Home A प्रेषित A सत्याची मुस्कटदाबी करण्यासाठी हिसात्मक युगाची सुरुवात

सत्याची मुस्कटदाबी करण्यासाठी हिसात्मक युगाची सुरुवात

सत्याचा विरोध करणार्यांकडे असलेले पुरावे नेहमीच पोकळ असतात. त्यांची उद्दिष्टे आणि नियती मुळात खोट्या असतात. त्यांच्यासमोर केवळ एक प्रश्न आणि समस्या असते, ती म्हणजे लोकांना मूर्ख बनवून सत्ता मिळविणे आणि आपला स्वार्थ साधणे होय. म्हणून परिवर्तन आणि क्रांतीची मशाल घेऊन उठल्यास त्यामध्ये ठोस विचारसरणीचे निमंत्रण असावे आणि त्या क्रांतीच्या आंदोलकांमध्ये दृढ आस्था, बुद्धी, उच्च नीतिमत्ता असलेले चारित्र्य असल्यास पोकळ आणि निराधार मुळावर आधारित विरोधकांजवळील सर्व हत्यारे संपून जातात आणि मग ते वैफल्यग्रस्त होऊन अनैतिकरीतीने ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीप्रमाणे काहीही करीत राहतात.
मक्का शहरात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचा सत्यधर्म प्रकट होताच विरोधकांचे मानसिक पीडा देण्याचे कार्य सुरु झाले. विरोधक केवळ मानसिक यातना देण्यावरच समाधानी झाले नसून त्यांनी सत्याची मुस्कटदाबी करण्यासाठी हिसात्मक मार्गाचा अवलंब केला. हिसात्मक युगाची सुरुवात झाली. याच्या काही प्रसंगावर व दृष्यांवर आपण दृष्टी टाकू या.
माननीय खब्बाब(र) यांना त्यांच्या इस्लाम स्वीकारण्यापूर्वी ‘उम्मे अम्मार’ने एका गुलामाच्या (दासाच्या) स्वरुपात खरेदी केले होते. माननीय खब्बाब(र) यांनी इस्लामचा स्वीकार केल्यावर त्यांना जळत्या निखार्यांवर झोपवून त्यांच्या छातीवर एक अडदांड माणूस उभा करण्यात आला. जळत असलेले कोळसे त्यांच्या पाठीतून होणार्या रक्तस्त्रावाने विझले. त्यांच्या पाठीचे मांस जळून खाक झाले. त्यांची पाठ विस्तवाने जळून पांढरी शुभ्र झाली होती. माननीय उमर(र) यांच्या इस्लामी शासनकाळात त्यांनी आपला अंगरखा उचलून दाखविला आणि सांगितले, ‘‘इस्लाम स्वीकारल्यामुळे विरोधकांच्या यातना मला अशा प्रकारे सहन कराव्या लागल्या.’’ पूर्वी ते लोहाराचे अर्थात लोखंडी वस्तू तयार करण्याचे काम करित असत. कुरैश कबिल्याच्या लोकांकडे त्यांच्या कामाच्या बर्याच रकमा होत्या. परंतु इस्लाम स्वीकारल्यामुळे कुरैशांनी त्यांचा पैसा दिला नाही आणि स्पष्टपणे सांगितले, ‘‘जोपर्यंत तू इस्लामचा त्याग करीत नाही. तोपर्यंत तुला एक कवडीदेखील मिळणार नाही. सत्याधिष्ठित आणि इस्लामला आपल्या शरीराचा आत्मा समजणारे माननीय खब्बाब(र) यांनी स्पष्ट शब्दांत खडसावले, ‘‘तुम्ही मरून पुनर्जीवित झाला तरी तुमच्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत.’’
माननीय बिलाल हब्शी(र) हेसुद्धा इस्लामचा कट्टर विरोधक असलेल्या ‘उमैया बिन खल्फ’चे गुलाम (दास) होते. इस्लाम स्वीकारल्यावर त्यांना अमानवी यातना देण्यात येत असत. अरब प्रदेशात सकाळचा सूर्य माथ्यावर येताच तेथील अतिउष्ण वातावरणात त्यांना अतिशय तप्त रेतीवर झोपवून त्यांच्या छातीवर मोठी दगडाची शिला ठेवण्यात येत असे. अशाच अवस्थेत त्यांचा मालक उमैया बिन खल्फ त्यांना बजावून सांगत असे की, ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही! इस्लामचा त्याग कर, अन्यथा अशाच अवस्थेत तडफडून मरशील. परंतु माननीय बिलाल(र) संयमाचे अतिशय तठस्थ पर्वत होते. उत्तरादाखल ते म्हणत, ‘‘अहद! अहद!!’’ (अर्थात ईश्वर एकच आहे.) उमैयाचा संताप अनावर होत असे. रागाच्या अतिरेकाने त्याचा जळफळाट होत आणि तो त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या गळ्यात दोर टाकून शहराच्या खट्याळ मुलांच्या हातात देत आणि त्यांना संपूर्ण शहरात खेचण्यात येत असे, कधी त्यांना प्र्राण्यांच्या चामड्यात शिवून तप्त उन्हात फेकण्यात येत असे तर कधी लोखंडी पोषाखात बांधून दुपारच्या तप्त उन्हात फेकण्यात येत असे. तरीसुद्धा इस्लामवरील त्यांची श्रद्धा कमी होण्याऐवजी वाढतच होती. एकदा माननीय अबू बकर(र) यांनी त्यांना अशा अवस्थेत पाहिले आणि त्यांचा आत्मा कळवळला. त्यांनी माननीय बिलाल(र) यांना त्यांच्या क्रूर मालकाकडून खरेदी करून स्वतंत्र केले.
यापेक्षाही मानवी आत्म्यास बेचैन करणारी कहानी तर माननीय यासिर(र) आणि त्यांच्या परिवारजणांची आहे. माननीय यासिर(र) हे ‘कहतान’चे निवासी होते. काही कामानिमित्त ते ‘मक्का’ शहरी आले होते. येथे त्यांची मैत्री ‘हुजैफा मख्जूमी’ शी झाली आणि शेवटी त्यांनी येथेच लग्नही करून मक्केतच राहायला लागले. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या निमंत्रणावर त्यांनी सहपरिवार इस्लामचा स्वीकार केला आणि विरोधकांच्या अमानुष छळास बळी पडले. विशेषकरून त्यांचे सपुत्र माननीय अम्मार(र) यांच्यावर तर विरोधकांनी मर्यादेपेक्षा जास्त अत्याचार केले. त्यांना तळपत्या रेतीत लोळवून बेदम मारहाण करण्यात येत असे. मार खाता खाता ते बेशुद्ध होत. त्यांच्या मातापित्यांवरसुद्धा अमानवी अत्याचार करण्यात येत असत. कधी पाण्यात बुडवून मारण्यात येत, तर कधी जळत्या कोळशांवर झोपवून मोठा दगड छातीवर ठेवण्यात येत असे. माननीय अम्मार(र) यांची माता माननीय सुमैया(र) यांच्या गुप्तांगावर क्रूर अबू जहलने भाला मारून त्यांचा वध केला. इस्लामसाठी हे पहिले हुतात्मा होते. त्यांचे वडील माननीय यासेर(र) हेसुद्धा अत्याचार सहन करताकरता हुतात्मा झाले. प्रेषित मुहम्मद(स) यांचा गुदर होत असताना त्यांना पाहून प्रेषित मुहम्मद(स) म्हणत, ‘‘तुमच्यासाठी स्वर्गाची खूशखबर आहे.’’ हे ऐकून माननीय अम्मार(र) हर्षोल्हासित होऊन आपल्या सर्व यातनांचा त्यांना विसर पडत असे. जणू जळजळणार्या जखमांवर थंडगार मलम ठेवण्यात यावे.
माननीय सुहैब(र) यांना इतका बेदम चोप देण्यात येत असे की, त्यांची शुद्ध हरपत असे. माननीय अबू फुकैह(र) यांच्या पायात दोरखंड टाकून गरम वाळूवर खेचण्यात येत असे. क्रूरकर्मा ‘उमैया बिन खल्फ’ याने त्यांचा गळा दाबला आणि ते मरता मरता वाचले. एकदा त्यांच्या छातीवर जड दगड ठेवण्यात आला, त्यांची जीभ बाहेर निघाली. त्यांना लोखंडाचे कवच घालून तळपत्या उन्हात बांधण्यात येत असे. माननीय अबू बकर(र) यांनी त्यांना अशा अवस्थेत पाहिले आणि त्यांचे मन भरून आले. त्यांनी तत्काळ त्यांची रक्कम भरून त्यांना स्वतंत्र केले.
माननीय लुबैना(र) आणि जुनैरा(र) या दोन स्त्रिया उमर(र) यांच्या दासी होत्या. माननीय उमर(र) यांनी अद्याप इस्लामचा स्वीकार केलेला नसून ते इस्लामचे कट्टर विरोधक मानले जात असत. या दोन्ही दासींना इस्लाम स्वीकारण्यावरून ते खूप मारत असत. माननीय लुबैना(र) यांना एकदा अबू जहल या क्रूरकर्माने एवढे मारले की, त्यांची दृष्टी हरपली. माननीय नहदीया(र) यासुद्धा दासी होव्या. त्यांच्यावरसुद्धा इतरांप्रमाणेच अत्याचार करण्यात आले. माननीय अबू बकर(र) यांनी या सर्वांना खरेदी करून दासत्वातून मुक्त केले.
ही परिस्थिती तर गुलाम आणि दासींवर होणार्या अत्याचारांची आहे. परंतु ज्या स्वतंत्र असलेल्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून इस्लामी आंदोलनास सर्वतोपरी मदत केली, त्यांची परिस्थितीसुद्धा जास्त वेगळी नाही. त्यांच्यावर होणार्या अत्याचारांचा इतिहास आपण थोडक्यात पाहू या.
माननीय उस्मान(र) हे एक अतिशय श्रीमंत व्यापारी होते. ते जेव्हा प्रेषित मुहम्मद(स) यांच्या हातावर इस्लाम धर्म स्वीकारून इस्लामी आंदोलनात सहभागी झाले तेव्हा त्यांच्या चुलत्याने त्यांना दोरीने बांधून बेदम चोप दिला. माननीय अबू जर(र) यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि सरळ पवित्र ‘काबा’मध्ये जाऊन इस्लाम स्वीकारण्याची आवेशपूर्ण घोषणा केली. इस्लामविरोधकांचे टोळके त्यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे अक्षरशः तुटून पडले आणि त्यांचा वध करण्यासाठी जमिनीवर पाडले. योगायोगाने तिकडून माननीय अब्बास(र) येत होते. त्यांनी पाहिले की, ‘गफ्फार’ कबिल्याच्या एका माणसास ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा त्यांनी विरोधकांना आवर घालून सांगितले की, ‘हा माणूस ‘गफ्फार’ कबिल्याचा असून या कबिल्याच्याच प्रदेशातून तुम्हाला व्यापार करण्यासाठी जावे लागते. तुम्ही जर याला ठार माराल तर तुमचा व्यापार बंद पडेल’ हे ऐकून विरोधकांनी त्यांना सोडून दिले.
माननीय जुबैर(र) यांनी इस्लाम स्वीकारल्यावर त्यांचे काका त्यांना चटाईत बांधून त्यांच्या नाकात धूर सोडत असत. तरीदेखील ते ओरडून काकांना म्हणायचे, ‘‘मी तुमच्या या त्रासाला कंटाळून ईशद्रोह मुळीच करणार नाही.’’
माननीय साद बिन जैद(र) आणि साद बिन अबी वकास(र) यांनाही दोरीने बांधून फटके देण्यात येत असत. माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद(र) यांनी इस्लाम स्वीकारून सरळ पवित्र काबा गाठला व त्या ठिकाणी आपण इस्लाम स्वीकारण्याची जोरदार घोषणा केली. विरोधकांची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि त्यांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले.
माननीय उसमान बिन मजऊन(र) यांना जोरदार झापड मारून त्यांचा एक डोळा फोडण्यात आला. माननीय उम्मे शरीक(र) यांना उन्हात उभे करण्यात येऊन त्रास देण्यात आला. तेव्हा ते बेशुद्ध पडत असत. त्यांना पाण्याचा एक थेंबही प्यायला देण्यात येत नसे. एवढेच नव्हे तर माननीय अबू बकर(र), तलहा(र), वलीद बिन वलीद(र) अयाश बिन रबिआ(र) आणि सलाबिन हिशाम(र) यांच्यासारख्या प्रतिष्ठित जणांनासुद्धा त्रास देण्यात आला.
संपूर्ण मक्का शहराने इस्लाम स्वीकारणार्यांसाठी एका उग्र भट्टीचे स्वरुप धारण केले होते. घरोघरी आणि गल्लोगल्ली अत्याचाराचे तांडव माजले होते. अन्याय व अत्याचाराच्या भयानक आगीत होरपळूनसुद्धा असा एकही माणूस नव्हता की, ज्याने अत्याचारांना घाबरून इस्लामचा त्याग केला असेल. मग तो पुरुष असो वा स्त्री, गुलाम वा दासीं असो वा स्वतंत्रजण, गरीब असो वा श्रीमंत हे सर्व आंदोलक श्रद्धेचे असे प्रदर्शन करीत होते की, याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. आजपर्यंत उठणार्या सर्व आंदोलनांतील अनुयायांवर सर्वांत जास्त कठोर शिक्षा ही इस्लामी आंदोलकांनाच देण्यात आली. एकमेव ईश्वरास उपास्य मानणे आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ईश्वराचे प्रेषित व जीवनाचे सर्वोच्च मार्गदर्शक मानण्याचे हेच उदाहरण आणि कसोटी होय. अत्याचार सहन करणार्यांच्या अंतःकरणात जी क्रांतीची ज्वाला भडकत होती ती आणखीन वाढत गेली. त्यांच्या संयम आणि सहनशीलतेसमोर क्रूर अत्याचारीजणांना हत्यार ठेवावे लागले. अत्याचारी पराभूत झाले. कारण ते एकाही व्यक्तीस त्याच्या मूळ स्थानापासून किचितही हलवू शकले नाहीत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ज्या ठिकाणी मानवकल्याण चळवळीच्या शूर वीरांच्या संकल्प, धैर्य व संयमाबाबतीत पूर्ण समाधान आणि निश्चितता होती, त्या ठिकाणी या गोष्टीचीदेखील जाणीव होती की, शेवटी मानवी सहनशक्तीची काही मर्यादा असते. अत्याचार व अन्यायाची शृंखला कोठेच थांबण्याचे नाव घेत नव्हती. उलट दिवसेंदिवस अत्याचारात जबरदस्त वाढ होत होती. आपल्या अनुयायांची ही दयनीय अवस्था पाहून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काळीज दुःखाने फाटत असे, परंतु नाविलाज होता. ते आपल्या अनुयायांचे ममतेने सांत्वन करून म्हणत, ‘‘ईश्वर अवश्य काही मार्ग काढील. परिस्थितीवरून असे लक्षात येत होते की, इस्लामी आंदोलनाचे पवित्र झाड ‘मक्का’ शहराच्या खडकाळ जमिनीत आणि प्रतिकूल वातावरणात वाढणे अशक्य आहे. हे सौभाग्य कदाचित इतर प्रदेशास लाभेल. तसेच इस्लाम धर्माच्या मानवकल्याण आंदोलनाच्या मागील इतिहासावरून असे दिसते की, या ठिकाणी स्थलांतराचे (अर्थात देशत्यागाचे) एक पर्व अवश्य येत असते. आदरणीय प्रेषितांच्या मनात ही कल्पना होतीच की, त्यांना व त्यांच्या अनुयायांना या पर्वातून गुदरावे लागेल. अर्थात वतनत्याग करावा लागेल. प्रेषितांनी आपल्या अत्याचारपीडित अनुयायांना सल्ला दिला की, ‘‘तुम्ही वतनत्याग करुन इतरत्र निघून जावे. ईश्वर लवकरच तुम्हा सर्वांना एकत्र करील.’’ अनुयायांनी विचारले की, ‘‘कोठे जावे?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘अॅबिसीनियाकडे प्रयाण करावे.’’ कारण ‘अॅबिसीनिया’ देशात ख्रिश्चन धर्मावर आधारित एक न्यायप्रिय शासन होते. म्हणून प्रेषितांनी त्या देशाच्या बाबतीत म्हटले की तेथे सत्य व न्यायाचे शासन आहे.
प्रेषितत्व मिळण्याच्या पाचव्या वर्षापर्यंत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांमध्ये अकरा पुरुष आणि चार स्त्रिया होत्या. इस्लामधारकांचा हा अकरा जणांचा काफिला मा. उस्मान बिन अफआन(र) यांच्या नेतृत्वाखाली अॅबिसीनियाकडे रात्रीच्या अंधारात रवाना झाला. माननीय उस्मान(र) यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्थात प्रेषित मुहम्मद(स) यांची कन्या माननीय रुकैया(र) देखील होत्या.
या ठिकाणी ही बाब लक्षणीय आहे की, इस्लामी आंदोलनात सहभागी असलेल्या अनुयायांमध्ये पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीसुद्धा मजल मारली होती. पुरुषांप्रमाणेच यातना भोगणार्यांमध्ये स्त्रियांदेखील सामील होत्या आणि वतनत्याग करणार्यांतसुद्धा स्त्रियांनी सहभाग घेतला होता. ‘‘मुहाजिरीन’ अर्थात या स्थलांतर करणार्यांच्या बाबतीत जेव्हा कुरैशजणांना माहिती मिळाली, तेव्हा त्यांचे रक्त खवळले. त्यांच्या पाठलागासाठी त्यांनी माणसांना पिटाळले. परंतु जिद्दाच्या बंदरापर्यंत पोहोचल्यावर त्यांना समजले की, हे लोक आपल्या हातून निसटले. या मुहाजिरीन (स्थलांतरीत) जणांनी थोडासा काळ तेथे व्यतीत केला व अफवा पसरली की, इस्लामचे विरोधक असलेल्या ‘कुरैश’ कबिल्याने इस्लाम स्वीकारला, तेव्हा ते ‘मक्का’ शहरात परत आले. येथे पोहोचल्यावर त्यांना कळले की, ती एक अफवा होती. आता मात्र त्यांच्यावर पहिल्यापेक्षाही जास्त अत्याचार वाढले.
विरोधकांचा हिसक विरोध उग्र रुप धारण करीत गेला. त्यामुळे परत एकदा इस्लामधारकांनी ‘हिजरत’ (स्थलांतर) केले. या स्थंलातरितांमध्ये ८५ पुरुष आणि १७ स्त्रिया होत्या. हे सर्वजण अॅबिसीनियाला पोहोचले आणि त्या ठिकाणी इस्लामी नियमानुसार शांतीपूर्ण जीवन व्यतीत करु लागले.
विरोधक मात्र शांत बसत नव्हते. त्यांनी आपसात सल्लामसलत करून एक योजना आखली. या योजनेनुसार ‘इब्ने रबिआ’ आणि ‘अम्र बिन आस’ यांना दूत बनवून पाठविले ते यासाठी की, या दोघांनी अॅबिसीनियाचा राजा ‘नेगूस’ याच्याशी बोलणी करून मुहाजिरांना (वतन त्यागून आलेल्यांना) आपल्या स्वाधीन करावे. सोबत त्यांनी राजा ‘नेगूस’ आणि त्याच्या दरबारातील पादरींसाठी बहुमूल्य भेटी व नजरानेदेखील पाठविले. मोठ्या तयारीनिशी हे दोघेजण अॅबिसीनियास पोहोचले. प्रथम त्यांनी दरबारातील पादरी व इतरांना भेटून आणि नजराने देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की, ‘‘त्यांच्या देशात निवास करीत असलेल्या मक्कावासियांनी मक्का शहर आणि अरब प्रदेशात एक धार्मिक पंथाची स्थापना करून आमच्या प्राचीन धर्माची विटंबना केली. हे इस्लामपंथीय लोक तुमच्या ईसाई धर्मावरसुद्धा संकट आणतील.’’ त्यांचा विचार असा होता की, येथील राजा त्यांचे मत ऐकून एकतर्फी निर्णय देईल आणि मुस्लिमांना आपली बाजू मांडू देण्याची संधीच न देता त्यांना आमच्या स्वाधीन करील. अशा प्रकारे वातावरण तयार करून हे दोघे दूत राजदरबारी पोहोचले, मग त्यांनी आपल्या येण्याचा हेतु स्पष्ट केला की, मक्का शहराच्या बड्या मंडळींनी आपले प्रतिनिधी बनवून आपल्याकडे आम्हास पाठविले आहे. त्यांनी अशी आपणास विनंती केली की, आपल्या राज्यात निवास करणार्या आमच्या लोकांना आमच्या स्वाधीन करावे.
दरबारातील पादरी आणि इतरजणांनी त्यांचे समर्थन केले. परंतु राजा नेगूसने मुस्लिमांची भूमिका समजून घेण्यापूर्वीच निर्णय देण्यास स्पष्टइन्कार केला व दुसर्या दिवशी दोन्ही पक्षांना पाचारण करण्याचे आदेश दिले. मुस्लिमांनी या बाबतीत आपसात सल्लामसलत करून निर्णय घेतला की, ‘‘आपण ईसाई असलेल्या राजासमोर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिकवणीनुसार इस्लामची भूमिका स्पष्टपणे मांडावी, मग जे होईल ते पाहू या.’’ हीच इस्लामवरील श्रद्धाधारकांची भूमिका असते. मुस्लिमजणांनी दरबारात पोहोचल्यावर तेथील परंपरेनुसार बादशाहसमोर साष्टांग घातले नाही. दरबारातील लोकांना हा बादशाहचा अपमान वाटला आणि याचे कारण विचारले, तेव्हा माननीय जाफर(र) यांनी मुस्लिमांचे नेतृत्व करताना म्हटले, ‘‘आम्ही ईश्वराशिवाय इतर कोणासमोरही आणि खुद्द आमच्या प्रेषितांसमोरही सजदा करीत नाहीत (अर्थात डोके नमवित नाहीत.)’’ लाचलुचपत देऊन स्वार्थ साधणार्या आणि लाळघोटेपणा करणार्यांच्या तुलनेत सिद्धान्त आणि संहितेवर आधारित हे वर्तन किती उठून दिसते!
यानंतर मक्काच्या दूतांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, ‘‘हे आमचे पळपुटे अपराधी आहेत. यांनी नवीन धर्म उभा करून आणखीन एक बिघाड निर्माण करणारे वादळ उभे केले आहे. म्हणून यांना आमच्या स्वाधीन करण्यात यावे.’’ यावर माननीय जाफर(र) उठले आणि या दूतांना काही प्रश्न विचारण्याची राजा नेगूसची परवानगी मागितली. यावर राजाने परवानगी दिली.
माननीय जाफर(र) यांनी विचारले, ‘‘आम्ही कोणाचे गुलाम आहोत काय?’’
‘‘नाही!’’ दूतांनी उत्तर दिले.
‘‘आम्ही एखाद्याचा हकनाक खून केला काय?’’
‘‘नाही!’’
‘‘आम्ही कोणाची संपत्ती घेऊन आलो काय?’’
‘‘नाही!’’
मग माननीय जाफर(र) म्हणाले, ‘‘यांपैकी एकही अपराध आम्ही केला असल्यास आम्हास परत पाठविण्यात यावे.’’ आता संपूर्ण चित्र स्पष्ट झाले होते. आता माननीय जाफर(र) यांनी राजा नेगूस आणि तेथील दरबारीजणांना उद्देशून एक मुद्देसूद आणि तर्कसिद्ध भाषण दिले.
‘‘हे राजन! आम्ही अज्ञान व रानटीपणाच्या अंधारात खितपत होतो. मूर्तीपूजा करीत होतो. मृत प्राण्यांचे मांस खात होतो. व्यभिचारात आमचे जीवन व्यतीत होत होते. शेजार्यांना त्रास देत होतो. भाऊ आपल्या भावावर अत्याचार करीत होता. बळी तो कान पिळी अशीच आमची अवस्था होती. एवढ्यात ईश्वराने आमच्यादरम्यान एक सज्जन माणूस उभा केला. त्याच्यातील सज्जनशीलता, अनामतदारी आणि सत्यनिष्ठ वर्तन आम्हा सर्वांना चांगले परिचित होते. त्याने आमच्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविला आणि त्यामार्फत शिकवण दिली की, मूर्तीपूजेचा त्याग करावा. सत्य बोलावे, रक्तपात सोडावा, अनाथांची संपत्ती गिळंकृत करू नये. शेजार्यांची मदत करावी. शीलवंत स्त्रियांवर व्यभिचाराचा आरोप लावू नये. नमाज अदा करावी. रोजे (उपवास) धरावे. दानधर्म करावा. म्हणून आम्ही मूर्तीपूजा त्यागली आणि संपूर्ण दुष्कर्म सोडून दिले. एवढ्यासाठीच आमचा समाज आमचा वैरी बनला आणि आमच्यावर बळजबरी करण्यात येत आहे की, आम्ही परत अज्ञानात यावे. त्यामुळे आम्ही आपली श्रद्धा आणि प्राणांच्या रक्षणास्तव या ठिकाणी स्थलांतर केले. हीच आमची कहानी आहे.’’
सत्याने ओतप्रोत असलेल्या भावना व्यक्त झाल्यास त्या आपोआप कोणालाही प्रभावित केल्याशिवाय राहत नाहीत. राजा ‘नेगूस’ याने दिव्य कुरआनाचा काही भाग पठन करण्याची विनंती केली. माननीय जाफर(र) यांनी ‘सूरह-ए-मरयम’ चा काही भाग वाचून दाखविला. ईश्वरी वाणी ऐकून राजाचे डोळे पाणावले. तो अकस्मातपणे म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! दिव्य कुरआनची ही वाणी आणि बायबल हे एकाच दिव्याची दोन प्रतिबिबे आहेत.’’ पुढे तो म्हणाला, ‘‘बायबलमध्ये येशू मसीह(अ) तर्फे ज्या प्रेषितांची भविष्यवाणी करण्यात आली आहे, मुहम्मद(स) हे तेच प्रेषित होत. ईश्वराचे महीम उपकार आहे की, मला प्रेषित मुहम्मद(स) यांचा काळ प्राप्त झाला.’’ याबरोबरच त्याने निर्णय दिला की, आश्रितांना परत करण्यात नाही.
मक्कावरून आलेल्या दूतांना आपल्या कुटिल कारस्थानात यश न मिळाल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पादरी आणि इतर पदाधिकार्यांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न केला की, येशू मसीह(अ) यांच्याविषयी असलेली मुस्लिमांची श्रद्धा चुकीची आहे. त्यामुळे दुसर्या दिवशी परत एक सभा घेऊन मुस्लिमांची श्रद्धा जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राजा ‘नेगूस’ याने मुस्लिमांना येशू मसीह(अ) यांच्या बाबतीत विचारले असता मुस्लिमांचे प्रतिनिधी माननीय जाफर(र) म्हणाले, ‘‘आमचे प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की, आदरणीय येशू मसीह(अ) हे ईश्वराचे प्रेषित असून त्यांच्यावर दिव्यवाणी अवतरित झाली होती.’’
राजा ‘नेगूस’ जमिनीवरून एक काडी उचलून म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! तुम्ही जे येशू मसीह(अ) चे वर्णन केले त्यापेक्षा येशू मसीह(अ) या काडीपेक्षाही जास्त नाहीत. तसेच त्याने मक्काच्या दोन्ही प्रतिनिधींना त्यांच्या सर्व भेटवस्तूंसह दरबारातून व देशातून निघून जाण्याचा आदेश दिला. मक्काचे दोन्ही दूत तोंडघशी पडले आणि अपयशाचे जखम घेऊन मक्केस परतले.
संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *