Home A परीचय A अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा

अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा

Dua
या सृष्टीचा निर्माता, पोशिंदा, स्वामी व प्रभू परम दयाळू व कृपाळू अल्लाह असून तो मानवजातीच्या कल्याणकारी मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठवितो, जे या जगाच्या पाठीवर वसणाऱ्या समस्त मानवांना योग्य मार्गदर्शन करतात, सत्य-असत्य, खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि चांगल्या-वाईटाचा फरक सांगतात. सत्याची, न्यायाची आणि सदाचाराची स्थापना करतात. माणसास माणूस बनवितात.
मात्र आपण याबरोबरच हेसुद्धा पाहिले आहे की मानव हा एक स्वतंत्र आणि स्वावलंबी जीव आहे. तो इतर सजीवांप्रमाणे विवश, निष्प्रभ आणि हतबलसुद्धा नाही. चांगल्या आणि वाईट, सत्य आणि असत्य मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य त्याच्यात आहे. सत्याचा मार्ग हा पैगंबरांनी दाखविलेला मार्ग असून पैगंबरांच्या मार्गाविरूद्ध असलेला मार्ग म्हणजे असत्य, अन्याय व दुराचाराचा मार्ग होय. या जगाच्या इतिहासात लोकांनी याच दोन मार्गांपैकी एका मार्गाची निवड केली आहे. आजही याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ईशमार्गावर चालणारेही आहेत आणि ईशद्रोहीसुद्धा आहेत.
या परिस्थितीवर गंभीरपणे जर आपण विचार केला तर हा प्रश्न उभा राहतो की सरळमार्गी आणि दुष्कर्मी वा अन्यायी लोकांत साम्य आहे काय? दोघांचा परिणाम सारखाच होईल काय? मुळीच नाही. शक्यही नाही. कारण अल्लाहकडून मार्गदर्शन अथवा जीवनाचा योग्य आणि सत्यमार्ग मिळाल्यास तसेच हा सत्यमार्ग स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असूनही न स्वीकारणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात येणार नाही आणि स्वीकारणाऱ्यांना त्यांच्या आज्ञाधारकतेचा कोणताही बदला मिळणार नाही, हे तर बुद्धीला मुळीच पटणारे नाही.
अल्लाहच्या पैगंबरांनी अल्लाहचा संदेश मानवजातीला प्रदान केला व या संदेशाबरोबरच या वस्तुस्थितीबाबतही खबरदार केले आहे की वर्तमान जीवनाची ही मुदत मुळात एका परीक्षेपुरता कार्यकाळ आहे. अल्लाहने मानवास चांगले वा वाईट निवडण्याचे जे स्वातंत्र्य प्रदान केले, ते यासाठीच केले की मानवाची परीक्षा घ्यावी की कोणती व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आणि चांगल्या प्रकारे वापर करते, सदुपयोग करते आणि कोणती व्यक्ती याचा दुरुपयोग करते. अल्लाहने मानवजातीस मार्गदर्शन देण्याचा एक पैलू हादेखील आहे की लोकांनी हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि याचा योग्य व पुरेपूर मोबदला प्राप्त करावा. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मार्गदर्शन डावलले आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून मनमानी केली, त्यांना याची शिक्षाही भोगावी लागणार. म्हणूनच अल्लाहच्या पैगंबरांनी मानवजातीस स्पष्ट शब्दांत खबरदार केले की हे वर्तमान जीवन कर्म करण्याचे कार्यक्षेत्र आहे. या जीवनात जी व्यक्ती अल्लाहने दाखविलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनाची  वाटचाल करील, अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर जीवन व्यतीत करील, नेकी आणि सदाचाराचे जीवन व्यतीत करील, त्यास याचा उत्तम मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या मार्गाविरूद्ध जीवन व्यतीत करील, त्या व्यक्तीस कठोर शिक्षा मिळेल. त्यांनी याविषयीदेखील मानवजातीस खबरदार केले की आम्ही (पैगंबर) अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समस्त मानवांना हे दाखवू इच्छितो की हा विश्वरूपी कारखाना एके दिवशी नष्ट करण्यात येईल. समस्त मानवजातीस परत जीवित करण्यात येईल आणि प्रत्येकास प्रभु, अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. या गोष्टीचा जाब की अल्लाहने प्रदान केलेल्या शक्ती व सामर्थ्यचा, स्वातंत्र्य व क्षमतेचा, कौशल्य व पात्रतेचा वापर कोणत्या व कशा पद्धतीने केला. अल्लाहच्या मर्जीनुसार केला की त्याच्या अवज्ञेनुसार केला. याबरोबरच अल्लाहने आपल्या पैगंबरांच्या माध्यमाने हेदेखील स्पष्ट केले की अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याचे प्रचंड बक्षीस मिळेल, अर्थात अविनाशी असलेली स्वर्गप्राप्ती होईल. याउलट अल्लाहची अवज्ञा करून इतर कुणाच्या आज्ञेनुसार वा मर्जीनुसार जीवन जगण्याचे फलित अत्यंत वाईट मिळेल, अर्थात कधीही न संपणाऱ्या नरकयातना मिळतील. यातून कधीही सुटका होणार नाही.
