मानवी जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? त्याची वास्तविक मागणी कोणती? ते सुशोभित व यशस्वी करण्यासाठी उपाययोजना कोणत्या? कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केल्याने जीवनात बहर येऊ शकतो? याचा आपण कधी विचार केला आहे काय? ईश्वराने जग निर्माण केले आणि त्यात मानवास सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ बनविले, हे उघड सत्य आहे. मानवास इतर जीवांच्या तुलनेत विशिष्ट शक्ती व योग्यता प्रदान करून त्याने मानवांवर कृपा केली आहे. त्याने बुद्धीबरोबरच विचार करण्याची व निर्णय घेण्याची शक्तीदेखील प्रदान केली. आचारविचार स्वातंत्र्याचा अधिकार दिला. मानवाने हवे तर चांगले काम करून ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करावी आणि हवे तर वाईट कर्म करून ईश्वराची नाराजी व कोपाचे भागीदार बनावे, याबाबत त्याच्या स्वातंत्र्यात परीक्षादेखील ठेवली. ईश्वराने सांगितलेल्या मार्गाचा मानवाने अवलंब करावा आणि त्याची प्रसन्नता प्राप्त करावी, यातच मानवाचे शहाणपण आहे. ईश्वर मोठा दयाळू आहे. त्याने आपल्या जीवनाकरिता शेकडो साधने निर्माण केली. धरती व आकाश बनविले, सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांची रचना केली, हवा, पाणी इत्यादींचे नियोजन केले, खाण्या-पिण्याच्या अनेक वस्तू बनविल्या. त्याने या सर्वांपेक्षाही मोठा उपकार असा केला की, मानवांचे मार्गदर्शन आणि त्यांना प्रकाशमान सरळमार्ग दाखविण्याकरिता आपले प्रेषित पाठविण्याचा क्रम सुरू केला. हा क्रम अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर समाप्त झाला. कारण दुसरा एखादा प्रेषित येण्याची आवश्यकताच उरली नाही. अल्लाहने मानवांना त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश सांगण्याकरिता, त्यास सुशोभित करण्याकरिता आणि यशस्वी बनविण्याकरिता ज्या प्रेषितांना पाठविले ते सर्व सत्कर्मी, सद्गुणी व चांगले मानव होते. सर्वांनी मानवांना इस्लामची शिकवण दिली. मानवांना अल्लाहची मर्जी सांगितली. सर्वांनी अल्लाह एक असल्याचा उपदेश दिला. तोच तुमचा व सर्व जगाचा उपास्य आहे. त्याचीच पूजा, उपासना व भक्ती करा. त्याच्याच पुढे नतमस्तक व्हा, त्याच्याचकडे मदतीची प्रार्थना करा आणि त्याच्याच आज्ञांचे पालन करत असताना सत्कर्म व चांगुलपणासह जीवन व्यतीत करा. तुम्ही असे केले तरच त्याचा उत्तम मोबदला मिळेल आणि स्वर्गात स्थान लाभेल, परंतु जर तुम्ही असे केले नाही आणि अल्लाहकडून देण्यात आलेल्या आचारविचार व अधिकार स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले नाही, तर शिक्षा मिळेल आणि नरकात दाखल होण्यास पात्र ठराल. काळ लोटला तसे या शिकवणींना लोक विसरत गेले आणि त्यांच्यात नैतिकता व धारणांसंबंधी दोष निर्माण होत राहिले. अत्यंत कृपाशील व दयावान अल्लाहने मानवांचे दारिद्रय दूर करण्याकरिता आणि त्यांच्या सुधारणा व मार्गदर्शनाकरिता जगाच्या कानाकोपऱ्यात आपले प्रेषित पाठविले. त्यांनी लोकांना अल्लाहच्या मर्जीनुसार मार्गक्रमण करून जीवन व्यतीत करण्याची पद्धत सांगितली.
