एकेकाळी म्हणजे रशिया येथील झार बादशाहांच्या सत्तेपूर्वी समरकंद नामक एक लहानसा देश होता. त्यावर मुस्लिम सैन्यांनी चढाई करून ते जिंकले होते. त्या वेळी तिथे एक रहस्यमय धर्माचे लोक राहात होते. आपल्या देशावर मुस्लिम सैन्यांनी हल्ला करून काबिज केल्याने ते दुःखी आणि रागावले होते. त्यांनी आपसात ठरवले की आपल्याकडील एका प्रतिनिधीला दमास्कस येथील मुस्लिम राजवटीचे अमीर-उल-मोमिनीन यांच्याकडे पाठवून त्यांना विनंती करावी. मुस्लिम लष्कराने आम्हाला अंधारात ठेवून कसा आमचा देश काबिज केला याची त्यांना माहिती देऊ.
यासाठी त्यांनी आपला प्रतिनिधी दमास्कसला पाठवला. त्याला अशी चिंता लागली की त्या मुस्लिम जगताचे सर्वेसर्वा अमीर-उल-मोमिनीनकडे जायचे कसे? त्याआधी त्यांचे अधिराज्य आशिया, आफ्रिका, यूरोप खंडांमध्ये होते. अशा अधिपती शासनकर्त्याकडे जायची त्याला भीती वाटू लागली. बऱ्याच खोट्या गोष्टी त्या वेळी त्या राजवटीबाबत प्रसिद्ध होत्या. लहानसहान चुकांना माफ केले जात नाही. त्यांना न आवडणारी गोष्ट जरी त्यांच्यासमोर कुणी बोलली तरी त्याला शिक्षा दिली जात असे. तो या गोष्टींमुळे विचलित आणि भयभीत अवस्थेतच कसाबसा दमास्कस येथे पोहोचल्यावर शहराच्या अलीशान इमारती पाहताच त्याच्यावर आणखीनच धाक बसला. चालता चालता एका भव्यदिव्य इमारतीसमोर जाऊन उभा राहिला. लोक त्या इमारतीतून बाहेर पडत होते, तर काही लोक आतमध्ये जात होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. तो प्रतिनिधी त्या इमारतीला राजाचा महाल समजत होता. पण इतक्यात भव्या इमारतीवर कुणाचा पहारा नसल्याचे त्याला दिसले. लोक स्वतंत्रपणे ये-जा करत होते. हे पाहून तो अचंबित झाला.
त्या लोकांमधून तोही चालू लागला. काय करावे त्याला सुचत नव्हते. एका अनोळखी इसमानं त्याला विचारलं, “काय हवंय? का आलात? कोण तुम्ही?”
याचं त्याने लगेच उत्तर दिलं, “मला खलीफांना भेटायचे आहे.”
एवढं सांगून तो स्वत:च घाबरू लागला. आपल्याकडून काही चुकलं की काय खलीफांचं नाव आदराणं म्हणायचं होतं की काय? अशा विचारांनी भिऊ लागला.
यावर तेथील माणसानं त्याला विचारलं, “मी तुला त्यांचं घर दाखवलं तर तुला आवडेल का?”
तो प्रतिनिधी म्हणाला, “म्हणजे हा त्यांचा महाल नाही वाटतं!”
“नाही, ही तर मशीद आहे. तुम्ही नमाज अदा केली का?” त्या अनोळखी व्यक्तीनं विचारलं.
तो प्रतिनिधी म्हणाला, “नाही. मला नमाज काय असते याची कल्पना नाही.”
यावर त्या अनोळखी माणसानं त्याच्या धर्माविषयी विचारलं. तो प्रतिनिधी म्हणाला, “मी समरकंदच्या काहिन पुरोहित लोकांच्या धर्माचं पालन करतो. ते सांगतात तसं करतो. धर्म काय असतो आणि काय नसतो याची मला कल्पना नाही.”
