येथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की इस्लामची ही स्पष्ट जीवनपद्धती कुठल्याही आर्थिक कारणांचा अथवा परिस्थितीचा परिणाम नाही. तसेच त्याचे अस्तित्व भिन्न वर्गांच्या स्वार्थांनी बरबटलेल्या संघर्ष व कलहापासून उपजले नाही. ती एक ईश्वरनिर्मित आदर्श व्यवस्था आहे. ती अशा एका युगात मानवाला प्राप्त झाली, जेव्हा त्याच्या जीवनात आर्थिक बाबींना काही विशेष महत्त्व नव्हते. तसेच त्याला सामाजिक न्यायाचे वर्तमान अर्थ ठाऊक नव्हते. म्हणून माणसाच्या सामाजिक व आर्थिक बाबतीतील सुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर इस्लामच्या तुलनेत कम्युनिझम तसेच भांडवलशाही हे दोन्ही फार नंतरच्या काळात निर्माण झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून इस्लामला या दोहोंच्या तुलनेत प्रथमस्थान प्राप्त आहे.
जीवनातील मौलिक गरजा
उदाहरण म्हणून माणसाच्या जीवनातील मौलिक गरजाच घ्या. सामान्यपणे असे म्हटले जाते की कार्ल माक्र्सच पहिला माणूस होता ज्याने अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मौलिक गरजा आहेत असे म्हटले आणि सरकारचे हे अनिवार्य व बंधनकारक कर्तव्य म्हणून दाखविले की त्याने राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या गरजा एकत्र करुन त्यांची पूर्तता करावी. कार्ल माक्र्सच्या या विधानाला मानवी विचारामध्ये फार क्रांतिकारी समजले जाते. पण सत्य हे आहे की कार्ल माक्र्सच्या जन्माच्या १४ शतके आधी इस्लामद्वारा हे जग या क्रांतिपूर्ण विधानाशी चांगल्या तऱ्हेने परिचित होऊन चुकले होते. म्हणून या संदर्भात इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे उल्लेखित केले आहे की,
‘‘ज्या व्यक्ती आमचे (इस्लामी राज्याचे) कर्मचारी म्हणून कार्य करीत आहेत व त्यांना पत्नी नसेल तर त्यांचा विवाह केला जाईल, जर त्यांचे स्वतःचे घर नसेल तर त्यांना राहण्यासाठी घर दिले जाईल, जर चाकर नसतील तर त्यांना चाकर प्राप्त करुन दिले जातील व जर त्यांच्याकडे प्रवासाचे साधन म्हणून एखादे जनावर नसेल तर त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जाईल.’’
त्यांच्या या ऐतिहासिक जाहीरनाम्यात केवळ सर्व मानवी मूळ अधिकारच आहेत असे नाही, ज्यांचे जाहीर निवेदन कार्ल माक्र्सने नंतरच्या काळात केले. अन्य बरेच काही त्यात सामील आहे. पण कम्युनिझमप्रमाणे इस्लाम त्याचे फळ, वर्गकलह, वर्गद्वेश व रक्तमय क्रांती आणि सर्व उच्च जीवनमूल्यांचा इन्कार करुन वसूल करीत नाहीत. ते अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मर्यादित क्षेत्रात कधीही बांधले जाऊ शकत नाही.
चिरकाल टिकणारी जीवनपद्धती
इस्लामी जीवनपद्धतीचे असे काही ठळक गुण आहेत. यावरुन ही गोष्ट चांगल्यारितीने स्पष्ट होते की धर्म म्हणून इस्लामला एका अशा विशाल, व्यापक व तर्कशुद्ध नियमांचे आणि सिद्धान्तांचे नामाभिदान दिले जाऊ शकते की मानवी जीवन आपल्या झगमगाटात व सुखवैभवात असूनसुद्धा त्याच्या स्पष्ट मर्यादा नजरेस पडतात व त्याचा कुठलाही भाग मग तो भावनेच्या जगाशी असो वा विचारांशी, कर्माशी, भक्तीशी, आर्थिक बाबी व सामाजिक सबंधाशी, नैसर्गिक प्रेरणांशी अथवा आध्यात्मिक आंदोलनाशी असो, त्याच्या पकडीपासून सुटत नाहीत. या अनेकविध पैलूंमध्ये समन्वय निर्माण करुन इस्लाम त्याला एक सुंदर, समतोल तसेच वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धतीचे रुप प्रदान करतो. अशा प्रकारची सर्वव्यापी समतोल अथवा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, कोणत्याही काळात आपली उपयुक्तता हरवून, गमावून बसू शकते काय? माणूस खऱ्या अर्थाने याकडे दुर्लक्ष करु शकतो काय? कारण आपल्या उद्देशांच्या अथवा लक्ष्याच्या दृष्टीने हे स्वतःच जीवनपर्याय आहेत किबहुना स्वयंजीवनच आहे. म्हणून जोवर या धरतीवर जीवमात्र आढळेल तोवर ही पद्धतीही अस्तित्वात असेल व टिकून राहील आणि सतत आढळणारे त्याचे अक्षय ठसे कधीही पुसले जाऊ शकत नाहीत.