मृत्यूनंतर परत जीवन मिळणार की नाही, मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल, याविषयीची माहिती मिळविण्याची साधने आपल्याकडे नाहीत. काहींचे मत आहे की आपले हेच वर्तमान जीवन एवढेच आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणे हे केवळ एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जर असे असते तर प्रश्नच मिटला असता. यावर विचार करण्याची गरजसुद्धा पडली नसती. कसले पुण्य आणि कसले पाप? पद्धतशीरपणे मस्तपैकी जीवन भोगायचे नि मरून जायचे, संपले! मात्र ही वस्तुस्थिती विसरण्यासारखी मुळीच नाही की आपल्या वर्तमान जीवनाशी या कल्पनाविलास वाटणाऱ्या बाबीचा दृढ संबंध आहे. विशेषत: आपल्या नैतिक जीवनाचा तर याशीच संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण थोड्या वेळेसाठी असे समजू या की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवन नाही आणि आपल्या जीवनाचा वा भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार नाही, ज्या जीवनाच्या यशापयशाची मदार वर्तमान जीवनावर आहे. तर याचा परिणाम निश्चितच आपल्या वर्तमान जीवनावर असा होईल की आपल्या जीवनातून पाप-पुण्याचा कोणताही मोबदला जर मिळत नसेल आणि पापाची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नसेल तर मग चांगले आणि सदाचाराचे विनाकारण लचांड गळ्यात घालून घ्यायचेच कशाला? मग वाटेल तसे जगायचे. नैतिकता, मानवता आणि सदाचाराची बिनधास्त होळी करायची. आपले जीवन रंगवून घेण्यासाठी इतरांच्या रक्ताने बिनधास्त शिमगा खेळायचा, वाटेल त्याला खपवायचे, वाटेल ते हिसकावून घ्यायचे, साऱ्यावर आपलीच मनमानी स्थापन करायची. कारण जीवन हे एकदाच मिळालेले असते, ते वाटेल तसे भोगायचे, मौज-मजा करण्याची कोणतीही संधी चुकवायची नाही. कारण आपल्याला कोण विचारणार, आपला कोण जाब घेणार? मात्र हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. यावर गंभीरपणे विचार केल्याशिवाय मुळीच गत्यंतर नाही. आपल्याला यावर विचार करावाच लागणार आहे की मृत्यूनंतरच्या जीवनातील यशापयशाचे परिणाम आपल्या वर्तमान जीवनावर काय होतात.
