तुम्ही स्वतः जेव्हा अमुक एक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे स्पष्टपणे ओळखता तेव्हा त्याच्या सांगण्याचा स्वीकार करणे, त्याच्या आज्ञांचे पालन करणे व त्याच्या पद्धतीचे अनुकरण करणे आवश्यक ठरते. एखाद्या माणसाला प्रेषित तर मानायचे व त्याचे सांगणे मात्र ऐकावयाचे नाही. हे बुद्धीला पटत नाही कारण त्याला प्रेषित मानण्याचा अर्थ असा की, तो जे काही सांगत आहे ते सर्व तो ईश्वराच्या वतीने सांगत आहे व जी काही कृती करीत आहे ती ईश्वरेच्छेनुसारच करीत आहे. आता त्याच्याविरुद्ध तुमची उक्ती व कृती ही ईश्वराविरुद्ध ठरेल व जी गोष्ट ईश्वराविरुद्ध असेल ती कदापि सत्यावर व न्यायावर अधिनिष्ठित असू शकत नाही. म्हणून एखाद्याला प्रेषित मानल्यानंतर ही गोष्ट अनिवार्य ठरते की, त्याचे सांगणे कसलीही शंकाकुशंका न बाळगता स्वीकारण्यात यावे व त्याच्या आदेशा पुढे नतमस्तक व्हावे. मग उद्देश व त्यामागील होणारा लाभ, तुम्हाला कळो वा न कळो. जे प्रेषिताकडून सांगितले गेले ते प्रेषितांकडून असणे हीच बाब सत्य असण्याचा पुरावा आहे. त्यात सर्व तत्त्वदर्शिता व हितकारक उपदेश सामावलेले असते. एखाद्या गोष्टीचे तुम्हाला आकलन होत नसेल तर दोष त्या गोष्टीचा नसून तुमच्या आकलनशक्तीचा आहे.
जो मनुष्य एखाद्या कलेत अथवा विद्येत पारंगत नाही, तो त्या कलेतील बारकावे जाणू शकत नाही, ही गोष्ट उघड आहे. जर असा मनुष्य त्या कलेत पारंगत असलेल्या व्यक्तीचे म्हणणे केवळ एवढ्यासाठीच मान्य करीत नसेल की, त्याला आकलन होत नाही तर असा मनुष्य किती मूर्ख असेल? जगातील प्रत्येक कार्यक्षेत्रात विशेषज्ञांची गरज असते आणि विसेषज्ञांकडे रुजू झाल्यावर त्याच्यावर श्रद्धा ठेवली जाते व त्याच्या कार्यात कसलीही ढवळाढवळ केली जात नाही. कारण सर्व माणसे सर्व प्रकारच्या कार्यात तज्ञ असू शकत नाहीत व सर्वकाही ते जाणू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा व चातुर्याचा वापर एक सर्वोत्तमसाठीच करावयास हवा. एक सर्वोत्तम तज्ञ शोधून काढा. एखाद्या व्यक्तीसंबंधी तुम्हास खात्री झाली की तो विशेषज्ञ आहे, तर त्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावा लागेल. मग त्याच्या कर्मात हस्तक्षेप करणे व प्रत्येक बाबीसंबंधी असे म्हणणे की आधी आम्हाला ते समजून सांगा नाहीतर आम्ही मान्य करणार नाही, असे वागणे हा शहाणपणा नसून शुद्ध मूर्खपणा आहे. एखाद्या वकिलास आपला खटला सुपूर्द केल्यावर त्याच्याशी एखाद्या मुद्यावर हुज्जत घातल्यास तुम्हाला त्याच्या कार्यालयातून तो बाहेर घालवून देईल. तसेच एखाद्या डॉक्टरला त्याने दिलेल्या औषधातील प्रत्येक घटकाबद्दल खुलासा विचारला तर तो तुमचा औषधोपचार बंद करील. असाच प्रकार धर्माबाबतही आहे. तुम्हाला ईश-ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे,
हे तुम्ही जाणू इच्छिता. स्वतः तुमच्याकडे या सर्व गोष्टी जाणून घेण्याचे साधन नाही. तेव्हा आता तुमचे हे कर्तव्य ठरते की, तुम्ही ईश्वराच्या खऱ्या प्रेषिताचा शोध घ्यावा. या शोधकार्यात तुम्हाला अत्यंत चातुर्याने व समंजसपणे वागावे लागेल, कारण जर तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाची निवड केलीत तर तो तुम्हाला चुकीच्या वाटेने नेईल. परंतु सर्व प्रकारचा शोध केल्यावर तुमची अशी खात्री झाली की, अमुक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे तर त्याच्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावयास हवा व त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावयास हवे.
