Home A स्त्री आणि इस्लाम A इस्लाम आणि स्त्री

इस्लाम आणि स्त्री

इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला सर्व मानवीय अधिकार दिले, वागणूक, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले आणि समाजास तिचा सन्मान करण्यास शिकविले. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या व गुलामीच्या विरुध्द इस्लामने आवाज उठविला की ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. इस्लामच्याच प्रभावामुळे तिच्या पूर्वीच्या दास्यत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे साहस आज कुणीही करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘लोकहो, आपल्या पालनकर्त्याच्या कोपचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि त्या दोघांच्यापासून पुष्कळ पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहच्या कोपचे भय बाळगा. ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की, अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’ (४:१)
ही या गोष्टीची घोषणा होती की, एक मानव व दुसऱ्या मानवाच्या दरम्यान जे खोटे भेदभाव जगात निर्माण करण्यात आले आहेत, ते सत्याच्या प्रतिकूल, निराधार व निर्मूळ आहेत. संपूर्ण मानवजात एकाच जीवापासून निर्माण झाली आहे. सर्वांचा उद्गम एकच आहे. जन्मजात न कोणी श्रेष्ठ आहे न हीन, न कोणी उच्च जातीचा आहे आणि न कोणी नीच जातीचा सर्वांना सारखे व समान अधिकार आहेत.
स्त्रीच्या तीन योग्यता (भूमिका)
एका घरात स्त्रीच्या तीन स्पष्ट योग्यता असतात आई, पत्नी व कन्या इस्लामने या तिन्ही भूमिकेंमध्ये तिला अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.
अ) आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा :- इस्लाम ईश्वर आणि प्रेषित यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरानोक्ती आहे,
‘‘आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या माता-पित्यांचा हक्क ओळखण्याची स्वतः ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्या प्रती कृतज्ञा दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ रहा.’’ (३१:१४)
अल्लाहचे आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
प्रेषितांचा आदेश आहे,
‘‘मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो.’’ (हदीस-इब्ने माजा)
हजरत अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे की, एक मनुष्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
‘‘हे अल्लाहच्या प्रेषिता ! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?’’
प्रेषित म्हणाले, ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
प्रेषित म्हणाले, ‘‘तुझी आई !’’
त्याने पुन्हा विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
प्रेषितांनी सांगितले, ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
मग प्रेषित म्हणाले, ‘‘तुझे वडील !’’ (हदीस :अल-अ-द-बुल मुफद्न)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.’’ (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
‘‘आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ (हदीस)
ब) पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा : इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
‘‘अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चितन व मनन करतात.’’ (कुरआन ३० :२१)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
‘‘पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.’’ (कुरआन – ४:३४)
कधी कधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सदवर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.’’ (कुरआन – ४ :१९)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
‘‘जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.’’ (हदीस :अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
‘‘कोणत्याही ईशभक्ताने (मोमिन) कोणत्याही धर्मपरायण (मोमिना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.’’
(हदीस :मुस्लिम)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘श्रध्दावंतांपैकी परिपूर्ण श्रध्दावंत तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.’’ (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
‘‘हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.’ (हदीस :मुस्लिम)
क) कन्येच्या रुपात स्त्रीचा दर्जा :- अज्ञानकाळात (अर्थात इस्लामपूर्व काळात) अरबवासी मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते, परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेषदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलतानादेखील त्यांची मान शरमेने खाली जात होती. इतकेच नव्हे तर काही कठोरहृदयी बाप आपल्या हाताने आपल्या निष्पाप (अल्पवयीन) मुलींना जिवंत दफन करीत होते कुरआनने म्हटले आहे,
‘‘अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.’’ (४२ :४९ – ५०)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुलींच्या पालन-पोषणाची प्रेरणा दिली,
‘‘अल्लाहने एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे कोणतीही कसोटी घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या मुली त्या व्यक्तीकरिता नरकापासून वाचण्याचे साधन असतील.’’ (हदीस :बुखारी)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिनी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर तो स्वर्गात निश्चितच प्रविष्ट होईल.’’ (हदीस :तिर्मिजी)
एका प्रसंगी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘जी व्यक्ती दोन मुलींचे त्यांच्या तारूण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने (एकत्र) येऊ’’ असे म्हणून प्रेषितांनी दोन बोटे जुळवून दाखविली. (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात,
‘‘ज्याला मुलगी असेल त्याने तिला दफन केले नाही अथवा तिच्याशी उपेक्षेने वागला नाही किवा तिच्याऐवजी आपल्या मुलास प्राधान्य दिले नाही, तर अल्लाह त्यास स्वर्गात स्थान देईल.’’ (हदीस)
एकदा अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.’’ (हदीस – मुसनद अहमद)
हजरत सुराका (रजि.) यांना अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले,
‘‘सर्वात मोठे दान कोणते हे मी तुम्हाला सांगू नये काय ?’’
