`अल्लाहचा सच्चा दास नेहमीच अल्लाहच्या अभयछत्राची आशा बाळगतो. तो आपल्या अहंकार आणि स्वैर अभिलाषांच्या विलोभणीय बाहूपाशात अडकून पडण्याच्या कुपरिणामांची तीव्र जाणीव ठेवतो आणि त्याला याचीही जाणीव असते की, अल्लाह ज्याला सत्यमार्ग दाखवितो त्यास कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि जर अल्लाहनेच एखाद्यास मार्गभ्रष्ट केले तर मग त्यास कोणीही सत्यमार्ग दाखवू शकत नाही’. हा मजकूर मुळात आज्ञाधारक दास अल्लाहचा आश्रय का घेतो हे दर्शवितो. अल्लाहने प्रदान केलेल्या अनुग्रहांपैकी सत्य मार्गदर्शन हा त्याचा सर्वांत महान अनुग्रह होय आणि याची माणसाला सर्वांत जास्त गरज आहे. कारण जर माणसाला सत्यमार्गाची ओळख नसेल तर तो सत्यमार्गावर चालू शकत नाही. यावर ईह आणि परलोकी जीवनाचे यश अवलंबून आहे. हे मार्गदर्शन अल्लाहने कुरआनच्या माध्यमाने मानवजातीस प्रदान केले आहे. म्हणून जे लोक पैगंबरांवर (अ.) ईमान धारण करतात आणि अल्लाहने प्रदान केलेल्या या मार्गाचा अवलंब करतात आणि ईशमार्गापासून रोखणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा ईशमदतीच्या आधारे मुकाबला करतात, ते निश्चितच अल्लाहच्या अभयछत्रात येण्याची कामना करतात. ते सत्यमार्ग प्राप्त करतात आणि त्यावर चालून आपल्या पालनकर्त्याची भेट घेतील. याउलट ज्यांनी अल्लाहच्या अभयछत्राची कामना न करता जीवनाची वाटचाल केली, ते निश्चितच दुष्ट प्रवृत्तीच्या मोहपाशात अडकून आपले जीवन उद्ध्वस्त करतात. हे जाणून आज्ञाधारक दास स्वत:ला ईशहवाली करून टाकतो आणि शैतानाच्या व मनोकामनांच्या अरिष्टांपासून अल्लाहचा आश्रय मागतो.
आम्ही अल्लाहचा आश्रय मागतो
संबंधित पोस्ट
0 Comments