“तुमचा विधाता पालनकर्ता कोण?”
असं विचारल्यावर त्या प्रतिनिधीनं उत्तर दिलं, “समरकंद येथील धर्मस्थळातील भयभित करणारे देवता.”
“मग तुम्ही काही मागितल्यावर ते देतात काय आणि आजारी प़डल्यावर बरे करतात काय?”
प्रतिनिधी म्हणाला, “मला काहीही माहीत नाही.”
यावर त्या अनोळखी माणसानं समरकंदच्या त्या रहिवाशाला इस्लामविषयी सर्व माहिती दिली आणि म्हणाला, “चला आता मी तुम्हाला खलीफांचं घर दाखवतो.”
मशिदीच्या दुसऱ्या दरवाजातून ते दोघे बाहेर पडले आणि समोर एक सामान्य माणसाच्या घरासारखं एक घर होतं. समरकंदचा नागरिक म्हणाला, “तुम्ही मला इथं का आणलं? इथं तर ते गृहस्त मातीपासून भिंत बांधण्याचं काम करत आहेत.”
यावर दमास्कसच्या त्या नागरिकानं सांगितलं, “होय. हेच खलीफा आहेत.”
समरकंदचा प्रतिनिधी म्हणाला, “तुम्ही माझी चेष्टा करताय.”
तो माणूस म्हणाला, “नाही. मी अजिबात चेष्टा करत नाही. हेच अमीर-उल-मोमिनीन आहेत.”
दरवाजावर हाक दिल्यावर खलीफा स्वतः बाहेर आले. समरकंदच्या नागरिकाला येण्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं, “आमच्या मर्जीविना मुस्लिम सैन्यानं आमच्या देशावर कबजा केलाय.”
हे ऐकल्यावर खलीफा यांनी एका कागदावर काहीतरी लिहून त्याला दिलं आणि म्हटलं, “हे पत्र तिथल्या राज्यपालांकडे द्या.”
बरेच दिवस चालत तो समरकंदला परतला. त्यानं आपल्या धर्मपंडितांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्वांना विश्वास नव्हता की असे काही घडू शकेल. ते पत्र देण्यासाठी तेथील लोक मशिदीत आले. आणखीन एक माणूस त्या मशिदीत आला. दुवळे व सामान्य माणसासारखे दिसणारे ते काझी होते. त्यांनी ते पत्र वाचलं आणि समरकंदच्या सत्ताधाऱ्यांना वोलाबून घेतले. तिथल्या धर्मपंडितांना आपला अहवाल त्यांच्यासमोर देण्यास सांगण्यात आलं.
तेव्हा ते धर्मपंडित म्हणाले, “यांनी आमच्या देशावर आमची संमती नसताना ताबा घेतला आहे.”
मग काझींनी मुस्लिम सत्ताधिकाऱ्याला विचारलं, “हे सत्य आहे काय?”
त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही. युद्ध धोक्याचेच नाव आहे.”
यावर काझींनी त्यांना विचारलं, “तुम्ही इथल्या लोकांना आधी इस्लाम ध्रम समजावून सांगितला होता काय?”
याचं उत्तर त्यांनी नकारार्थी दिलं.
काझींनी निर्णय दिला की मुस्लिमांनी या देशातून निघून जावे आणि त्यांचा देश त्यांना परत करावा.
नंतर मुस्लिम सैन्य तो देश सोडून बाहेर निघताना पाहून तिथल्या धर्मपंडितांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, “असा जर हा धर्म असेल तर आम्ही तो स्वीकारण्याची घोषणा करतो.”
त्यानंतर तिथले सर्व नागरिक इस्लामी राजवटीत सामील झाले.
(संदर्भ – मासिक ‘जिन्दगी’, दिल्ली, लेखक- शेख अली तनतानवी यांच्या उर्दू भाषांतरावरून)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
0 Comments