हजरत सुराका (रजि.) यांनी नम्रपणे सांगितले की, ‘‘हे अल्लाहच्या प्रेषिता ! आपण अवश्य सांगावे.’’
प्रेषित म्हणाले, ‘‘आपल्या त्या मुलीवर उपकार कर जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’ (हदीस)
अशा प्रकारे इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकारदेखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपातसुध्दा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे.
जर इस्लामी शिकवणींचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे खालील अधिकार आढळून येतात.
  1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे.
    अरबांच्या काही जमातीतील लोक आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. कुरआनने त्या मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला आणि म्हटले की, जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी ईश्वरासमोर जाब द्यावा लागेल. कुरानोक्ती आहे, ‘‘तो क्षण आठवा, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली ?’’ (कुरआन – ८१ :९)
  2. इस्लामनुसार प्रत्येक मुलास त्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला जाऊ नये या नैतिक व वैधानिक अधिकारांसह तो जन्म घेत असतो. पवित्र कुरआनचा असा आदेश आहे, ‘‘ज्या माता-पित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपान-काळ पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी – आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पध्दतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.’’ (२ :२३३)
  3. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालन-पोषण, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ-सूचना दिली आहे.
  4. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास व संरक्षकास निश्चितच महत्व दिले आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, विवाह त्या मुलींच्या परवानगीनेच होईल. जर महिला विधवा वा घटस्फोटिता असेल तर स्पष्टपणे आपली मान्यता व्यक्त करील आणि कुमारिका असेल तर तिच्या मौनास मूक संम्मती समजली जाईल. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे. ‘‘जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत विवाह तिचा केला जाणार नाही, आणि कुमारिकेची अनुमती घेतल्याशिवाय तिचा विवाह होणार नाही.’’ (हदीस)
  5. इस्लामने ‘महर’ (लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची कबूल केलेली रक्कम) ला महिलेचा अधिकार म्हटले आहे आणि पुरुषास असा आदेश दिला आहे की, ज्या महिलेशी त्याचा विवाह होईल, त्याने कोणत्याही परिस्थितीत ‘महर’ची रक्कम तिला देणे अनिवार्य राहील. ‘महर’विना विवाह वैध नसेल. कुरआनने स्पष्ट शब्दात घोषणा केली आहे की, ‘‘स्त्रियांना ‘महर’ (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा.’’ (कुरआन – ४ :४)
    विवाहप्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दाग-दागिने वा संपत्ती इ. देणे अनिवार्य आहे, ज्यास ‘महर’ म्हटले जाते. ‘महर’ उधारदेखील असू शकतो. परंतु तो निश्चित करणे अनिवार्य असते. ‘महर’ स्त्रीची स्वतःची संपत्ती आहे, तिला त्यावर पूर्ण अधिकार आहे. तिच्या संरक्षकाचा त्यामध्ये कसलाही अधिकार नाही.
