Home A परीचय A इस्लामी क्रांतीचे स्वरुप

इस्लामी क्रांतीचे स्वरुप

१४ एप्रिल १९७६ साली ‘इस्लामिक कौंसिल ऑफ युरोप’ तर्फे लंडनमध्ये एक आंतर्राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात जगभरातून धार्मिक विद्वान व विचारवंतांनी इस्लामच्या विविध विषयांवर निबंध सादर केलेत. मला सुद्धा या अधिवेशनात निमंत्रित केले गेले होते. परंतु आजारपणामुळे मी या अधिवेशनात भाग घेऊ शकलो नाही. तरी पण यासाठी एक निबंध लिहून पाठविला होता. जो या अधिवेशनात सादर करण्यात आला.(अबुल आला)
सुरवातीला ही बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे की जगामध्ये व इतिहासामध्ये प्रथमतः प्रेषित मुहम्मद(स) यांनी सादर केलेला धर्म म्हणजे इस्लाम – ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. तसेच प्रेषित मुहम्मद(स) यांना या कारणास्तव इस्लामचे संस्थापक म्हणून संबोधले जाणे सुद्धा चुकीचे आहे. दिव्य कुरआन या वस्तुस्थितीचे पूर्णपणे स्पष्टीकरण असे करतो की ईश्वराकडून मानव जातीच्या मार्गदर्शनाकरीता व कल्याणाकरीता नेहमी एकच धर्म पाठविला गेला आणि तो धर्म म्हणजेच ‘इस्लाम’ इस्लाम म्हणजे एकमेव ईश्वरासमोर आत्मसमर्पण करणे. जगाच्या विविध भागात आणि विविध समाजात जे जे प्रेषित ईश्वरातर्फे पाठविले गेले होते. ते त्यांच्या आणलेल्या धर्माचे अजिबात संस्थापक नव्हते. उदाहरणार्थ प्रेषित नूह ने आणलेला धर्म म्हणजे ‘नूह वाद’, प्रेषित ईब्राहीमचा धर्म म्हणजे इब्राहीम वाद, प्रेषित मूसाचा धर्म म्हणजे मूसावाद अथवा इस्त्राईल धर्म किवा प्रेषित येशूने आणलेला धर्म म्हणजे येशूवाद वगेरे असा प्रकार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की सुरुवातीपासून सादर करीत आलेल्या प्रेषितांच्या धर्मालाच त्यांच्यानंतर येणार्या प्रेषितांनी सादर केले.
या प्रेषितांपैकी प्रेषित मुहम्मद(स) यांचे मुळात वैशिष्टये हे आहेत की,

  1. ते ईश्वराचे अंतिम प्रेषित आहेत.
  2. त्यांच्या मार्फत ईश्वराने भुतकाळातील सर्व प्रेषितांमार्फत पाठविलेल्या मूळ धर्माचे पुनरुज्जीवन केले.
  3. मागच्या काळातील धर्मांत विविध भाषिकांनी विविध प्रकारे स्वयंविचारांची जी भेसळ करुन जे कृत्रिम धर्म निर्माण केले होते, एकमेव ईश्वराने त्या कृत्रिम धर्माचे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या मार्फत शुद्धीकरण करुन शुद्ध व सुरक्षित इस्लामची शिकवण समस्त मानवजातीपर्यंत पोहोचविली.
  4. प्रेषित मुहम्मद(स) नंतर ईश्वराला कोणताच प्रेषित पाठवायचा नव्हता. करीता त्यांना जी अंतिम शिकवण दिली गेली तीस त्याने मूळ भाषेत शब्दन्शब्द सुरक्षित केले की जेणेकरुन मानवाला कोणत्याही काळात त्या शिकवणीपासून मार्गदर्शन प्राप्त करता यावे. ही एक संदेहमुक्त सत्यता आहे की अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांनी आणलेले दिव्य कुरआन कोणत्याही परिवर्तनाशिवाय आपल्या पूर्वीच्या मूळ स्थितीत आजपर्यंत जशास तसे सुरक्षित आहे. त्याच्या अवतरण काळाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेषित मुहम्मद(स) त्याला लिहून ठेवित असे. नंतर प्रथम खलिफा(प्रतिनिधी) यांनी त्याला ग्रंथाचे स्वरुप देऊन सुरक्षित केले व नंतर तिसर्या खलिफांनी त्याच्या प्रती इस्लामी जगताच्या संपूर्ण केंद्रात पाठविल्यात. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक देशातील, प्रत्येक शतकातील पत्रकीय व मुद्रनीय कुरआन जमा करुन त्यांची तुलना करुन पाहिल्यास त्यामध्ये कींचितही फरक आढळणार नाही. याशिवाय प्रत्येक नमाज(दिवसातील पाच वेळेची निश्चित केलेली प्रार्थना) मध्ये कुरआन पठणाचे आदेश प्रेषित मुहम्मद(स) यांच्या प्रेषित्वाच्या पहिल्याच दिवसापासून दिले गेले होते. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शेकडो साहबांनी(तत्कालीन अनुयायांनी) संपूर्ण कुरआन व सर्वच साहेबांनी दिव्य कुरआनाचा काही भाग अंतिम प्रेषित मुहम्मद(स) च्या जीवनातच मुखपाठ केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात गेल्या चौदाशे वर्षापासून आजपर्यंत दिव्य कुरआनाचा शब्दन शब्द मुखपाठ करणे आणि दरवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात तरावीहच्या नमाज मध्ये(अर्थात रमजान महिन्याच्या रात्रीच्या प्रार्थनेत) तोंडी पठनाचं परंपरा संपूर्ण इस्लामी जगतात चालू आहे. तसेच प्रत्येक काळात दिव्य कुरआनाचे लाखोंच्या संख्येत मुख पाठक उपलब्ध असतात. जगातील इतर कोणतेही धार्मिक ग्रंथ अशारितीने लिखित स्वरुपात अस्तित्वात नाही. व अशा प्रकारे मुखपाठकांमध्ये सुरक्षित नाही की त्याच्या वास्तव व मूळ स्वरुपात शंकेची कीमान शक्यताही नसावी. ५) अंतीम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवन प्रणालीस त्यांच्या साहबांनी(तत्कालीन अनुयायांनी) व नंतरच्या इतिहासकारांनी अशा अतुलनीय पद्धतीने लिखीत स्वरुपात सुरक्षित केले की याहून जास्त सुरक्षित पद्धतीने कधीच कोणत्याही भुतकालीन प्रेषितांचे कथन व कर्म सुरक्षित केलेले नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही एखाद्या ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्तीचे कथन व जीवनी सुरक्षित केलेली नाही. थोडक्यात ती पद्धत अशी की जर एखाद्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद(स) शी संबंधीत एखादी बाब कथन केली असेल त्या व्यक्तीसाठी ही अट बंधनकारक असायची की त्याने कथीत केलेली बाब कोणत्या कथनकाराद्वारे त्याच्या पर्यंत पोहोचली. तसेच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समक्ष असलेल्या व्यक्तींपासून ही बाब इथपर्यंत पोहोचली अथवा नाही व कीती आणि कोणत्या कथानकाद्वारे ही बाब पोहोचते. या सर्व गोष्टींचे समाधानकारक स्पष्टीकरण आवश्यक आहे. मग ज्या ज्या कथनकाराच्या माध्यमाने ही शाब्दिक व कर्मिक कथानके नंतरच्या लोकांपर्यंत पोहोचलीत त्यांच्या संपूर्ण परिस्थितीचे खोल परिक्षण केले गेले. की जेणेकरुन त्यांनी केलेल्या कथानकाची सत्यता व विश्वसनीयता पडताळणे शक्य व्हावे. अशा प्रकारे अगदी बारकाईने व काटेकोरपणे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवन प्रणालीचे व कथनांचे संकलन केले गेले व या संकलित कथनांच्या कथनकारांचा क्रम सुद्धा उल्लेखित केला गेला. तसेच कथनकारांच्या समस्त परिस्थितीवर सुद्धा ग्रंथ लिहीले गेले की ज्यांच्या मदतीने आजही आपण अंतिम प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या जीवन प्रणालीचा संशोधनात्मक अभ्यास करु शकतो. तसेच त्यांच्या कथन व कर्मातून आपल्याला मिळणार्या शिकवणीचा पण संशोधनात्मक अभ्यास करु शकतो.
  5. अशा प्रकारे दिव्य कुरआन व त्याची शिकवण देणारे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांची प्रमाणित जीवन-प्रणाली या दोन्ही बाबी हे माहित करण्याचे विश्वसनीय साधन बनले आहे की, एकमेव ईश्वराचा धर्म मुळात काय व कसा आहे? तो कशा प्रकारचे मार्गदर्शन करतो आणि आपल्याकडून त्याच्या काय अपेक्षा, इच्छा वा मागण्या आहेत.

जर आपण अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पूर्वीच्या काळातील प्रेषितांच्या प्रेषित्वावर आणि दिव्य कुरआनात उल्लेख नसलेल्या प्रेषितांच्या प्रेषित्वावर अनुकरण करू शकत नाही. तरीपण जीवन जगण्याचे मार्गदर्शन आपण केवळ मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडूनच प्राप्त करु शकतो त्यांनी आणलेली ईश्वरीय शिकवण ही ईश्वरातर्फे आलेले अत्याधुनिक मार्गदर्शन आहे. त्यांच्या माध्यमाने जी ईश्वर वाणी आपल्या पर्यंत पोहोचली आहे ती अगदी शुद्ध ईश्वरवाणी आहे व यामध्ये कोणत्याही मानववाणीची किचितही भेसळ झालेली नाही. ती तिच्या मूळ भाषेत नेहमी साठी त्रिकालीय सुरक्षित आहे. तिची भाषा एक जिवंत भाषा आहे व आजसुद्धा कोटयावधी लोकांमध्ये ती बोलली, लिहिली व समजली जाते. त्या भाषेचे व्याकरण, शब्दकोष, वाक्यप्रचार, उच्चार आणि शब्दरचनेत दिव्य कुरआनाच्या अवतरणापासून आजपर्यंत किचितही बदल झालेला नाही. आत्ताच मी वर्णन केल्याप्रमाणे की, अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनशैली, नैतिकता, भूमिका, कथन आणि कर्म या बाबतीत पूर्ण ऐतिहासिक रेकॉर्ड कमालीचा सुरक्षित व कमालीच्या बारकाव्या सहीत सुरक्षित आहे. मुळात ही बाब इतर दुसर्या प्रेषितांना लागू होत नसल्यामुळे त्यांच्या प्रेषित्वावर आपण केवळ श्रद्धा ठेवू शकतो परंतु त्यांचे अनुकरण करु शकत नाही.
इस्लामी श्रद्धेनुसार मुहम्मद(स) चे प्रेषित्व संपूर्ण विश्वाकरीता आणि सर्वकालीन आहे. कारण की, दिव्य कुरआनात याचे स्पष्टीकरण आहे. मुहम्मद(स) हे अंतिम प्रेषित असण्याची तार्कीक मागणी आहे. कारण की जगामध्ये एका प्रेषिताच्या अंतिम प्रेषित होण्यामुळे आपोआप हे अनिवार्य होते की तो प्रेषित समस्त मानवासाठी व आपल्या नंतरच्या प्रत्येक काळासाठी मार्गदर्शक आहे. त्याच्या माध्यमाने जीवनाचे मार्गदर्शन परिपूर्ण स्वरुपात दिलेले आहे. जे की सत्य मार्गावर चालण्याकरिता आवश्यक आहे. आणि ही बाब सुद्धा त्याच्या अंतिम प्रेषित असण्याचे तार्कीक फलीत आहे. कारण की परिपूर्ण मार्गदर्शनाशिवाय जे प्रेषित पाठविले गेले असतील त्यापैकी कोणीच अंतिम प्रेषित असू शकत नाही. उलट एका प्रेषिताची गरज शेष राहतेच. तसेच ही पण एक वस्तुस्थिती आहे की मुहम्मद(स) यांच्यानंतर गेल्या चौदाशे वर्षात कोणत्याही व्यक्तीने हा दावा केला नाही की तो ईश्वरातर्फे पाठविलेला प्रेषित आहे. तसेच कोणत्या ही व्यक्तीच्या जीवनशैलीत, कार्यात वा कथनात प्रेषिताच्या कीमान दर्जाची तुलनात्मक साम्यता सुद्धा आढळून आलेली नाही. तसेच कोणीही ईश्वरीय साक्षात्कारानुसार एखादा ग्रंथ सादर करण्याचा दावा केला नाही की ज्या ग्रंथामध्ये नावापुरतेच का असेना ईश्वरीय कथानकांशी साम्य असलेली शिकवण असेल. किवा ईश्वरीय कायदा प्रदान करणारा संबोधित करता येईल.
परिसंवादाच्या या अध्यायावर हे माहित करून घेणे आवश्यक आहे की ईश्वराकडून मानवाला कोणत्या प्रकारच्या विशेष ज्ञानाची गरज आहे जे केवळ प्रेषिताच्याच माध्यमाने दिले गेले आहे. जगामध्ये एका प्रकारच्या त्या गोष्टी आहेत की ज्याचे ज्ञानार्जन आपण पंचेद्रियांद्वारे अथवा आपण तयार केलेल्या कौशल्यपूर्ण साधन सामग्री द्वारे करता येते. ह्या माध्यमाने हस्तगत केलेली माहिती प्रयोग व विचारशक्ती आणि पुराव्या मार्फत संपादन करून नवीन नवीन निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. अशा स्वरुपाच्या बाबींचे ज्ञान ईश्वराकडून प्रेषितामार्फत घेण्याची गरज नाही. हे आपले स्वतःचे संशोधन, ज्ञानार्जनाची धावपळ, विचारशीलता व शोधाचे एक वर्तुळ आहे. आणि ते सुद्धा आपल्या निर्मात्या ईश्वराने साथ दिली तर इतिहास काळात नकळत उल्लेखासहित ईश्वराच्या निर्मित जगातून आपला परिचय देत आला आहे. ज्ञान आणि माहितीचे मार्ग आपल्या साठी खुले करीत आला आहे. व कधी कधी साक्षात्काराच्या स्वरुपात एखाद्या मानवाला एखाद्या बाबींचे मार्गदर्शन करत आला ज्यामुळे तो एखादे नवीन संशोधन अथवा नवीन प्राकृतिक कायदा शोधण्यास पात्र झाला. शेवटी हे सर्व अपूर्णच आहे. शेवटी ही मानवीय बुद्धीची मर्यादा ज्या करीता ईश्वरातर्फे प्रेषित अथवा ईश्वरीय ग्रंथ येण्याची गरज नाही. या मर्यादावर्तुळात ज्या माहिती पाहिजेत त्या माहिती मिळविण्याची साधनसामग्री ईश्वराने मानवाला प्रदान केली आहे.
दुसर्या प्रकारच्या अशा बाबी आहेत ज्या पंचेद्वियांच्या व वैज्ञानिक साधनांच्या सीमापार आहेत ज्यांचे मोजमाप आपण करू शकत नाही. तसेच आपल्या ज्ञानार्जनाच्या वैज्ञानिक साधनांद्वारे सुद्धा या बाबींसंबंधी माहिती मिळवू शकत नाही. की ज्याला ‘‘ज्ञान’’ म्हणता येईल. विचारवंत व वैज्ञानिक सुद्धा केवळ अनुमान व अंदाजापर्यंत मत व्यक्त करू शकतील. परंतु याला ‘‘ज्ञान’’ अजिबात म्हणता येणार नाही. हे अंतिम वास्तव आहे की ज्यांच्या बाबतीत पुराव्या सहीत कल्पनांना ते लोक सुद्धा विश्वसनीय म्हणू शकत नाहीत. ज्यांनी जे जे सिद्धांत मांडले आहेत आणि जर त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव असेल तर ते स्वतः त्यावर श्रद्धापूर्ण विश्वास ठेवू शकणार नाहीत तसेच इतरांना पण त्यावर पूर्णपणे श्रद्धापूर्वक विश्वास ठेवण्याचा प्रचार करु शकणार नाहीत.
अर्थात हेच ते मर्यादा वर्तुळ आहे ज्यात मानव वास्तवाला जाणून घेण्याकरीता विश्व निर्मात्या ईश्वराने प्रदान केलेल्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि ईश्वराने कधीच हे ज्ञान अशाप्रकारे प्रदान केलेले नाही की कोणी एखाद्याने ग्रंथ छापून एकेकाच्या हातात दिले असेल व त्याला सांगितले असेल की या ग्रंथाचा अभ्यास करून स्वतःच जाणून घ्या की विश्वाची व तुझी स्वतःची वास्तविकता काय आहे. तसेच या वास्तवानुसार तुझी भुमिका अथवा जीवन शैली कशी असेल. म्हणून या ज्ञानविशेषाला मानवापर्यंत पोहोचविण्या करीता ईश्वराने नेहमीच प्रेषितांना माध्यम बनविले आहे. आणि त्यांना या कार्यावरच नियुक्त केले की हे ज्ञानविशेष त्यांनी मानवा पर्यंत पोहोचवावे.
प्रेषितांची जवाबदारी कार्य व कर्तव्य केवळ एवढ्या पुरतेच मर्यादित नाही की त्यांनी केवळमात्र वास्तवाचे व सत्याचे ज्ञान समस्त जणांना द्यावे. या व्यतिरिक्त हे सुध्दा निदर्शणास आणावे की या ज्ञानविशेषानुसार ईश्वर, मानव आणि मानवा-मानवा दरम्यान कोणते वास्तविक संबंध असावेत. हे ज्ञानविशेष कोणत्या प्रकारच्या श्रद्धा, भक्तीप्रथा, नैतिकता व तसेच संस्कृती नियमांची मागणी करते. त्याच प्रमाणे या ज्ञानविषेशानुसार सामाकिडता आर्थिकता, वित्त व्यवहार राजनितीक, न्यायालय, युद्ध तह, अंतर्राष्ट्रीय संबंध अर्थात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्व बाबी कोणत्या नियमानुसार असाव्यात. प्रेषित केवळ एकच भक्ती व प्रथा घेऊन येत नाही ज्याना प्रचलित भाषेत धर्म संबोधले जाते. या उलट प्रेषित एक परिपूर्ण जीवन व्यवस्था घेऊन येतो. ज्याचे नाव इस्लामी अर्थाने ‘‘दीन’’(जीवन मार्ग) असे आहे.
प्रेषिताची चळवळ ही केवळ ‘दीन’ अर्थात जीवन मार्गाचे ज्ञानविशेष लोकांपर्यंत पोहोचविण्या पर्यंतच मर्यादित नसून प्रेषिताने सादर केलेल्या ‘दीन’(जीवनमार्ग) स्वीकृत केलेल्या ईश्वराच्या दासांना या सत्य मार्गाची शिकवण देणे, त्यांची श्रद्धा व ईश्वरावरील वास्तविक विश्वास, नैतिकता, भक्तींच्या प्रथा, ईश्वरीय वैधानिक आदेश, तसेच एकूण जीवन व्यवस्था वगैरे ची शिकवण देणे, आणि या संपूर्ण शिकवणी नुसार स्वतःला एक आदर्श मुस्लिम बनून दाखविणे, की जेणे करून मानवाने प्रेषितांच्या जीवन शैलीचे अनुकरण करावे. व मानवांना वैयक्तिक आणि सामुहिक प्रशिक्षण देऊन एका खर्या खुर्या इस्लामी संस्कृती व सभ्यतेकरीता वास्तविकरित्या तयार करावे. त्याच प्रमाणे त्यांना शिस्त बद्ध संघटित करून एका अशा स्वच्छ समाजाची निर्मिती करावी की या संघटित समाजा मार्फत ईश्वरीय धर्म(अर्थात दीन) कार्यीत्मकरित्या प्रस्थापित करण्याचा जीवतोड प्रयत्न व्हावा आणि शेवटी ईश्वरीय सुत्रांस विजय प्राप्त होऊन इतर कृत्रीम व अवास्तव सुत्र नष्ट व्हावे. काही प्रेषित या चळवळीस यशस्वीतेच्या अंतिम टप्प्या पर्यंत पोहोचविण्यात अयशस्वी झाले. व बरेचसे प्रेषित काही कारणास्तव अथवा द्वेष व मत्सर बाळगणार्या लोकांच्या अहंकारी विरोधामुळे तसेच विरुद्ध व खडतर परिस्थिती मुळे या चळवळीला अयशस्वीचे स्वरूप देण्यात असमर्थ ठरले. ही बाब वेगळी परंतु हे मात्र निश्चित त्रिकाल सत्य आहे की सर्वच प्रेषितांची चळवळ मात्र हीच होती. मात्र प्रेषित मुहम्मद(स) यांचे हे वैशिष्टय इतिहासात अगदी स्पष्ट आहे की त्यांनी ईश्वरीय शासन भूतलावर नेमके तसेच स्थापन करून दाखविले जसे आकाशात ईश्वराचे शासन प्रस्थापित आहे.
दिव्य कुरआनचे सुरूवातीपासुन ते शेवटपर्यंत अध्ययन केल्यास आणि प्रेषित मुहम्मद(स) यांच्या भाषणांच्या व संवादाच्या संपूर्ण रेकॉर्ड चे अध्ययन केल्यास कुठेही आपल्या निदर्शनास येणार नाही की या ईश्वरीय ग्रंथाने, व त्याला सादर करणार्या प्रेषिताने एखाद्या विशेष राष्ट्राला अथवा विशेष समाजाला किवा विशिष्ट वंशीय व वर्णिय अथवा विशिष्ट जमातीलाच तसेच विशिष्ट भाषा बोलणार्यांनाच संबोधित केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने(म्हणजे ईश्वराने) ‘‘या बनी आदम’’ म्हणजे ‘‘हे आदमची संतती’’(अर्थात समस्त मानवजाती) किवा ‘‘या अय्युन्नास’’ म्हणजे ‘‘हे मानवांनो’’ अशा संबोधांनी समस्त मानव जातीलाच ‘‘इस्लाम’’ चा स्वीकार करण्याची हाक दिली. किवा ज्यांनी ईश्वरासमोर आत्मसमर्पण केले.(अर्थात इस्लामचा स्वीकार केला) त्यांना सत्मार्गाचे आदेश आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘‘या अय्युहल लजीना आमनू’’ म्हणजे ‘‘हे लोकहो, ज्यांनी ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवला.’’ अशा संबोधनांनी संबोधित केले. या मुळे ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते की, ‘इस्लामची’ ही चळवळ वर उल्लेखल्या प्रमाणे कोण्या विशिष्ट राष्ट्र समाज, वंश, वर्ण व भाषा बोलणार्या पर्यंतच मर्यादित नसून ती विश्वव्यापी आहे. आणि ज्याने या इस्लामी चळवळीस स्वीकारून इस्लामचा स्वीकार केला तो समाज अधिकारासहीत समान दर्जाचा मोमिन असणार. दिव्य कुरआनात ईश्वराने फर्मावले आहे की ‘‘ज्या मानवांनी ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून इस्लामचा स्वीकार केला. ते सर्व आपसात बंधू आहेत. प्रेषित मुहम्मद(स) यांनी फर्माविले की ज्या लोकांनी इस्लामचा अंगीकार केला व मुस्लिमाप्रमाणे कार्य प्रणाली अंगीकारली त्यांचे अधिकार व कर्तव्य व आमचे अधिकार व कर्तव्य अगदी समान आहेत. याहुन अधिक स्पष्टपणे प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की ‘‘लक्षपूर्वक ऐका की आपणा सर्वांचा पालनकर्ता एकच आहे आणि आपणा सर्वांचा पिता(अर्थात आदम) सुद्धा एकच आहे. कोणत्याही अरब वंशजाला अरबेतर वंशजावर श्रेष्ठत्व प्राप्त नाही. कोणत्याही गैर अरबी वंशजाला अरबवंशजावर श्रेष्ठत्व प्राप्त नाही. कोणी गौर वर्णीय कृष्ण वर्णीया पेक्षा श्रेष्ठ नाही व कोणताही कृष्ण वर्णीय गोर्या वर्णीयापेक्षा श्रेष्ठ नाही. श्रेष्ठत्व हे केवळ सत्मार्गावर चालणार्यांना प्राप्त आहे. तुमच्या पैकी सर्वश्रेष्ठ ती व्यक्ती आहे जी सर्वात जास्त सन्मार्गी आहे.
इस्लाम चा पाया ज्या वैचारिक श्रद्धांवर आधारित आहे त्यात सर्वात जास्त व सर्वात प्रथम महत्वाची श्रद्धा अगर विश्वास म्हणजे एकट्या ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवणे होय. आणि ते सुद्धा एवढ्यावरच नाही की ईश्वराचे अस्तित्व आहे व एवढ्यावरच नाही की तो एकच आहे. तर या गोष्टीवर सुद्धा अपार श्रद्धापूर्वक विश्वास आवश्यक आहे की ईश्वर हा एकटाच या समस्त विश्वाचा अथवा ब्रह्मांडाचा निर्माता, मालक, शासक, व्यवस्था लागू करणारा आहे. केवळ आणि केवळ त्याच्या एकट्याच्याच इच्छेमुळे हे ब्रह्मांड उभे आहे व अस्तित्वात आहे. तसेच कार्यरत आहे. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक वस्तूला लागणार्या इंधन आणि उर्जा केवळ तो एकटाच पुरवितो. एका अती उच्च व असामान्य शासकाचे संपूर्ण गुणधर्म केवळ त्या एकमेव ईश्वरातच आढळतात. आणि इतर कोणीही त्या मध्ये कणभर सुद्धा सामिल नाही. ईश्वरीय गुणधर्म केवळ त्या एकट्या ईश्वरातच आहेत. आणि या गुणधर्मापैकी एकही गुणधर्म त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणातच नाही. समस्त ब्रह्मांडाला व त्यातील एकन एक प्रत्येक बाबीवर त्याची एकाच वेळी नजर आहे व त्याने त्याच्या दृष्टीत सर्वांना ठेवलेले आहे. तसेच प्रत्येक बाबी व घटनांचे त्याला प्रत्यक्षपणे ज्ञान आहे आणि हे ज्ञान सुद्धा त्रीकालीय(भूत, वर्तमान व भविष्य) आहे. हे सर्व समावेशक अपार ज्ञान त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच नाही. त्याचे असामान्य व अबाधित अस्तित्व नेहमी पासून आहे व नेहमी पर्यंत राहणार, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व नष्टप्राय आहेत व स्वतः आपणहून जीवंत आणि बाकी राहणारा तो एकटाच आहे. तो कुणाची संततीही नाही व त्याने कोणालाही त्याच्या उदरातून जन्म दिलेला नाही. त्याच्या अस्तित्वाशिवाय जगामध्ये जे काही आहे ते त्याचीच निर्मिती आहे. व जगामध्ये कुणाचीही एवढी लायकी व पात्रता नाही की कोणत्याच अर्थाने विश्वाचा पालनकर्त्या चा सह वंश(सहजातीय) किवा त्याची संतती वा पुत्र किवा पुत्री म्हटली जावी. केवळ मात्र तोच मानवाच्या दास्यत्वास पात्र आहे. इतर कोणालाच त्याच्या या पात्रतेत सामिल करणे सर्वात मोठे पाप व दगाबाजी आहे. तो एकटा मानवांच्या प्रार्थना ऐकूण सर्वांच्या मनोकामनांची पूर्तता करण्याचे वा न करण्याचे अधिकार सुरक्षित ठेवतो. त्याच्या समोर आपल्या गरजपुत्रतेसाठी प्रार्थना न करणे म्हणजे विनाकारण अहंकार बाळगणे होय. त्याच्या व्यतिरिक्त इतरासमोर कामनापुर्तींची प्रार्थना करणे म्हणजे घोर अज्ञान व मार्गभ्रष्टता आहे. तसेच ईश्वराबरोबर दुसर्यांशीही प्रार्थना करणे सुद्धा ईश्वरत्वामध्ये इतीश्वराला सामिल करण्याचे महापाप करणे आहे.
