‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत
या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
तसे पाहता ‘ज्यू’ समाजात पूर्वी बरेच प्रेषित येऊन गेले. ‘ज्यूं’ च्या प्राचीन धर्मग्रंथात प्रेषितांचे आज्ञापालन आणि अवज्ञा करण्याची चांगली व वाईट फळे चाखण्याची बरीच उदाहरणे आहेत. ईश्वरी ग्रंथधारक आणि प्रेषितांचे अनुयायी असल्याचा त्यांना मान होता. त्यामुळे त्यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना अंतिम प्रेषित स्वीकारून सहकार्य करावयास हवे होते. परंतु ‘ज्यू’ जणांनी प्रेषित मुहम्मद(स) यांचा विरोध केला.
‘मक्का’तील कुरैश समुदायात दंभ किवा स्वश्रेष्ठत्वाची भावना होती. परंतु ‘ज्यूं’मध्ये प्रेषितांविरुद्ध द्वेष होता. द्वेषाची भावना ही नेहमी हीन भावनेचे स्वरुप धारण करीत असते. धार्मिक मंडळी जेव्हा खालच्या स्तरावर येतात तेव्हा या स्तराच्या खालच्या पातळीची मर्यादाच नसते.
एका उच्च दर्जाच्या ‘ज्यू’ विद्वानाची मानसिकता कशी आहे ते या एका छोट्याशा घटनेवरून लक्षात येते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची एक पत्नी माननीय सफया(र) या ‘हुय्या बिन अखतंब’ या ‘ज्यू’ विद्वानांची अतिशय लाडकी कन्या होती. एकदा ‘हुय्या बिन अख्तब’ आपल्या धाकट्या भावासह आपल्या कन्येस भेटण्यासाठी ‘कुबा’ या ठिकाणी आले. ते दोघे प्रेषितांना पाहून खूप चितातूर झाले. धाकट्या बंधुने ‘हुय्या बिन अखतब’ ला विचारले की, ‘‘आपल्या धर्मग्रंथात ज्या प्रेषितांची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे, ते हेच आहेत काय?’’ ‘हुय्या बिन अख्तब’ उत्तरला, ‘‘होय! ईश्वराची शपथ!’’
‘‘मग विचार काय आहे?’’ धाकट्या बंधुने विचारले, ‘हुय्या’ म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत मी या माणसाचा (प्रेषितांचा) वैरी व शत्रूच असेन.’’
या घटनेवरून स्पष्ट होते की, ‘ज्यू’ समाजाच्या धर्मग्रंथात प्रेषित मुहम्मद(स) यांच्या बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली असून आणि धर्मपंडितांनी मुहम्मद(स) यांना प्रेषित असल्याचे ओळखले असूनसुद्धा केवळ हट्टापायी त्यांच्या प्रेषितत्वाचा स्वीकार न करण्याचे दुर्भाग्य ओढवून घेतले. हीच मानसिकता संपूर्ण ‘ज्यू’ समाजात होती.
आदरणीय प्रेषितांच्या उपदेशसभेत असताना उपहासात्मक शैलीत टर उडविण्याचा ‘ज्यू’ ना छंदच होता. बिनबुडाचे प्रश्न विचारून सभेतील उपदेशकार्यात बाधा आणायची, काहीजण मुस्लिम होण्याचे नाटक रचून प्रेषितांच्या अनुयायांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करून इस्लामी आंदोलनात बाधा आणण्याचे प्रयत्न करीत. याशिवाय प्रेषितांच्या गरीब अनुयायांना अगदीच अल्प मोबदला देऊन कष्टाची कामे करवून घेत. त्यांना कर्ज देऊन कर्जवसुलीच्या वेळी त्यांचा अपमान करीत. एकदा प्रेषितांचे एक अनुयायी माननीय हदरद यांनी एका ‘ज्यू’ सावकाराकडून कर्ज घेतले. कर्ज फेडण्याच्या निर्धारित वेळेवर त्यांच्याकडे शरीरावरील कपड्याशिवाय एक कवडीदेखील नव्हती. माननीय हदरद(र) यांनी कर्ज फेडण्याची मुदत वाढवून मागितली. परंतु ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून देण्याचे नाकारले. शेवटी हे प्रकरण प्रेषितांपर्यंत आले. प्रेषितांनी मुदतवाढीची विनंती करूनही ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून तर दिली नाही आणि माननीय हदरद(र) यांच्या अंगावरील वस्त्र काढून घेण्याचे दुर्दैवी कर्म केले.
