प्रेषित परंपरेचा मानवजातीत कसा प्रारंभ झाला व विकसित व उन्नत होत होत एका शेवटच्या महान प्रेषितावर तिचा कसा शेवट झाला; हे आपण पाहू या.
आपण हे ऐकलेच असेल की ईश्वराने सर्वाआधी एका मानवाला निर्माण केले. नंतर त्या माणसापासून त्याचे युगल बनविले व त्यापासून पुढे मानवी वंशवृद्धी केली आणि अगणित शतकानुशतकांपासून ती संपूर्ण भूमीवर पसरलेली आहे. जगात जितकी माणसे जन्मली ते सर्व त्या प्राथमिक युगलचीच संतान होत. सर्व जातीधर्माचा धार्मिक व ऐतिहासिक उल्लेख या गोष्टीशी सहमत आहे की मानवजातीचा आरंभ एकाच मनुष्यापासून झाला आहे. विज्ञानाच्या संशोधनाद्वाराही हे सिद्ध झालेले नाही की भूमंडलावर निरनिराळया भागांत वेगवेगळी माणसे निर्माण केली गेली. उलट अधिकतर वैज्ञानिक विद्वानांचे असे अनुमान व मत आहे की सर्वाआधी एकच मनुष्य निर्माण झाला असेल. जेथे मानववंश आढळतो, तो त्याच एका पहिल्या मानवाची1संतान आहे.
१) हे वास्तव की संपूर्ण मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे, जात पात, उच्चनीचसंबंधी भेदभावाचे समूळ उच्चाटन करते आणि सर्व एक दुसऱ्यांचे बंधु आहेत, हे सिद्ध होते. जातीयतेमुळे मानवसमाजात बिघाड निर्माण झाला आहे आणि त्याने रौद्ररूप धारण केले आहे या समस्येचे निराकरण मानवी विश्व-व्यापकतेत आहे.
आपल्या वंशजांना इस्लामी जीवनपद्धतीचे शिक्षण द्यावे. अर्थात त्यांना हे दाखवावे की तुमचा व संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. त्याचीच तुम्ही उपासना करा. त्याच्या समोर आपले मस्तक टेका. त्याच्याशीच सहाय्याची करूणा भाका आणि त्याच्या इच्छेनुसार जगात सदाचरणाने व न्यायाने आपले जीवन व्यतीत करा. तुम्ही अशा प्रकारे आचरण केले तर तुम्हाला योग्य ईनाम (मोबदला) मिळेल. जर तुम्ही त्याची अवज्ञा कराल तर कठोर शिक्षा मिळेल.
आदरणीय आदम (अ.) यांच्या संततीपैकी जे लोक भले होते ते आपल्या पित्यांनी दाखविलेल्या सरळ मार्गाने चालत राहिले. परंतु जे लोक दुष्ट व वाईट होते त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हळूहळू हरप्रकारची दुष्कृत्ये व कुश्रद्धा पसरत गेली. कोणी चंद्र, सूर्य, तारे कोणी वृक्षाची, पशूची व नद्यांची उपासना सुरू केली. काहींनी असा विचार केला की, वायू, जल, अग्नि, रोगराई तसेच आरोग्य व निसर्गाच्या इतर सत्तेचे व सामर्थ्यांचे ईश्वर वेगवेगळे आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उपासना करावयास हवी ज्यायोगे ते सर्व प्रसन्न होऊन आमच्याशी दयाळू होतील. अशा तऱ्हेने अज्ञानापोटी ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजेची अनेक रूपे प्रकटली आणि त्यापासून अनेक धर्म