  6. इस्लाम स्त्रीचे पालन-पोषण करण्याचा अधिकार मान्य करतो. विवाहापूर्वी मुलींच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी तिच्या पित्यावर असते आणि विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी तिच्या पतीवर येते. जर महिला श्रीमंत असेल तर तिच्याकरिता पती नोकर सुध्दा ठेवील. जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटूंबात राहू इच्छित नसेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते. हा तिचा वैधानिक अधिकार आहे आणि पतीने तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
  7. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग-धंद्याचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तिला व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व कारागिरी, नोकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता व लेखनकार्य-सर्व वैध कार्य करण्याची अनुमती आहे. त्यासाठी ती घराच्या बाहेरदेखील पडू शकते, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कसलाही बिघाड वा बाधा निर्माण होऊ नये आणि तिच्या स्थिरतेत विघ्न निर्माण होऊ नये, याकरिता तो (इस्लाम) तिच्यावर काही बंधने अवश्य लावतो.
  8. इस्लामने धन-संपत्तीत स्त्रीच्या मान्यतेसंबंधीच्या अधिकारास मान्य केले आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास अनुचित व अवैध ठरविले आहे. ज्याप्रमाणे मिळकतीचा हक्क पुरुषाला आहे अगदी तसाच अधिकार स्त्रीलादेखील आहे. कुरआनचा आदेश आहे – ‘‘जे काही पुरुषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे स्त्रियांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.’’ (कुरआन ४ :३४)
    वारसाहक्काबाबत कुरआन म्हणतो,
    ‘‘पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे. एक निश्चित वाटा.’’ (कुरआन – ४ :७)
  9. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मोठी मौल्यवान संपत्ती आहे. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. एखाद्या स्त्रीच्या सतीत्वावर आक्षेप घेणे आणि तिच्यावर व्यभिचार व चरित्रहीनतेचा आरोप करणे इस्लामच्या दृष्टिकोनातून हे सर्व मोठे अपराध व गंभीर गुन्हे आहेत. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी माणसाला नष्ट करणाऱ्या सात गुन्हयांपैकी एकाचा उल्लेख असा केला आहे.
    ‘‘उत्तम चारित्र्यवान, श्रध्दावंत, भोळ्या-भाबड्या स्त्रियांवर मिथ्या आरोप करणे.’’ इस्लामने कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की, जो कोणी एखाद्या निर्दोष स्त्रीवर व्यभिचार व चरित्रहीनतेचा मिथ्या आरोप करील त्याला ऐंशी फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये.
  10. इस्लाम स्त्रीस समिक्षण व आपले मत व्यक्त करण्याचादेखील अधिकार प्रदान करतो. कुरआनने पुरुष व स्त्री दोघांना चांगुलपणाचा हुकूम देण्यापासून आणि कुकृत्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. कुराणोक्ती आहे, ‘‘श्रध्दावंत पुरुष व श्रध्दावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.’’ (कुरआन – ९ :७१)
यामध्ये धर्माचा प्रसार-प्रचाराचे, समाजाच्या विकासाचे कार्य, वैचारिक व प्रशासकीय विद्वान आणि अधिकाऱ्यांचे समिक्षण टीका-टिप्पणी सर्व काही येते. स्त्रीने आपल्या मर्यादेत राहून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे तिचे कर्तव्य आहे.
स्त्रीच्या अधिकारांच्या बाबतीत कुरआन व हदीसच्या आदेशांचे काही संकेत आणि उदाहरणे येथे सादर करण्यात आली आहेत. स्त्रीला इस्लाम व कुरआनने कोणते स्थान दिले आहे याबाबतच्या सखोल माहितीकरिता खालील पुस्तकांचे अध्ययन उपयोगी ठरेल.

१. (स.) याचे पूर्ण रूप म्हणजे ‘सल्लल्लाहु अलैहि व सल्लम’ अर्थात – त्यांच्यावर अल्लाहची दया व कृपा असो. जेव्हा संदेशवाहक, प्रेषित मुहम्मद यांचे नाव घेतले वा लिहिले जाते तेव्हा प्रार्थनेचे हे शब्द (वाढविले) म्हटेल जातात.
२. रजि. म्हणजे – ‘रजियल्लाहु अन्हु’ अर्थात – अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होवो. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कोणा साथीदाराचे नाव घेतले जाते वा लिहिले जाते तेव्हा प्रार्थनेचे हे शब्द म्हटले (वाढविले) जातात.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *