सशस्त्र जिहाद मग तो बचावात्मक अथवा सकारात्मक असो स्वच्छंदपणे करता येत नाही. काही अटींअंतर्गतच त्यास परवानगी दिली आहे. अटींची पूर्तता केल्यानंतरच या जिहादला धर्ममान्यता असते. अटीविना याचे महत्त्व नाही. हा मुळात जिहादच नाही. अल्लाहची अप्रसन्नता या जिहादमुळे पदरी पडते.
सशस्त्र जिहादच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र आणि स्वावलंबी मुस्लिम व्यक्तीच या जिहादसाठी पात्र आहे आणि अमीरच्या (प्रमुख) नेतृत्वात जिहादला मान्यता आहे. सामाजिक व्यवस्थेशिवाय (शासनव्यवस्था) आणि प्रमुखाविना (अमीर) जिहाद अयोग्य आहे. बचावात्मक जिहादसाठीसुध्दा ही अट आहे. मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वास्तव्य प्रारंभी असताना ही अट पूर्ण होत नव्हती म्हणून तर जिहादची परवानगी दिली गेली नाही. त्या काळी कुरैश समुदायाचे प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींवर अत्याचार परम सीमेला पोहचले होते आणि ते इस्लाम प्रचारकार्य गुप्तपणे करीत होते. त्यांनी मदीना शहरी स्थलांतर केल्यानंतर तेथे ते स्वतंत्रपणे आपले कार्य करीत होते आणि तेथे एक स्वतंत्र इस्लामी व्यवस्था स्थापित झाली होती, तेव्हाच जिहादची अनुमती दिली गेली. स्वतः प्रेषित तत्कालिन इस्लामी शासनव्यवस्थेचे अमीर (प्रमुख) होते. हीच परिस्थिती इतर प्रेषितांचीसुध्दा होती.
२) पुरेसे सैन्यबळ आणि सामरिकबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. शत्रुविरुध्द युध्द (सशस्त्र जिहाद) अन्यथा अयोग्य ठरते. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘कुणावरही त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे टाकू नये.’’ (कुरआन २: २३५)
याच तत्त्वांवर कुरआनमध्ये दिव्यादेश आहे,
‘‘तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्यावरील अल्लाहचे कर्तव्य पार पाडत जा.’’ (कुरआन ४: १६)
३) जिहाद फक्त आणि फक्त अल्लाहसाठीच पाहिजे आणि त्याचा एकमेव उद्देश धर्माची सेवा करणे आणि अल्लाहची प्रशंसा आहे. जिहादीचा एकमेव उद्देश दुराचाराचे निराकरण आणि सदाचाराचा फैलाव करणे आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच जिहाद केला जातो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उद्देश या पवित्र युध्दाचा नसावा. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले गेले की वेगवेगळ्या उद्देशाला समोर ठेवून लोक युध्द करीत आहेत. कोणी धनसंपत्तीसाठी, कोणी नावासाठी, कोणी देशासाठी, कुणाचे युध्द जिहाद आहे? यावर प्रेषितांनी उत्तर दिले,
‘‘जो अल्लाहच्या नावाचा महिमासाठी युध्द करतो त्याचेच युध्द हे अल्लाहसाठी असते.’’ (मुस्लिम, बुखारी)
दुसऱ्या एका प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की, ‘‘जर एखाद्याने अल्लाहसाठी संघर्ष करण्याचे ठरविले परंतु त्याबरोबर ऐहिक फायदे मिळण्याची इच्छासुध्दा आहे, तर अशासाठी आपले काय मत आहे?’’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘त्याला काहीही मोबदला मिळणार नाही.’’ (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी खालील तत्त्व मांडले,
‘‘जो कोणी आपली पूर्वग्रहदूषितता ठेवून संघर्ष करीत असेल तर तो आपल्यातला नाही. तसेच जर कोणी पूर्वग्रहदूषिततेसाठी मरण पावला तर तोसुध्दा आपल्यापैकी नाही.’’ (अबु दाऊद)
वरील दोन अटी या अगदी स्पष्ट आहेत परंतु तिसऱ्या अटीसंदर्भात थोडा खुलासा आवश्यक आहे. इस्लाममध्ये दुराचाराचा नायनाट करण्यासाठी जिहादची आवश्यकता सांगितली आहे. दुराचाराचा नायनाट आणि सदाचाराला प्रस्थापित करणे हा जिहादचा उद्देश आहे. अल्लाहची उपासना आणि सदाचाराचा फैलाव काय दुराचारी माणसांपासून अपेक्षित आहे की त्यासाठी संघर्ष ते करतील? कधीही नाही. या परिस्थितीत एक दुष्प्रवृत्तीचा अथवा दुराचारांचा नाश करून दुसरे दुराचार अथवा दुष्प्रवृत्ती पहिल्याची जागा घेईल. ही प्रवृत्ती इस्लामला लाभदायक मुळीच नाही तर ती हानीकारक आहे. ते इस्लामच्या नावाखाली हा दुष्प्रवृत्त खेळ खेळतील तर परिणामतः लोक इस्लामपासून दूर जातील.
0 Comments