आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळातील लढायांचा उल्लेख पाहून काही इतिहासपंडितांकडून होणार्या टीकांच्या आधारावर असा नेहमीच प्रश्न उभा करण्यात येतो की, नैतिकता आणि शांतीचा संदेश देणार्या धर्मात तलवारीची आणि युद्धाची काय गरज आहे? मस्जिदीसह रणभूमीतील कार्याची जोड कशासाठी? कारण धर्म, नीतिमत्ता, पूजापाठ, समाजकार्य वगैरे सर्व काही मस्जिदीमधून होऊ शकते. ‘रणभूमी’चा या बाबीशी काय संबंध आहे?
या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर स्वयं कुरआनने दिले आहे. प्रथम असे की, इस्लामी राज्याचे अस्तित्व व अधिकार, तेथील निवासी आणि संपत्तीचे संरक्षण करणे हे रणभूमी गाजविल्याशिवाय शक्य नाही.
दुसरे असे की, मानवाची श्रद्धा, लक्ष्य, जीवनव्यवस्था आणि सांस्कृतिक रुपरेखा अबाधित ठेवण्यासाठी इस्लामी राज्याचे गठन व्हावे.
तिसरे असे की, ईशदासत्वावर आधारित आणि मानवकल्याण आंदोलनविरोधी असलेल्या विध्वंसक शक्तींचा विनाश व्हावा.
चौथे असे की, जर एखाद्या अत्याचारी आणि जुलमी शक्तीद्वारे दीनदलित मानव, अबला स्त्रिया आणि आबालवृद्ध सतत अत्याचार व अन्यायाच्या भट्टीत होरपळत असतील, त्यांना सुधारणा, विकास, सफलता व समृद्धीपासून हेतुपुरस्पर रोखण्यात येत असेल, तेव्हा अशा विध्वंसकारी शक्तींना मुळासकट उपटून काढण्यात यावे.
‘जिहाद’च्या या पवित्र धारणात्मक क्षेत्रात प्रतिरक्षात्मक युद्धदेखील आलेच. परंतु हे विसरता कामा नये की आंदोलन आणि सभ्यतांची प्रत्येक लढाई ही एकप्रकारे प्रतिरक्षात्मक लढाई असते आणि दुसर्याप्रकारे अक्रामक, मात्र त्याचबरोबर ती सुधारात्मक आणि रचनात्मकसुद्धा असते.
जिहादच्या या धारणेनुसार आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायाचे त्यांच्या विरोधकांशी असे वर्तन होते की, जणू एखाद्या पडीक शेतीस तयार करून त्यात बगीचा लावू इच्छीतात. परंतु काही जंगली पशु, त्यांनी तयार केलेली शेती वारंवार खराब करतात आणि मग जेव्हा त्या बगीच्यात सुंदर फुले लागतात तेव्हा एक एक फूलझाड उपटून नष्ट करतात. मग या जंगली पशुंना कोणत्या नियम आणि नैतिक आधारानुसार स्वैराचार करण्यासाठी मोकळे रान सोडण्यात यावे? यासाठी कोणत्या नैतिक नियमांचा आधार घ्यावा? ‘अरब’मध्ये दोन शक्ती समोरासमोर होत्या. एकीकडे विधिवृत सुव्यवस्थित राज्य होते. या राज्यात स्वच्छ आणि शालीन समाज वावरत होता. हे राज्य संपूर्ण जगासाठी एक सफल संदेशाचा ध्वजधारी होता. दुसरीकडे अनेकेश्वरवादाच्या विवेकहीन आणि अमानवी धारणा व श्रद्धा होत्या. प्रत्येक कबिल्याची वेगळी विचारधारा आणि स्वरुप होते. नैतिक स्तर पतनग्रस्त होत्या. एक जुनाट गंजलेली सभ्यता आणि संस्कृती होती. या संस्कृतीत कोणताही प्रवाह नसून जमलेल्या पाण्याप्रमाणे ती सडत होती.
मक्का आणि मदीना दरम्यानचे युद्ध हे गृहयुद्ध स्वरुपाचे होते. हे युद्धक्रांती घडवून आणणार्या शक्तीविरुद्ध क्रांतीविरोधी शक्तींनी सुरु केले होते.
बद्रच्या पहिल्या युद्धाची पृष्ठभूमी अशी होती की, ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याविरुद्ध कुरैशजणांनी त्यांच्या हत्येचे भ्याड षडयंत्र रचले होते आणि ‘हिजरत’ च्या रात्री मक्काच्या गल्लोगल्ली तलवारी म्यानाच्या बाहेर आल्या होत्या. ‘अकबा’च्या ठिकाणी मदीनावासी ज्या वेळी प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेत होते, तेव्हाच त्यांना हे सत्य कळून चुकले होते की, प्रेषितांना मदीनास येण्याचे निमंत्रण देणे म्हणजेच मक्काच्या क्रूर सरदारांचे वैर घेणे आणि युद्धास सामोरे जाणे होय. मक्कावासीयांनी तर अब्दुल्लाह बिन उबईच्या मार्फत मदीनावासीयांना गुपित पत्रसुद्धा दिले होते की, ‘‘तुम्ही स्वतः प्रेषित मुहम्मद(स) यांना शहराबाहेर काढून टाका, अन्यथा आम्ही तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला ठार करून आणि तुमच्या पत्नी आणि मुली व बहिणींना आपल्या भोगविलासाचे साधन बनवू.’’ मग प्रत्यक्षात आणखीन एक संदेश मुस्लिमांना पाठविण्यात आला की, ‘‘असे समजू नका की, मक्का शहरातून सुरक्षित निसटल्याने आम्ही तुम्हास सोडून दिले. मदीना पोहोचून आम्ही नक्कीच तुमचा समाचार घेऊ.’’
त्याच काळात माननीय साद बिन मआज(र) यांना ‘अबुजहल’ या ईशद्रोह्याने प्रवेश करू दिला नाही आणि म्हणाला, ‘‘तुम्ही लोकांचा काबागृहात प्रवेश करणे आम्हाला मुळीच खपत नाही.’’ यावर माननीय साद बिन मआज(र) यांनीदेखील त्यास खडसावले की, ‘‘ठीक आहे, तुम्ही आम्हास काबागृहांचा मार्ग बंद केला तर आम्ही तुमचा व्यापारिक राजमार्ग बंद करू!’’
या सर्व घटनांच्या कड्या जोडून पाहिल्यास ही गोष्ट स्पष्ट होते की, मक्कावासीयांकडूनच सुरुवातीस युद्धाची घोषणा करण्यात आली. कुरैशजणांना आपली तलवार म्यानाबाहेर काढण्यासाठी काही कारणास्तव उशीर झाला खरा, अन्यथा हे कुकर्म त्यांनी खूप अगोदरच केले असते. त्यांच्यासमोर एक मोठी अडचन ही ‘किनाना’ परिवाराची होती. किनाना परिवार मक्का आणि मदीनाच्या मध्यात होता. किनाना परिवाराचे कुरैश परिवाराशी जुने हाडवैर होते. मदीनावर चढाई करण्यासाठी ‘किनाना’ प्रदेशातूनच जाणे भाग होते. कारण हाच एकमेव मार्ग मदीनास जाण्यासाठी होता. जुने वैर असल्याने कुरैशजणांना या मार्गावर किनानाजणांकडून अडविले जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर असा धोका संभावण्याचीदेखील भीती होती की, कुरैशजणांनी मदीनावर चढाई केली तर किनाना परिवाराचे लोक मागून येऊन मक्का शहरावर चढाई करतील किवा कुरैशजणांचा मक्का शहराशी असलेला मार्ग बंद करतील. ‘सुराका बिन मालिक’ हा किनाना परीवाराचा सरदार होता. त्याला जेव्हा परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा तो स्वतः मक्का शहरी गेला आणि तेथील इस्लामद्रोही सरदारांना सहाय्य करण्याचे अश्वासन दिले.
मक्कावासीयांची दुसरी समस्या ही योद्ध्यांना संघटित करण्याची होती. यासाठी हे ठरविण्यात आले की, हे प्रकरण ‘अहाबिश’च्या स्वाधीन करावे. कारण ते अत्यंत शूर आणि रागीट व संतापी स्वभावाचा होता. सुपारी घेऊन युद्ध करण्याचादेखील त्याचा व्यवसायच होता. त्यांनी मक्काच्या जवळ असलेल्या ‘अल अहाबिश’ नावाच्या खाडी प्रदेशात मक्कावासीयांबरोबर मैत्रीचादेखील करार केला होता.
तिसरी समस्या ही आर्थिक समस्या होती. म्हणून जो व्यावसायिक काफिला या वर्षी ‘सीरिया’ देशी चालला होता, त्यास मक्कावासीयांनी जास्तीतजास्त भांडवल गोळा करून दिले होते, जेणेकरून या व्यवसायातून मिळणार्या भरघोस नफ्याचा प्रचंड पैसा मदीनावर हल्ला चढविण्यासाठी कामी येईल.
खर्या अर्थाने विचार केल्यास हा काफिला व्यवसायिक नसून त्यातून कमाविलेल्या नफ्याचे प्रत्येक नाणे हे मुस्लिमांचे रक्त सांडण्यासाठी भाल्याचा फाळ आणि तलवारीची तीक्ष्ण धार होती. जगाच्या पाठीवरील कोणतेही राज्य आजही आपल्या प्रभावसीमांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांची उघड सूट कोणत्याही शत्रूक्तीस देत नाही. इस्लामद्वेष्ट्या कुरैशच्या व्यावसायिक काफिल्याविरुद्ध मुस्लिमांकडून जी कार्यवाही सुरु करण्यात आली होती तिचा उद्देश हा होता की, ‘कुरैश’ परिवाराची व्यापाराच्या आडची युद्धाची मोहीम अशसस्वी व्हावी.
या ठिकाणी थांबून आपण मागे घडलेल्या एका घटनेचा अढावा घेऊ या. ‘नखला’कडे प्रेषितांनी पाठविलेल्या एका तुकडीची कुरैश कबिल्याच्या काहीजणांशी झडप झाली आणि त्यात कुरैशांचा एक माणूस ठार झाला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या घटनेचे दुःख झाले. कारण इस्लामी शासनाकडून अद्याप अशा कार्यवाहीचा आदेश जारी झालेला नव्हता. प्रेषितांनी ठार झालेल्या माणसाच्या हत्येचा मोबदला कुरैशपरिवारास पाठवून घडलेल्या दुःखद घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. प्रेषितांनी हत्येचा मोबदला देऊनसुद्धा मक्का शहरात प्रेषितविरोधी भावना उफाळल्या आणि ही संधी साधून मक्कावाल्यांनी संपूर्ण मक्का शहराचे वातावरण गढूळ केले. संयोगाची बाब ही की मुस्लिम लष्कर तुकडीस ही गोष्ट माहीत नव्हती की, याच दिवसापासून माहे ‘हराम’ (शांतीमास) सुरु होत आहे. या महिन्यात कोणावरही चढाई वा हल्ला करणे संपूर्ण अरबच्या परंपरेविरुद्ध होते, ही गोष्टसुद्धा विरोधकांच्या प्रचाराचे साधन बनली आणि याच घटनेस कुरैशजणांनी लढाईसाठी पाऊल उचलण्याचे निमित्त बनविले.
परिस्थिती विचित्र होती. पवित्र रमजानचा पहिला महिना होता आणि रोजे (महिनाभराचे उपवास) आनिवार्य झाले होते. याच महिन्यात सत्य आणि असत्याची पहिली लढाई झाली आणि सत्यास विजय मिळाला. असत्य पराभूत झाले.
कुरआन अवतरित झालेल्या या महिन्यास ईश्वराने ईशपरायणता आणि प्रशिक्षणाचे साधन बनविले. या ईशपरायणता आणि प्रशिक्षणाशिवाय इस्लामी जिहादच्या बाबतीत कल्पना करणेच शक्य नाही.
प्रशिक्षणाचा हा महिना श्रद्धावंतांसाठी एक मोठी परीक्षाच असते. रमजान महिना हा या गोष्टीची कसोटी असतो की, जगामध्ये सत्य प्रस्थापना करणारे आणि असत्याचे निर्मूलन करणारे वीर क्रांतिकारी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पुढे येताहेत की नाही. त्यांचा आपल्या मनोकामना आणि अभिलाषांवर ताबा आहे की तेच आपल्या मनोकामना आणि अभिलाषांचे दास व गुलाम आहेत? जर त्यांचा ताबा नसेल तर उत्तुंग हेतु आणि उद्देशांचे केवळ नारे तर कोणीही लावू शकतो, परंतु निर्णायक बाब अशी की, त्याग आणि संकटे झेलण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे काय? ‘रमजान’हा पवित्र महिना ईश्वरी सैन्यास असा जिहाद करणार्यांना तयार करण्याची कसोटी आहे, जे भूक, तहान सहन करून आणि इतरांची निदानालस्तीसारख्या दुष्कृत्यापासून दूर राहून ईश्वरी आदेशाचे पालन करावे. नसता एखादा माणूस खाण्यापिण्यावरील काही तासांचे बंधन सहन करु शकत नाही. दांपत्यिक सुख काही काळापुरते त्यागू शकत नाही आणि मग तो जर इस्लामची सेवा, इस्लामी क्रांती आणि इस्लामी स्वरुपाच्या गप्पा मारत असेल, तर या निव्वळ गप्पाच असतील. यामुळे कोणाचे आणि स्वतःचेही भले होणार नाही. जगावर अशा लोकांनाच विजय मिळविता येतो, जे दुसर्यांशी लढण्यापूर्वी स्वतःशी लढून स्वतःवर विजय प्राप्त करतात.
पवित्र आणि मंगलमय रमजान महिन्यात मुस्लिम मुजाहिदीन (धर्मयोद्धे) प्रथमच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नेतृत्वात जिहादच्या मार्गावर पाऊल टाकतात.
पवित्र आणि मंगलमय रमजान महिन्यात मुस्लिम मुजाहिदीन (धर्मयोद्धे) प्रथमच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नेतृत्वात जिहादच्या मार्गावर पाऊल टाकतात.
0 Comments