प्रेषितांचे उत्तर ऐकून त्याने विचारले की, ‘‘इमान (श्रद्धा) काय आहे’’? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ईश्वर एकच आहे, यावर दृढ असणे, मृत्यूनंतर पुर्नजिवित होण्यावर विश्वास ठेवणे, आणि जे काही जगांमध्ये घडले ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार व त्याच्याच निर्णयानुसार घडते, यावर विश्वास ठेवणे होय.’’ मग त्याने तिसऱ्यांदा प्रश्न केला की ‘‘एहसान काय आहे?’’ यावर प्रेषितांनी सांगितले, ‘एहसान’ हे आहे की तुम्ही ईश्वराचे असे भय बाळगा की, तुम्ही ईश्वरास पाहात आहात किंवा तुम्ही जरी त्यास पाहु शकत नसाल तर तो मात्र तुम्हाला निश्चितच पाहत आहे’’? यावर तो म्हणाला, ‘‘कयामत (प्रलयकाळ) केव्हा येईल?’ यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे तुम्हाला हे माहित नाही, त्याचप्रमाणे मला पण कयामतची निश्चित वेळ माहित नाही. मात्र मी तुम्हाला त्याची काही पुर्नलक्षणे सांगतो. जेव्हा तुम्ही पहाल की, स्त्री आपल्या स्वामीची आई बनेल. जेव्हा तुम्ही पहाल की, अनवाणी पायी चालणारे, नागवे शरीर ठेवणारे, मुके व बहिरे लोक शासनकर्ते होतील. आणि पशुपालन करणारे उंच-उंच इमारती उभी करण्यात एक दुसऱ्यांशी स्पर्धा करतील. ही कयामत (जग नष्ट होण्याचा दिवस) ची लक्षणे आहेत. (हदीस : बुखारी व मुस्लीम)
भावार्थ- ‘इमान’चा शब्दश: अर्थ विश्वास व भरवसा आहे. ‘इस्लाम’चा अर्थ, ‘‘स्वत:ला ईश्वराच्या स्वाधीन करणे’’ असा आहे. ‘एहसान’चा अर्थ ‘एखादे कार्य कौशल्यपूर्ण व व्यवस्थितरित्या पूर्ण करणे. एखादा माणूस ईश्वराचा उत्तम आणि ईशपरायणदास कसा होऊ शकतो? शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते की माणसांवर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहात आहे, त्याचे अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे, इतके मनोसामर्थ्य नसेल तर किमान असे समजावे की ईश्वर त्याला पाहात आहे. तात्पर्य हे की तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वराला नेहमी आपल्याजवळ हजर असण्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णत: येत नाही. स्त्रीचे आपल्या स्वामीची माता होण्याचा अर्थ म्हणजे पत्नी आपल्या पतीची अवज्ञा करील. दासी आपल्या स्वामीवर प्रभुत्व गाजविल. मुले आपल्या पित्याच्या डोक्यार बसतील – (डोईजड होतील) आणि प्रत्येक धाकटा आपल्या थोरांचा (ज्येष्ठांचा) आदर-सन्मान करणार नाही, हे एक लक्षण झाले. दुसरे लक्षण असे की, संस्कृती व सभ्यता नसलेल्या आणि बुद्धिमत्ता व आकलनक्षमतांचा अभाव असलेल्या लोकांच्या हाती जमीनीची सत्ता येईल. संपत्तीच्या अवास्तव रेलचेलीमुळे उंचच उंच व भव्य इमारती बांधण्यात अमाप संपत्तीचा वापर होईल, आणि उंच इमारती बांधण्यामध्ये स्पर्धा होईल. जेव्हा ही लक्षणे प्रकट होतील तेव्हा असे समजावे की, ‘‘कयामत (जग नष्ट होण्याची वेळ) जवळ येऊन ठेपली आहे. मात्र कयामतची निश्चित वेळ सर्व शक्तिमान ईश्वराखेरीज कोणालाही माहित नाही.
0 Comments