१. माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की कर्मांची भिस्त फक्त दृढनिश्चयावर आहे आणि मनुष्याला ते सर्व मिळेल ज्याचा त्याने निश्चय केला असेल, अल्लाह आणि पैगंबरांसाठी केलेली ‘हिजरत’ उत्तम ‘हिजरत’ होय आणि भौतिक जगासाठी केलेली अथवा एखाद्या महिलेशी विवाह करण्यासाठी असलेली ‘हिजरत’ या जगासाठी अथवा महिलेसाठीच समजली जाईल. (बुखारी व मुस्लिम)
२. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह तुमचा चेहरामोहरा आणि तुमच्या संपत्तीला पाहणार नाही तर तुमची हृदये आणि तुमच्या कर्मांना पाहील. (मुस्लिम)
३. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की अंतिम निवाड्याच्या (‘कयामत’च्या) दिवशी सर्वप्रथम एका अशा मनुष्याच्या बाबतीत निर्णय देण्यात येईल ज्याला हौतात्म्य लाभले असेल, त्याला अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल. मग अल्लाह त्याला आपल्या सर्व देणग्यांची आठवण करून देईल आणि त्याला त्या सर्व देणग्या आठवतील तेव्हा विचारले जाईल, ‘‘तू माझ्या देणग्या प्राप्त करून कोणते काम केले?’’ तो म्हणेल, ‘‘मी तुझ्या प्रसन्नतेसाठी (तुझ्या जीवनधर्माचा (‘दीन’चा) विरोध करणाऱ्यांविरूद्ध) युद्ध केले, इतकेच नव्हे तर मी आपले प्राण दिले.’’ अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘तू ही गोष्ट खोटी सांगितली की माझ्यासाठी युद्ध केले, तू फक्त यासाठी युद्ध केले (आणि शौर्य दाखविले) की लोकांनी तुला शूरवीर म्हणावे. मग जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘त्या हुतात्म्याला तोंडघशी फरफटत घेऊन जा आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला नरकात टाकले जाईल. मग एक दुसरा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात उभा केला जाईल, तो ‘दीन’ (जीवनधर्म) चा ज्ञानी आणि ‘दीन’ शिकविणारा असेल. त्याला अल्लाह आपल्या देणग्यांची आठवण करून देईल आणि त्याला सर्व देणग्या आठवतील. तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘त्या देणग्या प्राप्त करून तू कोणते कर्म केले?’’ तो म्हणेल, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्यासाठी तुझ्या ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले आणि तुझ्यासाठी दुसऱ्यांना त्याचे ज्ञान दिले आणि तुझ्यासाठी पवित्र कुरआनचे पठण केले.’’ अल्लाह म्हणेल, ‘‘तू खोटे सांगत आहेस. लोकांनी तुला ‘आलिम’ (विद्वान) म्हणावे यासाठी तू ज्ञान प्राप्त केले, लोकांनी तुला कुरआन जाणणारा म्हणावे यासाठी तू कुरआनचे पठण केले; तेव्हा जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत घेऊन जा आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला फरफटत नेण्यात आले आणि नरकात फेकण्यात आले. आणि तिसरा मनुष्य तो असेल ज्याला अल्लाहने जगात ऐशोआराम प्रदान केला होता आणि प्रत्येक प्रकारची संपत्ती दिली होती. या मनुष्यास अल्लाहसच्या समोर हजर केले जाईल आणि तो आपल्या सर्व देणग्या सांगेल आणि त्याला अल्लाहच्या सर्व देणग्या आठवतील आणि मान्य करील की होय, या सर्व देणग्या त्याला देण्यात आल्या होत्या. तेव्हा त्याचा पालनकर्ता त्याला विचारील, ‘‘माझ्या देणग्या प्राप्त करून तू कोणते कर्म केले?’’ तो उत्तर देईल, ‘‘जेथे जेथे खर्च करणे तुला पसंत होते तेथे मी तुझी प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी खर्च केले.’’ अल्लाह म्हणेल, ‘‘खोटे बोलतोस. तू ही सारी संपत्ती लोकांनी तुला दानशूर म्हणावे यासाठी खर्च केलीस. मग त्याच्या बदला तुला जगात मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत न्या आणि नरकाच्या आगीत फेकून द्या.’’ तद्वत त्याला नेऊन नरकाच्या आगीत फेकून देण्यात येईल.
(हदीस : सही मुस्लिम)
0 Comments