या दुसरे खलीफा उमर (रजि.) यांची कन्या होत्या. माननीय हफ्सा (रजि.) पैगंबरी जाहीर होण्याच्या ५ वर्ष आधी जन्मल्या होत्या. त्यांचे लग्न माननीय कैनस बिन खिदाफा (रजि.) यांच्याशी झाले होते. ते बनी सहम या कबिल्याचे होते. त्यांनी हफ्सा (रजि.) सह इस्लाम धर्म स्वीकारला होता. माननीय कनैस (रजि.) नबूवत ६ मध्ये हब्शा येथे स्थलांतर करून गेले. पैगंबरांच्या स्थलांतरापूर्वी ते मक्का येथे आले व त्यांच्यासह स्थलांतर करून मदीना येथे गेले.
माननीय कनैस (रजि.) सत्यमार्गाचे वीर पराक्रमी शिपाई होते. हिजरी सन २ मध्ये झालेल्या बदरच्या युद्धात ते फार उत्साहाने सामील झाले होते. हिजरी सन ३ मध्ये उहुदच्या युद्धात त्यांनी पराक्रम केला व जखमी झाले. त्यांना मदीना येथे आणले गेले, परंतु त्यांचा तेथे मृत्यू झाला. इद्दत (चार महिने दहा दिवस)चा काळ संपल्यावर उमर फारूख (रजि.) यांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागली. एकदा एकांतात पैगंबर (स.) यांनी अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्याशी हफ्सा (रजि.)चा उल्लेख केला. माननीय अबू बकर (रजि.) यांना उमर (रजि.)यांना आपल्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते गप्प राहिले तेव्हा उमर (रजि.) उस्मान (रजि.)कडे गेले. त्यांच्या पत्नी रुकय्या (रजि.) हिचे निधन झाले होते. त्यांच्यापुढेही तोच प्रस्ताव ठेवला. उस्मान (रजि.) यांनी नकार दिला. उमर (रजि.) शेवटी पैगंबर (स.)यांच्याकडे गेले व सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, “अबू बकर (रजि.) व उस्मान (रजि.) पेक्षा श्रेष्ठ माणसाशी हफ्सा (रजि.)चा विवाह का होऊ नये?” त्यानंतर त्यांचा विवाह पैगंबरांशी झाला.
बुखारी यांनी लिहिलेल्या हदीशीनुसार, हफ्शा (रजि.) या स्वभावाने कडक होत्या. प्रसंगी त्या पैगंबर (स.) यांना सुद्धा निर्भीडपणे उत्तरे देत. एके दिवशी पिता उमर (रजि.) यांना ही गोष्ट कळली. त्यांनी आपल्या मुलीला विचारले, “तू पैगंबर (स.) यांना बरोबरीच्या नात्याने उत्तरे देतेस? हे बरोबर आहे का?” तेव्हा त्या उत्तरल्या, “होय? मी असे बोलते.” तेव्हा उमर (रजि.) म्हणाले, “बेटी अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळग.”
हफ्शा (रजि.) या पैगंबरांशी देखील प्रत्येक अडचणीबदल बोलताना निर्भीड असत. त्यांचा स्वभाव कडक असूनही हफ्सा (रजि.) या धर्मपरायण व ईशपरायण होत्या. एकदा जिब्रिल (अ.) पैगंबरांसमोर हफ्सा (रजि.) विषयी म्हणाले, (त्या फार उपासना करणाऱ्या व रोजे ठेवणाऱ्या आहेत) “हे मुहम्मद (स.) त्या स्वर्गात देखील तुमच्याबरोबर राहतील.”
पैगंबर (स.) यांनी हफ्सा (रजि.) यांच्या शिक्षणाची खास व्यवस्था केली होती. शिफा बिन्ते अब्दुल्लाह (रजि.) यांनी त्यांना लिहिणे शिकविले. तसे मुंगी चावल्यावर म्हणायचा मंत्रही शिकविला. पैगंबरांनी कुरआनच्या पानांचा संग्रह करून हफ्सा (रजि.) यांच्याजवळ ठेवला होता. पैगंबर (स.) यांच्या निधनानंतरही त्या आयुष्यभर त्यांच्याच घरी राहिल्या. मदीना येथे वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मदीनाचे गव्हर्नर मरवान यांनी जनजाच्या नमाजचे नेतृत्व केले. मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र केले व गाबा येथील आपल्या मिळकतीचा ट्रस्ट करण्यास आपला भाऊ अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांना सांगितले व अशा तऱ्हेने आपली संपत्ती त्यांनी वाटून टाकली.
0 Comments