मानवी सभ्यतेच्या विकासाबरोबरच जनसुविधांचादेखील विकास झाला. परिवहन, दळणवळणासाठी रस्ते निर्माण झाले, ये-जा करण्यासाठी साधने वाढली. जगातील विविध समुदाय आणि प्रांतात राहणाऱ्या मानवांदरम्यान संफ वाढला. जलमार्ग शोधले गेले आणि व्यापाराबरोबरच आचारविचारांची देवाणघेवाण होऊ लागली. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश काय? त्यांचा सहज स्वाभाविक धर्म कोणता होता आणि आहे? अल्लाहजी मर्जी काय आहे? मानवास निर्माण करण्यामागचा उद्देश कोणता? मानव कशा तऱ्हेने आपल्या पालनकर्त्यांची प्रसन्नता व निकटता प्राप्त करू शकतो? इत्यादी, सर्वकाही जगातील लोकांना संबोधून परखडपणे सांगण्यासाठी जर संपूर्ण जगाकरिता ईश्वरीय जीवनव्यवस्था पाठविली गेली तर ती जगाकरिता पुरेशी होईल, याकरिता हीच वेळ उचित आहे. म्हणूनच सर्वशक्तिमान अल्लाहने आपले एक सर्वोत्तम दास प्रेषित मुहम्मद (स.) यांना अरबस्थानात पाठविले आणि त्यांच्यावर प्रेषितत्वाचा क्रम थांबविला. यात कमालीची विवेकबुद्धी आढळते. अरबस्थानात प्रेषित मुहम्मद (स.) यांना पाठविण्याचे एक कारण असे होते की, अरबस्तान जगातील अशा ठिकाणी आहे जेथून आशिया, युरोप व आफ्रिका सर्व जवळ आहेत. अरबस्थान या सर्वांच्या मधोमध स्थित आहे. येथून संपूर्ण जगाला संबोधित करण्याची सोय होऊ शकते. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना इस्लामची संपूर्ण शिकवण आणि जीवनपद्धती सोपवून अल्लाहकडून पाठविण्यात आलेला त्याचा एकमात्र प्रिय धर्म-इस्लाम जगातील सर्व मानवांना जीवनाचा सरळमार्ग दाखविण्याकरिता पाठविले. मानवांना प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मौल्यवान शिकवण दिली, तीच यापूर्वी आलेल्या प्रेषितांचीदेखील शिकवण होती.
मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो! ज्याने तुम्हाला जन्माला घातले तोच तुमचा खरा स्वामी आहे. त्याचेच दासत्व स्वीकारा. तो एक आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. अल्लाहला सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त आहे. तुम्ही त्याच्याच आज्ञांचे पालन करा. त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. मीदेखील त्याचाच दास आहे. मी त्याच्याच आदेशांचे पालन करतो. अल्लाहने मला आपला प्रेषित बनविले आहे. ज्या गोष्टींमुळे तो प्रसन्न होतो त्या सर्व गोष्टी त्याने सांगितल्या आहेत आणि ज्या गोष्टी त्याला पसंत नाहीत त्यादेखील त्याने सांगितल्या आहेत. जे लोक मला अल्लाहचा प्रेषित मानतील, त्याने पाठविलेला ग्रंथ (कुरआन) सत्य मानतील आणि अल्लाहने पाठविलेल्या आदेशांचे पालन करतील तेच यशस्वी होतील. जग परीक्षास्थळ आहे. परलोकीय जीवन हेच खरे जीवन आहे. मृत्यूनंतर एक दिवस सर्व मानव पुन्हा जिवंत केले जातील. सर्वजण अल्लाहच्या समक्ष हजर राहतील. जो मनुष्य जगातील जीवनात अल्लाहच्या मर्जीनुसार वागेल, तो त्या जीवनात सदैव सुखात राहील आणि ज्याने अल्लाहच्या आदेशांचे पालन केले नाही त्याच्याकरिता दुःखद यातना आहेत.’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचे आदेश जसेच्या तसे मानवांपर्यंत पोहोचविले आणि स्वतः त्यानुसार जीवन व्यतीत केले. मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि कार्यांचा मानवांवर दीर्घकालीन प्रभाव पडला. जेव्हा प्रेषितांचे जगात आगमन झाले तेव्हा संपूर्ण जगावर अज्ञानता आणि अंधविश्वास याचा अंधकार पसरला होता. लोक आपल्या वास्तविक ईश्वरास विसरले होते आणि अनेक प्रकारचे उपास्य निर्माण केले होते. मानवी सभ्यता विविध कुसंस्कारांमध्ये अडकून बधिर झाली होती. प्रेषितांच्या अनुपम व्यक्तिमत्त्वामुळे मानवाच्या वैयक्तिक तसेच सामाजिक कुसंस्कार व कुप्रवृत्तींचा लोप झाला. मानवाच्या बिघडलेल्या स्वभावात सुधारणा झाली आणि मानवी समाजात नवीन क्रांती व चेतना निर्माण झाली. मस्जिदपासून बाजारापर्यंत, शाळेपासून न्यायालयापर्यंत आणि घरापासून सार्वजनिक स्थळे; सर्व ठिकाणी परिवर्तन आढळू लागले आणि मानवाची चोहोबाजूंनी प्रगती होऊ लागली. तसेच नैतिकता, न्याय व सद्गुणांवर आधारित जीवनाची आधारशिला बसविली गेली. प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्यानंतरचे चार आदरणीय खलीफांच्या कारकिर्दीत असाच आदर्श समाज अस्तित्वात आला होता. असे प्रत्येक काळात शक्य आहे, अगदी आजदेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणी व त्यांनी अवलंबलेल्या पद्धतींचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास हे जग सुख-शांती व कुशलतेचा पाळणा बनू शकते. तसेच मानव इहलोक व परलोकातील यश संपादन करू शकतो. इस्लामद्वारा एक असा स्वस्थ व आदर्श समाज अस्तित्वात येऊ शकतो, जो अत्याचार, अन्याय, उच्च-नीच, भेदभाव, स्पृश्यास्पृश्य आणि शोषण इत्यादी कुप्रथांपासून मुक्त असेल. अट अशी की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणी व त्यांच्या जीवनपद्धतींचे अनुकरण केले जावे.
