एकीकडे शरिअतने माणसाला स्वतःच्या देहाचे तसेच आत्म्याचे हक्क अदा करण्याचा आदेश दिला आहे तर दुसरीकडे त्यावर असेही बंधन घातले आहे की वरील स्वतःच्या हक्कांची पूर्तता करतांना इतर माणसांच्या हक्कावर विपरीत व अनिष्ट परिणाम होईल अशा पद्धतीचा अवलंब करू नये. कारण असे की अशा पद्धतीने जर स्वतःच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता करण्याचा अवलंब केला तर माणसाचा स्वतःचा आत्माही मलीन बनतो व त्यापासून इतर माणसांनाही तऱ्हेतऱ्हेने अपाय व हानी सोसावी लागते. म्हणूनच शरिअतने चोरी, लूटमार, लाचलुचपत व भ्रष्टाचार, अपहार, व्याज घेणे व फसवणूक वगैरे गोष्टी ‘हराम’ (निषिद्ध) ठरविल्या आहेत. कारण की अशा मार्गाने माणसाला जो काही लाभ होतो तो इतर माणसांच्या हानीतूनच निष्पन्न होत असतो. असत्य-खोटारडेपणा, निंदा-नालस्ती, चुगली-चहाडी व खोटे आरोप व खोटे आळ घेणे, या कृत्यांनाही ‘हराम’ (निषिद्ध) केले गेले आहे. या सर्व कृती इतर माणसांना हानीकारक असतात. जुगार, सट्टा व लॉटरीलाही ‘हराम’ ठरविले गेले. कारण तो एका माणसाचा लाभ व हजारो लाखो लोकांच्या हानीवरच आधारलेला असतो. फसवणुकीचे व्यवहार व अशा प्रकारचे वाणिज्य व व्यापारी करार ज्यात कोणाही एखाद्या व्यक्तीची हानी होण्याचा संभव आहे, अशा करारांनाही हराम ठरविले गेले आहे. हत्याकांड, दंगली व अशा उद्रेक घडवून आणण्यासाठी केली जाणारी कटकारस्थाने यांनाही हराम केले गेले आहे. कारण असे की एखाद्या माणसाला स्वार्थासाठी व स्वहितासाठी इतर माणसांचे प्राण घेण्याचा व त्यांना उपद्रव पोहोचविण्याचा कसलाही हक्क नाही. व्यभिचार व समलिंगी संभोगही हराम ठरविले गेले आहेत. कारण अशी कृत्ये करणाऱ्या माणसाचे आरोग्य तसेच त्याच्या नैतिकतेस कीड लागते. त्याचबरोबर अशा कृत्यामुळे संपूर्ण समाज निर्लज्जपणा, दुराचार व असभ्यतेच्या घाणीत लोटला जातो, त्यांच्यामुळे दुर्धर गुप्तरोग होतात. येणाऱ्या पिढ्यांवरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो, उपद्रव निर्माण होतो, माणसाचे परस्परातील संबंध बिघडून जातात व संस्कृती व सुसंस्कारांचे निर्मूलन होत जाते.
हे निर्बंध शरिअतने केवळ यांचसाठी लावले आहेत की, एखाद्याने स्वतःच्या इच्छा वासनांची पूर्तता करताना इतर माणसांचे हक्क डावलू नयेत. परंतु मानवी संस्कार व संस्कृतीच्या उन्नतीसाठी एका माणसाने दुसऱ्याला हानी पोचवू नये, एवढेच पुरेसे नाही, उलट त्यासाठी हेही अत्यंत आवश्यक आहे की माणसामाणसातील परस्पर संबंध अशा प्रकारे जोडले जावेत की ते एकमेकांच्या भल्यासाठी व कल्याणासाठी सहाय्यक व्हावे. याच गरजेपोटी शरिअतने जे नियम निर्धारित केले आहेत त्यांचा केवळ खुलासा आम्ही येथे देत आहोत.
