हज’चा अर्थ होतो पवित्र स्थानाला भेट देणे. या उपासनापध्दतीला हज असे म्हणतात, कारण त्यात पवित्र स्थान काबागृहाची यात्रा अभिप्रेत आहे.
महत्त्व: प्रत्येक श्रध्दावंताचे कर्तव्य आहे की त्याने आयुष्यात एकदा हजयात्रा करावी, जर तो प्रौढ असेल आणि त्याची तितकी आर्थिक क्षमता असेल. एखादी प्रौढ आणि आर्थिक सक्षम व्यक्ती काबागृहाची यात्रा (हज) करत नाही तर ती व्यक्ती आज्ञाधारक (मुस्लिम) राहण्याचा दावा करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की या गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत आहे त्याने त्याची हजयात्रा करावी आणि जो कोणी या आदेशाचे पालन करण्यास नकार देईल त्याने समजून असावे की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे.’’ (कुरआन ३: ९७)
वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खालील हदीस (प्रेषितवचन) आहेत,
‘‘जर एखाद्या व्यक्तीला सशक्त कारण नसेल अथवा जालीम राज्यसत्तेमुळे हजयात्रा करणे अशक्य आहे, हेसुध्दा कारण नसेल तर ती व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मृत्यु पावली तरी काही एक फरक पडणार नाही.’’
‘‘आदरणीय उमर (रजि.) यांच्यानुसार, अशी व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मरण पावली (हे शब्द तीनदा उच्चारले गेले) जिला आर्थिक सुबत्ता आहे आणि हजयात्रा करणे सुकर आहे तरी हजयात्रा न करता मृत्यु आला.’’
याविरुध्द ज्याने हजयात्रा गांभीर्यपूर्वक व्यवस्थितरित्या पार पाडली अशा व्यक्तीची वाखाणणी करताना स्पष्ट करण्यात आले आहे की या पवित्र कार्याव्यतिरिक्त अधिक चांगले कृत्य दुसरे असूच शकत नाही.
अशा प्रकारच्या मान्यताप्राप्त हजयात्रेसाठी स्वर्ग हेच एकमेव पारितोषिक आहे.
‘‘जो हजयात्रेला जाऊन तेथे कोणतेही पाप आपल्या हातून करीत नाही आणि विधीपूर्वक सर्व हजकार्य व्यवस्थित पार पाडतो तो नुकत्याच जन्मलेल्या बालकाप्रमाणे निरागस बनून परत येतो.’’ (बुखारी)
अल्लाह आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांनी हजयात्रेला इतके महत्त्व का दिले आहे? हजयात्रेव्यतिरिक्त एखाद्याचा मुस्लिम (आज्ञाधारक) राहण्याचा दावा खोटा कसा ठरतो? हजयात्रेने स्वर्गप्रवेश सुकर कसा बनतो? या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी आपणास हजयात्रा म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहावे लागेल. इस्लाम धर्माच्या आत्म्याशी हजयात्रेचा कसा संबंध आहे, इस्लामी चारित्र्यसंवर्धनकार्यात हजयात्रेला काय महत्त्व आहे? अल्लाहची उपासना करण्यात व्यक्तीला हजयात्रेमुळे काय मदत मिळते? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपणास खालील दोन प्रश्नांची उकल करून घ्यावी लागेल. प्रथम काबागृह म्हणजे काय, जिथे लोक हजयात्रेला जातात? ते कशासाठी बांधले गेले? त्याचा इस्लामशी संबंध काय? आणि दुसरे म्हणजे हजयात्रेत कोणते धर्मविधी पार पाडले जातात आणि त्यांचा हेतु काय? हे सर्व मुद्दे अभ्यासले गेले तर स्पष्ट होईल की हजयात्रेला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व का आहे.
0 Comments