अल्लाहचे अंतिम प्रेषित आणि महान व्यक्तिमत्त्व प्रेषित मुहम्मद (स.) यांचा मानवी सभ्यतेवर एक मोठा उपकार हादेखील आहे की, त्यांनी मानवांच्या सर्व नाते-संबंधांना मजबूत आधारावर उभे केले. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि सर्वांचे अधिकार व कर्तव्य निश्चित केले. याच कारणास्तव प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ज्या इस्लामी राज्याची स्थापना केली, त्यात कसलाही वर्गसंघर्ष व मतभेद नव्हता. त्यात वंशाचा गर्व व पिढीच्या संकुचित दृष्टीचा पूर्णतः अभाव होता. त्यात धनवान-निर्धन, शिक्षित-अशिक्षित सर्व एकमेकांचे भाऊ बनले. त्यात गुन्ह्यांचे प्रमाण अगदी नगण्य होते. लोक एकमेकांवर अत्याचार करणारे, सरकारी संपत्ती व जबाबदारीत अफरातफर करणारे आणि लाच घेणारे नव्हते. प्रत्येकजण एक-दुसऱ्याच्या मदतीला धावत होता. ही खरोखरच एका नवीन जगाच्या पुनर्बांधणीची मोहीम होती. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या २३ वर्षांच्या प्रेषितत्वाच्या जीवनात लाखो मानवांचे जीवन बदलून टाकले. त्यांना पूर्णतः एकेश्वरवादी बनविले आणि त्यांच्यात अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचेही दासत्व कदापि न स्वीकारण्याची सुदृढ भावना विकसित केली. प्रेषितांनी त्यांना एकत्र करून एक नवीन सामाजिक व राजनैतिक व्यवस्था बनविली. त्यांनी या व्यवस्थेचा अवलंब करून संपूर्ण जगास हे दाखवून दिले की, त्यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या तत्त्वांच्या आधारे कशा प्रकारचा आदर्श समाज व जीवन निर्माण होते. इतर जीवनप्रणालींच्या तुलनेत ती जीवनव्यवस्था पवित्र, शुद्ध व कल्याणकारी आहे. या महान कार्यामुळेच प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘जगाचा नेता’ असे म्हटले जाते. त्यांचे हे कार्य कोणा विशिष्ट जाती वा समुदायासाठी नव्हते, तर संपूर्ण मानवजातीकरिता होते. ही मानवतेची संयुक्त अनामत, ठेव असून त्यावर कोणाचा अधिकार कोणापेक्षा कमी वा जास्त नाही. ज्या कोणाची इच्छा असेल तो यापासून लाभान्वित होऊ शकतो. किबहुना प्रत्येकाने याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. अल्लाहचा ग्रंथ कुरआनमध्ये म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित! आम्ही तर तुम्हाला जगवासियांकरिता कृपा बनवून पाठविले आहे.’’ (कुरआन २१: १०७)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन पूर्णतः इतिहासाच्या प्रकाशात आहे. त्यांची शिकवण व जीवनाच्या बाबतीत आम्ही जे काही जाणू इच्छितो ते जाणू शकतो. त्यांचे वैयक्तिक, सामाजिक व राजनैतिक जीवन स्पष्टपणे उघड आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे जो कोणी खुल्या अंतःकरणाने अध्ययन करील, तो या निष्कर्षाला पोहोचेल की, प्रेषित मुहम्मद (स.) संपूर्ण मानवतेचे हितैषी, उपकारक, उद्धारक आणि पथप्रदर्शक व आदर्श आहेत. त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करून प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनावर संक्षिप्त दृष्टी टाकू या, ज्यामुळे सर्वसामान्य