आपण जर यावर खरोखरच विचार केला तर आपल्याला हे स्पष्टपणे आढळून येईल की या जगात बरेच लोक चांगले व वाईटही आहेत आणि बरेचजण सदाचारी व दुराचारीही आहेत. दुराचारी लोक अत्यंत मौज-मस्तीत जीवन व्यतीत करून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या जीवनात समस्त सुखसाधने असतात. तर याउलट सदाचारी व सद्वर्तनी लोक दु:ख, समस्या, अडचणी आणि ना-ना प्रश्नांशी झुंजत असताना दिसतात. असेच समस्याग्रस्त जीवन कंठून ते या जगातून निघून जातात. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की जे लोक सद्वर्तनी, सत्यनिष्ठ आणि सदाचारी असतात व याच सत्यनिष्ठतेपायी संकटमय जीवन जगत असतात, अल्लाहच्या निर्णयाचे प्रत्येक संकटमय पावलावर स्वागतच करीत असतात, मोठमोठ्या संकटांना न घाबरता आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सत्याची कास सोडत बसतात, न्याय आणि सदाचाराकरिता अख्खे जीवन अल्लाहला सर्मिपत करतात आणि याच सत्याच्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून जीवनाची सांगता करतात, त्यांच्या मनात निश्चितच ही जाणीव तीव्रपणे उचंबळून येते की जगाचा निर्माता व पोशिंदा प्रभू अल्लाह निश्चितच न्यायी आहे, तो आपल्या सत्यनिष्ठा व सदाचाराचा, आपल्या भावनांच्या बलिदानांचा, आपल्या सत्य समर्पणाचा निश्चितच उत्तम मोबदला देईल. या सदाचाराच्या बदल्यात एका अशा स्थायी, समाधानकारक, दु:खरहित आणि आनंददायी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. एका अशा जीवनाची गरज आहे जेथे निश्चितच सदाचाराचे चांगले फळ आणि दुराचाराची शिक्षा मिळावी. शिवाय ज्या माणसाला या गोष्टीवर विश्वास असेल की या विश्वाचा रचयिता, निर्माता, सृष्टा, पोशिंदा, प्रभु अल्लाह आहे आणि त्यानेच हे सारे काही आपल्या सामर्थ्यने निर्माण केले, आपले स्वामित्व गाजविले, आपल्या प्रभुत्वाने सारी सृष्टी पोसली, तोच प्रभु अल्लाह निश्चितच सहजरित्या परत ही सृष्टी निर्माण करील. यात त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. अशा अमर्याद सामर्थ्यशाली निर्मात्या प्रभु अल्लाहसाठी प्रत्येक मानवास परत जीवन देण्यात काहीही अडचण येणार नाही. मग शेवटी अल्लाहच्या पैगंबरांनी परलोकी जीवनाची जी खबर अथवा वार्ता दिली, त्यात मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आणखीन एक सांगायचे झाल्यास तुम्ही कदाचित म्हणाल की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचे फलित मिळण्यासाठी दुसऱ्या जीवनाची काय गरज आहे? हे तर या जीवनातही शक्य आहे! येथेसुद्धा दु:ख आहे, कष्ट आहे, सुख-समाधान आहे. येथेही उच्च-नीच आहे आणि या आधारावर हेदेखील जर मान्य करण्यात आले की याच जगात आपल्या पाप-पुण्याईचा मोबदला प्राप्त करण्यासाठी याच जगात वारंवार माणूस जन्म घेऊ शकतो. पुण्याईच्या बदल्यात सुखी-समाधानी जीवन प्राप्त होऊ शकते, पापकर्मांच्या मोबदल्यात दु:ख व यातनामय जीवन मिळू शकते. मात्र यावर थोडाजरी विचार केला तर तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर विश्वास येईल की पाप-पुण्याच्या बदल्यात या वर्तमान जीवनात तर काहीही मिळणे शक्य नाही. जर आपण हे मान्य केले की सध्या अडीअडचणीत असलेली व्यक्ती मागच्या जन्मीच्या पापाची फळे भोगत असून सुखी-समाधानी व्यक्ती मागील जन्माच्या पुण्याची फळे चाखत आहे, तर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की या जगात सर्वप्रथम पाऊल ज्या व्यक्तीने ठेवले होते, त्यास कोणत्या जन्माच्या पुण्य अथवा पापाचे फळ भोगण्यासाठी या जगात पाठविण्यात आलेले होते?कारण यापूर्वी तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक जीवन नव्हते. यापेक्षाही आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे लोक सुखी-समाधानी आहेत अथवा समस्या व संकटांनी ग्रस्त जीवन कंठीत आहेत, त्याच्यासंबंधी हे सांगता येणे शक्य नाही की ते पुण्यकर्माची बक्षिसे प्राप्त करताहेत की पापाची कडू फळे चाखत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दीन-दु:खी आणि संकटग्रस्त व्यक्तीस पाहा. कदाचित तो या अवस्थेच्या स्वरूपात शिक्षा भोगत असेल. कारण मागच्या जन्मी कदाचित त्यास धन-दौलत अगर सत्ता मिळालेली असेल आणि त्याने कदाचित दुराचार वा पापकर्मे केली असतील आणि त्याच्या परिणामस्वरूपी तो या जन्मी शिक्षा भोगत असेल. याबरोबरच हेदेखील शक्य आहे की ही अवस्था मागील जन्मातील चांगल्या कर्मांचे उत्तम बक्षीस भोगण्यासाठी असावी. कारण मागच्या जन्मी तो कदाचित एखादा प्रामाणिक कुत्रा असावा आणि त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्यास हे मानवी जीवन मिळालेले असेल. मग हे जीवन समस्या आणि संकटांनी ग्रस्त का असेना. शिवाय या अडचणींव्यतिरिक्त आणखीन एक मोठी अडचण अशी दिसते की या जन्मात माणूस पुढील जन्मासाठी काही कष्ट करून पुण्याईची कमाई करीत असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हणणे वावगे ठरणार नाही की या वर्तमान जीवनात माणूस पुढील जन्मासाठी काही पुण्य कमावित असेल अथवा पुढील जीवनाच्या यशापयशाची पूर्ण भिस्त या जीवनाच्या पुण्य व पापकर्मांवर असेल. मग यातदेखील आणखीन एक अडचण अशी निर्माण होते की एक माणूस एकीकडे शिक्षा भोगत आहे वा बक्षीस मिळवित आहे आणि दुसरीकडे तर हीच शिक्षा आणि बक्षीस त्याच्या पुढील जन्माकरिता यशापयशाचे कारण ठरत असेल, हे कोणत्याही पैलूने बुद्धिसंमत वाटत नाही.
या समस्त बाबींव्यतिरिक्त आणखीन एक पैलू असा की आपण जर कोणत्याही दृष्टिकोनानुसार या वारंवार जन्म घेण्यावर विचार केला तर ते शक्य वाटत नाही. या जीवात जो माणूस जेवढी कर्मे करतो, ती सर्व प्रकरणे त्याच्या जीवनाबरोबरच संपूर्ण जाणारी बाब मुळीच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नराधमाने एखाद्या निष्पाप माणसाचा वध केला आणि जर त्या खुन्यास या अपराधास्तव फाशीची शिक्षा देण्यात आली तर हे प्रकरणदेखील इथेच संपत नाही. कारण त्याचा एक गुन्हा असा होता का त्याने एका निष्पाप माणसाला जीवातून उठविले. मात्र याबरोबरच मृताच्या परिवारास असंख्य आर्थिक, मानसिक छळ सोसावा लागला. बिचाऱ्याची मुलेबाळे रस्त्यावर आली, पत्नी विधवा व निराधार झाली. मुले अनाथ झाल्याने शिक्षणाची सोय झाली नाही आणि दर-दर भीक मागून अख्खे जीवन व्यर्थ घालवावे लागले. शिवाय नंतरच्या कित्येक पिढ्या या दुष्कृत्यामुळे वाया गेल्या अर्थात त्याच्या खून करण्याच्या अपराधाचे परिणाम फक्त मृतकासच नव्हे तर परिवार, समाज आणि न जाणो कोणाकोणास भोगावे लागले असतील. जर सत्य आणि न्यायासहित त्यास त्याच्या पापाची पूर्णपणे शिक्षा द्यायची झाल्यास केवळ फाशी दिल्याने कसे चालेल?मृतकाच्या परिवारजनांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय? जर फाशी होताच त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्यास कुत्रा अथवा मांजराच्या जन्मी घालण्यात आले तर ते असे ठरेल जणू एखाद्याचे खाते बंद करण्यापूर्वीच त्याचा हिशेब पूर्ण करण्याचा एखाद्याने निर्णय घ्यावा. हीच परिस्थिती पुण्यकर्मांचीदेखील आहे. माणूस बरीच कर्मे अशी करतो, ज्यांचे उत्तम परिणाम त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा मानवजातीस प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखादी शाळा काढली. जोपर्यंत लोक त्या शाळेत शिक्षण घेत राहतील तोपर्यंत त्यास याचे पुण्य लाभत असेल. कोण जाणे किती शतकांपर्यंत ही शाळा सुरू राहील आणि लोकांना शिक्षणासारखी अमूल्य संपत्ती प्राप्त होत राहील. अशा अवस्थेत त्याला मेल्यानंतर तात्काळ त्याच्या पुण्याचा मोबदला कसा देता येईल. कारण अद्याप त्याच्या पुण्यकर्माचे खातेच बंद झालेले नसणार.
अशाप्रकारे विचार केल्यास हीच बाब स्पष्ट होते की जर माणसाला त्याच्या पुण्य वा पापाचे योग्य फलित मिळावयास हवे असेल तर त्यास एक असे जीवन हवे जे हे जग नष्ट झाल्यानंतर सुरू व्हावे आणि ते परलोकी जीवन कायमस्वरूपी व स्थायी स्वरूपाचे असावे. ज्या ठिकाणी माणसाला पूर्ण रूपाने त्याच्या पुण्य वा पापांची फलिते मिळणे शक्य व्हावे. कारण या वर्तमान जगातील क्षणभंगूर जीवन या फलितांसाठी पुरेसे ठरू शकत नाही, मात्र निश्चित!
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *