आपल्या सभोवताली पसरलेले हे अनंत विश्व अगणित तारे, सूर्यमालिका व आकाशगंगा यांनी व्यापलेले असून, ज्यांच्या प्रकाशाची गती प्रती सेकंदास तीन लक्ष कि.मी. (1,86,000 miles/sec.) असून त्यास पृथ्वीवर पोहोचण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. हे ब्रह्मांड अनादी नसून काही अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. हे ब्रह्मांड आकस्मित किंवा अपघाती अस्तित्वात आलेले नाही, किबहुना असे होणे अशक्यप्राय आहे ! याचा एक निर्माता आहे व तो ‘अल्लाह’ आहे. या विश्वाच्या कानाकोपऱ्यात एकाच प्रकारचे समान कायदे, व्यवस्था लागू आहेत. म्हणजेच येथे अनेक ईश्वर नसून एकच ईश्वर आहे. हे विश्व ना देव-देवतांची लीला आहे आणि ना ही मायाजाळ. वास्तविक ही अल्लाहची विशिष्ट व ठोस विचारपूर्वक केलेली निर्मिती आहे. ईश्वराने विश्वाला ज्ञान, विवेक व बुध्दिचातुर्याने निर्माण केले आहे आणि याच्या प्रत्येक कणाकणांमध्ये शिस्त, नियमबद्धता, समतोलता, बुध्दिचातुर्य व विशिष्ट उद्देश दिसून येतो.
मनुष्य हा योगायोगाने, अपघाती किंवा स्वयंभू जन्मलेला नाही. तो मोकाट सुटलेला प्राणी पण नाही. अल्लाहने त्याला मनुष्य म्हणूनच निर्माण केलेले आहे. अल्लाहने त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये संपूर्ण श्रेष्ठता प्रदान केलेली आहे. पृथ्वीतलावर ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून आणि त्याच्या मर्जीप्रमाणे जीवन व्यतीत करण्याचा हक्क त्याला दिला आहे. अल्लाहने त्याला स्वातंत्र्य, स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता प्रदान केली असून त्यानुसार तो पुण्य आणि पाप यांसारखे कर्म करु शकतो. त्या अधिकार व स्वातंत्र्यामुळे तो अल्लाह आणि त्याच्या दासांजवळ आपल्या कृत्याला जबाबदार आहे.
ईश्वराने त्याच्या अंतर्मनामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट ओळखण्याची पारख व क्षमता दिलेली आहे. मनुष्य जन्मतःच गुन्हेगार वा पापी नसतो किंवा असा निष्पापही नसतो. ज्याकडून पुन्हा पाप घडणार नाही त्याच्याकडून पाप किंवा पुण्य घडू शकते आणि असे घडतेसुद्धा. एवढेच नव्हे तर केलेल्या चुकांची, पापांची क्षमायाचना करुनसुद्धा तो सन्मार्गाकडे वळू शकतो आणि तो तसे करतोदेखील.
प्रत्येक मानव, मग काळा असो वा गोरा, पाश्चिमात्य असो वा पौर्वात्य, एकाच ईश्वराची निर्मिती आणि भक्त आहे. त्याच्यामध्ये ईश्वराचा अंश नसून तो ईश्वराचे अपत्यही नाही. सर्व मानव आदम व हव्वा या एकाच आईवडिलांची अपत्ये आहेत. अखिल मानवजातीतील प्रत्येक व्यक्ती आपआपसात भाऊ-भाऊ आहे. वर्ण, जात, वंश, देश, भाषा, व्यवसाय, भाऊबंदकी यांच्या फरकावरुन त्यांच्यामध्ये भेदभाव करणे योग्य नाही. कोणत्याही जाती, वंश, भाऊबंदकी किंवा व्यवसायाशी त्यांचा संबंध असला तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून ते सर्व एकसारखे, समान व एकरुप आहेत आणि तो सत्प्रवृत्त, सदाचारी किंवा ईशभिरु, पापभिरु असेल तर तो ईश्वराजवळ व मानवाजवळ दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठित व आदरणीय आहे. उच्च-नीच आणि स्पृश्य अस्पृश्यता, समाजाने वाळीत टाकणे हा धार्मिक व नैतिक गुन्हा आणि संपूर्ण मानवतेवर होणारा अन्याय आहे. प्रत्येक मानवाचा देह पवित्र आहे. कोणा मानवाला स्पर्श केल्याने कोणी अपवित्र होत नाही. पण त्याच्या हाताला व शरीराला घाण लागलेली असेल तर तो अस्वच्छ होऊ शकतो. तसेच प्रत्येक मानवाचे उष्टे पवित्र आहे. मग तो कोणत्याही जाती, जमातीचा किंवा धर्माचा असो, प्रत्येक मनुष्याबरोबर बसून तो निर्धास्तपणे खाऊ-पिऊ शकतो. परंतु त्या खाण्या-पिण्याच्या वस्तू, स्वच्छ, पवित्र आणि वैध असाव्यात.
स्त्री ना सैतानाची एजंट आहे ना पापाचे मूळ, ना ती तिरस्करणीय वा अपवित्र आहे. ती मानवतेच्या व कायदेव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन ईश्वराजवळ हिशोब देण्यास जबाबदार आहे आणि ईश्वराचा कोप, शिक्षा, बक्षीस आणि चांगले फळ यांस पुरुषाएवढीच पात्र आहे. मातेचे स्थान मानवांमध्ये सर्वोच्च आहे आणि सर्वांमध्ये सद्वर्तन आणि सेवा यासाठी तिचे स्थान उच्च पातळीवर आहे.
विश्व आणि मानव
संबंधित पोस्ट
0 Comments