आजच्या युगाची गरज
आज जी अवस्था आढळते व या वेळी ज्या ज्या समस्या आहेत ते पाहिल्यानंतर कोणताही बुद्धिमान माणूस असे माणने कठीण आहे की आजचा माणूस एखाद्या बौद्धिक आधारावर इस्लामशी विन्मुख होऊ शकतो व त्याने सादर केलेल्या जीवनपद्धतीशी दुर्लक्ष करुन तिची उपेक्षा करु शकतो. आज २१ व्या शतकातही मानवता तशाच प्रकारच्या सर्व दोषांमध्ये बरबटलेली आहे जशी ती मानवाच्या रानटी अवस्थेमध्ये होती. प्रगतीचा, प्रकाशाचा ध्यास ठरलेल्या या युगामध्ये मानवता, वंशद्वेष, वर्णद्वेष याच्या अत्यंत तिरस्करणीय अवस्थेत आहे. उदाहरण पाहिजे असेल तर अमेरिका व दक्षिण आफ्रिका या देशांवरच एक दृष्टी टाका. नैतिक, सदाचार, सुसंस्कार व मानवतेच्या बाबतीत या २१ व्या शतकातील माणसाला, अजून इस्लामपासून फार काही शिकण्यासारखे आहे. इस्लामने मानवतेला सर्व प्रकारच्या वांशिक संकुचित दृष्टिकोनातून मुक्त केले, त्याला आज बराच काळ लोटला आहे. आजसुद्धा इस्लामच जगाला या द्वेष व तिरस्काररुपी दलदलीतून बाहेर काढू शकतो. कारण इस्लाम मानवाच्या समानतेची एक सुंदर प्रतिमाच सादर करीत नाही तर व्यवहारी जगातही तो एक अशी समानता निर्माण करु दाखवून चुकला आहे, ज्यासारखे जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेही उदाहरण आढळत नाही. इस्लामच्या या आदर्शकाळांत कोणत्याही काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर, वर्ण अथवा वंशाच्या आधारावर कसलेही प्रभुत्व नव्हते. इस्लाम जवळ प्रमुखता व श्रेष्ठत्व यांचे एकमात्र साधन म्हणजे मानवाचा चांगुलपणा व त्याचा सदाचार आहे. म्हणूनच इस्लामने गुलामांना गुलामीच्या दैन्यावस्थेपासून मुक्ती प्राप्त करून दिली व त्यांना प्रगती व सुखांचा व्यापक संभवांची सूचनाही देऊन टाकली, येथपर्यंत की गुलामांना राष्ट्राध्यक्षपदावर बसविण्याचे अधिकारही स्वीकारण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘आपल्या अमीराचे (अध्यक्षाचे) म्हणणे ऐकून घ्या व त्यांचे आज्ञापालन करा. मग हा अमीर निग्रो गुलाम जरी असला तरी त्याच्या आज्ञेचे पालन करा जोवर तो तुम्हाला ‘अल्लाह’च्या शरीअतीनुसार नेत आहे.’
नागरी स्वातंत्र्याचा आदर
आणखी एका दृष्टिकोनातूनही इस्लामच्या गरजेकडे आजचे जग अनास्था दाखवू शकत नाही, साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या हाताने आजची मानवता जे कष्ट, क्लेश व दुःख भोगीत आहे ज्या रानटीपणाचे व क्रोर्याचे भक्ष्य बनले आहे त्या पासून वाचण्याचा, सुटकेचा, इस्लामखेरीज दूसरा कुठलाही मार्ग दृष्टीस पडत नाही. इस्लामच मानवतेला साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या शापापासून सुटका करून देऊ शकतो, कारण तो साम्राज्यवाद व साम्राज्यवादी शोषणांचा अत्यंत विरोध करणारा आहे. आपल्या उत्कर्षकालामध्ये मुस्लिमांचे इतर राष्ट्रांशी व्यवहार इतके औदार्यपूर्ण, श्रेष्ठ व सभ्यतापूर्ण होते की आजच्या युरोपाची संकुचित दृष्टीसुद्धा त्याची उंच भरारी पाहू शकते.