निर्माण झाले. हा तो काळ होता जेव्हा आदरणीय आदम (अ.) यांची वंशवेल जगाच्या विभिन्न भागांत पसरली होती. भिन्नभिन्न जाती बनल्या होत्या. प्रत्येक जातीने आपला एक नवीन धर्म बनविला होता आणि प्रत्येकाच्या रूढी-परंपरा वेगळ्या होत्या. ईश्वराच्या विस्मरणाबरोबरच लोकांना त्या नियमांचेही विस्मरण झाले जे आदरणीय आदम (अ.) यांनी आपल्या संततीला शिकविले होते. लोकांनी केवळ आपल्या तुच्छ इच्छावासनांचेच पालन आरंभिले. हर प्रकारच्या वाईट रूढी व प्रथा निर्माण झाल्या. सर्व प्रकारच्या अज्ञानपूर्ण विचारांचा प्रसार झाला. चांगले व वाईट जाणण्यासाठी चुका करण्यात आल्या. अनेक वाईट गोष्टींना चांगले मानण्यात आले व कित्येक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या गेल्या.2
आता ईश्वराने प्रत्येक जातीत व वंशात, प्रेषित पाठविण्यास आरंभ केला आणि ते लोकांना त्याच इस्लामची शिकवण देऊ लागले जी शिकवण आदरणीय आदम (अ.) यांनी सर्वप्रथम माणसांना दिली होती. या प्रेषितांनी आपापल्या जातीवंशांना विसर पडलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. एकाच ईश्वराची उपासना करण्याची त्यांना शिकवण दिली. ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजा करण्यापासून लोकांना परावृत्त केले. अज्ञानापोटी आलेल्या रूढींचे उच्चाटन केले. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत दाखविली. उचित नियम व आदेश दाखवून देऊन त्यांचे पालन करण्याचा आदेश दिला. भारत, चीन, इराण, इराक, इजिप्त, आफ्रिका, युरोप थोडक्यात असे की जगात कोणताही देश असा नाही जेथे ईश्वराकडून त्याचे सच्चे प्रेषितांचे आगमन झाले नाही. त्या सर्वांचा धर्म एकच होता तो हाच धर्म होता ज्याला ‘इस्लाम’ असे म्हणतात.(२) इतके जरूर होते की त्यांच्या शिकवणीची पद्धत व जीवनाचे नियम व कायदे थोडेसे भिन्न होते. ज्या तऱ्हेचे अज्ञान प्रत्येक जातीत पसरले होते, तेच दूर करण्यावर अधिक भर दिला गेला. ज्या प्रकारचे असत्य विचार प्रचलित होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावरच अधिक भर दिला गेला. संस्कृती, सभ्यता, ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने सर्व जाती प्राथमिक अवस्थेतच होत्या म्हणून त्यांना सरळ व सोपी शिकवण व साधे धर्म-नियम व विधान दिले गेले. जसजशी प्रगती व उन्नती होत गेली तसतसे शिकवणीला व धर्म विधानांनाही विकसित रूप दिले गेले. परंतु हा फरक केवळ बाह्यात्कारीच होता. सर्वांचा आत्मा एकच होता. श्रद्धेत ‘तौहीद’ (एकेश्वरत्व), व्यवहारात भलेपणा व सदाचार आणि आखिरत (पारलौकिक जीवन) च्या शिक्षा व मोबदल्यावर सर्वांची श्रद्धा व दृढ विश्वास होता.
प्रेषितांशी माणसांनी विचित्र असा दुर्व्यवहार केला. पहिल्यांदा त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार देण्यात आला. काहींना आपल्या मायभूमीतून हुसकून लावण्यात आले. काहींचा वध करण्यात आला. काहींना आयुष्यभर शिकवण व उपदेश करूनसुद्धा मोठ्या मुष्किलीने केवळ दहापाच अनुयायी प्राप्त होऊ
२) सर्वसाधारणपणे लोकांचा एक मोठा असा गैरसमज आहे की, इस्लामचा उदय आदरणीय मुहम्मद (स.) कडून झाला आहे. हा गैरसमज येथपर्यंत झालेला आहे की, आदरणीय मुहम्मद (स.) यांना इस्लामचे संस्थापक मानण्यात येते. वास्तविकपणे ही एक अत्यंत मोठी चूक असून प्रत्येक अभ्यासकाच्या मनातून ती पूर्णपणे दूर केली गेली पाहिजे. प्रत्येक अभ्यासकाने ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की, अगदी आरंभापासून मानवजातीचा इस्लाम हाच एकमेव व खराखुरा धर्म आहे. पृथ्वीवर ज्या काळी व ज्या स्थळी ईश्वराकडून प्रेषित आले, त्या सर्वांनी याच एका धर्माची लोकांना शिकवण दिली. परंतु ईश्वराचे हे निवडक दास आपले कर्तव्य ठामपणे करीत राहिले. शेवटी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम घडला. मोठमोठे जाती-वंशाचे समूह त्यांचे अनुयायी बनले. त्यानंतर मार्गभ्रष्टतेने वेगळे रूप धारण केले. जगातून प्रेषितांचे प्रयाण होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना मिळालेल्या शिकवणुकीत हळूहळू बदल केला. त्यांच्यावर अवतरलेल्या ईशग्रंथात आपले विचार व मत मिसळले. उपासनांच्या निरनिराळ्या प्रकारांचा अंगीकार केला.
काहींनी तर खुद्द प्रेषितांचीच उपासना व आराधना सुरू केली. कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा अवतारच मानले (म्हणजे खुद्द ईश्वरच मानवी रूपात प्रकटला होता) कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा पुत्र मानले तर आणखी कोणी आपल्या प्रेषिताला ईशत्वाचा सहभागी मानले. अशा रितीने माणसांनी एक अद्भूत आत्मवंचनेचे कृत्य सुरू केले. ज्या व्यक्तींनी एकेश्वरत्वाची शिकवण दिली होती आणि मूर्तीपूजेचे खंडन केले होते, मनुष्याने त्यांच्याच मूर्ती बनवून त्यांचीच उपासना सुरू केली. या प्रेषितांनी जे काही नियम व आचारसंहिता आपल्या अनुयायांना दिले होते तेही तऱ्हेतऱ्हेने विकृत करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अज्ञानयुक्त व अडाणीपणाच्या रूढींचा समावेश करण्यात आला. मानवनिर्मित नियमांची त्यामध्ये सरमिसळ करण्यात आली, ती इतकी की कांही शतके लोटल्यानंतर हे जाणून घेण्याचे कसलेही साधनच शिल्लक उरले नाही की प्रेषितांनी दिलेली खरी शिकवण व खरी आचारसंहिता कोणती आहे व नंतर लोकांनी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची मिसळ व भेसळ केली.3
खुद्द प्रेषितांची जीवनचरित्रेसुद्धा आख्यायिका व दंतकथामध्ये अशा रितीने मिश्रित झालेली आहेत की, त्या बाबतीत कोणतीही गोष्ट विश्वासार्ह उरली नाही. तरीसुद्धा प्रेषितांनी केलेले प्रयत्न अगदीच व्यर्थ व वाया गेले नाहीत. मिसळ व भेसळ झाली असूनही काहीतरी मूळ सत्य अनेक धर्मात अल्पशा प्रमाणात शिल्लक उरले आहे. ईश्वराची जाणीव व पारलौकिक जीवनाची जाणीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व धर्मांत आढळते. चांगुलपणा, सदाचार यांची काही तत्त्वे सर्व जगात मान्य केली गेली.