इस्लाम धर्माच्या अनुसार ईश्वरीय शासन हे केवळ चमत्कारिक नसून राकडीय आणि वैधानिक सुद्धा आहे. तसेच या शासनात एकमेव ईश्वराशिवाय कोणाचाही सहभाग नाही. त्याच्या निर्मित भूतलावर व त्याच्या निर्मित दासांवर त्याच्या शिवाय कोणालाच आदेश देण्याचा अधिकार नाही. मग तो कोणी सम्राट असो, शाही परिवार असो किवा अधिकारी वा शासकीय वर्ग असो अथवा अशी लोकशाही व्यवस्था असो जी लोकशासनाची समर्थक आहे. त्याच प्रमाणे जो स्वयंभूत शासक असतो तो पण बंडखोर असतो. आणि ईश्वराच्या दास्यत्वास सोडून इतरांचे दास्यत्व करतो तो पण बंडखोर आहे. तसेच ती व्यक्ती अथवा संस्था जी राकडीय आणि वैधानिक शासन आपल्या करीता दास्यत्वास पात्र समजून ईश्वरीय अधिकाराच्या मर्यादांना व्यक्तीगत कायदा किवा धार्मिक आदेशापर्यंत मर्यादित समजते, ती सुद्धा बंडखोर आहे. एकूण वास्तविकरित्या त्याच्या भूतलावर निर्माण केलेल्या संपूर्ण मानवांसाठी ‘‘शरियत’’(ईश्वरीय कायदा) प्रदान करणारा त्याच्या शिवाय कोणीच नाही. व असूही शकत नाही. व कोणालाही त्याच्या सर्वोच्च अधिकाराला चेतावणी देण्याचा किवा आव्हान करण्याचा अधिकार नाही.
इस्लामने दिलेल्या ईश्वराच्या कल्पनेनुसार काही बाबी आपोआप स्पष्ट होतात. त्या म्हणजे

  1. फक्त एकमेव ईश्वरच एकटा समस्त मानवजातीच्या भक्तीस व दास्यत्वास पात्र आहे. त्याच्या शिवाय इतर कोणा मध्येच ही पात्रता नाही की मानवाने त्याची पूजा अथवा भक्ती करावी. तसेच दास्यत्व पत्करावे.
  2. तोच एकटा संपूर्ण विश्वात असलेल्या शक्तींचा स्वामी आहे आणि मानवांच्या प्रार्थना याचना व मागण्या पूर्ण करण्याचा व न करण्याचा पूर्ण अधिकार त्याला एकट्यालाच आहे. करीता मानवाने अनिवार्यतः केवळ त्याचीच प्रार्थना करावी व मानवाने याची कल्पना सुद्धा करू नये की त्याने ईश्वरेतर कोणतीही व्यक्ती अथवा शक्ती त्याची प्रार्थना स्वीकारून त्याच्या मागण्या पूर्ण करतील.
  3. एकमेव एकटा ईश्वरच मानवाच्या नशीबाचा अथवा दैवाचा चा स्वामी आहे. आणि इतर कोणामध्ये पण एवढी ऐपत व लायकी नाही की त्याला मानवाचे नशीब बनविता किवा बिघडविता येईल. करीता मानवाची आशा व निराशा अथवा भय दोन्ही ईश्वराशीच संबंधीत आहे. तेव्हा मानवाने केवळ आपल्या आशा ईश्वराशीच संबंधीत ठेवाव्या व त्याच्या शिवाय इतर कोणाचीही भिती बाळगू नये.
  4. एकमेव एकटा ईश्वरच मानव व त्याच्या सभोवतालच्या जगाचा निर्माता व स्वामी आहे. म्हणून मानवाची वास्तविकता व समस्त विश्वाच्या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष संपूर्ण ज्ञान केवळ त्यालाच आहे व असणार तेव्हा तोच जीवनाच्या गुंतागुंतीच्या मार्गात मानवाचे खर्या अर्थाने मार्गदर्शन करू शकतो आणि जीवन जगण्याचा वास्तविक कायदा प्रदान करू शकतो.
  5. मग ज्या अर्थी एकमेव ईश्वरच मानवांचा व भूतलाचा आणि विश्व व त्यामधील प्रत्येक वस्तूंचा निर्माता व स्वामी आहे त्या अर्थी मानवावर इतर कोणत्याही व्यक्तीस व स्वयं मानवास शासन करण्याचा अधिकार असणे हे सत्त्यास नाकारणेच आहे. व याच प्रमाणे मानवाची स्वतःची स्वतःहून विधीनिर्माता बनने किवा इतर व्यक्ती अथवा संस्थांचे विधीनिर्मितीचे अधिकार स्वीकृत करणे सुद्धा याच प्रकारात मोडतात. ईश्वर निर्मित भूतलावर स्वतः ईश्वराने केलेल्या निर्मितीचा स्वामी आणि विधी निर्माता केवळ मात्र एकमेव ईश्वरच असू शकतो. तसेच
  6. सर्वोच्च शासनाचा वास्तविक स्वामी ईश्वरच असल्यामुळे, त्याचाच कायदा हा सर्वोच्च कायदा आहे. व मानवा करीता विधीनिर्मिती चा अधिकार केवळ मात्र ईश्वराच्या सर्वोच्च कायदयाच्या मर्यादा कक्षेत आहे अथवा त्याने प्रदान केलेल्या परवानगीच्या कक्षेत आहे.

या ठिकाणी आपल्या समोर इस्लाम धर्माच्या दूसर्या महत्वाच्या पायाभूत श्रद्धेचा उल्लेख येतो आणि ती म्हणजे प्रेषितावर श्रद्धा. प्रेषित अशी व्यक्ती आहे जिच्या मार्फत ईश्वर ईश्वरीय कायदा मानवास प्रदान करतो. हा कायदा आपल्याला दोन प्रकारच्या स्वरूपात प्राप्त होतो. पहिले स्वरुप म्हणजे ‘ईश्वर वाणी’ जी शब्दन शब्द प्रेषितावर अवतरीत झाली. अर्थातच ‘दिव्य कुरआन’. दुसरे स्वरुप म्हणजे ईश्वरीय आदेशा व इच्छेनुसार प्रेषिताचे कथन व कार्य आणि सत्वर्तनाचे आदेश व दुर्वतनापासुन परावृत्त होण्याचे आदेशानुसार जे प्रेषिताने आपल्या अनुयायांना ईश्वरीय मार्गदर्शनानुसार दिलेत. यालाच सुन्नत म्हणजे प्रेषिताची जीवन प्रणाली म्हणतात. त्या विश्वासपूर्ण श्रद्धेचे महत्व हे आहे की जर हे द्वितीय स्वरुप अर्थात सुन्नत नसेल तर ईश्वरावरील श्रद्धा ही केवळ एक सैद्धांतिक विचार व कल्पनाच राहणार. उदाहरणार्थ जी ‘बाब’ ईश्वर भक्तीच्या श्रद्धेला एक संस्कृती, सभ्यता व एक जीवन व्यवस्थेचे स्वरुप व आकार देते अर्थात ती ‘बाब’ म्हणजे प्रेषिताची वैचारिक आणि कार्यात्मक मार्गदर्शन आहे. याच्याच माध्यमाने आपल्याला कायदा प्राप्त होतो. आणि प्रेषित या कायद्यानुसार जीवन व्यवस्था प्रस्थापित करतो. म्हणूनच एकेश्वरवादानंतर प्रेषित्वावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवल्या खेरीज कोणीही वास्तविक व खर्या अर्थाने ‘मुस्लिम’ होऊच शकत नाही.