व प्रेषितांच्या दरम्यान कोणते नाते व मधुर संबंध आहे; हे त्यांना स्पष्टपणे कळू शकेल. मुहम्मद (स.) यांचा जन्म अरबस्थानातील प्रसिध्द शहर मक्केत १२ रबीउल अव्वल, सोमवारी इ. स. ५७१ मध्ये प्रतिष्ठित कुरैश घराण्यात झाला होता. जन्माअगोदरच त्यांचे वडील अब्दुल्लाह यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी पालनपोषण केले, मग त्यांच्या निधनानंतर त्यांचे काका अबू तालिब यांनी पालनपोषण केले. मुहम्मद (स.) सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, आकर्षक आणि विनम्र असल्यामुळे कुटुंबीय व शहरातील लोक त्यांचा आदर करीत. त्यांच्या प्रामाणिकपणाची व सद्गुणांची सर्वत्र चर्चा होऊ लागली. कुरैशचे लोक व्यापारी होते. मुहम्मद (स.) यांचे काका अबू तालिबसुद्धा व्यापार करीत असत. मुहम्मद (स.) १२ वर्षांचे असताना काकांबरोबर व्यापाराच्या निमित्ताने शाम (सीरिया) ला गेले. तरुणपणी व्यवसायाकरिता इतर व्यापाऱ्यांबरोबर माल घेऊन स्वतः जाऊ लागले. मुहम्मद (स.) देवाणघेवाण व धंद्यात अतिशय प्रामाणिक व सत्यवचनी असल्यामुळे लोक त्यांना ‘सच्चा’ व ‘विश्वासू’ या उपाधिसह बोलवीत असत.
त्यांची कीर्ती ऐकून खदीजा नामक एका धनवान विधवेनेदेखील त्यांना व्यापाराचे सामान घेऊन प्रवासास पाठविले. माननीय खदीजा त्यांचे काम, प्रामाणिकपणा व खरेपणामुळे खूपच प्रभावित झाल्या आणि मोठमोठ्या सरदारांच्या लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी विवाहाकरिता आपल्या एका मैत्रिणीद्वारा त्यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव आपल्या काकांच्या अनुमतीने स्वीकारून मुहम्मद (स.) यांनी त्यांच्याशी विवाह केला. विवाहसमयी माननीय खदीजांचे वय ४० वर्षे होते तर मुहम्मद (स.) २५ वर्षांचे होते.
त्या काळच्या सामाजिक कुप्रथा आणि लोकांच्या समस्यांमुळे मुहम्मद (स.) खूपच दुःखी होते. ते मक्केपासून अंदाजे ६ मैलांच्या अंतरावर असलेल्या ‘हिरा’ नामक गुहेत जाऊन अल्लाहचे स्मरण करीत आणि लोकांना संकटमुक्त करण्याची त्याच्याकडे प्रार्थना करीत. त्यांचे वय ४० वर्षे असताना अल्लाहने त्यांना ‘प्रेषितत्व’ बहाल केले. एक दिवस गुहेत मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहकडून ‘ईश्वरी संदेश’ अवतरला आणि भटकलेल्या मानवतेला सरळमार्ग दाखविण्याची आणि ईश्वरी संदेश मानवांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. अल्लाहने मानव कल्याणाकरिता मुहम्मद (स.) यांच्यावर पवित्र ग्रंथ कुरआन अवतरण्याचा क्रम सुरू केला. हा क्रम २३ वर्षांत पूर्ण झाला. अल्लाहकडून ‘ईश्वरी संदेश’ अवतरणे आणि प्रेषित बनविण्याबरोबरच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा धर्म-प्रचाराचा कालखंड सुरू होतो. अल्लाहच्या आदेशानुसार ते मानवांच्या मार्गदर्शनाचे कार्य करीत राहिले. समाजातील स्वार्थी व सत्ताधारी लोकांनी त्यांचा जोरदार विरोध केला. सज्जन व उपेक्षित लोकांनी त्यांच्या शिकवणींचा स्वीकार केला आणि मुस्लिम बनले. मुहम्मद (स.) व त्यांच्या सहकाऱ्यांवर मक्केतील दुष्ट लोकांनी ना-ना प्रकारचे अत्याचार केले.
