आपण म्हणतो की इस्लाम स्वीकारल्यास मनुष्य मुस्लिम बनतो. प्रश्न असा आहे की इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ काय आहे?काय इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की माणसाने केवळ जिभेने सांगावे की मी मुस्लिम आहे अथवा मुस्लिम झालो आहे, तर काय तो मुस्लिम होतो? अथवा इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण पुजारी काहीही अर्थ न समजता उमजता संस्कृतच्या काही मंत्रांचे पठण करतो, तसेच एका मनुष्याने अरबी भाषेतील काही वाक्ये अर्थबोध न होता जिभेने उच्चारले आणि बस्स, तो मुस्लिम झाला? तुम्ही स्वत: सांगा की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही स्वत: म्हणाल की इस्लामचा स्वीकार करण्याचा अर्थ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जी शिकवण दिली आहे तिचा माणसाने समजून उमजून मनापासून स्वीकार करावा आणि त्यानुसार कृती करावी. जो असे करील तो मुस्लिम आहे आणि जो असे करणार नाही तो मुस्लिम नाही.
प्रथम आवश्यकता – ज्ञान
जे उत्तर तुम्ही द्याल त्यावरून आपोआपच हे स्पष्ट होते की इस्लाम प्रथमत: ज्ञानाचे नाव आहे आणि ज्ञानानंतर कर्म अथवा कृतीचे नाव आहे. एखादा मनुष्य ज्ञानाशिवायसुद्धा ब्राह्मण असू शकतो, कारण त्याचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला आहे आणि तो ब्राह्मणच राहील. एखादा मनुष्य ज्ञान नसतानाही जाट असू शकतो, कारण तो जाट म्हणून जन्मला आहे आणि तो जाटच राहील. परंतु एखादा मनुष्य ज्ञानाशिवाय मुस्लिम असू शकत नाही कारण मुस्लिम जन्मत: मुस्लिम असत नाही तर तो ज्ञानाने मुस्लिम बनतो. जोपर्यंत त्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणती शिकवण दिली आहे हेज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तो त्यावर ईमान धारण कसे करू शकेल? आणि त्यानुसार कसे कर्म करू शकेल? आणि जर त्याने समजून उमजून ईमान धारण केले नसेल तर तो कसा मुस्लिम होऊ शकेल? म्हणून अज्ञानासह मुस्लिम असणे आणि मुस्लिम म्हणून राहणे अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य ज्याने मुस्लिमाच्या घरी जन्म घेतला आहे, ज्याचे नाव मुस्लिमासारखे आहे, जो मुस्लिमासारखे वस्त्र परिधान करतो आणि जो स्वत:ला मुस्लिम म्हणवितो, वास्तविकत: तो मुस्लिम नाही. खऱ्या अर्थाने मुस्लिम तर केवळ तो मनुष्य आहे जो इस्लामचे ज्ञान बाळगतो आणि समजून उमजून त्याला मानतो. एक अनेकेश्वरवादी व एक मुस्लिमात मौलिक अंतर नावाचे नाही. तो रामप्रसाद आहे आणि हा अब्दुल्लाह आहे, म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम. अशाप्रकारे एक अनेकेश्वरवादी व एका मुस्लिमात मौलिक फरक पोषाखाचासुद्धा नाही की तो धोतर नेसतो आणि हा विजार घालतो म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम! तर मूळ फरक या दोहोंमध्ये ज्ञानाचा आहे. तो अनेकेश्वरवादी अशासाठी आहे की त्याला माहीत नाही की अल्लाहचा त्याच्याशी व त्याचा अल्लाहशी काय संबंध आहे? त्याला माहीत नाही की सृजनकर्त्याच्या इच्छेनुसार या जगात जीवन व्यतीत करण्याचा सरळमार्ग कोणता आहे? अशीच स्थिती एखाद्या मुस्लिमाच्या मुलाचीसुद्धा असेल, तर तुम्हीच सांगा की त्याच्यात आणि एक अनेकेश्वरवाद्यामध्ये कोणत्या आधारे फरक कराल आणि म्हणाल की तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम आहे?
