स्पष्टीकरण
या हदीसद्वारा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ही हकीकत स्पष्ट केली आहे की नमाज मनुष्याचे पाप क्षमा होण्याचे माध्यम बनते आणि ही गोष्ट एका अनुभूती होणाऱ्या उदाहरणाद्वारे समजावून सांगितली आहे. नमाजमुळे मनुष्याच्या मनात कृतज्ञतेची ती स्थिती निर्माण होते जिच्या परिणामस्वरूप तो अल्लाहच्या आज्ञापालनाच्या मार्गावर चालू लागतो आणि अवज्ञांपासून त्याचे मन दूर जाऊ लागते, इतकेच काय जर त्याच्या हातून एखादी चूक घडते तेव्हा ती जाणूनबुजून घडत नाही आणि लगेच तो आपल्या पालनकत्र्यासमोर लोटांगण घेतो, रडून रडून क्षमा मागतो. माननीय अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, मग तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्यांना या गुन्ह्याबाबत सांगितले तेव्हा पैगंबरांनी या आयतीचे पठण केले, ‘‘व अ़िकमिस्सलाता तऱफन्नहारि व जुल़फम्मिनल्लैलि, इन्नल हसनाति यु़जहिबनस सय्यिआति.’’ यावर तो मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! ही आयत माझ्यासाठी विशिष्ट आहे काय?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘नाही, माझ्या जनसमुदायतील सर्व लोकांसाठी आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
ही हदीस वरच्या हदीसचे आणखीन अधिक स्पष्टीकरण करते. यात सांगितले गेले आहे की नमाज पापांना नष्ट करते. या हदीसमध्ये ज्या मनुष्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो एक ईमानधारक मनुष्य आहे, तो जाणूनबुजून कुकृत्य करीत नव्हता परंतु मनुष्य होता, वाटेत भावनेच्या भरात त्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, त्याबाबत त्याला इतके अस्वस्थ वाटले की तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी शिक्षापात्र एक कर्म केले आहे, मला शिक्षा देण्यात यावी.’’ तेव्हा पैगंबरांनी कुरआनमधील ‘सूरह हूद’च्या शेवटच्या चरणातील ही आयत त्याला ऐकविली जिचा वर उल्लेख करण्यात आला आहे. या आयतमध्ये अल्लाहने ईमानधारकांना दिवसा व रात्रीच्या वेळी नमाज अदा करण्याचा आदेश दिला आहे आणि मग सांगितले आहे, ‘‘इन्नल हसनाति यु़जहिबनस सय्यिआति.’’ अर्थात पुण्य पापांना नष्ट करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त बनतात. यावर त्या मनुष्याचे समाधान झाले आणि त्याची अस्वस्थता संपुष्टात आली. यावरून लक्षात येते की पैगंबरांनी आपल्या सहकाऱ्यांना किती उच्च दर्जाची शिकवण आणि प्रशिक्षण दिले होते. माननीय उबादह बिन सामित यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘या पाच नमाजी आहेत ज्यांना अल्लाहने आपल्या दासांवर अनिवार्य केल्या आहेत. ज्या मनुष्याने उत्तम पद्धतीने वुजू केली आणि त्या नमाजीं निश्चित वेळी अदा केल्या आणि रुकूअ व सजदे योग्य प्रकारे केले आणि त्याचे मन अल्लाहसमोर नमाजींमध्ये नतमस्तक राहिले तेव्हा अल्लाहने त्याच्या मोक्षाची जबाबदारी घेतली आणि ज्याने असे केले नाही तर त्याच्यासाठी अल्लाहचे हे वचन नाही. जर इच्छिले तर त्याला क्षमा करील आणि इच्छिले तर त्याला शिक्षा देईल.’’
(हदीस : अबू दाऊद)
0 Comments