पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे… ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे… अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.
0 Comments