माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत वजनदार वस्तू जी अंतिम निवाड्याच्या दिवशी मोमिनच्या तराजूमध्ये ठेवली जाईल ती म्हणजे त्याची नीतीमत्ता होय. अभद्र बोलणारा आणि अर्वाच्च कथन करणाराला अल्लाह अजिबात पसंत करीत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ‘खलकुन हसनुन’चे स्पष्टीकरण देताना अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी म्हटले आहे, ‘‘हुवा तला़कतुल व़िज्ह व ब़ज्लुल मअरु़फि व क़फ़्फल अ़जा.’’ (मनुष्याने एखाद्या हसतमुखाने भेटणे, अल्लाहच्या वंचित दासांवर धन खर्च करणे आणि कोणालाही त्रास न देणे यालाच चांगली नीतीमत्ता म्हणतात.)
माननीय अली (रजि.) यांनी सांगितले, ‘‘अश्लील बोलणारा आणि अश्लील गोष्टींचा प्रसार करणारा हे दोन्ही पाप सारखेच आहेत.’’ (हदीस : मिश्कात)
दुतोंडीपणा
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांत वाईट मनुष्य तो आढळेल जो जगात दोन चेहरे बाळगत होता. काही लोकांशी एका चेहऱ्याने भेटत होता आणि दुसऱ्या लोकांशी दुसऱ्या चेहऱ्याने.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)
स्पष्टीकरण : दोन मनुष्यांमध्ये अथवा दोन समूहांमध्ये जेव्हा शत्रुत्व निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी काही लोक असेही आढळतात जे दोन्हींकडे पोहोचतात आणि दोघांच्या होकाराला हो म्हणतात आणि त्यांच्या आपसांतील शत्रुत्वावर चर्चा करतात व ते वाढविण्याचा प्रयत्न करतात, हा फार मोठा दुराचार आहे.
त्याचप्रमाणे काही लोक समोर अतिशय दृढ संबंध प्रगट करतात मात्र जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची निंदा करण्यास सुरूवात करतात, हाच दुतोंडीपणा आहे.
माननीय अम्मार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगात दुतोंडीपणाने वागणाऱ्या मनुष्याच्या तोंडात अंतिम निवाड्याच्या दिवशी आगीच्या दोन जिव्हा असतील.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या तोंडात आगीच्या दोन जिव्हा यासाठी असतील की जगात त्याच्या तोंडातून आग निघत होती जी दोन मनुष्यांच्या आपसांतील संबंधाला जाळून टाकत होती.
चुगलखोरी
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे अधिक ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘चुगलखोरी म्हणजे तू आपल्या बंधुचा उल्लेख त्याला न आवडणाऱ्या पद्धतीने करावा.’’ मग पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘मी उल्लेख करीत असलेली गोष्ट जर माझ्या बंधुमध्ये आढळत असली तरीही ती चुगलखोरीच ठरेल काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही उच्चारलेली गोष्ट जर त्याच्यात आढळत असेल तरीही ती चुगलखोरीच झाली आणि जर ज्याच्यात ती गोष्ट नाही त्या मनुष्याबाबत जर ती गोष्ट म्हटली गेली तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणे होईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : मोमिनला त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल चांगल्या पद्धतीने टोकले गेले तर निश्चितच त्याला वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अपराधाची सूचना त्याच्या वरिष्ठांना दिली गेली तर तेही त्याला आवडेल, कारण हीदेखील त्याच्यात सुधारणा घडविण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही आपल्या मोमिन बंधुला समाजाच्या नजरेतून उतरविण्यासाठी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या त्रुटी सांगाल तर त्याला खूप वाईट वाटेल. जो मनुष्य उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो आणि कोणत्याही प्रकारे मान्य करीत नाही, त्याचे दुराचरण व्यक्त करणे चुगलखोरी नसून त्याचा स्वभाव समाजासमोर उघड करणे फार मोठे पुण्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याचेच मार्गदर्शन केले आहे.
माननीय अबू सईद व जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी व्यभिचारापेक्षाही मोठे पाप आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! चुगलखोरी व्यभिचारापेक्षा मोठे पाप कसे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मनुष्य व्यभिचार करतो, मग पश्चात्ताप व्यक्त करतो तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप कबूल करतो, परंतु जोपर्यंत तो मनुष्य ज्याची चुगलखोरी करण्यात आली आहे, त्या माणसाला क्षमा करीत नाही तोपर्यंत अल्लाह चुगलखोरी करणाऱ्याला क्षमा करणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरीचे एक प्रायश्चित्त हे आहे की ज्याची तू चुगलखोरी केली आहे त्या मनुष्याकरिता तू माफीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे म्हणा– हे अल्लाह! तू माझी आणि त्याची मुक्ती कर.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जर तो मनुष्य उपस्थित असेल आणि त्याच्याकरवी आपला अपराध माफ करविला जाऊ शकत असेल तर करवून घ्यावा आणि जर तो मरण पावल्यामुळे अथवा तो कोठेतरी दूरवर गेल्यामुळे माफीसाठी जागाच उरली नसेल तर त्याच्याकरिता माफीच्या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरा मार्गच उरत नाही.
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मृतांना वाईट बोलू नका कारण ते आपल्या कर्मांपर्यंत पोहोचलेले आहेत.’’ (हदीस : बुखारी)
0 Comments