माननीय खदीजा (रजि.) हे नाव आणि हिंदची माता, ताहेरा (पाक) हे संबोधन ज्यांचे आहे त्यांचा जन्म `आमुलफिल’ (हत्तीवाल्यांच्या वर्षापूर्वी) १५ वर्षे म्हणजे इ.स.५५५ मध्ये झाला. बालपणापासून त्या सज्जन आणि पुण्यशील होत्या. वयात आल्यावर त्यांचा विवाह अबुहाल हिन्द बिन नबाश तमीमी यांच्याबरोबर झाला. त्यांच्यापासून त्यांना दोन मुलगे, हाला व हिंद झाले. त्यापैकी हालाचा मृत्यू इस्लामपूर्वीच झाला तर हिंद एक सहाबी (पैगंबर (स.) यांचे शिष्य, सहकारी) झाले.
अबू हालाचा मृत्यु झाला. त्यानंतर खदीजाचा दुसरा विवाह आतिक बिन आबिद मखजुमी यांच्याबरोबर झाला. त्याच्यापासून त्यांना हिन्दा नामक एक कन्या झाली. काही काळानंतर दुसऱ्या पतीचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा तिसरा विवाह पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी झाला.
या लग्नापूर्वी खदीजा (रजि.) या आपला वैधव्याचा काळ जास्त करून एकान्तवासात व्यतीत करीत असत. काही काळ त्या काबागृहात व्यतीत करीत तर काही काळ त्या युगातील प्रसिद्ध व आदरणीय भविष्यवेत्या (काहीना) स्त्रियांबरोबर व्यतीत करीत. त्यांच्याशी त्या काळातील परिवर्तनावर कधीकधी चर्चा करीत असत. कुरैशच्या अनेक मोठमोठ्या सरदारांकडून त्यांना विवाहाबद्दल विचारले जाई, परंतु एकमागून एक संकटांनी (तिन्ही मुले व दोन्ही पती यांचे मृत्यु) त्यांचे मन जगातून उचाट झाले होते. त्यांचे वडील म्हातारपणामुळे मोठा व्यापार-धंदा सांभाळू शकत नव्हते. त्यांचा खदीजा (रजि.) व्यतिरिक्त कोणताही वारस जिवंत नव्हता. त्यामुळे आपल्या अत्यंत बुद्धिमान कन्येच्या सुपूर्द सगळा व्यापारउदीम करून त्यांनी एकान्तवास स्वीकारला. काही अवधीनंतर त्यांचेही निधन झाले.
खदीजा (रजि.) यांनी आपला व्यवसाय उत्तमरीतीने सुरू ठेवला. त्यांचा व्यापार सीरियापासून यमन देशापर्यंत पसरलेला होता. या विशाल व्यवसायासाठी त्यांनी खूप कर्मचारी ठेवले होते. त्यात अरबी, ईसाई, यहुदी आणि काही गुलाम यांचा समावेश होता. व्यापाराचे सुयोग्य धोरण व प्रामाणिकपणा यामुळे त्यांचा व्यापार दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्यांना अशा एका व्यक्तीची गरज होती जी योग्य, बुद्धिमान, प्रामाणिक असेल आणि जिच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना देश-विदेशात व्यापारासाठी पाठवता येईल.
भाग २
त्या वेळी मुहम्मद (स.) यांच्या पवित्र विचारसरणीची चर्चा मक्का शहरातील घराघरात होत होती. मुहम्मद (स.) अगदी तरूण होते, त्यांना `अमीन’ (ठेव सांभाळणारा प्रामाणिक मनुष्य) या उपाधीने ओळखले जाई. खदीजांच्या कानावर या पवित्र व्यक्तीच्या वागणुकीची बातमी स्वाभाविकरित्याच पोहोचली. त्यांना व्यापाराच्या विकासासाठी अशाच सर्वगुणसंपन्न व सर्वसमावेशक समन्वयकाची आवश्यकता होती. त्यांनी मुहम्मद (स.) यांना निरोप पाठविला की, “आपण सीरिया देशापर्यंत माझ्या व्यापाराच्या वस्तू पोहचवण्याचे काम कराल तर मी इतरांपेक्षा दुप्पट मोबदला देईन.” मुहम्मद (स.) त्या काळात आपले चुलते अबू तालिब यांच्या छत्रछायेत राहत होते. त्यांना खदीजा (रजि.) यांच्या व्यापाराबद्दल अधुनमधून माहिती मिळत असे.
त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला व व्यापारासाठी माल घेऊन बसरा शहराकडे रवाना झाले. त्यांच्याबरोबर खदीजा (रजि.) यांनी मयसरा नावाच्या खास गुलामाला त्यांची देखभाल करण्यासाठी पाठविले. त्याला ताकीद दिली की प्रवासात पैगंबर (स.)यांना काहीही त्रास होता कामा नये. या दौऱ्यात पैगंबरांच्या प्रामाणिकपणा, सभ्यता इ. गुणांमुळे व्यापारात व नफ्यात दुप्पट वाढ झाली. काफिल्यातील इतर लोकांबरोबर ते इतके चांगले वागले की प्रत्येक व्यक्ती त्यांची स्तुती करू लागली व त्यांच्यावर जीव टावूâ लागली. मक्केत आल्यानंतर मयसराकडून या दौऱ्याची हकीकत खदीजा (रजि.) यांना कळाली आणि त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी आपल्या नफीसा नावाच्या दासीमार्फत पैगंबरांकडे विवाहाचा प्रस्ताव पाठविला. त्यांचा होकार मिळताच खदीजा (रजि.) यांचे चुलते अमर बिन असद यांना बोलविण्यात आले. त्यांचे त्या वेळी ते पालक होते.
भाग ३
इकडे मुहम्मद (स.) देखील आपले काका अबू तालिब व घराण्यातील बुजुर्ग मंडळीना घेऊन खदीजा (रजि.) यांच्या घरी आले. अबू तालिब यांनी लग्नाचे मंत्र पठण करून त्यांचा निकाह लावून दिला. त्यात ५०० चांदीची (दिरहम) नाणी महर ठरविण्यात आला. त्या वेळी मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे आणि खदीजा (रजि.) यांचे वय ४० वर्षे होते.
निकाहनंतर मुहम्मद (स.) बहुधा घराबाहेर राहू लागले. कित्येक दिवस मक्केच्या गुफांमध्ये उपासना करीत असत. दहा वर्षे अशीच लोटली. एके दिवशी नेहमीप्रमाणे हीरा या गुफेत चिंतन करीत असताना अल्लाहच्या आदेशाने जिब्रिल (अ.) तेथे आले व म्हणाले, “क्रम या मुहम्मद!” (हे मुहम्मद उठा) पैगंबरांनी दृष्टी उचलून पाहिले तर त्यांना एक सुंदर चेहरा दिसला. त्याच्या कपाळावर तैयबाचा कलमा लिहिलेला होता. ते जिब्रिल होते. त्यांनी मुहम्मद (स.) यांना गळामिठी घातली व जवळ दाबत म्हटले, “वाचा!” पैगंबर (स.) म्हणाले, “मी लिहू वाचू शकत नाही.” परत त्यांना आलिंगन देत ते म्हणाले, “वाचा!” पैगंबरांनी तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदाही वाचावयास सांगितले, “वाचा अल्लाहच्या नावाने ज्याने हे सर्व निर्मिले पाण्याच्या थेंबाने (रक्ताच्या पेशीने) माणसाला बनविले. तुमचा परवरदिगार फार दयाळू आहे, तुम्ही वाचा.” अल्लाहने माणसाला लेखणीद्वारे ज्ञान शिकविले जे त्याला काही माहीत नव्हते. पैगंबरांच्या पवित्र जिव्हेवर `इकराबिस्मी….” हे शब्द उमटू लागले. या विचित्र अनुभवाने मुहम्मद (स.) अत्यंत प्रभावित झाले. घरी परतले आणि म्हणाले, (जमलूनी, जमलूनी) “माझ्यावर पांघरूण घाला.” माननीय खदीजा (रजि.) यांनी तसे केले व म्हणाल्या, “आपण कोठे होता? मी अगदी काळजीत होते. कित्येक माणसांना तुमच्या शोधार्थ मी पाठविले होते.” पैगंबरांनी त्यांना तो सगळा अनुभव सांगितला. माननीय खदीजा (रजि.) म्हणाल्या, “आपण सत्य तेच बोलता, गरीबांना मदत करता, अतिथ्यशील आहात, दयाळू आहात, ठेव प्रामाणिकपणे जपणारे अमीन आहात, दु:खितांची खबर ठेवता, अल्लाह आपल्याला एकटे सोडणार नाही, एकाकी पाडणार नाही.” पैगंबरांना घेऊन त्या आपले काका वर्का-बिन-नौफिल यांच्याकडे गेल्या. या काकांनी मूर्तिपूजेला कंटाळून खिस्ती धर्म स्वीकारला होता. पूर्वीच्या दैवी ग्रंथांचे-तौरात, जबूर, इंजील ते गाढे अभ्यासक होते. खदीजा (रजि.)यांनी मुहम्मद (स.) यांचा विचित्र अनुभव त्यांना सांगितला. वर्का ते ऐवूâन म्हणाले, “हा तोच देवदूत आहे जो मूसाकडे पाठविला गेला होता. जर मी त्या दिवसांपर्यंत जिवंत राहू शकलो असतो, जेव्हा तुमच्या जमातीतील लोक तुम्हाला देशत्याग करावयास भाग पाडतील.” पैगंबर (स.) यांनी विचारले, “काय हे लोक मला देशाबाहेर काढतील?” वर्का म्हणाले, “होय, तुमच्यावर जे अवतरले आहे ते ज्यांच्या-ज्यांच्यावर अवतरते, जग त्यांचे विरोधी होते. जर मी त्या काळापर्यंत जगलो तर तुम्हाला जरूर मदत करीन.” यानंतर वर्कांचा लवकरच मृत्यु झाला. खदीज (रजि.)यांना कळून चुकले की आदरणीय मुहम्मद (स.) यांना पैगंबर म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
त्यांनी त्वरीत इस्लाम धर्म स्वीकारला. सर्व इस्लामी ग्रंथ या गोष्टीची पुष्टी करतात की माननीय खदीजा (रजि.) या इस्लामचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या महिला अनुयायी (सहाबीया) आहेत. पैगंबरांशी विवाहानंतर खदीजा (रजि.) या २५ वर्षे जगल्या. कुरआन अवतरल्यानंतर नऊ वर्षे त्या जगल्या. या काळात त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आत्मिक संघर्षाला हसत हसत साथ दिली व तो सहन करीत पैगंबरांच्या जीवलग व त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या पत्नी सिद्ध झाल्या.
माननीय खदीजा (रजि.) यांनी इस्लाम स्वीकारताच त्यांच्या नातेवाईकांमध्ये इस्लामचे आकर्षण वाढले. तरूणात माननीय अली (रजि.) व वयस्कांमध्ये माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.), जैद बिन हारिसा (रजि.) इत्यादींनी इस्लाम स्वीकारला. तदनंतर हळूहळू अनेक लोक या धर्मात प्रविष्ट होऊ लागले. इस्लामच्या या विस्ताराने माननीय खदीजा (रजि.) आनंदित झाल्या. आपल्या जवळच्या तसेच दूरच्या गैरमुस्लिम नातेवाईकांच्या टीकेची पर्वा न करता त्यांनी पैगंबरांना धर्मप्रचारात मदत केली. त्यांनी आपली सर्व संपत्ती इस्लामला अर्पण केली. त्यातून अनाथ व विधवा यांची देखभाल, निराधारांना मदत, गरजूंना सहाय्य दिले गेले.
इकडे कुरैश लोक नवमुस्लिमांवर अत्याचार करू लागले व इस्लामच्या प्रचारात अडथळे निर्माण करू लागले. त्यांनी पैगंबर व त्यांच्या अनुयायांना छळण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
भाग ४
जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) काफिरांच्या मूर्ख बडबडीने त्रस्त होत तेव्हा खदिजा (रजि.) त्यांना समजावत, “हे पैगंबर आपण दु:खी होऊ नका. आजपर्यंत एकही पैगंबर असा झाला नाही ज्याची लोकांनी टर उडविली नसेल.” हे ऐवूâन पैगंबरांची नाराजगी दूर होत असे. अशा प्रकारे या दु:खदायी काळात खदीजा (रजि.) या पैगंबराच्या समविचारी व दु:खात केवळ सामीलच नव्हत्या, तर प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांना मदत करीत असत. पैगंबर म्हणत, “मी जेव्हा काफिराची बडबड ऐवूâन खदिजा (रजि.) याला त्याबद्दल सांगत असे तेव्हा त्या मला धीर देत व कोणत्याही दु:खावर त्यांचे समजावणे हे औषधाप्रमाणे काम करी व माझे दु:ख हलके होत असे. त्या काळातील एक व्यापारी एके ठिकाणी म्हणतो, मी एकदा अज्ञानाच्या काळात मक्का येथे माल खरेदीसाठी आलो असता अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब यांच्याकडे थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अब्बास यांच्यासह बाजारात गेलो. काबागृहाजवळून जात असता एक तरूण आकाशाकडे पाहून नंतर काबागृहाकडे तोंड करून उभा राहिला. थोड्या वेळाने पोरगेलासा मुलगा आला, तो ह्या तरूणाजवळ उभा राहिला. थोड्या वेळाने एक स्त्री आली व या दोघांच्या मागे उभी राहिली. तिघांनी नमाज अदा केली व निघून गेले. मी म्हणालो, `अब्बास मला वाटते मक्का शहरात क्रांती होणार आहे.’ ते उत्तरले, “होय, तुला माहीत आहे का हे दोघे कोण आहेत?” – `नाही’, ते उत्तरले. तो तरूण व तो मुलगा, दोघे माझे पुतणे आहेत. ती स्त्री मुहम्मद (स.) यांची पत्नी खदीजा (रजि.) होती. माझा पुतण्या मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की त्यांचा धर्म दिव्य आहे आणि अल्लाहच्या आदेशानेच तो प्रत्येक काम करतो. अजून तर त्या तिघांखेरीज कोणी त्या धर्माचा अनुयायी झालेला नाही. मला वाटले चौथा अनुयायी मी झालो तर किती बरे होईल!”
भाग ५
वरील उदाहरणावरून दिसून येते की खदीजा (रजि.) यांच्या या प्रेम, सहानुभूती, त्याग इ. गुणांमुळे पैगंबराचे त्यांच्यावर अमर्याद प्रेम होते. त्या जिवंत असेपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. माननीय खदीजा (रजि.) मुलाचे पोषण आणि घरातील कामकाजदेखील उत्तमरित्या करत असत. संपत्ती व ऐशआराम असूनदेखील त्या पैगंबरांची सेवा स्वत: करीत असत. उदा. पैगंबरासाठी काही ताटात घेऊन त्या येत असताना जिब्रिल (अ.) तेथे पोहचले. त्यांनी सांगितले, “पैगंबर त्यांना माझा आणि अल्लाहचा सलाम सांगा. खदीजा (रजि.) ची पैगंबरांवर एवढी श्रद्धा होती की पैगंबरी मिळण्याआधी व नंतरच्या काळात पैगंबराच्या प्रत्येक वचनावर त्यांनी श्रद्धा ठेवली. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांची खूप स्तुती करीत असत. पैगंबरी मिळाल्यावर सात वर्षानंतर कुरैशांनी अबू तालिबच्या घराला वाळीत टाकले त्या वेळीदेखील खदीजा (रजि.) त्यांच्यासोबत होत्या. तीन वर्षापर्यंत त्यांनी हा वनवास सहन केला. त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले. ११ रमजान १० नबवी वर्ष हा तो दिवस होता. त्या वेळी खदीजा (रजि.) ६५ वर्षाच्या होत्या.
भाग ६
पैगंबरांना त्यांच्या निधनाने धक्का बसला ते नेहमी नाराज असत त्यानंतर माननीय सौदा (रजि.) त्यांचा विवाह झाला. खुदीजा (रजि.) यांना ते कधी विसरू शकले नाहीत. जेव्हा ते कुर्बानी करीत तेव्हा खुदीजा (रजि.) यांच्या मैत्रिणींना अगोदर त्यातील हिस्सा पोहोचता करीत. खुदीजा (रजि.) यांचा कोणी नातेवाईक त्यांच्याकडे आला तर त्याचे आदरातिथ्य करीत.
खदीजा (रजि.) यांची स्तुती केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत व घरात प्रवेश करतानाही खुदीजा (रजि.) यांची स्तुती करीत. माननीय आएशा (रजि.) यांनी एकदा इर्षेने विचारले, “पैगंबर (स.)! ती विधवा व म्हातारी स्त्री होती, अल्लाहने त्यांच्यापेक्षा चांगली पत्नी तुम्हाला दिली आहे.” ऐवूâन पैगंबरांना राग आला. म्हणाले, “अल्लाहशपथ! मला खदीजा (रजि.) पेक्षा चांगली पत्नी मिळाली नाही. जेव्हा सगळे काफीर होते त्यांनी इस्लाम स्वीकारला. सगळ्यांनी मला खोटे ठरविले तेव्हा त्यांनीच मला पाठिंबा दिला. आपली सगळी संपत्ती मला अर्पिली.” आएशा (रजि.) यांनी घाबरुन निश्चय केला की, “इथून पुढे मी खदीजा (रजि.) यांना भलेबुरे म्हणणार नाही.”
खदीजा (रजि.) कडून एवूâण सहा अपत्ये पैगंबरांना झाली. पहिले कासीम (रजि.) ते लगेच वारले. मग जैनब (रजि.), अब्दुल्लाह (रजि.) तेही बालपणीच वारले. त्यानंतर रुकय्या (रजि.), उम्मे कुलसुम (रजि.), फातेमा तुज्जोहरा (रजि.) ही मुले जन्मली.
0 Comments