बंधुनो! हे मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत मनाने यावर विचार करा. हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे की अल्लाहची ही सर्वांत मोठी देणगी आहे ज्यावर तुम्ही आभार व कृतज्ञता व्यक्त करता ती प्राप्त होणे अथवा प्राप्त न होणे, हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान नसेल तर ही देणगी त्याला प्राप्तच होऊ शकत नाही. समजा थोडी बहुत प्राप्तसुद्धा झाली तर अज्ञानामुळे सदैव ही भीती असते की ही वैभवशाली देणगी त्याच्या हातातून निसटून जाईल. केवळ अज्ञानामुळे तो स्वत:ला मुस्लिम समजत राहील, वास्तविकत: तो मुस्लिम नसेल. ज्या माणसाला ही जाणीवच नसेल की इस्लाम व अनेकेश्वरवादात काय फरक आहे आणि इस्लाम व बहुदेववादात काय अंतर आहे, त्याची स्थिती तर अगदी अशी आहे जणू एखादा मनुष्य अंधारात एखाद्या पायवाटेवरून चालत आहे. सरळ रेषेवर चालता चालता स्वत: त्याचे पाय एखाद्या अन्य मार्गाकडे वळणे शक्य आहे आणि त्याला सरळ मार्गावरून भटकल्याची कल्पनासुद्धा येत नाही. असेसुद्धा शक्य आहे की मार्गात एखादा धोकेबाज उभा असेल आणि त्याने म्हणावे की तुम्ही अंधारात मार्गावरून भटकला आहात, या मी तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचवितो. बिचारा अंधारातून प्रवास करणारा स्वत:च्या डोळ्याने पाहू शकत नाही की सरळमार्ग कोणता आहे. म्हणून तो अज्ञानाने आपला हात त्या धोकेबाजाच्या हातात देईल आणि तो त्याला मार्गभ्रष्ट करून कोठल्या कोठे घेऊन जाईल. त्या माणसाला या अडचणी तर अशासाठी येतात की त्याच्या स्वत:जवळ कोणताही प्रकाश नाही आणि तो स्वत: आपल्या मार्गावरील खुणा पाहू शकत नाही. त्याच्याजवळ प्रकाश असता तर हे स्पष्ट आहे की तो मार्गही चुकला नसता आणि त्याला दुसरा कोणी मार्गभ्रष्टही करू शकला नसता. बस्स! याच्यावरूनच कल्पना करा की मुस्लिमासाठी सर्वांत मोठा जर कोणता धोका असेल तर हाच आहे की तो स्वत: इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ आहे, स्वत:ला हे माहीत नाही की पवित्र कुरआन काय शिकवितो आणि प्रेषित मुहम्मद (स.) कोणता आदेश देऊन गेले आहेत? या अज्ञानामुळेच तो स्वत:ही मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि दुसरे धोकेबाजसुद्धा त्याला मार्गभ्रष्टकरू शकतील. परंतु त्याच्यापाशी ज्ञानाचा प्रकाश असेल तर तो जीवनाच्या प्रत्येक पावलावर इस्लामचा सरळमार्ग पाहू शकेल, प्रत्येक पावलावर अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, मार्गभ्रष्टता, दुष्कृत्य आणि दुराचाराचे जे वक्र-मार्ग मध्ये येतील ते ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहू शकेल, जो कोणी मार्गभ्रष्ट करणारा रस्त्यात त्याला आढळेल त्याचे ऐवूâनच तो या निष्कर्षाप्रत पोहचेल की हा मनुष्य मार्गभ्रष्ट करणारा आहे, याचे अनुयायित्व स्वीकारणे चुकीचे आहे.
0 Comments