अगदी नाजुक वेळेवर ‘ज्यू’ समाजाने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी केलेला सहकारकरार कित्येकदा मोडून इस्लामी आंदोलनास संकटात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गद्दारी केली. कित्येक वेळा प्रेषितांना ठार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. प्रेषितांच्या जेवणात विष कालवले. अशा प्रकारच्या अगदी हीन दर्जाच्या व अतिशय खालच्या पातळीच्या कुकर्मांच्या वातावरणातसुद्धा प्रेषितांनी न डगमगता ‘बद्र’ या पहिल्या युद्धापासून ते ‘मक्का’वर ऐतिहासिक विजय मिळविण्यापर्यंत इस्लामी आंदोलन मोठ्या यशस्वीपणे राबविले.
‘बद्र’ आणि नंतर होणार्या ‘उहुद’ या दोन पहिल्यावहिल्या युद्धांदरम्यान घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकू या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा ‘महीन’वरून ‘बद्र’ स्थळावर पोहोचले तेव्हा त्यांना सूचना मिळाली की, ‘सुलैम’ कबिला हल्ला करण्याच्या तयारीत आहे. प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या २५ तारखेस ‘माऊल कद्र’ या स्थानावर पोहोचले, परंतु शत्रूचा थांगपत्ता लागला नसल्याने तेथून परत आले. ‘रमजान’ महिना संपण्यास दोन दिवसांचा अवधी असताना ‘सदकतुल फित्र’ (दान धर्म)आणि ‘ईद’ ची नमाज अदा करण्याचा ईश्वरी आदेश अवतरला. हिजरी सन दोनमध्ये जकात (कमाईचा चाळीसावा भाग जनकल्यानास्तव देणे) चा आदेश आला. हे कर्म ‘नमाज’नंतर अतिशय महत्त्वाचे आहे. याच काळामध्ये प्रेषितकन्या माननीय फातिमा(र) यांचा माननीय अली(र) यांच्याशी विवाह झाला.
ज्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) ‘बद्र’च्या युद्धासाठी मदीनाबाहेर गेलेले होते, त्या वेळी ‘कैनुकाअ’ या ‘ज्यू’ परिवाराने मदीना शहरात उपद्रव माजविण्यास सुरुवात केली. ते मुस्लिमांना त्रास देऊ लागले. एक अनसारी महिला एका ‘ज्यू’ च्या दुकानापर्यंत सामान घेण्यासाठी गेली असता तिची छेड काढली. हे पाहताच एका मुस्लिमाने त्या उपद्रवी ‘ज्यू’ ला जागीच ठार केले आणि येथूनच मुस्लिम आणि ‘ज्यू’ चे चांगलेच बिनसले. आदरणीय प्रेषित युद्धावरून परत आल्यावर ‘कैनुकाअ’ परिवाराने आपल्या दुष्कृत्यावर खेद व्यक्त करण्याऐवजी प्रेषितांना सांगितले,
‘‘आम्हाला ‘कुरैश’ लोकांसारखे भ्याड समजू नका! युद्ध काय असते, ते आम्ही तुम्हास दाखवून देऊ!’’ या ठिकाणी ‘‘कैनुकाअ’ परिवाराने प्रेषितांशी केलेला ‘सहकारकरार’ भंग केला. प्रेषितांनीही या वेळी शव्वाल महिन्यात त्यांचा घेराव केला. पंधरा दिवसांच्या घेरावानंतर त्यांचा हेकेखोरपणा आणि उन्माद पार वितळून गेला आणि आपला पराभव स्वीकारून त्यांनी अभयदानाची भीक मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना जीवदान देऊन शहराबाहेर काढले.
‘बद्र’च्या युद्धभूमीवर इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांना मुस्लिमांकडून जो अपमानास्पद पराभव पत्करावा लागला, त्यामुळे मक्कावासीयांत मुस्लिमांविरुद्ध संतापाची तीव्र लाट आली. त्याचबरोबर बदल्याची तीव्र भावना व जळफळाटामुळे ते अक्षरशः फणफणत होते. या वेळी मक्कावासीयांचा सरदार हा ‘अबू सुफियान’ होता. (मक्केवर प्रेषितांनी विजय मिळविला तेव्हा अबू सुफियानने इस्लामचा स्वीकार करून इस्लामची खूप सेवा केली) म्हणून ‘बद्र’च्या युद्धात ठार झालेल्यांचा बदला घेण्याची त्याच्यावरच जवाबदारी होती. त्याने पूर्ण तयारीनिशी दोनशे सत्तर जणांची सशस्त्र टोळी घेऊन ‘जिल हज्जा’ महिन्याच्या पाच तारखेस मदीनावर चाल करून आला. मदीनापासून तीन मैल अंतरावर असलेल्या ‘अरीज’ नावाच्या वस्तीवर त्याने हल्ला चढवून आपला राग शमविण्याचा प्रयत्न केला. तेथे त्याने प्रेषितांचे खंदे समर्थक माननीय ‘साद बिन अम्र(र)’ यांना ठार केले. काही घरांना आग लावली. तेथील मुस्लिम चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होण्याच्या आधीच त्याने तेथून पळ काढला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना घटनेची सूचना मिळताच सैनिकांची एक तुकडी घेऊन त्याचा पाठलाग केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेस ‘गजवा-ए-सवीक’ असे म्हणतात. प्रेषित मुहम्मद(स) जलहिज्जा महिन्याच्या नऊ तारखेस मदीना परत आले आणि दहा तारखेस ‘ईदुल अजहा’ (बकर ईद) ची नमाज अदा केली. तसेच दोन बोकडांची ‘कुरबानी’ (ईश्वराच्या नावावर बलिदान) देऊन संपूर्ण मुस्लिम समुदायास कुरबानीचा आदेश दिला. ही पहिली ‘बकरईद’ होय.
‘जिलहज्जा’चा महिना संपताच ‘इस्लामी राज्य मदीना’चे सर्वेसर्वा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या खबर्यामार्फत सूचना मिळाली की, ‘सालबा’ आणि ‘नज्द’ कबिल्याच्या लोकांनी मदीना आणि सभोवतालच्या वस्तींमध्ये लुटमार करण्याची योजना आखली आहे. आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय उस्मान(र)’ यांना मदीनाची जवाबदारी सोपवून साडेचारशे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) घेऊन ‘नज्द’कडे निघाले. प्रेषितांच्या या आक्रमक पवित्र्याची ‘नज्द’वासीयांना खबर मिळताच त्यांनी पळ काढून डोंगरदर्यांमध्ये आश्रय घेतला. शेवटी आदरणीय प्रेषित ‘सफर’चा संपूर्ण महिना प्रवासात व्यतीत करून मदीना शहरी परतले.
इस्लामी राज्याचा एक अतिशय कट्टर शत्रू ‘काब बिन अश्रफ’ होता. तो ‘ज्यू’ समाजाचा होता. तो ‘मदीना’ आल्यावर तेथील ‘ज्यू’ जणांना इस्लामविरुद्ध चिथावणी देत आणि मक्का शहरी जाऊन तेथील लोकांनादेखील मुस्लिमांविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करीत, अशा प्रकारे चिथावणीखोर दौरा आटोपून तो मदीना सीमेबाहेर मजबूत तटबंदी असलेल्या आपल्या किल्ल्यात दबा धरून बसायचा. त्याला जेव्हा ‘बद्र’च्या युद्धाचा परिणाम कळाला, तेव्हा मुस्लिमांच्या विजयामुळे त्याचा मुस्लिमद्वेष अनावर झाला. त्याने सरळ मक्का शहर गाठले. ठार झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना मुस्लिमांविरुद्ध भडकावले. शोकगीत तयार करून मक्कावासीयांच्या बदल्याच्या आगीत तेल ओतले. त्यांच्या भावना उत्तेजित केल्या. अशा प्रकारे संपूर्ण मक्का शहराला चिथावणी देऊन ‘मदीना’ शहरी आला. तेथे प्रेषित आणि इस्लामी आंदोलनाविरुद्ध चिथावणीखोर व मानहानीकारक काव्य रचून मोठे कुभांड रचले.
या शत्रूचा नायनाट आणि बिमोड करण्यासाठी ‘माननीय इब्ने मुसलमा(र)’ यांनी एक तुकडी घेऊन ‘काब बिन अश्रफ’ या उपद्रवी माणसास ‘रब्बिउल अव्वल’ महिन्याच्या चौदा तारखेस ठार केले. ‘ज्यू’ समाजास या घटनेची खबर मिळताच त्यांना घाम फुटला. त्यांनी घाबरून तत्काळ प्रेषितांची भेट घेतली. प्रेषितांनी त्यांच्याकडून इस्लामविरोधी कुभांड न रचण्याचे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.
‘कुरैश’जण बद्रच्या पराभवाने इतके विचलित आणि भयभीत झालेले होते की, त्यांनी सीरियाचा व्यापारी मार्गच बदलला. मदीनाऐवजी ते ‘इराक’कडून सीरिया जाऊ लागले. ‘जुमादिल उखरा’च्या महिन्यात प्रेषित मुहम्मद(स) यांना या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली आणि त्यांनी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या नेतृत्वाखाली शंभर सैनिकांची तुकडी रवाना केली. पहिल्याच हल्ल्यात काफिल्याचे सरदार आणि इतर जण पळून गेले. परंतु काफिल्याचा प्रमुख ‘फरात बिन हय्यान’ कैदी बनविण्यात आला. त्याने मदीना आल्यावर इस्लाम स्वीकारला. या काफिल्याकडून हस्तगत झालेली ‘गनीमत’ची संपत्ती जवळपास एक लाख दिरहम होती. तिचा एक पंचमांश भाग म्हणजेच वीस हजार दिरहम सरकारी खजिण्यात जमा करण्यात आला.
‘माननीय उमर फारुक(र)’ यांची कन्या ‘माननीय हफसा(र)’ या विधवा झाल्या होत्या. त्यांचे पती ‘बद्र’च्या युद्धात हुतात्मे झाले होते. माननीय उमर(र) यांना आपल्या विधवा कन्येची चिता होती. हिजरी सन तीनमध्ये ‘शाबान’च्या महिन्यात त्यांचा प्रेषितांशी विवाह झाला.
वरील घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला कळून चुकते की, ईश्वराचे प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ‘बद्र’च्या घटनेनंतरसुद्धा जवाबदार्यांचे किती मोठे ओझे होते. रक्षणात्मक गरजांसाठी त्यांना सतत प्रवास करावा लागला. या घटनांवरून हे स्पष्ट होते की, सत्य धर्माची सीमा उपासना आणि उपदेशापर्यंतच मर्यादित नव्हती. तसेच हेदेखील स्पष्ट होते की, ‘सत्यधर्म’ व्यवस्थेस ईशद्रोहावर आधारित व्यवस्थेवरील समाजावर लागू करून जनकल्यानाचे आंदोलन चालू ठेवणे काही पोरखेळ नव्हे. ही एक क्रांतिकारी चळवळ असून त्यासाठी प्रत्येक पावलावर त्याग आणि बलिदानाची गरज असते.
0 Comments