इस्लाम धर्मात प्रेषिताचा दर्जाचे इतक्या स्पष्ट स्वरुपात वर्णन केले गेले आहे की आपण सहजरित्या व पूर्णपणे समजू शकतो की प्रेषित काय आहे व काय नाही.
प्रेषित हा मानवाला प्रेषिताचा दास बनविण्याकरिता आलेला नसून एकमेव ईश्वराचा दास बनविण्याकरीता आलेला आहे. आणि प्रेषित स्वतः सुद्धा स्वतःला ईश्वराचाच दास म्हणतो. इस्लामी प्रार्थनेत(नमाज मध्ये) सतरा वेळा ‘साक्ष वाणी’ उच्चारण्याची वा पठन करण्याची जी शिकवण प्रेषित मुहम्मद(स) यांनी मुस्लिमांना दिली आहे त्या मध्ये अनिवार्यतः हे उच्चारणे आवश्यक आहे की, ‘‘मी साक्ष देतो की मुहम्मद(स) ईश्वराचे दास आणि प्रेषित आहे. दिव्य कुरआन नुसार ही बाब अगदी स्पष्ट आहे की प्रेषित केवळ मात्र एक मानव आहे आणि ईश्वरीय अंशात कणभर ही त्याचा सहभाग नाही. तो परम मानव सुद्धा नाही. सर्व मानवीय गुणधर्म त्याच्यात आढळतात. तसेच ईश्वरीय संपत्तीचा स्वामी पण नाही व त्याला अज्ञात बाबींचे ज्ञान पण नाही की ईश्वराप्रमाणे प्रत्येक दृष्य व अदृष्य बाबींचे ज्ञान असावे. किबहुना तो इतरांना स्वयंशक्तीने लाभ व नुकसान पोहोचविणे तर सोडाच स्वतःला लाभ व नुकसान पोहोचविण्याचे त्याला अधिकार नाहीत. त्यांची जबाबदारी ही केवळ ईश्वराचे संदेश मानवापर्यंत पोहोचविणे एवढीच आहे. त्याच्या अख्त्यारित कोणाला सत्यमार्गावर आणणे नसुन व सत्यमार्ग नाकारणार्यांचा हिशोब पुरता करणे व त्यांच्यावर शाप अवतरीत करणे पण नाही. प्रेषिताने स्वतः सुद्धा ईश्वरीय आदेशांचे उल्लंघन केल्यास किवा स्वतः तर्फे एखादी गोष्ट तयार करुन ईश्वरीय संदेशात दाखल केल्यास किवा ईश्वरीय संदेशात किचीतही बदल करण्याची हिम्मत केल्यास ईश्वरीय प्रकोपापासून तो वाचू शकत नाहीत. तर मग प्रेषित मुहम्मद(स) सुद्धा प्रेषितांपैकीच आहेत आणि प्रेषित्वापेक्षा जास्त कोणत्याही अधिकाराचे स्वामी नाहीत. ते आपल्या अख्त्यारीने आणि अधिकाराने कोणत्याही बाबीस वर्ज्य अथवा अवर्ज्य घोषित करू शकत नाहीत. किवा दुसर्या शब्दात ईश्वरीय इच्छे शिवाय स्वतः विधी निर्मिती करण्याचा त्यांना कणभर ही अधिकार नाही. त्यांचे कार्य केवळ मात्र ईश्वरातर्फे अवतरीत झालेल्या आदेशांचे काटेकोर पालन करणे आहे.
अशा प्रकारे इस्लामी शिकवणीने अशा संपूर्ण अतिशयोक्ती पासून मानव जातीला सुरक्षित केले आहे. ज्या अतिशयोक्ती प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पूर्वीच्या प्रेषितांच्या अनुयायांनी आपल्या धार्मिक नेत्यांच्या पुढारपणांच्या फायद्यासाठी केल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांना ईश्वराचा दर्जा दिला, किवा त्यांना ईश्वराचा वंशज किवा ईश्वराची संतती अथवा ईश्वराचा अवतार सुद्धा घोषित केले. अशा प्रकारे संपूर्ण अतिशयोक्तींच्या अतिरेकापासून मानवाला सुरक्षित केले व प्रेषिताचा मूळ दर्जा वर्णन केला तो असा आहे.
प्रेषितावर ईमान(श्रद्धा पूर्वक विश्वास) ठेवल्या शिवाय कोणीही व्यक्ती मोमीन(श्रध्दाळू) होऊ शकत नाही. जी व्यक्ती प्रेषितांचे आदेशांचे पालन करते ती मुळात एकमेव ईश्वराच्याच आदेशाचे पालन करते. कारण की ईश्वराने प्रेषित यासाठीच पाठविले की प्रेषिता मार्फत ईश्वरीय आदेशाचे पालन केले जावे. सत्य मार्गदर्शन केवळ त्यालाच लाभू शकते जो प्रेषिताच्या आदेशाचे पालन करतो. अर्थात प्रेषित ज्याचे आदेश देईल त्याचे पालन करावे व ज्या बाबींपासून परावृत्त ठेवील त्यापासून परावृत्त व्हावे.(या सल्याचे स्पष्टीकरण स्वतः प्रेषित मुहम्मद(स) यांनी अशा प्रकारे केले की ‘‘मी एक मानव आहे. ईश्वरीय धर्माच्या बाबतीत जे आदेश मी तुम्हाला देत आहे त्याचे पालन करा. व जी गोष्ट मी स्वतःच्या मतानुसार सांगतो त्या बाबतीत तर मी पण मानव आहे. तुम्हाला तुमच्या व्यवहारिक बाबी माझ्या पेक्षा चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत.) प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवन प्रणाली मुळात दिव्य कुरआनच्या इच्छेचे वर्णन आहे. आणि हे वर्णन दिव्य कुरआनचा निर्माता स्वतः ईश्वराने त्यांना स्वतः शिकविले आहे. करीता प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेले दिव्य कुरआनचे वर्णन ईश्वरीय प्रमाणपत्रीत आहे. म्हणून कुरआनच्या मुळ वर्णनापेक्षा किचितही वेगळे वर्णन करण्याचा कोणालाच कवडीचा पण अधिकार नाही. ईश्वराने प्रेषिताच्या जीवन प्रणालीस मानवाकरिता एक नमुना(व प्रमाण) ठरवून दिले आहे. कोणतीही व्यक्ती मोमिन(इस्लामचा खरा अनुयायी) होऊच शकत नाही जो पर्यंत प्रेषित मुहम्मद(स) चा निर्णय मान्य करीत नाही. मुस्सिलमांचे हे काम नाही की ज्या बाबतीत ईश्वराने व प्रेषिताने जो निर्णय दिला त्या निर्णयास सोडून स्वतः एखादा निर्णय घेण्याचा अधिकार प्रस्थापित करावा.
वर उल्लेखलेल्या विश्लेषणात ही बाब स्पष्ट होते की एकमेव ईश्वराने प्रेषितामार्फत मानवाला केवळ सर्वोच्च विधी प्रदान केलेला नसून कायम स्वरूपी मुल्ये पण प्रदान केली आहेत. दिव्य कुरआनात व प्रेषित मुहम्मद(स) च्या जीवन प्रणालीत ज्या बाबी मानव हितास फायदेशीर ठरविल्या आहेत त्या कायम स्वरुपी भल्या व फायदेशीरच राहणार. ज्या बाबी अनिवार्य ठरविल्या गेल्या त्या नेहमीसाठी अनिवार्यच असणार. ज्या बाबी अनैतिक ठरविल्या गेल्या त्या कायम स्वरूपी अनैतिकच ठरणार! या ईश्वर निर्मित कायद्यामध्ये कसलीच सुधारणा अथवा कमतरता करण्याचा कोणालाच अजिबात अधिकार नाही. ही गोष्ट मात्र वेगळी की कोणी व्यक्ती अथवा समूह इस्लाम धर्मच सोडण्याची इच्छा बाळगत असेल! परंतु जो पर्यंत कोणी व्यक्ती वा समूह मुस्लिम आहे त्यांच्यासाठी हे कधीच शक्य नाही की कालपर्यंत ज्या बाबी घातक होत्या त्या आज फायदेशीर व उद्यापरत घातक ठरविल्या जातील. कोणतेही तार्कीक अनुमान व सामुहिक संमतीने घेतलेले निर्णय अशा प्रकारचे परिवर्तन करण्याचा अधिकार ठेवू शकत नाही.
इस्लामची तीसरी मुलभूत श्रद्धा म्हणजे ‘‘परलोक’’ होय आणि याचे महत्व हे आहे की परलोकावर विश्वास न ठेवणारा ‘मुस्लिम’ कधीच असू शकत नाही. मग तो ईश्वर, प्रेषित, कुरआन वर विश्वास ठेवणारा का असेना. तो काफिर(सत्य नाकारणारा) आहे. ही भावना अर्थातच परलोकांवर विश्वास स्वरुपात सहा सिद्धांतावर आधारित आहे.

  1. जगामध्ये मानवाला गैर जबाबदार म्हणून सोडून दिले गेलेले नसून आपल्या निर्माणकर्त्या ईश्वरासमोर आपल्या बर्यावाईट कर्माचा जाब द्यावाच लागेल. जगातील वर्तमान जीवन मुळात मानवाची परिक्षा व कसोटी आहे. करिता हा परिक्षा काळ संपल्यावर त्याला त्याच्या जीवन कर्माचा हिशोब ईश्वरासमोर द्यावाच लागणार आहे.
  2. या कर्मपरिक्षणा करिता ईश्वराने एक वेळ निश्चित केली आहे. मानवजातीला जगामध्ये कर्म करण्यासाठी जेवढी मुद्दत देण्याचा ईश्वराने निर्णय घेतला आहे त्या मुदतीच्या अंतीम क्षणी जग नष्ट होईल. त्या वेळी जगाचे वर्तमान नष्ट करण्यात येईल आणि एक दुसरी व्यवस्था नवीन प्रणाली नुसार सुरु करण्यात येईल. या नवनिर्मित जगामध्ये वर्तमान जगाच्या सुरुवातीपासून शेवट पर्यंत जन्मलेल्या समस्त मानवांना पुनर्जिवीत करून ईश्वरासमोर हजर केले जाईल.
  3. त्यावेळी या समस्त मानवांना एकाच वेळी विश्वाच्या स्वामी अर्थात ईश्वराच्या न्यायालयात हजर केले जाईल. व तेथे प्रत्येक मानवास आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. जे त्याने स्वतः आपल्या जबाबदारीवर जगामध्ये केले होते.
  4. त्यावेळी ईश्वर न्यायाच्या सर्व अटी पूर्ण करून स्वज्ञानाने न्याय दान करील. प्रत्येकाच्या जीवनकर्माचा संपूर्ण रेकॉर्ड ईश्वराच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल आणि अनेक प्रकारच्या साक्षी त्याच्या गुप्त व दृष्य कर्माच्या पुराव्यासाठी तसेच त्याच्या अंतःकरणातील विचारा करीता असतील.
  5. ईश्वराच्या न्यायालयात कोणत्याच प्रकारची लाच, निरर्थक शिफारस व वशीलेबाजी अथवा वास्तवा विरुद्ध वकीली चालणार नाही. कोणाचेच ओझे दुसर्यावर लादले जाणार नाही. कोणीही निकटवर्तीय, नातेवाईक, मित्र अथवा नेता किवा धार्मिक पुढारी वा तथाकथीत पालनकर्ता कोणाच्याच मदतीला पुढे सरसावणार नाही. त्या ठिकाणी मानव अगदी एकटा कोणाचीही मदत व सहकार्य नसलेल्या अवस्थेत उभा आपल्या बर्यावाईट कर्माचा जाब देत असेल आणि अंतीम निर्णय केवळ मात्र एकमेव ईश्वराच्याच अधिकारात असेल.
  6. अंतीम निर्णय यावरच अवलंबून आहे की मानवाने जगामध्ये प्रेषिताने दाखविलेल्या सत्याचा मार्ग स्वीकारून आणि परलोकात आपल्या कर्माचा जाब देण्याची जाणीव ठेवून व्यवस्थित एकमेव ईश्वराचे दास्यत्व केले अथवा नाही. केले असेल तर त्याच्या करीता स्वर्ग आणि नसेल केले तर त्याच्या करीता यातनामय नरक असणार.

