यपणा व शिष्टाचार असा होता की सर्व प्रकारच्या असभ्यता व अमंगलपणाच्या वातावरणात संगोपन होऊनही सर्व प्रकारच्या असभ्यतेचा व अमंगलपणाचा तो तिरस्कार करीत असे. त्याच्या प्रत्येक कृतीत स्वच्छता व पावित्र्य होते. त्याचे विचार इतके निर्मळ होते की स्वतःचा अरबवंश, रक्तपात व लूटमार करताना पाहून त्याचे अंतःकरण कष्टी होत असे. तो युद्धप्रसंगी तडजोडीचे प्रयत्न करीत असे. त्याचे हृदय इतके मृदु असे की, सर्वांच्या दुःखात व कष्टात तो सहभागी होत असे. अनाथ मुलांना व विधवांना सहाय्य करी व भुकेलेल्यांना जेवू घालीत असे. वाटसरूंचा पाहुणचार व आदरातिथ्य करीत असे. त्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व इतरांखातर तो स्वतः त्रास सहन करीत असे. त्याच्या बुद्धीचा रोख असा उचित होता की मूर्तीपूजकांमध्ये राहूनही तो मूर्तीचा तिरस्कार करीत असे. कोणत्याही निर्मित वस्तूपुढे तो नतमस्तक होत नसे. त्याच्या अंतरंगातून असा ध्वनी उमटत असे की, पृथ्वीवर व आकाशाखाली जे काही दृष्टीस पडते त्यापैकी काहीही उपासनापात्र नाही. त्याचे मन स्वतःच अशी ग्वाही देत असे की, ईश्वर तर एकच असू शकतो व तो एकच आहे. या अडाणी लोकामध्ये हे व्यक्तिमत्त्व इतके आगळे-वेगळे दिसते की, जणू दगडधोंड्याच्या राशीत तळपणारा हिराच आहे. अथवा घनदाट काळोखात तेवणारा एक दीप आहे.
अशा प्रकारे उच्चदर्जाचे सोज्वळ व पवित्र जीवन सुमारे चाळीस वर्षे व्यतीत केल्यानंतर त्यांच्या जीवनात एका क्रांतीचा आरंभ होतो. ही व्यक्ती त्यांच्या सभोवताली पसरलेल्या अंधकाराला भयभीत होऊन ते अज्ञान, दुराचार कुव्यवस्था, मूर्तीपूजा व अनेकेश्वरत्वरूपी चोहोकडून उसळणाऱ्या सागराच्या लाटातून बाहेर पडण्याची शिकस्त करीत होती. तेथील कोणतीही वस्तू त्याच्या प्रकृतीला अनुकूल नव्हती. सरतेशेवटी वस्तीपासून दूर अंतरावरील पर्वताच्या एका गुफेत जाऊन, एकांत व शांत वातावरणात कित्येक दिवस घालविले. उपवास करून आपल्या आत्म्याची मनाची व बुद्धीची अधिक शुद्धी करून घेतली. तो विचार-चिंतन करीत असे, चोहोकडे पसरलेला काळोख दूर करण्यासाठी प्रकाशाचा शोध घेत असे. तो असा एखादा दृष्टांत प्राप्तीसाठी अविरत प्रयत्नशील होता ज्यामुळे या विस्कटलेल्या व बिघाड निर्माण झालेल्या जगाची घडी पुन्हा नीट बसेल. अशा अवस्थेत अकस्मात एक महान स्थित्यंतर घडून येते. जो प्रकाश तत्पूर्वी त्याच्या हृदयात नव्हता तो एकाएकी येतो, त्याच्यात अचानकपणे असे सामर्थ्य निर्माण होते जे तत्पूर्वी त्याने कधीच अनुभवले नव्हते. तो गुफेतील एकांतातून बाहेर पडून आपल्या जातबांधवासमीप येतो. त्यांना असे सांगतो की, ज्यांचेसमोर तुम्ही नतमस्तक होता त्या सर्व मूर्ती तथ्यहीन वस्तू असल्याने त्यांचा त्याग करा. कोणताही माणूस, वृक्ष, पाषाण, आत्मा अगर कोणतेही नक्षत्र पात्र नाही की तुम्ही त्यांच्यापुढे आपले मस्तक झुकवावे, त्याचे दास्यत्व पत्करावे व त्याची उपासना करावी आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. ही पृथ्वी, हा चंद्र, सूर्य, नक्षत्रे, भूमंडलावरील व आकाशाखालील एकूण एक सर्व वस्तू, एकाच ईश्वराने निर्माण केल्या आहेत. तोच तुमचा तसेच या सर्व वस्तूंचा निर्माणकर्ता आहे. तोच सर्वांचा पालक आहे व तोच मृत्यू व जीवनदाता आहे. इतर सर्वांचा त्याग करून त्याचेच दास्यत्व पत्करा. सर्वांचा त्याग करून त्याच्याच आज्ञांचे पालन करा व त्याच्यासमोरच आपले शीर झुकवा. तुम्ही करीत असलेली कुकर्मे-चोऱ्या, लूटमार, रक्तपात व हत्याकांड, अन्याय व अत्याचार, ही सर्व पापे असून ती सर्व कृत्ये सोडून द्या. ईश्वराला ती अप्रिय आहेत. खरे बोला, न्याय करा. कोणाचीही हत्या करू नका. कोणाचीही मालमत्ता बळकावू नका, देवाण-घेवाण न्यायाने करा. तुम्ही सर्व माणसे आहात, सर्व माणसे समान आहेत. श्रेष्ठत्व व सभ्यपणा हा माणसाच्या वंशकुलावर अगर त्याच्या वर्णरुपावर व धनसंपत्तीवर आधारित नसून ते केवळ ईशोपासनेत, सदाचार व पावित्र्य यामध्ये सामावलेले आहे. जो मनुष्य ईश्वराचे भय बाळगतो तोच सदाचारी व निर्मळ असून तोच उच्च प्रतिचा मनुष्य आहे. जो कोणी असा नाही तो निरर्थक आहे. मृत्यू पश्चात तुम्हा सर्वांना आपल्या ईश्वरासमोर हजर व्हायचे आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजन ईश्वरापुढे आपल्या कर्मासाठी उत्तरदायी आहे. तो सर्वकाही पाहणारा व जाणणारा आहे, तुम्ही काहीही त्याच्यापासून लपवू शकत नाही. तुमच्या जीवनाचे कर्मपत्र जसे की तसे त्याच्यासमोर हजर होणार आहे आणि त्या कर्मपत्रानुसार ईश्वर तुमच्या परिणामाचा फैसला करील.
त्या खऱ्याखुऱ्या न्यायदात्यापुढे कसलीही शिफारस उपयोगी पडणार नाही, की कसलीही लाच-लुचपत उपयुक्त ठरणार नाही, कोणाच्या वंशकुळाचीही चौकशी होणार नाही. तेथे केवळ ईमान व सत्कृत्याची चौकशी होईल. ज्याच्याकडे ही सामग्री असेल तो ‘‘जन्नत’’ (स्वर्ग) मध्ये दाखल होईल व ज्याच्याकडे यापैकी काहीही नसेल असा करंटा माणून नरकात झोकून दिला जाईल. हा तो संदेश होता ज्याला घेऊन ती व्यक्ती बाहेर आली.
अडाणी व ज्ञानहीन वंशाच्या लोकांनी त्या भल्या माणसाला केवळ एवढ्याच अपराधाखातर त्रास द्यायला आरंभ केला की तो पूर्वापार व वंशपरंपरेने होत आलेल्या गोष्टींना नावे ठेवत होता. पूर्वजांच्या रूढी व प्रथांविरुद्ध शिकवण देत होता. याच एका कृत्याखातर लोकांनी त्याला शिव्याशाप व अपशब्द दिले, धोंडे मारले. त्याला जगणे मुष्किल करून सोडले त्याला ठार मारण्याचे कट रचले गेले. हे सर्व चार दोन दिवसांपुरतेच होते असे नाही तर तब्बल तेरा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यावर हे सर्व अनन्वित जुलूम व अत्याचार केले गेले. शेवटी त्यांना आपल्या जन्मभूमीचा त्याग करण्यास विवश केले गेले. मायभूमीतून हुसकूनही ते स्वस्थ्य बसले नाही तर जेथे त्यांने आश्रय घेतला होता तेथेही कित्येक वर्षे त्याला छळत राहिले.
हा सर्व छळ का ?
हा सर्व छळ त्या सन्मार्गी माणसाने कशासाठी सहन केला? केवळ एवढ्यासाठी की तो आपल्या समाजाच्या लोकांना सरळ मार्ग दाखवू इच्छित होता. त्याच्या समाजाचे लोक त्याला सार्वभौमत्व देऊन बादशहा मानण्यास तयार होते. त्याच्यापुढे धनराशी ओतण्यास तयार होते. परंतु त्यासाठी एकच अट होती की, लोकांना देत असलेली शिकवण त्याने सोडून द्यावी. परंतु त्याने या सर्व आमिषांना लाथाडून आपल्या कर्तव्यात अढळ राहिला. एखादा मनुष्य स्वहितासाठी त्रास व हालअपेष्टा सोसण्याऐवजी केवळ इतरांच्या कल्याणासाठी, परहितासाठी त्या आनंदाने सहन करतो यापेक्षा अधिक सन्मती व सत्यप्रियता याची तुम्ही कल्पना करू शकाल काय? ज्यांच्या भल्यासाठी व कल्याणासाठी तो झटतो तेच लोक त्याला दगड मारतात व तो त्यांच्या कल्याणासाठी ईश्वराची करुणा भाकतो. अशा माणसाच्या सदाचरणावर माणसेच काय परंतु ‘‘फरिश्ते’’ (ईशदूतही) स्वतःला ओवाळून टाकतात. आणि पाहा की एखादा खोटारडा मनुष्य कसल्यातरी मूल्यहीन गोष्टी पाठीमागे लागून अशा प्रकारची दुःखे व हाल सहन करू शकतो काय? एखादा थातूरमातूर मनुष्य निव्वळ अटकळ व अनुमान यांच्या आधारावर, एखादे विधान करून त्यावर इतका दृढपणाने व ठामपणाने टिकून राहू शकतो काय? त्याच्यावर संकटाचे डोंगर जरी कोसळले, धरणी जरी अपुरी भासू लागली, संपूर्ण देश त्याच्या विरुद्ध उभा राहिला, मोठमोठी सैन्ये त्यावर चालून आली तरी तो आपल्या भूमिकेपासून तिळभरसुद्धा हटण्यास तयार होत नाही. असे संभवनीय आहे काय? इतका व भक्कमपणा व निश्चयशक्ती याच गोष्टीचा पुरावा आहे की आपल्या सत्येवर त्याचा पुरेपूर विश्वास होता. जर त्याबद्दल तिळमात्रही त्याच्या मनात शंका असती तर अखंड एकवीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक संकटांच्या व कष्टांच्या झंझावाताशी व वादळाशी झुंझताना तो भक्कमपणे टिकू शकला नसता.
त्या व्यक्तीमध्ये झालेल्या क्रांतीची ही तर एक बाजू होती. त्याची दूसरी बाजू याहीपेक्षा अधिक विस्मयजनक आहे.
अरब एक अंधकारमय भूभाग आणि क्रांतीचा सूर्योदय
संबंधित पोस्ट
0 Comments