प्रेषितांवर ईमान धारण करण्याची आवश्यकता
ईश्वरातर्फे प्रेषित जो मार्ग दाखवितो. तोच इस्लामचा सत्य व सरळ मार्ग आहे, हे तुम्हाला कळले आहे. आता तुम्ही स्वतःच हे समजू शकला की, प्रेषितांवर ईमान धारण करणे व त्यांच्या आज्ञेचे पालन व अनुकरण करणे सर्व मानवजातीला अनिवार्य आहे. जो मनुष्य प्रेषिताचा मार्ग सोडून स्वतःच्या बुद्धीनुसार मार्ग अनुसरतो, तो निश्चितपणे मार्गभ्रष्टच आहे.
याबाबतीत लोक अनेक प्रकारच्या विचित्र चुका करतात. काही लोक असे आहेत की, ते प्रेषितांची सत्यनिष्ठा मानतात, परंतु त्यावर ते ईमान धारण करीत नाहीत. तसेच त्यांचे आज्ञापालन करीत नाहीत. हे नुसते ‘श्रद्धाहीन’ (काफिर) नसून मूर्खही आहेत. कारण की प्रेषिताला खरा मानल्यानंतर त्यांची अवज्ञा करणे याचाच अर्थ असा होतो की असा मनुष्य जाणूनबुजून असत्याचा मार्ग अनुसरतो. यापेक्षा मोठी घोडचूक असू शकत नाही, हे उघड आहे.
काही लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्हास प्रेषितांचे अनुकरण करण्याची आवश्यकताच नाही. आम्ही आपल्या स्वयंबुद्धीने सत्याचा मार्ग जाणून घेऊ. हीसुद्धा एक मोठी चूक आहे. तुम्ही भूमितीचा अभ्यास केलेला आहे. तुम्हास हे माहीत आहे की एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकच सरळ रेषा असू शकते. तिच्याव्यतिरिक्त जितक्या रेषा असतील त्या एकतर वाकड्या असतील किंवा त्या दोन्हीबिंदूशी मिळणाऱ्या नसतील. अशीच वास्तवता सत्यमार्गाचीही आहे, ज्याला इस्लामच्या भाषेत ‘‘सिराते-मुस्तकीम’’ म्हणजे सरळ मार्ग असे म्हटले जाते. हाच मार्ग मनुष्यापासून प्रारंभ पावून ईश्वराप्रत जातो व भूमितीच्या या सिद्धांताप्रमाणेच तोसुद्धा एकच मार्ग असू शकतो. त्याच्याखेरीज जितके मार्ग असतील ते एकतर वेडेवाकडे असतील किंवा ते ईश्वरापर्यंत न पोहचणारे असतील. आता विचार करा की जो सरळ मार्ग आहे तो तर प्रेषिताने दाखवून दिला आहे व त्याशिवाय अन्य कोणताही सरळ मार्ग होऊच शकत नाही. हा मार्ग सोडून जो मनुष्य स्वतःच दुसरा मार्ग शोधील त्याला खालील दोन अवस्थांपैकी एक अवस्था अनिवार्यपणे प्राप्त होईल. एकतर त्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्गच सापडणार नाही. दुसरा जर सापडलाच तर तो अतिशय लांब व वक्र असा असेल. ती सरळरेषा असणार नाही तर ती अतिवक्र रेषा असेल. पहिल्या अवस्थेत तर त्याचा सर्वनाश उघड आहे. उरली दुसरी अवस्था तर तीसुद्धा निस्संशयपणे मूर्खपणाचीच असेल. निर्बुद्ध जनावरसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वक्र मार्ग सोडून सरळ मार्गानेच जातो. मग अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याला ईश्वराचा एक सदाचरणी दास सरळमार्ग दाखवित असताना तो म्हणतो की ‘‘मी तुम्ही दाखविलेल्या मार्गाने जाणार नाही व स्वतःच वेड्यावाकड्या मार्गाने भरकटत जाऊन मी माझे इच्छित स्थानापर्यंत पोहोचेन.’’