या संदर्भात आदरणीय उमर बिन खत्ताब (र) यांनी न्यायदानात केलेल्या एका सुप्रसिद्ध निवाड्याचे उदाहरण सादर केले जाऊ शकते. या प्रकरणात एका इजिप्शियन आदिवासीला विनाकारण मारहाण करण्याच्या व छळ करण्याच्या आरोपावरुन ज्याने इजिप्त जिकले होते, तो प्रसिद्ध विजेता व प्रतिष्ठित गव्हर्नर आदरणीय अमर बिन आस (र) यांच्या चिरंजीवाला फटक्यांची शिक्षा दिली होती, किबहूना त्याच्या बापालाही अशी शिक्षा देण्यास तयार झाले होते. या एका उदाहरणावरुन हे सहज अनुमान केले जाऊ शकते की इस्लामी राज्यात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात नागरी स्वातंत्र्य होते.
आज भांडवलशाही पद्धतीचा जो शाप जगावर पसलरेला आहे, ज्यामुळे सारे जीवन विषारी बनले आहे; त्यापासून सुटकेचा मार्गही इस्लामखेरीज अन्य कुठलाही नाही. व्याज घेणे, नफाखोरी हा भांडवलशाही पद्धतीचा पाया असून इस्लाम या दोहोंचा अत्यंत तीव्र विरोध करतो व त्यांना वर्ज्य घोषित करतो. दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ असा की आजच्या जगात भांडवलशाहीने निर्माण केलेले अनुभव व दोष फक्त इस्लामच दूर करु शकतो.
याचप्रमाणे भौतिकवादी व नास्तिकवादी साम्यवादाचे उच्छेदनही केवळ इस्लामच्या हस्तेच संभवनीय आहे. कारण इस्लाम केवळ पूर्ण सामाजिक न्याय स्थापन करुन त्याला टिकवून धरतो, तेवढेच तो उच्च मानवी तसेच आध्यात्मिक मूल्यांचे रक्षणही करतो. कारण तो साम्यवादाप्रमाणे कसल्याही प्रकारच्या संकुचित दृष्टीस बळी बनलेला नाही व त्याचे जग ज्ञानेंद्रियांनी जाणवणाऱ्या वस्तूपर्यंतच मर्यादित नाही. आपल्यात हे सर्व गुण असूनसुद्धा, इस्लाम आपली कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादून त्याला ती मानण्यास भाग पाडीत नाही. कारण धर्माच्या व श्रद्धेच्या बाबतीत तो आरंभीपासूनच कसल्याही जबरदस्तीशी सहमत नाही व मानत नाही. याबाबतीत त्याचा नियम असा आहे की –
‘‘धर्माच्या बाबतीत कसलीही जुलूम-जबरदस्ती नाही. सत्य गोष्ट चुकीच्या विचारापासून वेगळी काढून ठेवली गेली आहे.’’ (२:२५६)
या वेळी जगावर तिसऱ्या विश्वयुद्धाचे अंधकारपूर्ण ढग पसरलेले आहेत, ते दूर होण्यासाठीही इस्लामरुपी सूर्योदय होण्याखेरीज अन्य कुठलाही मार्ग दिसत नाही. पण हे त्याचवेळी शक्य आहे जेव्हा मानवजात इस्लामला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवून खऱ्या सुखशांतीच्या या मार्गाचा अंगीकार करण्यास तयार होईल.
तात्पर्य असे की इस्लामचा काळ संपलेला नसून तो आता सुरु झाला आहे. हा कुठलाही मृत दृष्टिकोन नसून ही क्रांतीपूर्ण जीवनपद्धती आहे. याचा भविष्यकाल तेवढाच उज्वल आहे जितका त्याचा भूतकाल वैभवशाली होता व युरोप त्या वेळी इतिहासाच्या काळोखात कालखंडात धडपडत, चाचपडत होता.
ईश्वरनिर्मित जीवनपद्धती
संबंधित पोस्ट
0 Comments