‘हिजरत’ (मदीना स्थलांतर) च्या सहाव्या वर्षाच्या शेवटी घडलेल्या एका महत्त्वाच्या घटणेकडे वाचकांचे लक्ष आम्ही वेधत आहोत. या घटनेचे इस्लामी आंदोलनावर अतिशय दूरगामी परिणाम झालेले आहेत.
त्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) यांना एक असे स्वप्न पडले की, ते आपल्या काही सोबत्यांना घेऊन शांतीपूर्वक मक्केस गेले आणि उमरा (काबादर्शन) केला. या स्वप्नाचा त्यांनी आपल्या सोबत्यांसमोर उल्लेख करताच सर्वांच्या मनात ‘उमरा’ (काबादर्शन) करण्याची तीव्र कामना निर्माण झाली.
शेवटी एके दिवशी म्हणजेच हिजरी सन सहामध्ये ‘जीकादा’ महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरबानीसाठी काही उंट घेऊन चौदाशे सोबत्यांसह मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषितांसह सर्वांनीच केवळ रक्षणात्मक हत्यार सोबत घेतले. मक्कातील कुरैशजणांना आपल्या ‘उमरा’ करण्याच्या उद्देशाची सूचना देण्यासाठी प्रेषितांनी ‘माननीय बिशर बिन सुफियान(र)’ यांना पुढे पाठविले. ‘माननीय बिशर(र)’ मक्कावरून परत आले आणि प्रेषितांना खबर दिली की, ‘कुरैश’ जणांनी प्रेषितांना मक्का शहरात दाखल होण्यास मज्जाव करण्यासाठी लष्कर जमविले असून याच्या तयारीचा भाग म्हणून खालिद बिन वलीद दोनशे स्वारांना घेऊन प्रेषितांशी दोन हात करण्यासाठी ‘गनीम’ या ठिकाणी पोहोचला आहे.
या वार्ता मिळाल्यावर प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपला मार्ग बदलून दुसर्या मार्गाने ‘सनीयतुल मरार’ या स्थानावर पोहोचले. तेथून जवळच ‘हुदैबिया’ नावाची एक विहीर आणि वसती होती. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या सोबत्यांसह येथेच पडाव टाकला. विहिरीत पाणी कमी होते, परंतु ईश्वरी चमत्काराने या विहिरीचे पाणीसुद्धा वाढले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय खिराश(र) यांना मक्कावासीयांशी बोलणी करण्यासाठी पाठविले. परंतु मक्कावासीयांनी त्यांच्याशी बोलणी करण्याऐवजी त्यांची स्वारी असलले उंट ठार केले व त्यांचीदेखील हत्या करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मध्यस्थी केल्यावर मात्र त्यांची हत्या टळली. मग मध्यस्थीसाठी प्रेषितांनी माननीय उस्मान(र) यांना मक्केस पाठविले. माननीय उस्मान(र) यांना परत येण्यास उशीर झाल्याचे पाहून प्रेषितांना वाटले की, कदाचित मक्कावासीयांनी त्यांची हत्या केली आणि ते शोकसागरात बुडाले. सर्वजण चिताग्रस्त झाले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी बाभळीच्या एका झाडाखाली आपल्या सोबत्यांसह प्रतिज्ञा केली की, माननीय उसमान(र) यांच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय येथून हलणारदेखील नाही. सर्वांनी एकमताने प्रेषितांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली. या झाडाचे नाव ‘रिजवान’ असल्यामुळे या प्रतिज्ञाकर्मास इस्लामी इतिहासात ‘बैतुर्रिजवान’ (रिजवान येथील प्रतिज्ञा) या नावाने ओळखले जाते. दिव्य कुरआनात ‘सूरह-ए-फतह’मध्ये या प्रतिज्ञा समारंभात सामील झालेल्यांना ईश्वराची प्रसन्नता लाभल्याची शुभवार्ता देण्यात आली आहे. मक्कामध्ये कुरैशजणांना या बदल्याच्या प्रतिज्ञेची खबर मिळताच ते घाबरले. शेवटी माननीय उस्मान(र) परत आले आणि प्रेषित व त्यांच्या सोबत्यांची चिता दूर होऊन आनंदाचे वातावरण पसरले.