तुम्ही खोलवर विचार केल्यास कळून चुकेल की जो कोणी प्रेषितावर ईमान धारण करण्याचे नाकारतो त्याला ईश्वराप्रत पोहचण्यास कोणताही मार्ग सापडू शकत नाही, सरळ मार्गही नाही व वाकडाही नाही. कारण असे की, जो मनुष्य सत्यनिष्ठ व सदाचारी मनुष्याचे म्हणणे स्वीकारण्याचे व मान्य करण्याचे नाकारतो त्याच्या मस्तकात काही दोष नक्कीच असतो ज्या कारणाने तो सत्यापासून तोंड फिरवतो. त्याची बुद्धी व समंजसपणा दोषयुक्त असेल किंवा त्याच्या मनात अहंकार भरलेला असेल वा त्याचा स्वभावधर्म इतका वक्र असेल की तो सत्य व सदाचाराच्या गोष्टी स्वीकारण्यास तयारच होणार नाही. तो पूर्वजांच्या रूढीचे अंधानुकरण करणारा असेल व ज्या काही असत्य गोष्टी रूढींच्या स्वरूपात पूर्वापार चालत येत असतात त्याविरुद्ध कसलेही ऐकून घ्यायला तयार नसेल. तो आपल्या इच्छा वासनांचा दास असेल आणि प्रेषितांच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास यासाठीच नकार देत असेल की स्वीकार केल्यानंतर बेकायदेशीर गोष्टी व पापकर्म करण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरणार नाही. वर उल्लेखलेल्या सर्व बाबींपैकी एखादा जरी दुर्गुण कोणा माणसांत असेल तर त्याला ईश मार्ग सापडणे केवळ अशक्यप्राय आहे. एक खरा सदाचरणी व तटस्थ वृत्तीचा भला मनुष्य एका सच्चा प्रेषिताच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास नकार देईल, हे अशक्य आहे.
प्रेषित ईश्वराने पाठविलेले असतात व ईश्वराचाच असा आदेश आहे की, त्यांच्यावर ईमान धारण करा व त्यांच्या आज्ञा पाळा. असे असतांना जर कोणी प्रेषितावर ईमान धारण केले नाही तर ते ईश्वराविरुद्ध बंड ठरते. तुम्ही ज्या राज्यातील प्रजा असाल त्यातील राजाने नियुक्त केलेल्या शासकांनाही तुम्हास मान्य करावे लागेल. जर तुम्ही त्याला शासक मानावयास नकार दिला तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही खुद्द राजाज्ञेविरुद्ध बंड पुकारले. राजाला मानायचे व राजाने नियुक्त केलेल्या शासकास मानायचे नाही, या दोन्ही परस्पर विरोधी व विसंगत गोष्टी आहेत. ईश्वर व त्याने पाठविलेल्या प्रेषिताचेही उदाहरण याच प्रकारचे आहे. ईश्वर सर्व मानवजातीचा वास्तविक सम्राट आहे. ज्या माणसाला त्याने मानवजातीच्या उपदेशार्थ व मार्गदर्शनार्थ पाठविले व ज्याच्या आज्ञापालनाचा आदेश दिला, त्याला प्रेषित मानणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरते. इतर सर्व गोष्टींचे अनुकरण व आज्ञा पाळण्याचे सोडून देऊन केवळ त्याचीच आज्ञा पाळावयास हवी. त्यांच्यापासून तोंड फिरवणारा मग तो ईश्वरास मानणारा असो की न मानणारा कोणत्याही अवस्थेत तो ‘श्रद्धाहीन’च (काफिर) आहे.
0 Comments