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सत्यधर्माचे आमंत्रण आणि प्रचार-प्रसाराचे कार्य निर्भीडपणे सुरूच ठेवले. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत अल्लाहचा संदेश पोहचविला. ते लोकांना अल्लाहच्या उपासनेकडे बोलवीत, त्याच्या एकत्वाची शिकवण देत, अल्लाहबरोबर कोणा दुसऱ्याला भागीदार ठरविण्यापासून परावृत्त करीत. मूर्ती, दगड, झाडे आणि जिन्नची पूजा करू देत नसत. पोटच्या मुलींना जिवंत गाडू देत नसत. व्यभिचार, मद्य आणि जुगाराचे दुष्परिणाम समजावून सांगत. मनाला वाईट विचारांपासून, जिभेला घाणेरड्या वक्तव्यापासून, शरीराला व कपड्यांना गलिच्छपणापासून पवित्र ठेवण्याचा उपदेश करीत. केवळ अल्लाहच संपूर्ण सृष्टी व जगाचा निर्माता आहे. मानव, सूर्य, चंद्र, तारे सर्व त्यानेच निर्माण केले असून सर्व त्याचेच आश्रित आहेत. अल्लाहच प्रार्थना ऐकणारा, इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारा आहे. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीस त्याच्या समक्ष आपल्या जीवनाचा हिशेब द्यावा लागणार आहे आणि कर्मानुसार अल्लाह बक्षीस व शिक्षा देईल म्हणजेच स्वर्ग व नरक, असा उपदेश मुहम्मद (स.) लोकांना देत असत. मक्केतील दुष्ट लोकांनी त्यांना व त्यांच्या साथीदारांना त्रास व यातना देणे चालूच ठेवले. प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या संपूर्ण वंशाचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला. ते व त्यांचे कुटुंबीय एका घाटीत जाऊन राहिले आणि तीन वर्षांपर्यत मोठमोठ्या संकटांना तोंड दिले. लोकांना बऱ्याचवेळा झाडांची पाने खाऊन दिवस कंठावे लागत होते, इतकेच नव्हे तर वाळलेले कातडे भाजून खाण्याची वेळ येऊन ठेपली. मक्केतील इस्लामच्या प्रचार-प्रसारामध्ये मोठमोठे अडथळे उभे करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केबाहेर इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा निश्चय केला. ताइफ शहरात ते गेले असताना तेथील लोकांनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केला. सतवणुकीचा क्रम जेव्हा अधिक वेगाने सुरू झाला तेव्हा त्यांना व त्यांच्या साथीदारांना स्वतःची जन्मभूमी सोडणे भाग पडले. ते व त्यांचे साथीदार मदीना शहरात गेले. मक्केतील विरोधकांनी तेथेही त्यांच्यावर हल्ला केला. अनेक लढाया झाल्या. तरीसुध्दा अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) विरोधकांशी मोठ्या उदारतेने वागत होते. जेव्हा मक्केत दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी मदीनेतून धन व जीवनावश्यक सामुग्री पाठविली. इस्लामी संदेश लोकांपर्यंत पोहचत राहिला आणि इस्लाम अरबस्थानात सर्वत्र पसरला. लोक सत्यमार्ग अवलंबून जीवनाचा उद्धार करू लागले.
मक्का एकेश्वरवादाचे प्राचीन केंद्र होते. येथूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांना आपली जन्मभूमी सोडून मदीनेला जाणे भाग पडले होते. अल्लाहच्या कृपेने इस्लाम एकसारखा वाढत गेला आणि सरतेशेवटी त्यांनी मक्केवर विजय मिळविला. मुस्लिमांची सेना जेव्हा मक्केजवळ पोहचली तेव्हा लपूनछपून टेहळणी करणाऱ्या कुरैशांचे एक सरदार अबू सुफियान यांना मुस्लिमांनी ताब्यात घेतले. त्यांना प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे करण्यात आले, परंतु त्यांनी या कट्टर शत्रूला अत्यंत दयाळूपणाची वागणूक दिली. अबू सुफियान अशा वागणुकीमुळे खुपच प्रभावित झाले आणि मुस्लिम बनून मुस्लिमांच्या सेनेत सामील झाले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का विजयानंतर मक्कावासी खूपच आशंकित व भयभीत झाले होते. त्यांनी मुस्लिमांना फारच यातना दिल्या होत्या आणि त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले होते. परंतु मुहम्मद (स.) त्यांना संबोधून म्हणाले, ‘‘आज तुमच्यावर कोणताही आरोप नाही. जा तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात.’’
प्रेषित प्रेम, दया व करुणेचे सागर होते. अल्लाहने त्यांना ‘संपूर्ण विश्वाकरिता कृपा’ बनवून पाठविले आहे. एक-दोन नव्हे तर आपल्या सर्वच शत्रूंना आणि विरोधकांना क्षमादान देऊन त्यांना सन्मान प्रदान करणारी एखादी व्यक्ती या जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही. अशा प्रकारचा मानवतेचा सर्वोत्तम आदर्श मुहम्मद (स.) यांनी सादर केला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनातच अरबस्थानातील एका मोठ्या विभागावर सत्याचे राज्य प्रस्थापित झाले. राज्यात गरिबांना, उपेक्षितांना व पीडितांना पूर्ण सन्मान लाभला.
मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या प्रकारचे जेवण ग्रहण करता त्याच प्रकारे जेवण आपल्या गुलामांनादेखील जेवू घाला, तुम्ही ज्या प्रकारचे कपडे परिधान करता तसलेच कपडे आपल्या गुलामांनाही परिधान करण्यास द्या, कारण तेदेखील अल्लाहचे दास आहेत. त्यांना त्रास देणे योग्य ठरणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘हे लोकहो! तुमचा पालनकर्ता एक आहे, याची तुम्हाला जाण असू द्या. तुमचा पिता (आदरणीय आदम अलै.) एक आहे. कोणा अरबाला एखाद्या अरबेतरावर कसलेही श्रेष्ठत्व नाही, तसेच कोणा अरबेतराला एखाद्या अरबावर श्रेष्ठत्व नाही, गोऱ्याला काळ्यावर आणि काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही. श्रेष्ठत्व फक्त ईशपरायणता व संयम बाळगणाऱ्याला लाभते.’’
अर्थात- वर्ण, जात, वंश, देश, प्रांत हे श्रेष्ठत्वाचे आधारस्तंभ नाहीत. प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व, श्रद्धा व चारित्र्यावर आधारित असतात.
मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘जो स्वतः पोटभर भोजन करतो आणि त्याचा शेजारी उपाशी झोपतो, तो मनुष्य श्रद्धावंत नसतो.’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी महिलांशी दुर्व्यवहार केला जात होता. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे शोषण केले जात असे आणि त्यांना भोगविलासाची वस्तू समजले जायचे. मुहम्मद (स.) यांनी ही दुष्ट मानसिकता बदलून टाकली आणि महिलांना त्यांचे स्वाभाविक अधिकार देऊन समाजात त्यांना आदर-सन्मान प्रदान केला.
मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जो तुमच्यात शिष्टाचाराच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे तो श्रध्दावानांत श्रध्देच्या दृष्टीने सर्वांत परिपूर्ण आहे आणि जो महिलांबाबत शिष्ट विचार बाळगतो तोच तुमच्यात सर्वोत्तम आहे.’’
ते पुढे म्हणतात, ‘‘महिलांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा. तुमचा महिलांवर आणि महिलांचा तुमच्यावर अधिकार आहे.’’
त्याचप्रमाणे मुलींच्या बाबतीत भेदभाव आणि अत्याचारपूर्वक वागणुकीस नष्ट करून त्यांनी असेदेखील सांगितले की, ‘‘जो मनुष्य आपल्या मुलींचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करील आणि मुलगा व मुलगी यामध्ये भेदभाव करणार नाही, तो स्वर्गात माझ्यासमवेत वास्तव्य करील.’’
प्रेषित मुहम्मद (स.) शूर तर होतेच त्याचबरोबर अत्यंत मृदु स्वभावाचे होते. दुर्बलांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्या बाबतीत मवाळपणाचा आदेश देत असत. मुहम्मद (स.) सोमवार दिनांक १२ रबीउल अव्वल, हिजरी सन ११ रोजी ठीक दुपारपूर्वी स्वर्गवासी झाले. मानवाने आपल्या एकमात्र स्रष्टा आणि पालनकर्त्याने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करूनच जीवन व्यतीत करावे. त्यामुळे तो इहलोक व परलोकात यश संपादन करू शकेल. हाच त्यांच्या जीवन व शिकवणींचा सार व उद्देश होता.
0 Comments