रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम ‘मेसहेराती’ करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय
सहेरी करण्यासाठी लोकांना जाग आणण्याकरिता काही लोकं घरोघरी जाऊन आवाज देऊन उठवतात. त्यांना ‘मेसहेराती’ म्हणतात. हे मेसहेराती लोकं गल्ली बोळात फिरून काही खास भक्ती गीते गात असतात, त्यांना ”सदा ए रमजान” देखील म्हटले जाते. याला आपण ‘रमजानची भूपाळी’ म्हणू या.
सर्वात पहिले मेसहेराती आदरणीय बिलाल हबशी (निग्रो) होते. जुन्या काळात भा.रा. तांबेंची भूपाळी ”उठ उठी गोपाळा …” ही फार प्रसिद्धीस पावली होती. कारण सकाळी उठण्याचे महत्व जुन्या लोकांना कळले होते. सकाळी आणि विशेष करून पांढरं फाटण्यापूर्वीच्या वेळी वातावरणात एक प्लाझ्मा स्टेट तयार होते. म्हणजे एकावर एक असलेल्या हवेच्या थरावरचे ओझोनचे महत्वाचे थर हे खालील हवेच्या थरात मिसळले जाते आणि त्यावेळी प्रदूषणरहित शुद्ध हवा उपलब्ध होते. पण अशावेळी बंदिस्त घरात ढाराढूर झोपणारे निसर्गाच्या या देणगीला पारखे होतात. म्हणूनच आज वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातले आहे. फार कमी जण याबद्दल जागृत आहेत.
यावेळी उठण्याचे फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक कारणे देखील आहेत. उठायला उशिर झाला तर दिवसाची इतर कामे पुढे पुढे ढकलली जातात. कधी कधी त्या कामांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी काढावी लागते तर व्यापाऱ्यांना दुकान अर्धा दिवस बंद करावे लागते. सकाळी उठून दुकान उघडणाऱ्यांचा धंदा नेहमीच जोरात असतो. म्हणूनच त्या एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे –
”पहाटेचं झोपणं हे रोजीरोटीला आडकाठी आणणे आहे.”
अशाप्रकारे सहेरच्या वेळी खाने हे रोजाधारकाला फक्त अध्यात्मिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिक फायद्याच्या सवयीदेखील लावते.
पण आजकाल अलार्म घड्याळे, मोबाईल अलार्ममुळे या मेसहिरातींची गरज नाही, असे सांगण्यात येते. म्हणून हे मेसहेराती शहरी भागातून लुप्त झाले आहेत. पण आलं;अलार्म वाजल्यानंतरही घडीचे बटन किंवा मोबाईल अलार्मचे ‘स्नूज’ऐवजी ‘डिसमिस’चे बटन दाबून पुन्हा झोपणारे तरुण महाभाग खूप आहेत. अशा लोकांना सकाळी उठणे हे एक दिव्य वाटते. काही देशात तर अलार्म वाजल्यावर इलेक्ट्रिक पलंग हा आपोआप वर खाली हलवून त्यावर झोपणाऱ्याला जागे करतो, अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा माणसाची जागा मशीन घेऊच शकतं नाही, हेच खरं. त्यामुळे आजही या मेसहेरातीची गरज आहेच आहे.
ग्रामीण भागात आजही हे मेसहेरातीं बाकी आहेत. परंतु त्यांना आता फार विकृत नाव देण्यात आले आहे – ”सहेरी के फकीर”. खरे म्हणजे हे भिकाऱ्यांचे काम नाही, यापूर्वी नव्हते. एक धर्मकार्य आणि समाजकार्य म्हणून विनामूल्य ही सेवा केली जात होती, त्यामुळे त्या कार्याची अस्मितादेखील जिवंत होती. परंतु आज त्यांना ‘सहेरी के फकीर’ म्हणून ईदच्या दिवशी थोडं जास्त धान्य दान (फितरा) म्हणून दिला जातो. हे काम कुणी दुसरे करत नसल्यामुळे आणि पोटाला प्रपंच देखील लागलेला असल्याने जे फकीर लोकं हे करत आहेत, तेही काही कमी नाही. काही मेसहेराती भूपाळीसोबतच खंजेरी, डफलीदेखील वाजवतात. याचा फायदा सकाळी उठणाऱ्या मुस्लिमेतर चाकरमान्यांनाही होतो. आज झोपलेल्या समाजाला बोधप्रत भूपाळी गाऊन जागे करणाऱ्या मेसहेराती आणि मराठीत अजरामर प्रभातगीते लिहिणाऱ्या भा.रा.तांबेंची खरंच गरज आहे!
– नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
0 Comments