मक्कावरून ‘खुजाआ’ कबिल्याच्या बुदैल बिन वरका या माणसाने हितैषीच्या स्वरुपात आदरणीय प्रेषितांना कुरैशजणांच्या भावना आणि लष्करी तयारी कळविली. उत्तरादाखल प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘आम्ही लढण्याच्या उद्देशाने मुळीच आलो नसून आमचा हेतु केवळ काबादर्शन करण्यचाच आहे.’’ मग प्रेषित मुहम्मद(स) परत म्हणाले, ‘‘कुरैशजण’ सतत लढाया करून खूप कमजोर झाले आहेत. त्यांनी एका ठराविक मुदतीकरिता युद्धबंदीचा आमच्याशी समझोता केल्यास हे त्यांच्या हिताचे ठरेल.’’ बुदैल बिन वरका याने प्रेषितांचा हा संदेश कुरैशजणांना कळविला. ‘कुरैश’च्या इतर काही बड्या नेत्यांसह उरवा बिन मसऊद सखफीनेसुद्धा म्हटले की, ‘‘मुहम्मद(स) यांनी पाठविलेला प्रस्ताव योग्यच आहे. मी स्वतः त्यांची भेट घेतो.’’
उर्वा बिन मसऊद प्रेषितदरबारी हजर झाला आणि प्रेषितांनी त्याच्यासमोरही आपला युद्धबंदी प्रस्ताव बोलून दाखविला. तो प्रेषित आणि त्यांच्या स्नेही सोबत्यांना पाहून खूप प्रभावित झाला. तो कुरैशजणांना जाऊन भेटला आणि म्हणाला, ‘‘हे कुरैशच्या सरदारांनो! मी रोमन सम्राट कैसर आणि पर्शियन सम्राट किसरा आणि ‘नेगूस’ यांच्या दरबारीसुद्धा जाऊन आलो. परंतु यापैकी कोणत्याच सम्राटाचा असा सन्मान करताना मी मुळीच पाहिला नाही, जेवढा सन्मान आणि आदर मुहम्मद(स) यांचे सोबती करतात. हे कुरैशच्या सरदारांनो! मुहम्मद(स) यांनी तुमच्याविषयी कोणतेच अपशब्द काढले नाहीत. त्यांचा संदेश स्वीकार करा!’’
मग मक्केतील ‘कनाना’ कबिल्याचा ‘हुलैस’ हा माणूस आला. त्याला लांबून पाहताच प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘कुरबानीसाठी आणलेल्या उंटांची रांग लावा. हा माणूस कुरबानीसाठी आणलेल्या प्राण्यांचा आदर करतो.’’ हुलैसने कुरबानीच्या उंटांची लांबलाचक रांग पाहताच कुरैशजणांकडे धावत जाऊन म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! मुहम्मद(स) आणि त्यांचे अनुयायी केवळ उमरा (काबादर्शन) करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना यापासून रोखने योग्य ठरणार नाही!’’ कुरैशजणांनी त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याला संताप चढला आणि त्याने स्पष्ट शब्दांत त्यांना ठणकावले की, ‘‘जर तुम्ही प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायांना या पुण्य कर्मांपासून रोखले तर मी आपल्या कबिल्यासह तुमच्यापासून विभक्त होईन!!!’’
शेवटी सुहैल बिन अम्र आले आणि काही वेळ बोलणी झाल्यानंतर समझोत्याच्या अटी निश्चित झाल्या. माननीय अली(र) हे समझोत्याचा करारनामा लिहिण्यासाठी बसले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘‘असीम दयाळू व कृपाळू ईश्वराच्या नावाने’’ लिहिण्यास सांगताच सुहैल बिन अम्र यांनी आक्षेप घेतला की, ‘‘आम्ही रहमान व रहीम (असीम दयाळू व कृपाळू) वर श्रद्धा ठेवीत नाहीत. त्यामुळे अरब समाजात प्रचलित असेलल्या परंपरेनुसार करारपत्र लिहावे.’’ म्हणून माननीय अली(र) यांनी त्याऐवजी ‘‘ईश्वराच्या नावाने’’ ने सुरवात केली. दुसर्या ओळीत दोन्ही पक्षांची नावे लिहिण्यात आली, तेव्हा माननीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नावाचा ‘‘ईश्वराचे प्रेषित’’ असा उल्लेख केला, त्यावर परत सुहैल याने आक्षेप घेताना म्हटले, ‘‘आम्ही जर मुहम्मद(स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकारले असते, तर मग आपल्यात कलह आणि वैर निर्माण होण्याचा प्रश्नच कुठे येतो? म्हणून तुम्ही ‘मुहम्मद बिन अब्दुल्लाह’ असे लिहावे. प्रेषितांनी त्यांची ही अटसुद्धा मान्य केली. या समझोत्याच्या निश्चित झालेल्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
- दहा वर्षांपर्यंत दोन्ही पक्ष आपसात युद्ध करणार नाहीत.
- प्रेषित मुहम्मद(स) यांचे जे सोबती काबादर्शन, ‘हज’ अथवा व्यापार किवा इतर कोणत्याही हेतुस्तव मक्का शहरात येतील त्यांच्या प्राण, वित्त आणि अब्रूचे रक्षण व्हावे. त्याचप्रमाणे ‘कुरैश’जणांच्या प्रत्येक व्यक्तीस मदीना शहरातून जाताना प्राण, वित्त व अब्रूचे संरक्षण मिळेल.
