अल्लाहने श्रद्धावंतांना केवळ परलोकातील देणग्यांचीच हमी दिली नाही तर त्यांना या जगातदेखील वैभवाचे आणि या धरतीवर सत्ता देण्याचे वचन दिले आहे. पण यासाठी अल्लाहने जी अट ठेवली आहे ती महत्त्वाची आहे, “जे लोक श्रद्धा बाळगतात आणि चांगले कर्म करतात त्यांना अल्लाहने वचन दिले आहे की पूर्वी जशी इतर लोकांना धरतीवर सत्ता बहाल केली होती तशीच त्यांनाही देईल.” त्यांना अराजकतेपासून वाचवील. यासाठी माणसाने अल्लाहची उपासना करावी आणि कुणालाही त्याचा भागीदार बनवू नये. अल्लाहने माणसाला या धरतीवर मालक बनवलेले नाही तर माणसाला आपला उत्तराधिकारी बनवून पाठवलेले आहे. अशात त्यास सत्ता दिल्यावर माणसाने ईश्वराच्या आदेशांनुसार राज्य कारभार चालवावा. तसे केल्यास त्यांना या जगात आणि परलोकात देखील सर्व काही मिळेल. अल्लाहचे म्हणणे आहे की “ज्यांना या जगातच सर्व काही हवे असेल, धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव, संतती – आम्ही सर्व काही त्यांना भरभरून देऊ, पण परलोकात त्यांना कसलाच वाटा नसेल.” पण ज्या लोकांना या जगात आणि परलोकात देखील अल्लाहच्या देणग्या हव्या असतील त्यांनी अल्लाहचे आदेश पाळले तर त्यांना दोन्ही ठिकाणी सर्व काही देण्याचे अल्लाहने वचन दिलेले आहे.
इस्लाममध्ये माणसाला बादशाह, अधिपती असे काहीच मानले गेले नाही. तो धरतीवर कशाचाही मालक नसून त्याला अल्लाहचा उत्तराधिकारी आणि विश्वस्त या भूमिकेतून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. खऱ्या अर्थाने केवळ अल्लाहच साऱ्या चराचराचा अधिपती आहे. “तोच (अल्लाह) साऱ्या विश्वाचा स्वामी, साऱ्या मानवांचा अधिपती, त्यांचा ईश्वर.”
याचबरोबर माणसांना दिलेल्या वैभवांचे आणि आपल्या देणग्यांचे वर्णन करताना अल्लाह म्हणतो, “आम्ही मानवाला आमचा उत्तराधिकारी नेमलेले आहे. आणि हे कारे विश्व, पृथ्वी, आकाश, समुद्र, नद्या, शेती सर्व काही त्यांच्या सेवेसाठी निर्माण केले आहे.” या अर्थाने माणूस या धरतीवर माणसांच्या सेवेसाठी पाठवला गेला आहे. त्यांना सत्ता दिलेली आहे, मग कशा प्रकारे तो आपल्या सत्तेचा कारभार चालवतो, याबाबत त्याची विचारणा केली जाईल.
0 Comments