माणसामाणसातील संबंधाचा प्रारंभ कुटुंब व्यवस्थेपासून होतो. म्हणून सर्वप्रथम आपण त्यावर दृष्टिक्षेप टाकू या. वास्तवतः पती, पत्नी व मुले यांच्यावर आधारलेल्या समूहाला परिवार अगर कुटुंब असे म्हणतात. परिवाराबाबतीत इस्लामी कायदा असा आहे की उपजीविका मिळविणे, कुटुंबाच्या गरजा भागविणे आणि पत्नीचे व मुलांबाळांचे रक्षण करणे हे प्रत्येक पुरूषाचे आद्य कर्तव्य आहे. स्त्रीचे कर्तव्य असे ठरविण्यात आले आहे की पुरुष जी काही मिळकत मिळवून आणील त्यामध्ये घरातील व्यवस्था व कारभार चांगल्या प्रकारे पाहावा आणि पतीला तसेच मुलाबाळांना जास्तीतजास्त सुख होईल असे पाहावे, मुलांना सुसंस्कार घडवावेत. मुलांचे कर्तव्य असे आहे की त्यांनी वडिलांच्या व आईच्या आज्ञांचे पालन करावे. त्यांचा आदर करावा व मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांनी माता-पित्यांची सेवा करावी. अशा प्रकारची कुटुंबव्यवस्था नीटपणे चालू राहण्यासाठी इस्लामने दोन गोष्टींचे आयोजन केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे पिता-पती यांना कुटुंबप्रमुख निर्धारित केले आहे. याचे कारण असे आहे की ज्याप्रमाणे एखाद्या गावाचा कारभार एक प्रशासक अगर कारभारी असल्याशिवाय नीट चालू शकत नाही आणि एखाद्या शाळेचा कारभार एका मुख्याध्यापकाशिवाय सुरळीत चालू शकत नाही. त्याचप्रमाणे कुटुंब व्यवस्थासुद्धा कुटुंबप्रमुखाविना नीट चालू शकत नाही. ज्या कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या इच्छे व मर्जीनुसार वागत असेल, त्या कुटुंबात अकारण कलह पसरेल व विस्कळीतपणा माजेल. सुख-समाधान तेथे नावापुरतेही उरणार नाही.
पती महाशय स्वतःच्या मर्जीनुसार एकीकडे जातील तर पत्नी तिच्या इच्छेनुसार दुसऱ्या ठिकाणी जाईल आणि अशा गदारोळाने मुलांचे वाटोळे होईल, अशी सर्व प्रकारची हानी टाळण्यासाठी कुटुंबाचा एक प्रमुख असणे आवश्यक असून तो पुरुषच असू शकतो. कारण तोच कुटुंबाच्या पालनपोषणास व त्याच्या रक्षणास जबाबदार असतो. इस्लामने आयोजिलेली दुसरी गोष्ट अशी की स्त्रीने घराबाहेरील सर्व कामे पुरुषावर सोपवावीत व कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तिने घरातील सर्व कर्तव्ये मनःपूर्वक व एकाग्रतेने पार पाडावीत आणि पतीच्या व मुलांच्या सुखामध्ये कसलीही बाधा होऊ नये. तिच्या घराबाहेर पडण्यामुळे घरातील सुख-समाधान व मुलांवरील सुसंस्कार व चांगले वळण लावण्यात जी बाधा संभवनीय असते, ती होऊ नये, म्हणूनच स्त्रीला घराबाहेरच्या सर्व कर्तव्यातून व जबाबदाऱ्यांतून पूर्णपणे मुक्त केले गेले आहे. याचा अर्थ स्त्रीने घराबाहेर पाऊलच टाकायचे नाही, असा कदापिही नाही. गरज असताना स्त्रीला घराबाहेर जाण्यास अनुमती आहे. परंतु शरिअतचा खरा मानस असा आहे की स्त्रीचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने तिचे घरच असले पाहिजे व स्त्रीची सर्व शक्ती व क्षमता घरातील सर्व व्यवस्था अधिकाधिक चांगली होण्यासाठीच कारणी लागली पाहिजे. रक्ताची नाती लग्नसंबंधामुळे अधिकाधिक विस्तार पावतात. या वर्तुळात जी माणसे एकमेकांशी जुळलेली असतात. त्यांचे परस्परसंबंध अबाधित व सुरळीत राखण्यासाठी व त्यांना एकमेकांचे मददगार करण्यासाठी, शरिअतने वेगवेगळे कायदे केले आहेत आणि ते अत्यंत बुद्धीविवेकाने केले गेले आहे. त्यातील काही कायदे असे आहेत,
ज्या पुरुष व स्त्रियांना नैसर्गिकतः मोकळपणाने व जिव्हाळ्याने आपसात वावरावे लागते, अशा नात्यामध्ये विवाह निषिद्ध (हराम) ठरविला गेला आहे. उदा. माता-पुत्र, पिता-कन्या, सावत्र पिता-सावत्र कन्या, सावत्र आई-सावत्र पुत्र, भाऊ-बहीण एका स्त्रीचे स्तनपान करून वाढलेला मुलगा व मुलगी, काकी-पुतण्या, आत्या-पुतण्या, मामा-भाची, मावशी-भाचा, सासू-जावई, सासरा-सून ही सर्व नाती विवाहबाह्य ठरविल्याने असणाऱ्या अगणित हितकर गोष्टींपैकी एक अशी की, या नात्यातील स्त्री पुरुषांचे परस्पर संबंध अत्यंत पवित्र व निर्मळ असतात. ते अशा सात्विक निर्मळ व निरलस प्रेमाने एकमेकांशी निःसंकोच मनाने मिळू-मिसळू शकतात.
वरील निषिद्ध ठरविलेल्या नात्यातील विवाहसंबंधाखेरीज, कुळातील अन्य स्त्री-पुरुषांचे विवाह धर्मसंमत ठरविले गेले आहेत जेणेकरून त्यांच्यामधील परस्परसंबंधात विकास व्हावा. जी माणसे एकमेकांच्या स्वभावाशी व सवयीशी परिचित असतात, त्यांच्यामधील विवाहसंबंध मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. अनभिज्ञ व अनोळखी कुटुंबात विवाह-संबंध जुळविण्याने बहुधा कलहाची अवस्था निर्माण होते. म्हणून इस्लाममध्ये ‘कुफू’ म्हणजे आचार, विचार-राहणीमान यांच्यात समपातळी असणाऱ्या व्यक्तींना विवाह-संबंधासाठी तशी समपातळी नसणाऱ्या माणसावर प्राधान्य दिले गेले आहे.
कुळात श्रीमंत-गरीब, सुस्थितीतील व विपन्नावस्थेत असणारी सर्व प्रकारची माणसे असतात. इस्लामचा आदेश असा आहे की प्रत्येक माणसावर सर्वांत जास्त हक्क त्याच्या नातेवाईकांचा आहे. ‘शरिअत’मध्ये याचे नाव ‘सिलएरहेमी’ म्हणजे नातेवाईकांशी दयाबुद्धीने केलेले सद्वर्तन असून तिच्या आचरणाबद्दल सक्त ताकीद दिली गेली आहे. नातेवाईकांशी बेमुर्वतपणाचे संबंध असण्याला ‘किताए रहेमी’ दयाबुद्धी ठेचणे असे नाव असून इस्लाममध्ये ते एक मोठे दुष्कृत्य (पाप) आहे. एखादा आप्तेष्ट व नातेवाईक जर गरीब असेल किंवा त्याच्यावर एखादे संकट कोसळले असेल तेव्हा सुस्थितीत असणाऱ्या त्याच्या सर्व नातेवाईकांनी त्याला सहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. दानधर्म करतानाही विशेषकरून नातेवाईकांच्या हक्कालाच प्राधान्य दिले गले आहे.
वारसा कायदाही अशा रितीने केला गेला आहे की, एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याची जी काही संपत्ती असेल मग कितीही जास्त असो अगर अल्पशी असो, ती संपत्ती एकाच जागी केंद्रित होऊन एकवटू नये. तर ती मृताच्या नातेवाईकांमध्ये कमीअधिक प्रमाणात विभागली व वाटली जावी. मुलगा, मुलगी, पत्नी, पती, आई, वडील, भाऊ, बहीण हेच माणसाचे सर्वाधिक हक्कदार आहेत. म्हणून वारसाहक्कात सर्वप्रथम या नात्यांचे वाटे निश्चित केले गेले आहेत. या नात्यातील कोणी अस्तित्वात नसतील तर अन्य नातेवाईकांपैकी जे अधिक निकटचे असतील त्यांना वाटा मिळतो. अशा रितीने एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याने मागे ठेवलेली धनसंपत्ती व मालमत्ता अनेक नातेवाईकांच्या उपयोगी पडते. इस्लामचा हा वारसाकायदा पूर्ण जगात अप्रतिम असून आता इतर जाती-वंशसुद्धा त्याचे अनुकरण करू लागले आहेत. परंतु खुद्द मुस्लिम लोकच आपल्या अज्ञानामुळे व अडाणीपणामुळे या कायद्याची पायमल्ली करीत आहेत. ही बाब अत्यंत शोचनीय आहे. विशेषकरून आईवडिलांच्या संपत्तीतील मुलींचा हिस्सा त्यांना न देण्याचा रिवाज व शिरस्ता मुस्लिमांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. वास्तविकता हा घोर अन्याय आहे व पवित्र कुरआनच्या स्पष्ट आज्ञेच्याविरुद्ध आहे.
आपल्या कुटुंबानंतर माणसाचा संबंध त्याच्या मित्रमंडळीशी, शेजारी लोकांशी व वस्तीतील इतर नागरिकांशी येत असतो व त्यांच्याशी त्याला कसला ना कसला तरी व्यवहार करावा लागतो. इस्लामचा आदेश असा आहे की या सर्वांशी सचोटीने, न्यायाने व सदाचाराने वागावे. कोणासही उपद्रव पोचवू नये. कोणाचेही मन दुखवू नये. असभ्य व अश्लील शब्द उच्चारण्यापासून दूर राहावे. एकमेकांस सहाय्य करावे, आजारी व रुग्णाची विचारपूस करावी. एखाद्याचे निधन झाले तर त्याच्या अंतयात्रेत सहभागी व्हावे. एखाद्यावर संकट आले तर त्याला सहानुभूती दाखवावी, जे कोणी अत्यंत गरीब, गरजू व अपंग असतील त्यांना गुप्तपणे मदत करावी. विधवांची व अनाथ मुलांची काळजी घ्यावी, भुकेलेल्यांना जेवू घालावे, विवस्त्रांना वस्त्राने झाकावे व बेकारांना काम द्यावे. जर ईश्वराने तुम्हाला धन दिले आहे तर ते केवळ आपल्या चैन-विलासावरच उधळू नये. सोन्या-चांदीची भांडी वापरात आणणे, रेशमी वस्त्रे परिधान करणे व आपला पैसा निरर्थक मनोरंजनार्थ अगर चैनबाजीत व विलासात व्यय करणे मनाई आहे. जी धनसंपत्ती ईश्वराच्या हजारो दासांना उपजीविका पुरवू शकते ती धनसंपत्ती एखाद्या व्यक्तीने केवळ स्वतःवरच उधळू नये. ज्या पैशाने अनेकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो तो पैसा केवळ एका दागिन्याच्या स्वरूपात तुमच्या देहावर रूळावा अगर एखाद्या भांड्याच्या रूपात तुमच्या टेबलाची शोभा बनावी अथवा एका गालिचाच्या रूपाने तुमच्या दिवाणखान्यात पडून असावा किंवा दारूच्या आतषबाजीत तो जळून जावा; ही बाब घोर अन्यायजनक आहे. तुमची धन-दौलत तुम्हापासून हिरावून घेण्याची इस्लामची इच्छा नाही. जे काही तुम्ही कमावले आहे अगर वारसाहक्काने तुम्हाला प्राप्त झाले आहे; त्याचे धनी तुम्हीच आहात. तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीचा उपभोग घेण्याचा पूरा अधिकार इस्लाम देतो. तुमच्या घरादाराच्या स्वरूपावर तुमच्या कपड्यावर तसेच तुमच्या वाहनावर ईश्वराने प्रदान केलेल्या धनसंपत्तीचे प्रतिबिंब उमटावे, ही गोष्टही धर्मसंमत ठरविली आहे. परंतु इस्लामच्या शिकवणुकीचा खरा हेतू असा आहे की तुमचे जीवन साधेसुधे असावे. आपल्या गरजा अवास्तव वाढवू नये. आपल्या स्वतःबरोबरच आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या मित्रांच्या, आपल्या शेजाऱ्यांच्या, आपल्या जातीबांधवाच्या व आपल्या देशबांधवांच्या तसेच अखिल मानवजातीच्या हक्कांबद्दलही मान राखावा. या लहान वर्तुळातून बाहेर पडून आता सबंध जगातील सर्व मुस्लिमांना वेढणाऱ्या अशा विशाल वर्तुळावर दृष्टी टाका. या वर्तुळामध्ये इस्लामने असे कायदे व काटेकोर नियम लावले आहेत ज्यामुळे मुस्लिमांनी एकमेकांच्या कल्याणासाठी झटावे व दुराचार निर्माण होण्याची स्थिती शक्यतो उद्भवू देऊ नये.
उदाहरणार्थ, आम्ही खालील काही गोष्टींच निर्देश करतो.