हा श्रद्धापूर्ण विश्वास तीन प्रकारच्या माणसांच्या जीवन प्रणालींना एक दुसर्या पासून विभक्त करतो. एका प्रकारचे मानव असे आहेत जे परलोकावर विश्वास ठेवित नाहीत आणि केवळ वर्तमान जगातील जीवनालाच संपूर्ण जीवन समजतात. ते साहजीकच चांगल्या व वाईटाचे प्रमाण कर्माच्या त्या फळांनाच समजतात जी फळे जगामध्ये प्रकट होत असतात. या ठिकाणी ज्या कर्माचे फळीत चांगले व लाभदायक मिळतील तेच कर्म त्यांच्या नुसार चांगले व ज्या कर्मांचे फलीत घातक मिळतील तेच कर्म त्यांच्या नुसार, वाईट असतील. एवढेच नाही तर कीत्येकदा असे घडते की एकाच कर्माचे फलीत एकदा चांगले व दुसर्यांदा घातक होत असते. दुसर्या प्रकारचे ती माणसे आहेत जे परलोकांवर श्रद्धा व विश्वास ठेवतात परंतु त्यांना गैरसमज होतो की कोणाची तरी शिफारस ईश्वराच्या न्यायालयात त्यांना तारू शकेल. किवा त्यांच्या कुकर्माचे दंड यापुर्वीच कोणीतरी भरलेला आहे. किवा ते ईश्वराचे लाडके आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या मोठमोठ्या अपराधांची शिक्षा अगदीच कीरकोळ स्वरुपात मिळेल. अशा प्रकारच्या गैरसमजुती परलोकावर श्रद्धा असण्याच्या संपूर्ण नैतिक फायद्यांना नष्ट करतात. व दुसर्या प्रकारच्या लोकांना सुद्धा पहिल्या प्रकारच्याच लोकांच्या रांगेत उभे करतात. तिसर्या प्रकारची ती माणसे आहेत. जी इस्लामने सादर केलेल्या स्वरुपातील परलोकांवरील श्रद्धा ठेवतात आणि कोणत्याही गैर समजुतीला बळी न पडून(उदाहरणार्थ आपल्या कूकर्माचा दुसर्याने दंड दिला, अथवा निरर्थक शिफारस किवा ईश्वराचे आम्हीच लाडके वगैरे) इस्लाम च्या अनुसार परलोकावर विश्वास ठेवून सन्मार्गाने वागतात. अशा माणसांकरीता परलोकावरील हा विश्वास एक प्रचंड नैतिक शक्ती प्रदान करतो. ज्या माणसाच्या अंतःकरणात परलोकाविषयी दृढ विश्वास आपल्या मूळ स्थितीत अस्तित्वात असतो त्याची स्थिती अशी असते जसे प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत एक पाहरेकरी आहे जो त्याच्या प्रत्येक अपराधीक भावनावर अंकुश ठेवतो व प्रत्येक दुष्कर्मावर त्याला समज देतो. मग त्याच्यावर अंकुश ठेवणारे पोलिस साक्ष देणारे साक्षीदार, शिक्षा देणारे न्यायालय आणि निषेध करणारे जनमत असो वा नसो. त्याच्या आत मध्ये एक कठोर परिक्षक प्रत्येक क्षणी बसलेला असतो. ज्याच्या भितीपोटी तो कधीही एकांतात, जंगलात किवा अंधारात ईश्वराने निश्चित केलेल्या कर्तव्यास पाठ दाखविणार नाही व अपराध करण्याचे धाडस करणार नाही. आणि जरी अपराध घडलाच तर त्याला कमालीचा पश्चात्ताप होईल व यापुढे कधीही हे अपराध न करण्याचा ठाम निश्चय करील व तोबा(क्षमायाचना) करील. नैतिक सुधारणा करण्याचा व मानवांमध्ये एक स्थिर आचरण व सदाचरण निर्माण करण्याचा या पेक्षा जास्त उत्तम आणि यशस्वी मार्ग दुसरा कोणताच नाही. ईश्वराचा सर्वोच्च कायदा जो मानवाला कायमस्वरूपी मुल्य प्रदान करतो व त्यावरच मानवाची तठस्थरित्या न हलता व न डगमगता कायम राहण्याची भीस्त याच श्रद्धेवर आहे आणि म्हणूनच इस्लाम अर्थात या परलोकांवरील विश्वासाला एवढे महत्व आहे की ते नसेल तर ईश्वर व प्रेषितावर विश्वास असूनही निरर्थक आहे.
पॅरेग्राफ क्र. ६ मध्ये वर्णन केल्या प्रमाणे ‘इस्लाम’ एक परिपूर्ण संस्कृती व सभ्यता आणि एक कायम स्वरुपी जीवन व्यवस्था आहे. तसेच मानवीय जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी नैतिक मार्गदर्शक आहे. म्हणून याची नैतिकता वास्तविक सामाकिड जीवनापासून दूर पळणार्या गिरीजन वासियांसाठी, वैराग्यासाठी आणि संन्यासांकरिता नसून अशा लोकांसाठी आहे जे व्यावहारिक जीवनाच्या विविध जबाबदार्या सांभाळतात व काम करतात. नैतिकतेची उच्च मुल्ये या जगातील लोक आश्रम, एकांतवास, वैराग्य अशा ठिकाणी शोधत असतात. परंतु इस्लाम माणसांना व्यवहारिक जीवनाच्या मूळ प्रवाहात सामिल करू इच्छितो. इस्लामचा मुळातच हेतु असा की, शासनकर्ते, राज्यांचे राज्यपाल, न्यायालयांचे न्यायाधिश, लष्कर आणि पोलिस अधिकारी, लोकसभेचे सभासद, वित्त आणि उद्योगांचे संचालक, कॉलेज, महाविद्यालये व विद्यापिठांचे शिक्षक व विद्यार्थी, पाल्यांचे पालक, पालकांची पाल्ये, मुलांचे पिता व पितांची मुले, पत्नींचे पती आणि पतींच्या पत्नी, शेजार्यांचे शेजारी, कामगारांचे मालक व मालकांचे नोकर एकूण सर्वांनीच या नैतिकतेची मुल्ये जपावी. आणि गल्लीबोळात व बाजारात अर्थात प्रत्येक व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जपली जावी. इस्लाम इच्छितो की व्यवहाराचे प्रत्येक क्षेत्र व शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात व विभागात याचे अनुकरण व्हावे. राजनिती सत्य व न्यायावर आधारित असावी. प्रत्येकाने व प्रत्येक समाज व समूहाने सत्याची जाण ठेवून ज्यांचे त्यांचे अधिकार ज्यांचे त्यांना प्रदान करावे. युद्धामध्ये सुद्धा प्रामाणिक व सुसंस्कृत असावे. अर्थातच रक्त पिणार्या हिस्त्र पशू प्रमाणे व्यवहार करू नये. मानव जेव्हा सदाचारी होईल, ईश्वराच्या कायद्याला सर्वोच्च कायद्याचे स्थान देईल, ईश्वरासमोर आपल्या बर्या वाईट कर्माचे जाब देण्याची जाणीव ठेवून कायम स्वरूपी मुल्यानुसार कर्म करील तेव्हा त्याचे गुणधर्म व कर्म पूजा स्थळांपर्यंत व प्रार्थना स्थळापर्यंतच मर्यादित राहणार नाहीत. या उलट ज्या पात्रते व दर्जावर अथवा हुद्यावर जगामध्ये तो कार्यरत आहे ईश्वराच्या सच्च्या व प्रामाणिक दासा प्रमाणेच काम करील.
ही आहे संक्षिप्त स्वरुपातील क्रांतीची रूपरेखा ज्याचा इस्लाम इच्छुक आहे. हे केवळ कोण्या एखाद्या विचारवंताचे काल्पनिक स्वर्ग नसून प्रेषित मुहम्मद(स) यांनी वास्तव स्वरुपात प्रस्थापित करून दाखविले आहे. आणि आज चौदाशे वर्ष संपूनही याचे प्रभाव मुस्लिम समाजात स्पष्टपणे दिसतात.

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *