तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, “(नेहमी) सत्य बोला.” हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, “कर्मांची भिस्त कशावर आहे?” नंतर पैगंबर (स.) यांनी आपली जीभ पकडून सांगितले, “याला आपल्या काबूत ठेवा.” (हदीस : तिर्मिजी, इब्नेमाजा, मुसनद अहमद)
आणखी एके ठिकाणी म्हटले,
“जी व्यक्ती मला मुख आणि गुप्तांगाच्या (वाईट बोलण्यापासून आणि व्यभिचारी कर्मांपासून) संरक्षणाची हमी देईल, त्यास मी स्वर्ग-प्रवेशाची हमी देतो.” (हदीस : तिर्मिजी, इब्ने माजा, मुसनद अहमद)
आणखी एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
“जी व्यक्ती अल्लाहवर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवते, तिने फक्त सत्यच बोलावे अन्यथा गप्प बसावे.” (हदीस : बुखारी, मुस्लिम)
वास्तविकता अशी आहे की, अल्लाहच्या आणि मानवाच्या हक्कांची जितकी अधिक पायमल्ली मुखावाटे होते, अन्य अवयवाद्वारे क्वचितच होते आणि कधी कधी मनुष्याला याचे ज्ञान नसते. भांडण-तंट्याची सुरवात जिभेनेच होते. जेव्हा आम्ही कमी बोलू, विचारांति बोलू, अपराधात्मक बोलणार नाही आणि तोंडाद्वारा इतराना दु:ख देणार नाही आणि नेहमी भले व सत्य बोलू तेव्हाच घरातील व बाहेरील जीवन आनंददायी बनेल.
0 Comments