सर्व जातीवंशाच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक जातीवंशाला इतपत तयार करून सोडले की, जगात अशा एका धर्माची शिकवण प्रसारित केली जावी की जो धर्म निस्संशयपणे व एकमुखाने सर्व मानवजातीचा धर्म असेल.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आरंभी प्रत्येक जातीवंशात वेगवेगळे प्रेषित येत असत आणि त्यांची शिकवण त्यांच्या जातीवंशापर्यंतच मर्यादित असे. याचे कारण असे की, त्याकाळी सर्वच जाती-वंश एकमेकापासून वेगळे होते. एकमेकांत मिसळत नसत. जणू काय प्रत्येक जात व वंश आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत मर्यादित होती. अशा काळी कोणतीही सर्वसाधारण व एकत्रित शिक्षण, शिकवण यांचा सर्व जाती-वंशात प्रसार करणे अत्यंत कठीण होते. शिवाय भिन्न भिन्न जाती-वंशाची अवस्था एकमेकापासून खूपच वेगळी होती. अज्ञानरुपी अंधकार चहुकडे मोठ्या प्रमाणात होता. अशा अज्ञानापोटी, श्रद्धा व आचार यात जी विकृती निर्माण झाली होती, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात आढळत असे. म्हणूनच ईश्वराच्या प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला वेगळी शिकवण व उपदेश दिला. असत्य विचारांचे हळूहळू उच्चाटन करून उच्चप्रतीच्या नियम व विधानाचे पालन करण्याची शिकवण दिली जाई. अशा तऱ्हेने या जातीवंशाला शिकवण देण्यात किती हजार वर्षे लोटली ते ईश्वरालाच ठाऊक. प्रगती करता करता अखेरीस ती वेळ आली जेव्हा मानवजात बाल्यावस्थेतून निघून तारुण्यावस्थेत पोहोचू लागली होती. व्यापार, कला कौशल्य यांच्या प्रगतीबरोबरच जातीजातीत परस्पर संबंध निर्माण झाले. चीन व जपानपासून ते युरोप व आफ्रिकेतील दूरवरच्या देशांमध्ये जलमार्गाने तसेच खुष्कीच्या मार्गाने दळणवळण सुरू झाले. बहुतेक जातीवंशांत लेखन कलेचा प्रसार व प्रचार सुरु झाला. विद्या व कला यांचा प्रसार झाला. विभिन्न जातीवंशात ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. मोठमोठ्या राज्यांची स्थापना करून अनेक देशांना तसेच अनेक जातीवंशांना एकाच राजनैतिक व्यवस्थेमध्ये जोडून टाकले.
अशा रीतीने त्यापूर्वी मानवजातीत आढळून येणारा दुरावा व परकेपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे इस्लामची एक शिकवण व एक धर्मविधान संपूर्ण जगासाठी पाठविणे शक्य झाले. आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानवाची अवस्था इतकी प्रगत झाली होती की जणू तो स्वतःच एका सामान्य धर्माची मागणी करु लागला होता. बौद्धमत हा काही परिपूर्ण धर्म झालेला नव्हता व त्यात केवळ काही नैतिक नियमच होते. परंतु तो भारताबाहेर जपान व मंगोलियापर्यंत व दुसरीकडे अफगाणिस्तान व बुखारापर्यंत पसरला. त्याचे प्रचारक दूरदूरच्या देशापर्यंत जाऊन पोचले. याच्या काही शतकानंतरच ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आदरणीय ईसा (त्यांचेवर ईश्वराची कृपा असो) इस्लामचीच शिकवण घेऊन आले होते, परंतु त्यांच्या पश्चात ख्रिश्चन धर्माच्या नावाने एक अपूर्ण व दोषयुक्त धर्म रचण्यात आला. ख्रिश्चनांनी या धर्माचा प्रसार इराणपासून आफ्रिका व युरोपमधील दूरदूरच्या देशांत केला. या घटना आम्हाला हे दर्शवितात की, जग त्याकाळी एक सामान्य मानवी धर्माची मागणी करीत होते. तसे करण्यात त्याची इतकी तयारी झाली होती की, जेव्हा एक परिपूर्ण व सत्यधर्म त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने अपक्व आणि अपूर्ण धर्माचाच मानवजातीत प्रसार करण्यास प्रारंभ केला.
0 Comments