- कुरैशजणातील जो मनुष्य रक्षकाशिवाय मुहम्मद(स) कडे येईल त्यास सुरक्षितपणे परत जाता येईल आणि याउलट मुहम्मद(स) च्या अनुयायांपैकी जो मनुष्य ‘कुरैश’जणाकडे जाईल त्याला परत केले जाणार नाही.
- समझोत्यातील जवाबदार्यांमध्ये ज्या माणसास मुहम्मद(स) बरोबर राहावयाचे त्याने त्यांच्याबरोबर राहावे आणि ज्याला कुरैशबरोबर राहावयाचे त्याने कुरैशबरोबर रहावे.
- या वर्षी मुहम्मद(स) उमरा (काबादर्शन) केल्याविनाच परत जातील, मात्र पुढील तीन दिवस तीन रात्रीपर्यंत ते मक्का शहरात राहू शकतील आणि नंतर त्यांना मक्का सोडावे लागेल.
हा समझोता अजून पूर्णही झाला नव्हात, एवढ्यात ‘सुहैल बिन अम्र’चे पुत्र ‘माननीय अबू जुंदल(र)’ साखळदंडासहित कैदेतून बाहेर आले (माननीय अबू जुंदल(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला असल्याने कुरैशजणांनी त्यांना साखळदंडाने बांधून कैद केले होते.) ‘सुहैल’ त्यांना पाहताच म्हणाले की,
‘‘समझोता कराराच्या अट क्र. तीनप्रमाणे या माणसास आमच्या स्वाधीन करावे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘अजून तर करारपत्र लिहूनही झाले नाही.’’ ‘‘अशा प्रकारे तर कोणत्याही अटीवर करार पूर्ण होऊ शकणार नाही.’’ सुहैल उत्तरले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दुःखाचे घोट गिळत मोठ्या संयमाने ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना शत्रूच्या स्वाधीन केले आणि ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांचे सांत्वन करीत दुःखद स्वरात म्हणाले, ‘‘ईश्वर तुमच्या मुक्तीचा मार्ग अवश्य काढेल.’’ ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना आपल्या हाताने शत्रूच्या विळख्यात देताना प्रेषितांच्या अनुयायांचे दुःख अनावर झाले. त्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटत होता आणि ‘माननीय उमर(र)’ यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘‘आपण सत्यमार्गावर आहात काय? आणि असल्यास शत्रूसमोर आपण एवढे नमते कशासाठी घ्यायेच?’’
‘‘मी ईश्वराचा सच्चा प्रेषित आहे. त्याच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही!’’ प्रेषितांनी शांत स्वरात ‘माननीय उमर(र)’ यांना उत्तर दिले.
समझोतापत्र तयार झाल्यावर रिवाजानुसार प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना शीरमुंडनाचा आदेश दिला. परंतु मुस्लिमांमध्ये एवढा संताप होता की कोणीच जागेवरून हलण्याच्या मनःस्थितीतही नव्हते. सर्वजणांवर निराशेचे सावट पसरले होते. या प्रसंगी माननीय उम्मे सलमा(र) यांनी आपले अवसान एकवटून गहिवरल्या स्वरात प्रेषितांना म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! हा समझोता मुस्लिमांसाठी असह्य होत आहे. तुम्ही यांना काहीही म्हणू नका, स्वतःच कुरबानी करून स्वतःचे शीर मुंडन करावे. आपले सर्व अनुयायी आपले अनुकरण करण्यास्तव शीर मुंडन करतील.’’
आणि नेमके असेच घडले. दोन आठवडे थांबल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या चौदाशे सवंगड्यांसह हुदैबियावरून कूच केले. रस्त्यात दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-फतह’ अवतरली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांना जमवून या ‘सूरह’ मधील ईश्वराचा संदेश ऐकविला की ‘हुदैबिया’चा तह हाच आपला स्पष्ट विजय होय!’’ ही ईशवाणी ऐकताच सर्वांनी आश्चर्यचकित होऊन प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! खरंच हा विजय आहे?’’ ‘‘त्या पवित्र ईश्वराची शपथ की, ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहे! निश्चितच हा शानदार विजय आहे! प्रेषित गंभीरपणे उत्तरले. इतिहासात पुढे घडणार्या घटनेवरून हे सिद्ध झाले की, हीच घटना पुढे चालून इस्लामप्रचार, शत्रूवर विजय आणि मक्काविजयाची मुख्य आधारशिला ठरली.
0 Comments