एकूण मुस्लिमांच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी व जोपासनेसाठी असा एक नियम केला गेला आहे की, ज्या स्त्री-पुरुषांमधील नाती विवाहनिषिद्ध (हराम) ठरविण्यात आलेली नाहीत अशा स्त्री-पुरुषांनी मुक्तपणे एकमेकांशी मिळूमिसळू नये. स्त्रियांचा समाजसमूह वेगळा असावा तसेच पुरुषांचाही वेगळा असावा. स्त्रियांनी अधिकांश प्रमाणात आपल्या गृहजीवनाची कर्तव्ये पार पाडण्यात सतत दक्ष असावे. घराबाहेर पडण्याची गरज असेल तर साज-श्ाृंगार करुन बाहेर पडू नये. साधा पेहराव वापरावा व शरीराचा संपूर्ण भाग योग्य रीतीने वस्त्रांनी झाकून घ्यावा. हात व चेहरा उघडे करण्याची अनिवार्य गरज नसेल तर तेही वस्त्रांनी झाकून घ्यावेत आणि तशी वास्तव निकड असल्यास ती निकड भागविण्यापुरतेच हात व चेहरा उघडा करावा. त्याचबरोबर पुरुषांनाही असा आदेश दिला गेला आहे की त्यांनी परस्त्रीकडे टक लावून पाहू नये. अचानक परस्त्रीवर दृष्टी गेलीच तर ती वळवावी. दुसऱ्यांदा त्याच परस्त्रीवर दृष्टी टाकणे दोषपूर्ण आहे. परस्त्रीशी गाठभेट करणे त्याहूनही अधिक दोषपूर्ण आहे. आपले चारित्र्य जपणे, हे प्रत्येक स्त्री-पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे. कामेच्छा व लैंगिक वासनेच्या पूर्ततेखातर ईश्वराने ‘निकाह’रुपी जे मर्यादेचे वर्तुळ आखून दिले आहे त्याचे उल्लंखन करण्याची इच्छासुद्धा आपल्या मनात निर्माण होऊ देऊ नये.
वरीलप्रमाणे मुस्लिमांच्या चारित्र्याची जपणूक करण्यासाठीच आणखी असा नियम केला गेला आहे की, कोणत्याही पुरुषाने आपल्या शरीराचा गुडघ्याच्या व नाभीच्या दरम्यानचा भाग तसेच कोणत्याही स्त्रीने आपल्या हाताखेरीज व चेहऱ्याखेरीज शरिराचा अन्य कोणताही भाग इतरांसमोर उघडा करु नये. मग समोरची व्यक्ती कितीही जवळच्या नात्यांतील असो. यालाच शरिअतच्या परिभाषेत ‘सतर’ असे म्हटले आहे व सतर झाकणे हे प्रत्येक स्त्रीपुरुषाचे कर्तव्य आहे. यामध्ये इस्लामचा हेतु असा आहे की, समाजामध्ये लज्जाशीलता निर्माण व्हावी व अशा प्रकारच्या निर्लज्जतेचा फैलाव होऊ नये ज्यांच्याद्वारा अनैतिकता व दुराचार यांची निर्मिती होते.
चारित्र्याच्या हानीस कारणीभूत ठरणारे, पाशवी वासनांना उत्तेजित करणारे तसेच पैसा, वेळ व आरोग्य यांचा नाश करणारे मनोरंजनाचे कार्यक्रम व छंद अशा गोष्टीही इस्लामला पसंत नाहीत. मनोरंजन ही बाब आपल्या जागी अत्यंत आवश्यक आहे. माणसातील चैतन्य व कार्यशक्ती निर्माण होण्यासाठी काबाडकष्टाबरोबरच मनोरंजनही अत्यंत गरजेचे आहे. परंतु मनोरंजन मनाला ताजेपणा व टवटवीतपणा आणणारे असावे व उलट मन अधिकाधिक मलीन व घाणेरडे करणारे नसावे. हजारो माणसे एकत्रितपणे गुन्हेगारीच्या काल्पनिक घटना तसेच बेशरमपणाची दृश्ये पाहतात. अशा तऱ्हेची असभ्य व अश्लील मनोरंजने सर्वांच्या चारित्र्याचे अधःपतन होण्यास कारणीभूत ठरतात, मग सकृत्दर्शनी ती दृश्ये कितीही चांगली असतील.
मुस्लिमांतील एकजूट व कल्याणासाठी मुस्लिमांना अशी ताकीद दिली गेली आहे की, त्यांनी आपापसातील फाटाफुटीपासून दूर राहावे, गटबाजीपासून अलिप्त असावे, एखाद्या बाबतीत मतभिन्नता निर्माण झाल्यास शुद्ध मनाने ‘कुरआन’ व ‘हदीस’च्या आधारे ते मतभेद दूर करण्यासाठी योग्य निर्णयांचा प्रयत्न करावा. असा निर्णय होऊ शकला नाही तर आपसात कलह करत बसण्याऐवजी तो निर्णय ईश्वराकडे सोपवावा. आपल्या सामाजिक कल्याणाच्या कृत्यामध्ये एकमेकांशी सहकार्य करावे. आपल्या नेत्यांचे आज्ञापालन करावे. कलह व भांडणे निर्माण करण्यापासून दूर व्हावे आणि आपसातील कलह व भांडणाद्वारे आपली शक्ती क्षीण करून आपल्या समाजाला खजिलपणा व नामुष्की आणू नये.
मुस्लिमांना मुस्लिमेतर लोकांकडून विद्या व तंत्रज्ञान प्राप्त करण्याचे व त्यांची उपयुक्त कार्यपद्धती शिकून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु आपले जीवन जगताना मुस्लिमेतरांच्या जीवनशैलीची नक्कल करण्यास प्रतिबंध केला गेला आहे. एक समाज दुसऱ्या समाजाची नक्कल त्याचवेळी करीत असतो जेव्हा तो आपला अवमान व आपली न्यूनता मान्य करतो. ही अवस्था गुलामीचा एक निकृष्ट दर्जाचा प्रकार होय. आपल्या पराभूतपणाची ही जाहीर ग्वाही आहे. याचा शेवटी निघणारा परिणाम असा आहे की इतरांची नक्कल व अनुकरण करणाऱ्या समाजाची संस्कृती अखेर नाश पावते. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना मुस्लिमेतरांच्या संस्कृतीचे अनुकरण व नक्कल करण्यास सक्त मनाई केली आहे. कोणत्याही जातीची शक्ती व सामर्थ्य तिच्या वेशभूषेवर व तिच्या जीवनशैलीवर अवलंबून नसते. याउलट ती शक्ती व सामर्थ्य तिच्या शिक्षणावर व तिच्या संघटितपणावर व तिच्या कार्यशक्तीवर व क्षमतेवर अवलंबून असते. हे साधारण बुद्धीचा माणूसही समजू शकतो. म्हणून शक्ती व सामर्थ्य प्राप्त करण्याची इच्छा असेल तर ज्यापासून बलप्राप्ती होते अशा गोष्टी आत्मसात करा. अशा गोष्टी मुळीच आत्मसात करू नका ज्यामुळे समाज गुलामीच्या दलदलीत पडतो व सरतेशेवटी इतर जातीत मिसळून जाऊन आपल्या जातीची स्वतंत्र अस्मिताच हरवून बसतो.
मुस्लिमेतरांशी वागतांना मुस्लिमांना संकुचितपणाची व पक्षपातीपणाची शिकवण दिली गेली नाही. त्यांच्या थोर विभूतींना नावे ठेवण्यास आणि त्यांच्या धर्माचा अवमान करण्यास सक्त मनाई केली गेली आहे. त्यांच्याशी भांडण उकरून काढण्यासही मनाई केली गेली आहे. ते जर मुस्लिमांशी सलोख्याचे व शांततेचे संबंध ठेवतात आणि त्यांच्या हक्कांवर कसलेही आक्रमण करीत नाहीत तर मुस्लिमांनाही त्यांच्याशी सलोखा राखण्याचे तसेच प्रेमाचे व मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची व न्यायपूर्ण वर्तन करण्याची शिकवण दिली गेली आहे. इस्लामी सभ्यतेची अशी निकडीची हाक आहे की, मुस्लिमांनी सर्वापेक्षा अधिक प्रमाणात मानवी सहानुभूती व सदाचारांचे आचरणात दर्शन घडवावे. वाकडी चाल, जुलूम-अत्याचार व संकुचित मनोवृत्ती मुस्लिमाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. उच्चकोटीचा सदाचार, सभ्यता व चांगुलपणाचा एक उत्कृष्ट आदर्श बनावा आणि स्वतःच्या तत्त्वांच्या गुणावर इतरांची मने जिंकावी. केवळ याचसाठी मुस्लिमांची उत्पत्ती पृथ्वीतलावर केली गेली आहे.
0 Comments