वर्तमानकाळात ईर्ष्या आणि लालसेने माणूस पार पिसाळून गेला आहे. जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल, यासाठी ना-ना काळ्या-पांढर्या पद्धतींचा तो अवलंब करीत आहे. यामुळेच आज सर्वच भ्रष्टाचार आणि काळ्या बाजाराचा वणवा पेटला आहे. मामुली चपराशापासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वच यात बरबटलेले आहे. जो जितका शासनकर्त्यांच्या जवळचा चमचेगिरी करणारा आहे, तितका जास्त भ्रष्ट आहे. याचे कारण असे आहे की, आज माणूस संपत्ती आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत आहे. पैसा असला की, वैभव, प्रतिष्ठा, समाजावर वचक, प्रसिद्धी आणि ऐशो- आरामाचे जीवन, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. यासाठी वाटेल त्याचा गळा चिरायचा, खिशावर डल्ला मारायचा आणि वाटेल ते कृष्णकृत्य करायचे, मात्र पैसा कमवायचाच, अशी सर्वत्र मानसिकता बळावली आहे. याउलट माणूस कितीही चारित्र्यवान असला, विचारवंत असला, ज्ञानी, सभ्य, आणि उच्चशिक्षित असला, मात्र जर त्याच्याकडे पैसाच नसेल, तर त्याच्या जगण्याला जणू काही अर्थच नाही. त्याला कोणी हुंगतही नाही. त्याला सर्वजण मूर्खात काढतात. त्याला कोणी किंमत देत नाही. कुत्रीही भुंकायला तयार होत नाहीत. त्याला तुच्छ आणि हिनतेच्या भावनेने पाहिले जाते. याच मानसिकतेमुळे समाज दिवसेंदिवस पोकळ होत चालला आहे. मात्र समाजास भ्रष्टाचार आणि काळाबाजारीपासून मुक्त करायचे असेल तर ही विचारमूल्ये बदलायलाच हवी, धन-दौलत आणि संपत्तीला महत्त्व देण्याऐवजी इस्लामी विचारसरणी आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच संपत्ती आणि पैशांना महत्त्व देण्याऐवजी चारित्र्य, सभ्यता, ईशपरायणता आणि सदाचाराला महत्त्व देण्याची मानसिकता यावी. ईश्वराने स्पष्टपणे म्हटले आहे की प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्वाचा मूळ आधार हा या इहलोकातील धन-संपत्ती आणि वैभवाचा दिखाऊपणा मुळीच नाही.
‘‘वस्तुतः प्रतिष्ठा ही केवळ ईश्वरालाच आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा – १३९)
‘‘वस्तुतः ईश्वराजवळ तुमच्यांपैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित आणि श्रेष्ठ माणूस तो आहे, जो सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे. निश्चितच केवळ ईश्वरालाच सर्वकाही ज्ञान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात – १३)
‘‘वस्तुतः ईश्वराजवळ तुमच्यांपैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित आणि श्रेष्ठ माणूस तो आहे, जो सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे. निश्चितच केवळ ईश्वरालाच सर्वकाही ज्ञान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात – १३)
उपरोक्त आयतीवरून हेच स्पष्ट होते की, पैसा आणि संपत्ती नसल्याने माणूस हा तुच्छ आणि हीन मुळीच असू शकत नाही. तर खरी किंमत ही माणसाच्या सभ्यता, सदाचार आणि ईशपरायणतेमध्ये असल्याने आपण अशा व्यक्तीचा आदर करावयास हवे, तरच समाज हा अपराधमुक्त होऊ शकतो. पैशांना अवाजवी महत्त्व न देणारा कधीच भ्रष्ट होत नाही, लाच घेत नाही, इतरांचे शोषण करीत नाही, इतरांच्या कल्याणासाठी आपल्या जवळील संपत्तीसुद्धा खर्च करतो.
आज आपण पाहतो की, शासकीय वा निमशासकीय अधिकारी पैसा मिळविण्यासाठीच शासनाचेच नव्हे तर माणुसकीचे नियमसुद्धा धाब्यावर बसवून मनमुरादपणे आणि जणू आपला जन्मसिद्ध हक्क समजून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करतात. मात्र इस्लामने अशी शिकवण दिली आहे की सरकारी पद अगर अधिकार आणि हुद्दा हा मुळात एक मोठी जवाबदारी आहे. केवळ ईश्वराप्रतिच नव्हे तर जनतेप्रतिसुद्धा मोठी जवाबदारी आहे. ती मात्र प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात यावी. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळातील एक घटना आहे,
‘‘प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इब्ने लतबिया(र.) यांची ‘सलीम‘ कबिल्याच्या लोकांकडून जकात आणि दानाची रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी नेमणूक केली. जेव्हा त्यांनी जकात आणि दानाची रक्कम वसूल करून प्रेषितांसमोर हजर झाले आणि प्रेषितांनी त्यांचा हिशेब घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘हे प्रेषिता! या काही वस्तु माझ्यासाठी लोकांनी भेट म्हणून दिल्या आहेत. आपण मला भेट म्हणून आलेल्या वस्तु स्वीकारण्याची परवानगी द्यावी.‘ यावर प्रेषित मुहम्मद(स.) ताडकन म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरीच बसायचे असते, जेणेकरून या वस्तु भेट म्हणून तुम्हाला स्वीकारता आल्या असत्या.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
अर्थातच ज्यांच्याकडून जकात वसुलीकरिता त्यांना पाठविण्यात आले होते, त्यांच्याकडून सप्रेम भेट म्हणून आलेल्या वस्तुसुद्धा स्वीकारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मुळीच परवानगी दिली नाही. तर मागून घेण्यात येणारी लाच तर आणखीनही गंभीर अपराध आहे आणि इस्लामने यासाठी कठोर शिक्षा नेमली आहे.
हा तर झाला लाचलुचपतीचा प्रकार. याशिवाय आर्थिक शोषणाचे आणखीनही बरेच प्रकार आहेत. पैकी ज्याच्याकडून मेहनत-मजुरीचे काम करून घेण्यात येते, त्याला त्याच्या मेहनत-मजुरीचा योग्य मोबदला देण्यात येत नाही. आज भांडवलदार आणि उद्योगपतीवर्ग मजुरांच्या रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा शोषून घेत आहे, मात्र त्याला खरा आणि योग्य मोबदला देत नाही. कायदासुद्धा मजुराला न्याय मिळवून देण्यात हतबल झालेला दिसतो. तुटपुंजा मजुरीतून तो अर्धपोटी आणि उपासमारीचे खडतर जीवन आज कंठित आहे. मात्र इस्लामी कायद्याने अशी शिकवण दिली आहे की मेहनत-मजुरी आणि कारागिरी वगैरे करणार्यांना त्यांच्या पात्रतेनुसार आर्थिक मोबदला देण्यात यावा आणि तेही त्याची प्रतिष्ठा जोपासून द्यावा. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वराने म्हटले आहे, अंतिम निवाड्याच्या दिवशी तीन प्रकारच्या गुन्हेगारांना मी अवश्य शिक्षा देणार. पैकी पहिला गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने माझी शपथ घेऊन कोणाला अभय दिले असेल आणि मग गद्दारी अगर दगा केला असेल, दुसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोण्या एखाद्या गुलाम नसलेल्या व्यक्तीस गुलाम बनवून विकले आणि त्याची रक्कम गिळली आणि तिसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोणाकडून मजुरी वा शारीरिक कष्टाचे काम करून घेतले, मात्र त्याच्या कामाचा मोबदला दिला नाही.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
त्याचप्रमाणे मजुराचे घाम सुकण्यापूर्वी त्याच्या मजुरीचा पूर्ण मोबदला देण्याची सक्तीने ताकीदसुद्धा इस्लामने केली आहे. यामुळे निश्चितच श्रीमंताविषयी मजुराच्या मनात आदर निर्माण होईल आणि तो चोरी, डकाइती आणि भ्रष्टाचाराकडे वळणार नाही.
0 Comments